गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात बंगलोरमधील एका महिला संघटनेने स्त्री-सखी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात अनेक स्त्री-पुरुषांनी महिलाविषयक प्रश्नांवर चर्चा केली, अनेक नवीन प्रश्नांना वाचा फोडली. या मेळाव्यातील श्रोत्यांच्या सहभागासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम योजला होता. आयोजकांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणून असे प्रश्न वेगवेगळ्या चिठ्यांवर लिहून ते श्रोत्यांमध्ये सोडत पद्धतीने वाटले. नंतर त्या श्रोत्यांनी या प्रश्नांना यथायोग्य उत्तरे दिली. त्यातल्या एका प्रश्नाला एका प्रथितयश श्रोत्याने दिलेले उत्तर ऐकून मी पुष्कळ अस्वस्थ झालो. शिवाय त्या उत्तरावर काहीच प्रतिक्रिया किंवा आक्षेप, विशेषतः सहभागी स्त्रियांकडून, न आल्याने मनात खंत निर्माण झाली. या मौनाचा अर्थ त्या उत्तरातील विचारांचा स्वीकार असा तर नाही ना, हा प्रश्न मनात आला व त्यातून निर्माण झालेले वैचारिक आंदोलन इतरांपुढे मांडावे असे वाटले.
प्रश्न सर्वसाधारणपणे असा होता “आज समाजात, विशेषतः दंगलीत, स्त्रियांवर अत्याचार होतात का आणि असल्यास त्यावर उपाय काय?” प्रश्न महत्त्वाचा होता पण त्याला दिलेले उत्तर अत्यंत क्लेशकारक होते. दुर्दैव म्हणजे एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाला धार्मिक वळणाने उत्तर दिले गेले. उत्तरातील महत्त्वाचे, माझ्या दृष्टीने विवाद्य मुद्दे पुढील प्रमाणे त्यांत होते: १) धार्मिक दंगली सोडल्यास, सर्वसामान्यपणे इतर दंगली, मोर्चे, आंदोलने ह्यांत स्त्रियांवर अत्याचार होत नाहीत. २) हिंदू धर्मात स्त्री-पुरुष समसमान असल्याने हिंदूंमध्ये स्त्रियांवर अत्याचार कमी होतात. इतर धर्मांत मात्र स्त्रियांना कमी लेखले असल्याने त्या धर्मांत स्त्रियांवर अत्याचार होतात. ३) स्त्रिया अबला असल्याने त्यांच्यावर अत्याचार होतात. त्याला उपाय म्हणजे स्त्रियांनी आपली कुवत ओळखून वागले पाहिजे किंवा आपली मानसिकता बदलून, अत्याचारांचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे.
वरवर साध्या व योग्य वाटणाऱ्या या उत्तरांमध्ये उथळपणा व धार्मिक दांभिकपणा दडलेला आहे असे मला वाटले. लगेचच मनात निर्माण झालेली प्रतिक्रिया सर्वसाधारणपणे अशी आहे: १) कोणत्याही दंगलीत किंवा एरवीसुद्धा संधी मिळेल तिथे स्त्रियांवरच जास्त अत्याचार होतात. हे अत्याचार शारीरिक, मानसिक व वैचारिकही असतात. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपांत आणि मोर्चात स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांची अनेक उदाहरणे आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झालेल्या दंग्याधोप्यांत अनेक गुजराती-मारवाडी दुकाने लुटताना तिथल्या स्त्रियांवर अत्याचार झाले. आजही शिवाजी पार्कवरील राजकारणी सभा सुटल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन स्त्रियांवर शारीरिक अत्याचार केले जातात. राजकारणात, पक्ष कार्यकर्त्यांत, स्वयंसेवी संघटनांमध्ये, विविध कार्यालयांत, अगदी प्रार्थनास्थळांमध्येही स्त्रियांवर मानसिक अत्याचार होत असतातच. समाजात ५०% लोकसंख्येतील वाटा असलेल्या स्त्रियांना ३०% आरक्षण निवडणुकीत देण्यास सर्व पक्षांच्या पुरुषी राजकारण्यांचा असलेला विरोध हा स्त्रियांवरील वैचारिक अत्याचार नव्हे का ? २) स्त्रियांना धर्म नसतो. त्या प्रथम स्त्रियाच असतात. जगभर सर्व धर्मांमधून, जमातींमधून स्त्रियांवर अत्याचार होत राहिले आहेत. हिंदू धर्म ह्याला अपवाद मुळीच नाही. अगदी महाभारतातसुद्धा द्रौपदीवरील अत्याचार सर्व पुरुषी लढवय्यांनी शांतपणे पाहिला. सीतेवर मानसिक अत्याचार झाले नाहीत का? विविध लढायांमध्ये जेत्यांकडून पराजित शत्रूच्या स्त्रियांवर अत्याचार केल्याची उदाहरणे आहेत. त्यात धर्माचा भेदभाव नाही. अगदी आजसुद्धा उत्तर प्रदेश, बिहार येथील दलित वस्त्यांवर होणारे हल्ले व स्त्रियांवरील बलात्कार हे हिंदू जमीनदारांकडूनच होतात ना ? आणि मुंबई महानगरात लोकलमध्ये किंवा बस स्थानकावर किंवा भर वर्गात होणारे अत्याचार हे पुरुषी असतात. त्यांना धर्म नसतो. आणि विवाह होताच स्त्रीचे नाव बदलायला लावणाऱ्या धर्मात व समाजात कसली स्त्री-पुरुष समानता आहे ? एक गंमत सर्व धर्मांत आहे. अगदी आंतरधर्मीय विवाह करणारे पुरुषसुद्धा विवाहाच्या वेळी आपल्या पत्नीला तिचा धर्म बदलून आपला धर्म स्वीकारायला लावतात! स्त्रियांवरील अत्याचारांच्या बाबतीत पुरुष हे अतिशय धर्मनिरपेक्ष असतात! ३) स्त्रियांवरील अत्याचाराला उत्तर म्हणून स्त्रियांना प्रतिकारक्षम व्हायला सांगणे व मानसिकता बदलायला सांगणे हा केवळ पुरुषी दांभिकपणा झाला. मुंबईतील आक्रमक स्वभावाच्या कोळणींना पुरुष घाबरतात हे सत्य आहे. पण गेल्या वर्षी कोळी समाजाने मुंबईतील भैयांविरुद्ध केलेल्या आंदोलनाच्या वेळी या कोळणींचीही हेटाळणी केली गेली, जाहीरपणे. एरवी राजकारणात सबल असलेल्या स्त्रियांची ‘स्त्री’ म्हणून हेटाळणी जगभरचे पुरुष करत असतात, मग ती मार्गारेट थेंचर असो, इंदिरा गांधी असो किंवा आजची सोनिया गांधी असो. स्त्रियांवरील अत्याचार दूर होण्यासाठी पुरुषांची विकृत मानसिकता बदलण्याची गरज आहे. हा सामाजिक प्रश्न आहे, धार्मिक नव्हे.
‘वृंदावन’, २२७, राजमहाल विलास एक्स्टेंशन-२, फर्स्ट मेन रोड, बंगलोर-५६००९४
पायवा
या सदरात आजचा सुधारकच्या पहिल्या काही वर्षांतील लेख पुनःप्रकाशित केले जातात. या अंकात डॉ. कल्पेश जोशी यांचे एक पत्र आहे. त्यानिमित्ताने रामकृष्ण परमहंसांच्या साक्षात्कारांबद्दलच्या १९९४ सालच्या एका चर्चेचा काही भाग देत आहोत. सं. श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार नी.र. व-हाडपांडे यांच्या जून १९९४ (अंक ५.३) मधील लेखातून,
मानवाला जे ज्ञान प्राप्त होते ते फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी होते. या प्रमाणांच्या पलीकडे साक्षात्कार नावाचे एक प्रमाण आहे, त्याने होणारे ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांनी होणाऱ्या ज्ञानापेक्षा अधिक प्रमाण आहे, म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान यांनी झालेले ज्ञान साक्षात्काराने झालेल्या ज्ञानाच्या विरुद्ध असेल तर प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी झालेले ज्ञान खोटे मानावे; शिवाय साक्षात्काराने अशा काही विषयांचे ज्ञान होते की जे प्रत्यक्ष व अनुमान यांनी होऊच शकत नाही असे एक मत प्रचलित आहे. ईश्वर, परलोक वगैरेंचे ज्ञान साक्षात्काराने होते व म्हणून साक्षात्काराच्या विरुद्ध प्रत्यक्ष व अनुमान यांची साक्ष अप्रमाण आहे असे साक्षात्कारवाद्यांचे म्हणणे आहे.
विवेकवाद साक्षात्काराचे अस्तित्व मानीत नाही असे मी जेव्हा प्रतिपादन करतो, तेव्हा माझ्यावर नेहमी अनेक इतिहासप्रसिद्ध साक्षात्कारी पुरुषांची नावे फेकण्यात येतात. ‘साक्षात्कार झालेल्या एवढ्या महान व्यक्ती होऊन गेल्या असताना साक्षात्काराचे अस्तित्व तुम्ही कसे नाकारू शकता?’ असा प्रश्न बिनतोड म्हणून विचारण्यात येतो. या प्रश्नाचे उत्तर देताना फार पंचाईत होते. कारण या सर्व व्यक्ती इतिहासप्रसिद्ध व लक्षावधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान बनलेल्या आहेत. प्रश्न विचारणाऱ्यांची त्यांच्यावर नितान्त श्रद्धा असते. अर्थात् या व्यक्तींच्या साक्षात्कारसामर्थ्याबद्दल विज्ञानपूत विवेचन केले तर या श्रद्धाळू व्यक्तींवर ते समजण्याच्या दृष्टीने परिणाम न होता त्यांचा द्वेष संपादन करण्यात मात्र त्या विवेचनाची फलश्रुति होते. अशी चर्चा करायला आधुनिक काळातील पुरुषांचेच उदाहरण घेतले पाहिजे पण अशा व्यक्तींच्या खाजगी जीवनाबद्दलदेखील पुरेपूर माहिती उपलब्ध असली पाहिजे, केवळ प्रकाशाच्या झोतात असलेल्या सार्वजनिक जीवनाची माहिती असून भागणार नाही.
वरील अटी ज्यांच्या बाबतीत काही प्रमाणात पुऱ्या होतात अशी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे रामकृष्ण परमहंस. ते आधुनिक काळात झाल्यामुळे त्यांच्या चरित्राबद्दल पुष्कळ वायय उपलब्ध आहे. शिवाय साक्षात्काराच्या बाबतीत जी नावे माझ्यावर फेकण्यात येतात त्यांतले हे नाव आहे. तेव्हा रामकृष्णांबद्दलच्या उपलब्ध माहितीवरून साक्षात्काराचे अस्तित्व सिद्ध होते काय याचा विचार करणे उद्बोधक होईल.
हा विचार उद्बोधक होण्यासाठी रामकृष्णांच्या भक्तांनी आपल्या श्रद्धा थोडा वेळ बाजूला ठेवणे आवश्यक आहे. विषय समजून घेण्याची इच्छा नसताना केवळ मला चूप बसविण्यासाठी जे लोक रामकृष्णांचे नाव घेत असतील त्यांना हा लेख वाचून फायदा होणार नाही, उलट माझ्याबद्दल द्वेषभावच उत्पन्न होईल. तेव्हा आपली श्रद्धा थोडा वेळ बाजूला ठेवणे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी हा लेख वाचू नये. कुणाच्या भावना दुखाविणे हा माझा उद्देश नसून सत्यावर प्रकाश टाकणे हा उद्देश आहे. तो सफल व्हायचा असेल तर वाचकांचे सहकार्य आवश्यक आहे.
कलाकार रामकृष्ण
रामकृष्ण परमहंसाच्या जीवनातील आपल्या प्रश्नाशी निकटचा संबंध असलेल्या घटना अश्या. रामकृष्ण परमहंसांना लहानपणापासून संगीत, अभिनय इत्यादि कलांचा नाद होता. पण ज्याला शालेय शिक्षण म्हणतात त्याबद्दल त्यांना मनस्वी अप्रीती होती. ते जवळ जवळ अशिक्षितच होते असे म्हटले तरी चालेल. ‘मला केवळ पोट भरण्याची विद्या नको, ईश्वरप्राप्ती करून देईल असे ज्ञान पाहिजे’ असे ते म्हणत. ईश्वरप्राप्तीसाठी रात्रीबेरात्री एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन ध्यानस्थ बसणे, कालीच्या मूर्तीसमोर बसून दर्शनासाठी व्याकुळ होणे यांत त्यांचा पुष्कळ काळ जाई. एकदा काली दर्शन देत नाही म्हणून वैतागाने ते स्वतःचा शिरच्छेद करून घेण्यास प्रवृत्त झाले. पुढे त्यांना कालीचे दर्शन झाले व समोर काली दिसते आहे अशा थाटात तासन्तास वागणे त्यांनी सुरू केले.
या आध्यात्मिक कृत्याबरोबर त्यांचे संगीत/अभिनयादि क्षेत्रातील नैपुण्यही पुष्कळ वेळा प्रकट झाले. कुठे नाटक बसत असताना एखादे पात्र आजारी पडले तर त्याचे काम त्यांनी पत्करावे, सारेच नाटक दिग्दर्शित करावे. त्यांना साऱ्याच पात्रांच्या नकला अनायासाने पाठ होत. एकदा शिवरात्रीच्या दिवशी करावयाच्या एका नाट्यप्रसंगात शिवाची भूमिका करणारा मुलगा आजारी पडल्यामुळे रामकृष्णांनी ते काम पत्करले. शिवाची वेशभूषा करून रंगभूमीवर आल्याबरोबर रामकृष्णांना ‘भावसमाधि’ लागली. त्यांच्यात काहीच हालचाल नाही असे पाहून लोक रंगमंचावर गेले व पाहतात तो रामकृष्ण शुद्धीवर नाहीत. (शुद्धीत नसलेला माणूस उभा राहू शकतो काय हा येथे प्रश्न उद्भवतो). त्यांना उचलून घरी नेण्यात आले. घरी नेल्यावरही त्यांची ‘भावसमाधि’ उतरायला बराच वेळ लागला. या प्रसंगापूर्वी एकदा शेतात फिरत असता आकाशात उडणाऱ्या बलाकांची माला पाहून त्यांना अशीच ‘भावसमाधि’ लागली होती. रामकृष्ण आणि विवेकानन्द रामकृष्णांच्या भावाने रासमणी नावाच्या एका कोळी जातीच्या राणीने बांधलेल्या कालीच्या मंदिरात पुजाऱ्याचे काम स्वीकारले व काही दिवसानंतर रामकृष्णांना तेच काम स्वीकारण्यास सांगितले. रामकृष्ण ते काम स्वीकारण्यास अत्यंत नाखूष होते, कारण कोळी ही हलकी जात समजली जात होती व कोळ्याची नोकरी करणे अर्थातच अप्रतिष्ठेची बाब होती. देवीला प्रार्थना करतानादेखील बरेच दिवस रामकृष्ण “आई, हे काय माझ्या नशिबी कोळ्याचे अन्न खाणे तू लिहिलेस?” म्हणून देवीजवळ हळहळ व्यक्त करीत असत. एकदा राणी देवळात देवीच्या दर्शनास आली. रामकृष्णांशी नमस्कार चमत्कार झाल्यानंतर जवळ त्यांचा जावई तिचा कारभार पाहत होता, त्याला तिने मालमत्तेबद्दल चाललेल्या एका खटल्याबद्दल विचारले. ते ऐकून रामकृष्ण एकदम संतापले व राणीला म्हणाले “हे काय देवीच्या मंदिरात देखील तुम्हाला सांसारिक गोष्टी सुचतात?” केवळ असे म्हणूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी राणीच्या मुस्कटात भडकावून दिली.
रामकृष्ण मला देवीचे दर्शन होते असे म्हणत व आपल्या शिष्यांनाही आपण तिचे दर्शन करवून देऊ शकतो असा त्यांना विश्वास होता. त्यांच्या शिष्यांपैकी विवेकानन्द हे जगत्प्रसिद्ध झाले. ते पूर्वाश्रमी नास्तिक होते. रामकृष्णांना ते भेटले तेव्हा ते अत्यंत आर्थिक विवंचनेत होते. रामकृष्णांनी त्यांच्या तोंडचे भजन ऐकले होते व त्यांच्या संगीतावर ते लुब्ध झाले व त्यांना त्यांनी भेटीस बोलावले. विवेकानंद हे आपले पुरुष प्रियकर व आपण स्त्री अशी भावना रामकृष्णांच्या मनात उद्भूत होत असे. पूर्वीदेखील कृष्णाची राधारूपाने उपासना करणे हा एक रामकृष्णांचा छंद होता. त्यांना राधारूपात “भावसमाधि’ लागली की स्त्रियांचे मासिक धर्मदेखील होत असा त्यांना अनुभव येई…
रामकृष्णांना विवेकानंद भेटले तेव्हा आपण रामकृष्णात विलीन होत आहोत असा त्यांना अनुभव आला. ‘मला असला काही अनुभव नको, माझी आर्थिक विवंचना दूर करण्याची तुमच्या देवीला विनंती करा’ असे विवेकानंद म्हणाले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना सांगितले की “मी तुलाच देवीचे दर्शन होईल अशी व्यवस्था करतो, तूच तिला धन मागून घे.’ या वचनानुसार रामकृष्णांच्या अनुग्रहाने विवेकानंदांना देवीचे दर्शन झाले, पण देवीला धन मागणे ते विसरून गेले. उलट त्यांनी भक्ति, ज्ञान वगैरेंची मागणी केली. रामकृष्णांनी हिंदुधर्माबरोबरच इतर साऱ्या धर्मांची साधना केली. इस्लामी धर्माची साधना करताना त्यांनी गोमांस वगैरे देखील खाल्ले व इस्लामी उपासनेप्रमाणे नमाज वगैरे पढण्याचा क्रम ठेवला. त्यांना पैगंबराचे दर्शन झाले. याच प्रकारे ख्रिस्ती धर्माची उपासना केली असता त्यांना ख्रिस्ताचे दर्शन झाले. आयुष्याच्या शेवटच्या काळात रामकृष्णांना घशाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर झाला. त्यांना अन्नदेखील खाता येईना. तेव्हा त्यांचे शिष्य म्हणाले, ‘आपल्या देवीला विनंती करून चार घास खाता येतील असा अनुग्रह मागून घ्या ना.’ त्यावर रामकृष्णांनी ‘भाव-समाधीत’ देवीची भेट घेऊन तिला चार घास खाण्याची शक्ती देण्याची विनंती केली. त्यावर देवी म्हणाली, “सर्व मानवांची तोंडे ही तुझीच तोंडे आहेत. या तोंडाच्या रूपाने तू खातच नाहीस काय ?’ शेवटी कर्करोगानेच रामकृष्णांचा मृत्यू झाला.
रामकृष्णांच्या जीवनाचा वरील वृत्तान्त रामकृष्णमठ, नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या श्रीरामकृष्णलीलाप्रसंग या ग्रंथावर आधारलेला आहे. शिवाय रामकृष्णमठातील प्रवचनाचा त्याला आधार आहे.
आता वरील चरित्रावरून साक्षात्काराचे अस्तित्व कसे काय सिद्ध होते ते पाहू. रामकृष्णांना बलाका पाहून जी ‘भावसमाधी’ लागली तो मिर्गीचा झटका होता असेच त्यांचेच आईबाप मानीत व त्यांनी रामकृष्णांना उपचारासाठी डॉक्टरकडेदेखील नेले होते. डॉक्टरही या मताशी सहमत होते. मिर्गीला इंग्रजीत ‘एपिलेप्सी’ म्हणतात. या एपिलेप्सीच्या झटक्यामध्ये कधी कधी व्याधिताला पूर्वसूचना मिळत असते, ती विशिष्ट वासाच्या वा प्रकाशाच्या स्वरूपाची असू शकते. तसेच या झटक्यात कधीकधी भास होतात. रणांगणावरून परत आलेला एक शिपाई मिर्गीचा झटका येऊन समोरील मुलालाच झोडपू लागला.त्या मुलाला इतरांनी वाचविले. झटका उतरल्यावर तो शिपाई आपण नुकतेच युद्धभूमीवरून परतून आलो आहोत. या युद्धात आपण चारही बाजूंनी घेरणाऱ्या शत्रुसैन्याला चांगले पाणी पाजले असे सांगू लागला. रामकृष्णांनी रासमणी राणीला मारलेली थप्पड अशीच मिर्गीच्या झटक्यात मारली हे स्पष्ट आहे. रामकृष्ण परमहंसांना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूति’ हा मिर्गीचाच प्रकार होता.
ज्यांना जागेपणी भास होतात अशा लोकांच्या व्यक्तित्वात एक विशेष हा असतो की ते उत्कट प्रमाणात सूचन म्हणजे सजेश्चनला (suggestion) बळी पडणारे असतात. मनुष्य जेव्हा पूर्णपणे विश्रब्ध अवस्थेत, कोणताही ताण नसलेल्या निद्रापूर्व अवस्थेत असतो तेव्हा त्याला ‘तुझ्यासमोर परी उभी आहे ती तुझी सेवा करीत आहे.’ वगैरे सूचन केले तर त्याला खरोखरीच परी दिसू लागते. या अवस्थेला मोहनिद्रा म्हणतात. सूचन दुसऱ्या एखाद्या प्रतिष्ठासंपन्न व्यक्तीने केले तर जशी मोहनिद्रा लागते त्याचप्रमाणे स्वतःच स्वतःला सूचन केल्यानेदेखील मोहनिद्रा लागते. मनावर देवीबद्दलच्या श्रद्धांचे संस्कार दृढ असले की अशा मोहनिद्रेत देवीचे दर्शन होणे ही गोष्ट काही दुर्घट नाही. रामकृष्ण परमहंस हे उत्तम नट, गायक व चित्रकारदेखील होते. नटाला व चित्रकाराला कल्पनेच्या जगात स्वतःचे व्यक्तित्व विसरून रममाण होण्याची शक्ती असते. त्यातून कल्पनेचा विषय धार्मिक श्रद्धेचाही विषय असेल तर सर्वसाधारण नटाला नाटक व वास्तव यांच्यातील भेदाची जी सतत जाणीव असते ती श्रद्धाळू मनातून नाहीशी व्हायला वेळ लागत नाही. विवेकानंद रामकृष्णांना भेटले तेव्हा अत्यंत विवंचनेत होते. अशा विवंचनेच्या अवस्थेत माणसाची सूचनीयता वाढते. रामकृष्णांच्या प्रभावाने विवेकानंदांना आलेले अनुभव हे मोहनिद्रेच्या स्वरूपाचे होते. याचे प्रमाण हे की त्या अनुभवांच्या सत्यतेचा पडताळा येत नव्हता. विवेकानंदांनी देवीला आपली विपन्नावस्था दूर करण्यास सांगितले असता ती विपन्नावस्था दूर झाली असती तर त्या देवीदर्शनापासून काही खरे व प्रत्यक्ष दिसणारे परिणाम होतात असे दिसून आले असते. पण विवेकानंद देवीला धन मागण्यास विसरून जात असत. म्हणजे ज्या परिणामांचा पडताळा पाहता येईल असे कोणतेही परिणाम विवेकानंदांची देवी घडवून आणू शकत नव्हती. हेच खुद्द रामकृष्णांच्या अनुभवांनाही लागू आहे. रामकृष्णांनी कर्करोगाने पीडलेल्या घशामुळे अन्न खाता येत नाही म्हणून देवीकडे तक्रार केली, तेव्हा देवीने त्यांना अन्न खाता येईल असा कोणताही इतरांना पडताळून पाहता येईल असा चमत्कार केला नाही. उलट ‘तू इतरांच्या तोंडाने खातच नाहीस काय?’ असा टाळाटाळीचा प्रश्न केला.
रामकृष्णांनी इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांची साधना करून त्या त्या धर्मात सांगितलेले निःश्रेयस प्राप्त केले असे सांगण्यात येते. पण इस्लामच्या सांगण्याप्रमाणे उपासना केल्याने पैगंबराचे दर्शन होते असे इस्लाम सांगत नाही. पैगंबराचे दर्शन करवून घेणे हे इस्लामचे ध्येय नाही व ख्रिस्ताचे दर्शन हे ख्रिस्ताच्या अनुयायांचे अंतिम साध्य नाही. कयामतच्या दिवशी स्वर्गप्राप्ति करून घेणे हे दोन्ही धर्माचे ध्येय आहे. तेव्हा रामकृष्णांची इतर धर्मांची उपासना ही त्या त्या धर्मांच्या तत्त्वाप्रमाणे नसून हिंदुधर्माच्या समजुतीप्रमाणे राम व कृष्ण यांच्याऐवजी पैगम्बर व ख्रिस्त यांचे नाव गोवून केलेली उपासना होती.
साक्षात्कारामुळे नैतिक उन्नयन व्हावे अशी अपेक्षा आहे. पण रामकृष्णांना साक्षात्काराचा असा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यांच्या जातींच्या उच्चनीचतेबद्दलच्या भावना कायम होत्या. तसेच तेविसाव्या वर्षी स्वतःच पुढाकार घेऊन सहा वर्षांच्या मुलीशी लग्न करणे व नंतर तिला संसारसुख न देता जन्मभर विवाहित ब्रह्मचर्यात ठेवणे हे त्यांचे कृत्य भूषणास्पद म्हणून सांगण्यासारखे नाही.
चर्चाः साक्षात्कार आणि विवेकवाद
डॉ. प्रसन्न दाभोलकर (M.D., Psychiatry) यांच्या ऑगस्ट १९९४ (अंक ५.५) मधली चर्चात्मक टिपणातून.
(ख) श्री. वहाडपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाला होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता. या दोन्ही अवस्था एपिलेप्सीमुळे (मिर्गी) श्रीरामकृष्णांना होत होत्या हे प्रतिपादन खालील कारणांमुळे सदोष वाटते.
(अ) आजही एपिलेप्सीचे अचूक निदान करणे यासाठी एपिलेप्सीचे नेमके ज्ञान, अनुभव व जरूर पडल्यास मेंदूच्या खास तपासण्या यांची गरज असते. आजही एपिलेप्सीच्या १० ते १५% रुग्णांमध्ये एपिलेप्सी हे निदान चुकीचे केलेले आढळते. श्रीरामकृष्णांच्या काळात एपिलेप्सीचे ज्ञान कमी होते, मेंदूच्या विशेष तपासण्यांचा शोध लागलेला नव्हता व एपिलेप्सीवरील औषधेही उपलब्ध नव्हती. एखाद्या व्यक्तीत आढळून येणारी देवीच्या दर्शनाची स्थिती व/वा भावानुभूती ही १००% एपिलेप्सी आहे, असे विधान करण्यासाठी त्या व्यक्तीची एएऋ शश्रशाशी या प्रकारे तपासणी करून असे अनुभव त्या व्यक्तीला येत असताना त्याच्या मेंदूत विशिष्ट विद्युतबदल आढळून येतात असे सिद्ध करावे लागेल. श्रीरामकृष्णांच्या काळी अशी तपासणी उपलब्ध नव्हती. वैद्यकशास्त्रामध्ये एखाद्या आजाराच्या अस्तित्वाचा अप्रत्यक्ष पुरावा मानण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत आपल्याला संपूर्ण खात्री देऊ शकत नाही, पण इतर तपासण्या उपलब्ध नसल्यास ही वापरली जाते. ही पद्धत म्हणजे रुग्णाला जो आजार आहे असे डॉक्टरला वाटत असते त्याचे औषधोपचार रुग्णावर करणे आणि आजार बरा झाल्यास रुग्णाला तो आजार आहे असे मानणे, (काही रुग्णात हे मानणे चुकीचे ठरेल हे गृहीत धरून.) श्रीरामकृष्णांच्या काळात एपिलेप्सीवरील औषधे उपलब्ध नव्हती त्यामुळे अर्थातच असा अप्रत्यक्ष पुरावा मिळणेही शक्य नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विचार करता केवळ श्रीरामकृष्णांचे आईवडील त्यांना लागलेली भावसमाधी हा मिर्गीचा झटका होता असे मानीत व डॉक्टरही त्या मताशी सहमत होते आणि मिर्गीला इंग्रजीत एपिलेप्सी म्हणतात म्हणून श्रीरामकृष्णांना एपिलेप्सी होती हे प्रतिपादन निःसंशयपणे सिद्ध होत नाही. आता थोडे सखोल विवेचन करू.
(ब) एपिलेप्सीमध्ये अनेक प्रकार आहेत. तो एकच आजार नाही. त्यामुळे एखाद्याला नुसती एपिलेप्सी आहे असे म्हणणे अपुरे ठरते आणि त्याला कोणत्या प्रकारची एपिलेप्सी आहे हे सांगणे आवश्यक असते. श्री.व-हाडपांडे यांनी या बाबीचा उल्लेखही केला नाही. श्रीरामकृष्णांना होणारे देवीचे दर्शन व भावानुभूती ही एपिलेप्सीच्या एखाद्या प्रकारात बसू शकते का ते पाहू.
विशिष्ट मानसिक अवस्था हेच मुख्य लक्षण असणारे एपिलेप्सीचे तीन प्रकार आहेत : (१) Simple partial seizures, psychic, (2) Complex partial seizures, (3) Simple or complex partial seizures with secondary generalization. यातील तिसऱ्या प्रकारात शेवटी माणूस पूर्णपणे बेशुद्ध पडून त्यास आकडी (convulsion) येते. श्रीरामकृष्णांना आकडी (बेशुद्ध पडून हातापायांची विशिष्ट प्रकारे हालचाल) येत असल्याचे वर्णन नाही. त्यामुळे या प्रकारची एपिलेप्सी त्यांना नव्हती. Simple partial seizures, psychic व Complex partial seizures या दोन्ही प्रकारात दर झटक्याच्या वेळी तोच अनुभव येतो. जणू मेंदूमध्ये एक रेकॉर्ड बसवलेली असते दर झटक्याच्या वेळी तीच रेकॉर्ड लावली जाते. श्रीरामकृष्णांना होणारे देवीचे दर्शन अशा प्रकारचे नव्हते. त्यांना वेगवेगळ्या देवांचे दर्शन होई आणि त्यांच्याशी ते परिस्थितीप्रमाणे वेगवेगळा संवाद करीत. त्यामुळे श्रीरामकृष्णांना होणारे देवीचे दर्शन एपिलेप्सीचा प्रकार ठरू शकत नाही. त्यांना होणारी भावानुभूती म्हणजे नेमके काय अनुभव होते याचे वर्णन श्री वहाडपांडे यांनी दिलेले नाही. तो अनुभव दर वेळी तसाच येत असल्यास एपिलेप्सी हे त्याचे एक कारण असू शकते. तो अनुभव त्यांना संपूर्ण व सुसंगतपणे आठवत असल्यास ती simple partial seizure, psychic ठरेल आणि तो अनुभव त्यांना पूर्ण व सुसंगत आठवत नसल्यास वा अजिबात आठवत नसल्यास (आपल्याला काही अनुभव आला हेही रुग्णाला आठवत नाही) ती complex partial seizure ठरेल. याबाबतही नेमकी माहिती श्री वहाडपांडे यांनी दिलेली नाही. मलाही श्रीरामकृष्णलीलाप्रसंग हा ग्रंथ मिळू शकला नाही. परंतु असे झटके हे बहुसंख्य रुग्णांत काही सेकंद ते मिनिटांपर्यंत टिकतात आणि श्रीरामकृष्णांमध्ये ते बराच काळ टिकत. ही गोष्ट हे झटके एपिलेप्सीचे असण्याची शक्यता कमी करते.
(II) ‘रामकृष्णांनी रासमणी राणीला मारलेली थप्पड अशीच मिर्गीच्या झटक्यात मारली हे स्पष्ट आहे’ असे श्री. व-हाडपांडे यांचे म्हणणे आहे. श्रीरामकृष्णांना एपिलेप्सी होती हे म्हणणे मला का चूक वाटते यांची सविस्तर मांडणी वर केलेली आहेच. तरीही त्यांना एपिलेप्सी होती असे गृहीत धरून या थपडेच्या प्रसंगाचा विचार करू.
एपिलेप्सीचे बहुसंख्य रुग्ण आयुष्यात कधीही एपिलेप्सीमुळे रागीट/हिंसक/आक्रमक बनत नाहीत. एपिलेप्सीमुळे अशा प्रकारची घटना घडणे ही अगदी क्वचित होणारी गोष्ट आहे. जेव्हा असे घडते तेव्हा एपिलेप्सी आणि हिंसकता (violence) यांचा तीनपैकी एक प्रकारे संबंध असतो. (1) Ictal violence एपिलेप्सीचा झटका चालू असताना निर्माण झालेली हिंसकता. (2) Post-ictal violence एपिलेप्सीचा झटका संपल्यावर व पूर्ण शुद्धीवर येण्यापूर्वी निर्माण झालेली हिंसकता. (३) inter-ictal violence एपिलेप्सीच्या दोन झटक्यांमधील काळात निर्माण झालेली हिंसकता.
Ictal violence या प्रकारात एपिलेप्सीच्या रुग्णाचे हिंसक वागणे हे बाह्य कारणाने निर्माण न झालेले (unprovoked) व दिशाविहीन (non-directed) असे असते. श्रीरामकृष्ण हे रासमणी राणीवर रागावले होते, म्हणजेच त्यांचे थप्पड मारणे unprovoked नव्हते. आणि ते राणीला एकच थप्पड मारून थांबले, तिला वा इतरांना बेभानपणे मारीत सुटले नाहीत यावरून त्यांचे वागणे non-directed नव्हते. या कारणास्तव थप्पड प्रकरण हा ictal violence चा प्रकार म्हणता येणार नाही.
Post-ictal violence या प्रकारात प्रथम एपिलेप्सीचा झटका येतो आणि नंतर रोगी हिंसक बनतो. थप्पड प्रकणात आधी श्रीरामकृष्णांना असा झटका (देवीचे दर्शन वा भावानुभूती) आल्याचा उल्लेख श्री. व-हाडपाडे यांच्या लेखात नाही. या प्रकारच्या हिंसकपणात रुग्ण गोंधळलेल्या अवस्थेत असतो आणि त्याला आवरायला गेल्यास तो अधिक हिंसक बनतो. श्रीरामकृष्ण अशा अवस्थेत होते असा उल्लेख लेखात नाही. यामुळे थप्पड प्रकरण हा झीं-ळलीरथ ळेश्रशपलश चाही प्रकार म्हणता येणार नाही.
Inter-ictal violence हा एपिलेप्सीशी संबंधित आहे असे अजून सर्वमान्य झालेले नाही. ज्या रुग्णांमध्ये असा संबंध असल्याचा दाट संशय घेण्यात येतो त्यांच्यात त्यांनी हिंसेच्या (अनेकदा अनाकलनीय) अनेक घटना केलेल्या आहेत असे आढळते. हिंसेची एकच घटना ही खपींशी-ळलीरश्र fळेश्रशपलश चा प्रकार आहे असे ठाम विधान करता येणार नाही. यामळे थप्पड प्रकरण Inter-ictal violence मध्येही बसत नाही.
अशा प्रकारे श्रीरामकृष्णांनी रासमणी देवीला रागावून थप्पड मारली, या घटनेचा एपिलेप्सीशी काहीही संबंध नाही. मोहनिद्रा (Hypnosis) (संमोहन हा शब्द अधिक युक्त)
मिर्गी आणि मोहनिद्रा या दोन गोष्टी श्री व-हाडपांडे यांनी जोडून घेतल्या आहेत. तसेच या झटक्यात कधी कधी भास होतात’ असे विधान ते एका परिच्छेदात करतात. नंतरच्या परिच्छेदाची सुरुवात ‘ज्यांना जागेपणी भास होतात अशा लोकांच्या व्यक्तित्वात एक विशेष हा असतो की ते उत्कट प्रमाणात सूचन म्हणजे सजेश्चनला (suggestion) बळी पडणारे असतात’ या विधानाने होते, हे दुसरे विधान अत्यंत सरधोपट व चुकीचे आहे. जागेपणी भास होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यापैकी कोणत्याही कारणातील सर्व लोक हे सजेश्चनला बळी पडणारे नसतात. परंतु हा मुद्दा महत्त्वाचा नाही.
श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद ही व्यक्तिमत्त्वे गाढ मोहनिद्रेत जाण्यास सक्षम होती हे मलाही मान्य आहे. गाढ मोहनिद्रेत देवीचे भास होणे शक्य आहे. (हे प्रयोग मी स्वतः केले आहेत.) परंतु ‘रामकृष्णांच्या प्रभावाने विवेकानंदांना आलेले अनुभव हे मोहनिद्रेच्या स्वरूपाचे होते. याचे प्रमाण हे की त्या अनुभवांच्या सत्यतेचा पडताळा येत नव्हता’ हा श्री व-हाडपांडे यांचा युक्तिवाद तर्कदुष्ट आहे. एक तर ज्या अनुभवांच्या सत्यतेचा पडताळा येत नाही त्यांचे मोहनिद्रा हे एकच कारण नाही; स्वपकावस्था, वेड, मादक द्रव्यांचे सेवन अशी इतरही मानसशास्त्रीय कारणे असतात. आणि साक्षात्कारवाद्यांच्या मते साक्षात्कार हा अनुभवही दुसरा ज्याची सत्यता पडताळू शकत नाही असा आहे. दुसरे असे की एखाद्या गोष्टीच्या सत्यतेचा अनुभव आला नाही म्हणून ती गोष्ट असत्य ठरत नाही. मोहनिद्रा आणि समाधी तसेच साक्षात्कार अवस्था या एकच आहेत असे मानसशास्त्रात अजून सिद्ध झालेले नाही. (या अवस्था एकच आहेत असे मानणारा मोठा गट आहे.) गाढ मोहनिद्रेत दैवताचे दर्शन करविता येते. परंतु नंतर जागे झाल्यावर त्या व्यक्तीला आपल्याला स्वपक्सदृश आभास झाला होता हे कळते. आपल्याला दैवताचे ‘साक्षात्’ दर्शन झाले अशी त्याची धारणा नसते. मोहनिद्रा, समाधी अवस्था, साक्षात्कार यातील परस्परसंबंधांवर आज मानसशास्त्रीयदृष्ट्या ठाम मत देता येणार नाही. श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार नी.र. व-हाडपांडे यांच्या सप्टेंबर १९९४ (अंक ५.६) मधील उत्तरातून
श्री. दाभोलकरांच्या पत्राला सविस्तर उत्तर देण्याची जरूर नाही, कारण माझा मुख्य मुद्दा म्हणजे श्रीरामकृष्ण व विवेकानन्द यांना आलेले अनुभव हे साक्षात्कार नसून भास होते हा त्यांनाही मान्य आहे. त्यांचे खालील वाक्य पाहा :
‘श्रीरामकृष्ण आणि विवेकानन्द ही व्यक्तिमत्त्वे गाढ मोहनिद्रेत जाण्यास सक्षम होती हे मलाही मान्य आहे. गाढ मोहनिद्रेत देवीचे भास होणे शक्य आहे. (हे प्रयोग मी स्वतः केले आहेत.)”
रामकृष्णांना झालेले देवीचे दर्शन हा साक्षात्कार नसून भास होता हे कबूल केल्यावर दाभोलकरांचे बाकीचे पत्र हा तपशिलाचा वाद ठरतो.
रामकृष्णांना होणारे भास दरवेळी निरनिराळे असत, एपिलेप्सीप्रमाणे एकच दृश्यफीत पुनःपुनः पाहिल्यासारखे नसत असे दाभोलकरांचे एक कथन आहे. मी रामकृष्णांच्या अनुभवाची उपपत्ति फक्त एपिलेप्सी म्हणजे मिर्गीच्या आधारे लावलेली नाही. मिर्गीव्यतिरिक्त रामकृष्णांच्या व्यक्तित्त्वाचे आणखी दोन पैलू होते. ते म्हणजे संसूच्यता (सजेस्टिबिलिटी suggestibility) व कलाप्रवणता. कलाप्रवणतेमुळे कल्पनेच्या जगात वावरण्याचे त्यांचे सामर्थ्य मनस्वी होते. याच्या भरीला लहानपणापासून झालेले “आध्यात्मिक” संस्कार. पुरुषाचा मासिक धर्म?
रामकृष्णांनी राणी रासमणीवर केलेला “आघात” प्रोव्होकेशनखाली क्रोधापनाखाली झाला म्हणून ‘इक्टल व्हायलन्स’ या मिर्गीच्या प्रकारात मोडत नाही असे दाभोलकरांचे म्हणणे, पण हे “प्रोव्होकेशन” कोणते होते? तर राणी रासमणीने मालमत्तेच्या खटल्याबद्दल आपल्या दिवाणजींना विचारले. याला प्रोव्होकेशन म्हणायचे तर कोणतेही वर्तन हे “प्रोव्होकेशन’ ठरू शकेल. भासाचे सर्व प्रकार संसूच्यतेमुळे, सजेश्चनमुळेच होतात असे मी म्हटलेले नाही. सर्वांना परिचित असलेले स्वप्न हा भासाचा प्रकार सजेश्चनमुळे झालेला नसतो. तेव्हा सर्वच भास सजेश्चनमुळे होतात असे मनोव्याधींशी मुळीच परिचित नसलेला सामान्य माणूसदेखील म्हणणार नाही. माझ्या विधानाचा संदर्भ मुद्दाम साधना करून प्राप्त केलेले वा गुरुकृपेने झालेले भास हा आहे. हे भास संसूच्यतेमुळे झालेले असतात असे म्हणण्यास काय हरकत आहे ?
मोहनिद्रा व समाधी या अवस्था एकच आहेत असे मी म्हटलेले नाही. डॉ. आनन्द यांनी मेंदूचे विद्युल्लेख घेऊन या अवस्था भिन्न आहेत असे दाखविले आहे. पण समाधीत जे ज्ञान होते असे समाधी लावणारे सांगतात ते त्यांच्या पूर्वश्रद्धांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ वेदान्ती श्रीहर्षाला समाधीत ब्रह्माचा साक्षात्कार होत होता तर सगुणभक्तिवादी रामकृष्णांना समाधीत देवी दिसत होती. खुद्द समाधीच्या अवस्थेचा या भासांशी संबन्ध नाही. सर्वसाधारण माणसाची मोहनिद्रा उतरल्यावर आपल्याला आलेला अनुभव हा भास होता हे त्याला कळले, पण रामकृष्णांना समाधी उतरल्यावरदेखील तो भास वाटत नव्हता त्याअर्थी तो भास नव्हता असे दाभोलकरांचे म्हणणे. पण भास दृढ श्रद्धेतून मिळालेल्या संसूचनाने झालेला असेल तर मोहनिद्रा उतरल्यावरही तो भास होता असे श्रद्धालूंना वाटत नाही.
“रामकृष्णांना स्त्रीवेशात कामजागृति व कामशान्ति होत होती” असा उल्लेख “रामकृष्णलीलाप्रसंगात” सापडण्याचा संभव नाही कारण रामकृष्ण आपल्या अनुभवांना कामानुभव समजत नव्हते. पण आपल्याला मासिक धर्म होतो आहे हा रामकृष्णांचा भास कामशान्तीला मासिक स्राव समजण्याने उत्पन्न झाला असला पाहिजे. श्री दाभोलकरांना या भासाची दुसरी काय उपपत्ति सांगता येत असेल तर त्यांनी सांगावी.