दर बारा वर्षांनी महाराष्ट्रात, त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे एकाच वेळी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ऑगस्ट २००३ ते ऑगस्ट २००४ ह्या मागील वर्षात हा धार्मिक सोहळा येथे पार पडला. सदर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शोध घेण्याचा हा छोटेखानी प्रयत्न.
कुंभमेळा भरण्याबाबत काही कथा ‘कुंभमेळा’ ह्या उत्तम कांबळे लिखित पुस्तकात आहेत. पैकी पुढे दिलेली कथा ही चारही (प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक) कुंभमेळ्यांना लागू पडते. ‘खूपखूप वर्षांपूर्वी देवांनी समुद्रमंथन सुरू केले. दानवही त्यांच्या मदतीला होते. बराच काळ मंथन झाल्यावर अमृत बाहेर आले. इंद्राचा पुत्र जयंत याने हा अमृतकुंभ घेतला व तो स्वर्गाच्या दिशेने म्हणजे आपल्या निवासस्थानाकडे जाऊ लागला. मंथनाच्या वेळी दानवांनीही मदत केली होती. पण त्यांना मात्र अमृत मिळाले नाही. संपूर्ण कुंभ जयंत घेऊन पळतोय, हे त्यांच्या लक्षात येताच तेही अमृतासाठी धावू लागले. दानव आणि देव यांच्यात अमृतकुंभासाठी घनघोर लढाई झाली. सुमारे बारा वर्षे ही लढाई चालली. लढाईच्या काळात कुंभातून चार थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले. प्रयाग, उज्जैन, हरिद्वार व त्र्यंबकेश्वर ही ती चार ठिकाणे होत.’ पुढे कांबळे लिहितात, ‘रिकामटेकड्या मंडळींनी अशा कथा भरपूर निर्माण केल्या. लोकांकडून त्या पाठ करून घेतल्या. श्रद्धाळू नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित न करता मुकाटपणे त्या पाठ केल्या. या कथांविषयी कार्यकारणभाव वगैरेंचे निकष लावल्यास त्या गळून पडतात असे घडू नये म्हणूनच धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात प्रश्न विचारण्यास बंदी आहे…
विश्वास साक्रीकर ‘पर्वणी’ ह्या पुस्तकात लिहितात, ‘धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे प्रकृतीनुसार चार जणांनी संशोधन कार्य करून एकत्र यावे. चारही पुरुषार्थांचा एकत्रित अभ्यास करावा. मानवी जन्माचा आद्य हेतूदेखील स्पष्ट करावा. यासाठी काही जागा, काही वेळा, विश्वाच्या स्पंदनक्षमतेचा अर्थात विद्युत् चुंबकीय ऊर्जेचा विचार करून शोधून काढल्या गेल्या. त्या जागा म्हणजेच चार कुंभक्षेत्रे होत. त्या चारही जागी संशोधक-वैज्ञानिकांचा मेळा होऊन, शास्त्रचर्चा, अध्यापनाच्या नवनवीन पद्धती, दिशा ठरवल्या जात असत. केलेले संशोधन (आजच्या भाषेत सेमिनारमधील प्रेझेंटेशन) अधिकारी व्यक्तीच्या समोर मांडून त्यांचे मैत्रीपूर्ण मार्गदर्शन विद्येच्या विकासासाठी घेतले जात होते. त्या प्रोत्साहनावर पुन्हा दीर्घ संशोधन, निरीक्षणासाठी जिज्ञासू अभ्यासक स्वस्थानी जात असत.’. . . . .
‘दुर्दैवाने आज दिसणारे चित्र खेदजनक आणि स्वार्थी आहे.’
सोहळ्यात भाविकांच्या श्रद्धा-अंधश्रद्धांचा आढावा घ्यावा, सामुदायिकपणे आणि दीर्घ कालावधीपर्यंत चालणाऱ्या अशा कार्यक्रमांचे, शास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक परिणाम अभ्यासावे, अशी निकड भासली. यासाठी एक प्रश्नावली तयार केली. ह्या प्रश्नावलीत एकूण चार बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश होता. प्रतिसादकाने प्रश्न वाचून त्याखाली दिलेल्या सर्व पर्यायांचा विचार करायचा आणि त्याप्रमाणे पर्यायासमोरील चौकटीत आपले पसंतीक्रमांक नोंदवायचे. पसंत नसलेल्या चौकोनात फुली ( ) ची खूण करायची. वर्षभरात, ह्या सर्व प्रश्नावल्या एकूण १५० स्त्री-पुरुषांना समक्ष भेटून दिल्या. भरण्यास पुरेसा वेळ दिला. प्रतिसादकांमध्ये विविध सामाजिक स्तरातील व्यक्ती होत्या. उदा. डॉक्टर, भक्त, वकील, मजूर, पुरोहित, विद्यार्थी, शिक्षक, हमाल, कामगार इ.
प्रश्न १ : कुंभमेळा भरण्याचे कारण माझ्या मते . . . . १) पौराणिक कथेनुसार, परंपरेने चालत आलेली धार्मिक बाब म्हणून, २) साधू-महंत समाजात, न्यायनीतीच्या विचारांची पेरणी करतात म्हणून, ३) शासन सर्व प्रकारची भरघोस मदत करते म्हणून, ४) जनसामान्यांना साधू-महंतांच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ होतो म्हणून, ५) साधू-महंत, समाजातील नाजूक आणि गंभीर प्रश्न, ह्या काळात तातडीने सोडवितात म्हणून, ६) साधू-महंतांची सर्व प्रकारची सेवा जनतेकडून होणार असल्याने, समाज सुखी होणार असतो म्हणून, ७) इतर . . . .
प्रश्न २ : कुंभमेळा आयोजनापूर्वी माझ्या मते . . . . १) कुंभमेळ्यात घडणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांची चिकित्सा करून, उचित कार्यक्रमांनाच स्थान देण्यात यावे. २) एकूण आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच खर्च करण्यात यावा. ३) कुंभमेळा आयोजनात, लोकशाही पद्धतीने जनमत अजमावण्यात यावे. ४) ह्या काळात स्थानिक जनतेच्या दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी स्वतंत्र प्रशासन नेमण्यात यावे. ५) खऱ्या अर्थाने नाशिक हे पर्यटक-स्थळ होईल, याचा विचार करून, टप्प्या-टप्प्याने दीर्घकालीन योजना राबविल्या जाव्यात. ६) सर्व प्रकारच्या व्यसनांवर, सर्वांसाठी सक्तीची बंदी आणावी. ७) एक नागरिक म्हणून, सर्वांनाच सारखा कायदा असावा, कुणालाही, कोणतीही सवलत मिळू नये. ८) स्वतःसोबत कोणतेही वन्यप्राणी अथवा पाळीव प्राणी आणण्यास साधू-महंतांना बंदी असावी. ९) एकूणच आर्थिक योजनांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही, उत्कृष्ट दर्जाचे कामकाज होईल, यासाठी स्वतंत्र योजना असावी. १०) इतर . . . .
प्रश्न ३: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्ष कुंभमेळा कालावधीत, तेथील जनतेच्या संदर्भात, माझ्या मते. . . १) येथील लोकांचे दररोजच्या प्रवासात अतोनात हाल होतात. २) प्रचंड महागाईची झळ प्रथम ह्यांना बसते. ३) पाणी प्रदूषण, खाद्य-पदार्थांची नासाडी-खराबी ह्यामुळे ह्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ४) वाढीव कर आकारणीची झळ सर्वप्रथम येथील नागरिकांना सोसावी लागते. ५) ह्या काळात साधू-महंत, ह्या शहरात-परिसरात वास्तव्याला असल्याने, गुन्हेगारी, चोऱ्या किंवा अन्य अनुचित प्रकार, यांपासून येथील लोक निर्धास्त राहतात. ६) पर्वणीकाळात, साधू-महंताच्या स्नानानंतर, आंघोळी केल्याने येथील जनतेचे पाप धुतले जाते. ७) कुंभमेळ्यात हजारो कोटी रुपये खर्च करून येथील जनतेचे पाणी, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत. ८) साधू-महंताच्या भ्रामक चमत्कारांमुळे येथील जनतेचे चांगलेच मनोरंजन होणार आहे, होत असते आणि कुतूहल शमते. ९) इतर . . . . .
प्रश्न ४ : कुंभमेळ्यानंतर, माझ्या मते असे घडेल. . . . . १) समाजाच्या नैतिक आचरणात खरोखरच आणखी भर पडेल. २) एक धार्मिक कार्यक्रम, कार्य, पार पाडल्याचे समाधान स्थानिक जनतेला मिळेल. ३) स्थानिक पर्यावरण प्रदूषणाचा त्रास पुढील काही दिवस येथील लोकांना भोगावा लागेल. ४) जनतेच्या, कोट्यवधी रुपयांचा व्यर्थ चुराडा केला गेला, याचे शल्य मला कायम बोचत राहील. ५) ‘पर्वणी’नंतर नवीन एखादी गंभीर सामाजिक समस्या उद्भवण्याची भीती मला वाटते. ६) अशा कार्यक्रमामुळे, समाजात, ऐतखाऊ लोकांची भरच पडेल, दैववाद बोकाळेल आणि व्यसनाधीनांची संख्या वाढेल. ७) कुंभमेळ्यानंतर ह्या शहरात, परिसरात तरी निदान कोणताही अनुचित प्रकार यापुढे घडणार नाही, याची ग्वाही, जमलेले तपस्वी, साधू, महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर अशी मंडळी देणार आहेत. देऊन जाणार आहेत. ८) कुंभमेळ्यात, सर्व काही यथासांग पार पडल्यावरही, कोणत्याही प्रकारची सामाजिक समस्या सुटल्याचे आढळणार नाही. ९) पुढील कुंभमेळ्यात, आता घडलेल्या काही अनिष्ट प्रवृत्तींची आणि प्रक्रियांची पुनरावृत्ती घडणार नाही, याची दखल आत्ताच घेतली जाणार नाही. १०) ह्या काळात, ज्या कुणांची जमीन अथवा तत्सम साधन-सामुग्री संपादन केली गेली, त्यांच्या मोबदल्यासाठी त्यांच्याकडे नंतर कुणीही, ढुंकुनही पाहाणार नाही. ११) प्रशासन यंत्रणेवरील ताण, त्यांची गैरव्यवस्था यांचे कुणालाही, काहीही वाटणार नाही. १२) इतर . . . .
अर्थनिर्वचन व निष्कर्ष
एकूण आलेल्या १५० प्रश्नावल्यांचे सांख्यकीय विश्लेषण केले. प्रत्येक प्रश्नातील, प्रत्येक पर्यायाच्या १ ते ३ पसंतीच्या, शेकडेवारीची मते विचारात घेतली. निष्कर्ष पुढीलप्रमाणे : प्रश्न १: कुंभमेळा भरण्याचे कारण . . . .
ह्या पहिल्या प्रश्नाच्या पहिल्या पर्यायासाठी प्रथम पसंती ८१%, द्वितीय पसंती ७% तर तृतीय पसंती ४% होती. याचा अर्थ परंपरेने जे आले ते केलेच पाहिजे. त्याची चिकित्सा करून चालणार नाही. परंपरा आणि रूढी जशाच्या तशा जोपासण्याची सामाजिक मानसिकता मोठ्या प्रमाणात आजही टिकून आहे, हे मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दुसऱ्या पर्यायासाठी प्रथम ४% द्वितीय २३% आणि तृतीय१२% पसंतीची मते मिळाली. फार कमी प्रतिसादकांचा साधू महंताच्या न्यायनीतीच्या विचारांवर विश्वास आहे. द्वितीय पसंती तो जास्त प्रकट होतो. याचा अर्थ प्रथम उत्सव, नंतर न्यायनीतीचा विचार करता येईल असा निष्कर्ष निघतो. इतर काही निष्कर्ष असे,
धार्मिक कार्यक्रमांना, सुख-सुविधांच्या नावाखाली भरघोस मदत शासन करते, तेव्हाच असे कार्यक्रम घडत असतात, हे गृहीतच धरलेले असते. त्यामुळे ही बाब मान्य-अमान्य करण्याचे कारण नाही. केवळ साधू-महंतांच्या दर्शनाने, आशीर्वादाने खूप काही प्राप्त होते, असा दृढ विश्वास, दुय्यम स्थानावर का होईना, आहे. वास्तविक अशा दर्शनातून अथवा आशीर्वादाने तात्पुरता दिलासा मिळतो. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिवाचा आटापिटा केला जातो. नंतर मात्र आपल्या जीवनात खूप काही सुधारणा झाल्याचे आढळून येत नाही, आणि पुन्हा निराशेने घेरले जातो. ही वस्तुस्थिती आहे. पण एवढा लांबचा विचार करण्याची मानसिकता अजून निर्माण झाली नाही.
समाजातील नाजुक आणि गंभीर प्रश्नांशी साधू-महंतांना काही देणे-घेणे नाही असे ९९% प्रतिसादकांना वाटते. समाजाच्या मदतीवर साधू-महंत पालन-पोषण करून घेतात मात्र त्यासाठी त्यांनी, समाजासाठी झटलेच पाहिजे अशी सक्ती सामान्य माणूस त्यांच्यावर करू शकत नाही, तशी त्याची इच्छाही नाही. हे इथे स्पष्ट होते.
साधू-महंतांची सेवा करूनही समाजाची दुःखे, साधू-महंत कमी करू शकणार नाहीत, हे ९९% लोकांना माहीत आहे. तरीही अनेक आखाड्यात सेवेसाठी रांगा लागल्या होत्या. याचाच अर्थ, जे घडते ते पूर्णपणे अशास्त्रीय पद्धतीने घडते. कार्यकारणभावाचा इथे स्पष्ट अभाव आहे. प्रश्न २ : कुंभमेळा आयोजनापूर्वी माझ्या मते . . . .
पहिल्या पर्यायाची प्रथम पसंतीची ३२% मते होती. दुसरा ११% व तिसरा ६% पसंतीचा होता. चिकित्सा व्हावी असे प्रथमदर्शनी ३२% प्रतिसादकांना वाटते. संख्या तशी कमी आहे. मात्र सकारात्मक विचारसरणी असलेली माणसे आहेत, ही जमेची बाब आहे. अशा मंडळींना एकत्र आणून धार्मिक कार्यक्रमांना, सामुदायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विधायक कृती कार्यक्रमांकडे वळविता येईल.
ह्या प्रश्नातील पर्याय क्र. २ ला प्रथम पसंती १३%, द्वितीय पसंती २०% आणि तृतीय पसंती १५% होती. राष्ट्राची राज्याची आर्थिक चिंता वाहणारी अशी ही माणसे फारच कमी आहेत. मुख्य सामाजिक प्रश्न बाजूला ठेवून वेळेचे महत्त्व वाढवून, त्या निमित्ताने अतोनात पैसा खर्च होतो, तोही अनाठायी! त्याचे विशेष काही कुणाला वाटत नाही.
तिसऱ्या पर्यायासाठी प्रथम १३% तर दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीची प्रत्येकी १०% मते मिळाली. धार्मिक कार्यक्रमामध्ये लोकशाहीचे काय काम ? शिवाय धार्मिक कार्यक्रमात काय असावे, काय नसावे हे सामान्य माणसाला कसे कळणार ? त्यासाठी ठरावीक व्यक्तीच हे ठरवितात. इतरांनी फक्त अनुकरण करायचे. मत द्यायचे काही कारण नाही. असे हे मत ! क) स्थानिक जनतेच्या कर-आकारणीतून आलेला पैसा ह्या कार्यक्रमातील सुखसुविधांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तरीही आपली अडचण होऊ नये ह्या काळात आपल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, असे फारसे वाटलेले नाही. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम स्थळ सोडल्यास इतरत्र नेहमीच्याच समस्या तशाच होत्या. त्यात काही बदल झाल्याचे दिसले नाही. ख) आजचे आज पाहू, उद्याचे नंतर पाहता येईल. एवढा लांबचा विचार धार्मिक कार्यक्रमात करायचा नसतो त्यामुळे पर्यटन स्थळ एवढे महत्त्वाचे वाटले नाही. ग) धार्मिक कार्यक्रमांत सर्वांना समानत्व आणि कायद्याचे बंधन क्वचितच पाळले जाते. घ) साधू-महंतच प्राण्यांचे स्वातंत्र्य, भूतदया मानत नाहीत, तेथे सामान्य माणसे कशी मुक्या जीवांचा विचार करणार ? च) भ्रष्टाचार होऊ नये, अशी प्रामाणिक इच्छा सर्वांचीच असते. मात्र तो कुणीच थांबवू शकत नाही तर तो प्रत्येकाने पाळावयाचा एक आचार असतो. स्वतःपासून तो थांबवायचा असतो मात्र वरच्या पातळीवर हे घडत असल्याने हतबल झाल्याची भावना दिसते. छ) ह्या प्रश्नाचा दहावा पर्याय हा ‘इतर’ होता. त्यामध्ये स्वतंत्र अशी मते मिळाली, ती अश आर्थिक बंधने पाळली जावीत, स्थानिक जनतेचे प्रश्न अगोदर सोडवावेत, वीज-पाणी वापरावर साधु-ग्रामात बंधने आणावीत, आपण प्रथम भारतीय आहोत ही भावना जागृत व्हावी, शिक्षणाकडे खर्च अधिक व्हावा. प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी राजकीय पुढारी व बुवांची चढाओढ लागते आणि जनतेसमोर मिरवून घेण्याची हौस भागते, ते बंद करावे. प्रश्न ३: कुंभमेळा कालावधीत जनतेच्या संदर्भात . . . .
यातील पहिला पर्याय, दररोज प्रवास करणाऱ्या बांधवांबाबत होता. त्यासाठी प्रथम ३१%, द्वितीय पसंती २१% तर तृतीय पसंती १५% होती. म्हणजे दररोजच्या प्रवासात हाल सोसावे लागतात. महागाईबाबत दुसरा पर्याय होता. त्याची पहिली, दुसरी व तिसरी पसंती अनुक्रमे १०%, २२%, १९% अशी होती. स्थानिक जनता महागाईने ह्या काळात त्रस्त होते, मात्र तक्रार कुणाकडे करणार ? म्हणून प्रथम पसंती मते कमी व इतर दोन्ही पसंती मते जास्त आहेत. प्रदूषणाबाबत स्थानिक जनतेची मते अजमावण्यासाठी तिसरा पर्याय होता. त्याला प्रथम पसंती ४५%, द्वितीय पसंती १६% आणि तृतीय पसंती १६% मिळाली याचा अर्थ, कविवर्य कुसुमाग्रजांच्या ‘पर्वणी’ कवितेचा बोध ना आयोजकांनी घेतला, ना शासकीय पातळीवर घेतला गेला. पर्वणीकाळात, साधू-महंत वास्तव्याला असतांना शहरातील अनुचित प्रकार थांबले किंवा कमी झाले, त्यांच्या आंघोळीने जनतेचे पाप धुतले गेले, जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न लगेच सुटले किंवा त्यांच्या चमत्कारांवर जनतेने विश्वास ठेवला असे काहीही घडले नाही. हे पर्याय क्र. ५ ते ८ होते. ह्या सर्व पर्यायांना २%, १%, ३% अशी प्रथम, द्वितीय व तृतीय पसंती अनुक्रमे मिळाली. तरीही चिकित्सा न करता, सर्व यथासांग घडत राहते, साधू-महंतांचा उदोउदो होतो. ह्या प्रश्नातील शेवटचा पर्याय ‘इतर’ हा होता.
प्रतिसादकांना, त्यांची वैयक्तिक मते इथे नोंदविता आली. ती पुढीलप्रमाणे होती. जनतेसाठी पैसा खर्च करावा. रूढींमुळे हे चालते आणि सहन करावे लागते, भ्रष्टाचाराला आयते कुरण मिळते, व्यावसायिकांचा व्यवसाय ह्या काळात भरभराटीला येतो, विद्यार्थ्यांचे नुकसान होते. कमवणारे कमवितात, गैरप्रकार आणखी वाढतात, दैववाद बोकाळतो. प्रश्न ४ : कुंभमेळ्यानंतर माझ्या मते असे घडेल. . . . ह्या प्रश्नाला एकूण १२ पर्याय दिलेले होते. त्यांतील पहिला पर्यायाला प्रथम पसंती ९%, द्वितीय पसंती ४% व तृतीय पसंती २% होती. नैतिक आचरणात असा मोठ्या धार्मिक कार्यक्रमाने खरोखर भर पडते पण, हे इथे तपासायचे होते. मात्र प्राप्त आकडेवारीवरून निराशा होते. एक धार्मिक कार्यक्रम पार पाडल्याचे समाधान स्थानिक जनतेला मिळेल असा दुसरा पर्याय होता. त्यात प्रथम २४%, द्वितीय व तृतीय १२% पसंती होती. तात्पुरता दिलासा मिळाल्याचे हे द्योतक आहे. कायस्वरूपी समाधानाचा हा इलाज ठरत नाही. प्रदूषणाचा त्रास पुढील काही दिवस होत राहील ह्या पर्यायाला प्रथम पसंती ३६%, द्वितीय पसंती १९% आणि तृतीय पसंती १२% होती. धार्मिक कार्यक्रम संपल्यावर सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा व्यर्थ चुराडा झाल्याचे शल्य मला कायम बोचत राहील. ह्या पर्यायाची प्रथम पसंती १५%, द्वितीय पसंती १८% तर तृतीय पसंती १२% होती. कोणत्या गुंतवणुकीला किती महत्त्व द्यायचे याबाबतचे अज्ञान इथे प्रकट होते. पर्वणीनंतर, नवीन एखादी गंभीर सामाजिक समस्या उद्भवण्याची मला भीती वाटते, ह्या पर्यायाला प्रथम पसंती ३%, द्वितीयपसंती ४% व तृतीय पसंती ८% होती. परिणामांचा विचार करून फारच थोडे धार्मिक कार्यक्रम आयोजिले जातात. वास्तविक गत-कुंभमेळ्यात, चेंगराचेंगरी झाल्याने ४० भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा ओढवून घेतलेल्या संकटाची, प्रतिसादकांनाही कल्पना करता आली नाही. तसेच त्यानंतर भरून आलेल्या प्रश्नावल्यांमध्ये तशी नोंदही कुणी केली नाही. अशा वेळी गरिबांसाठी ‘मरणही स्वस्त होत आहे’ किंवा ‘मोक्षच मिळाला’ अशीही भाषा वापरली जाते. जाणीवपूर्वक अशा दुःखद घटना टाळल्या जातात किंवा विसरल्याचा भास निर्माण केला जातो. इतर काही निष्कर्ष : क) पर्यायांतील संभाव्य अनिष्ट बाबींना अशा कार्यक्रमांमधून खतपाणी मिळते, हे अजून समाजाला ओळखता येत नाही. ख) साधू-महंत अनिष्ट टाळण्यासारखी कामे करीत नसतात, त्यांचा अशा प्रकाराशी किंवा ते थांबविण्याशी काहीही संबंध नसतो, असा भाबडा समज भाविकांचा झालेला असतो. ग) सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कुंभमेळा नसतोच, असे कुणी म्हणाले तर आश्चर्य वाटायला नको. घ) ‘जे घडले ते तेवढ्यापुरते होते, आता पुन्हा ते आठवणीत ठेवण्याचे कारण नाही. १२ वर्षानंतर सगळे बदलले असेल, पुढचे पुढे पाहू’ ही प्रवृत्ती जोमाने वाढते आहे. च) शासनाने संपादित केलेल्या जमिनी, साधन-सामग्रीबाबतचा मोबदला मिळण्यासाठी, संबंधितांकडे कुणीही लक्ष देणार नाही. बऱ्याच काळानंतर हा मोबदला मिळत असेल. वेळ संपलेली असते. तेव्हा त्यांची दखल कोण घेणार? संबंधित हेलपाटे मारतील. त्यामुळे प्रतिसादकांनीही त्यांची फारशी दखल घेतल्याचे इथे आढळत नाही. छ) प्रशासकीय यंत्रणा आपल्या सेवेसाठी आहे, त्याचा त्यांना पगार मिळतो, त्यांचे कर्तव्य त्यांनी केलेच पाहिजे. त्यात विशेष काय? मात्र तीही माणसेच आहेत. त्यांनाही वेळेवर अन्न पाणी-निवारा लागतो याची दखलही, माणुसकीच्या नात्याने प्रतिसादकांनी घेतली नाही. ज) ह्या प्रश्नाचा शेवटचा पर्याय, ‘इतर’ असा होता. त्यामध्ये दिलेल्या पर्यायाव्यतिरिक्त, प्रतिसादकांनी त्यांची, प्रश्नाच्या अनुषंगाने प्रतिक्रिया लेखी स्वरूपात नोंदवावी असे संशोधकाने स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रश्न क्र. ४ च्या अनुषंगाने मिळालेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होत्या कुशावर्ताचे डबके झालेले असेल, ज्यांना आर्थिक लाभ झाला ते पैसे मोजत असतील, व्यक्तिपूजेत वाढ झालेली असेल. अंधश्रद्धा वृद्धिंगत होण्यास मदत झाली. निष्क्रियता वाढेल, पुन्हा ‘जैसे थे’ असेल, प्रशासकीय अधिकारी श्रीमंत होतील. सामावून घेण्याची वृत्ती वाढेल, स्थानिक व्यापारी, पुरोहित व अधिकारी पुढील कुंभमेळ्याची आतुरतेने वाट पाहातील. धार्मिक स्थळांचे महत्त्व वाढेल, घाणीचे साम्राज्य वाढेल, समान नागरी कायदा होण्याची गरज आहे.
पुढील कुंभमेळ्यांबाबत मी काही शिफारसी करू इच्छितो, त्या पुढीलप्रमाणे: शिफारसी १) कुंभमेळा किंवा तत्सम धार्मिक कार्यक्रमांची कालसुसंगत चिकित्सा करून, उचित कार्यक्रमांनाच स्थान देण्यात यावे. २) कोणत्याही धर्माच्या, धार्मिक कार्यक्रमांना सरकारने कोणतीही मदत करून नये. ३) प्रसिद्धिमाध्यमांना अशा कार्यक्रमांसाठी, प्रसारणाच्या मर्यादा घालून द्याव्यात. ४) कोणत्याही धार्मिक वा तत्सम कार्यक्रमांमधून पर्यावरण प्रदूषण होत असेल तर ते कार्यक्रम कायमचे रद्द करावेत. ५) सार्वजनिक ठिकाणी, सक्तीची व्यसनबंदी राबवावी. ६) चमत्कारांचा दावा करणाऱ्या भोंदूंवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वैज्ञानिक प्रबोधनाचे कार्यक्रम व्हावे. ७) कुंभमेळ्यात अथवा अशा कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊन, जीवघेणा प्रसंग उद्भवणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात यावी. ८) आर्थिक योजनांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही, उत्कृष्ट दर्जाचे काम होईल, यासाठी स्वतंत्र योजना असावी. ९) कुंभमेळ्यात कुणालाही कोणतीही सवलत देऊ नये. १०) कुंभमेळा भरणारी सर्व शहरे कायमस्वरूपी पर्यटनस्थळे कशी होतील, अशा प्रकारे टप्प्या-टप्प्याने कामे व्हावीत. ११) पुढील कुंभमेळ्याअगोदर, मागील कुंभमेळ्याचा लेखा-जोखा जनतेसमोर जाहीररीत्या मांडावा. १२) स्थानिक जनतेचे हाल होणार नाहीत, यासाठी त्या काळासाठी स्वतंत्र प्रशासन नेमावे. १३) भाविकांनी ही ‘खरा देव’ ‘खरा संत’ ओळखून, गर्दी करण्याचे टाळावे. संतपरंपरेचा आदर्श मनात ठेवावा.
६१, कामगारनगर, सातपूर, नाशिक – ४२२ ००७.