(लेखिका – सुलक्षणा महाजन, ग्रंथाली, मुंबई-२. प्रथमावृत्ती २००४)
‘अर्थसृष्टी भाव आणि स्वभाव’ हे पुस्तक जेन जेकब्स या अमेरिकन लेखिकेच्या मूळ पुस्तकावर (Nature of Economies) नेचर ऑफ इकानॉमीज आधारित आहे. मूळ पुस्तकातील विचार व प्रस्तुती लेखिकेची खरी प्रेरक शक्ती आहे. मनुष्यसमाजाच्या अर्थव्यवहारांचे गर्भित माणसाच्या उपजिविकेच्या प्रयत्नात निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परावलंबी संबंधात कसे आहे याची यात उकल आहे. मानवप्राणी एकंदर निसर्ग-व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहे ही प्राथमिकता मान्य करून लेखिका अर्थसृष्टी व निसर्ग यांच्या विकासाचे गतिनियम सारखे कसे आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करते. हे संबंध स्पर्धचे आणि त्याचबरोबर सहकार्याचे कसे आहेत, दोन्हीच्या स्वाभाविक वृत्तीला मानवी प्रज्ञेने नवीन दिशा कशी देता येईल याचे यात विवेचन आहे. पुस्तकात काही काल्पनिक पात्रे आहेत जी आपसात चर्चा करतात व वाचकाला विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.
साधारणतः शास्त्रीय विषयावर लिहिलेल्या पुस्तकात एक संगती असते त्याला एक षीरी असतो. उदा. अॅडम स्मिथ याचे अर्थशास्त्रावरील पुस्तक. त्यात काल्पनिक पात्रे, ज्यांचा मूळ विधानाशी संबंध नाही व जी अनावश्यक आहेत त्यास मुळीच जागा नसते. लेखिकेने ती गाळली असती तर पुस्तक अधिक शास्त्रशुद्ध झाले असते. वास्तविक पाहता काल्पनिक पात्रांतील संभाषण घटस्फोट-मैत्री-जवळीक यांस शास्त्रीय पद्धतीत स्थान नाही. ती मूळ मुद्दयापासून वाचकाचे मन विचलित करते व मूळ धागा तुटतो. कोणतेही शास्त्रीय पुस्तक वाचताना लेखकाला काय म्हणावयाचे आहे हे जाणण्याचा वाचक प्रयत्न करतो. या चर्चेमध्ये वाचकाला सहभागी होता येत नाही. प्रश्न विचारता येत नाही.
निसर्गाचा विकास आणि मानवी समाजाचा आर्थिक विकास यांमधील कार्यतत्त्व अगदी सारखे आहे हे सुंदरपणे लेखिकेने पात्रांच्या संभाषणाद्वारे मांडले आहे. निसर्गाची नक्कल करून आपला उत्पादनक्रम व प्रक्रिया यांत सुधारणा करणे कसे आवश्यक आहे-नव्हे अनिवार्य आहे, हे अतिशय मार्मिकपणे प्रतिपादन केले आहे. आपल्या आर्थिक विकासाचा पाया निसर्गतत्त्वांना अनुसरून पक्का कसा करता येईल याचे विवेचन आहे. निसर्गाकडून आपण अर्थविकासाचे धडे घ्यायला हवेत.
आर्थिक विकास होताना उत्पादनप्रक्रियेमुळे उत्पादनात गुणात्मक बदल होतो. असा विकास-गुणात्मक बदल-निर्जीव व सजीव सृष्टी दोन्हीमध्ये होत असतो हे लेखिकेने सोदाहरण दाखविले आहे. वैज्ञानिकांनी ‘एकजिनसी सामान्य स्थितीमधून होणारा विविधतेचा उगम’ अशी संकल्पना मांडली आहे. (Differentiation emerging from generality.) कोणताही विकास एकाकीपणे होऊ शकत नाही. सहजीवनामुळे हे शक्यहोते, कारण एकाचे अन्न हे दुसऱ्याने टाकलेले पदार्थ असतात. उदाहरणार्थ कार्बनडाय-ऑक्साईड व प्राणवायू. ही सहविकासाची वीण उत्क्रांतिक्रमामुळे अधिक गुंतागुंतीची व दाट होत गेली. सहविकास, सहकार्य, सहअस्तित्व, परस्परावलंबन त्याचप्रमाणे जीवघेणी स्पर्धा, दुर्बलाचा नाश व अन्न म्हणून उपयोग हेदेखील असते. पुस्तकात १) विकास म्हणजे एकजिनसी, सर्वसामान्य स्थितीतून उद्भवणारा वेगळेपणा २) वेगळेपणा ही एक नवीन परिस्थिती बनते व पुन्हा त्यात वेगळेपणा ३) आणि हे सर्व होत असताना घटकांमध्ये गुंतागुंतीचे, सहविकासाचे अनेक नातेसंबंध निर्माण होणे. भौतिक विकासही अशाच प्रक्रियेतून निर्माण होतो. आर्थिक व्यवहार उत्पादन, उपभोग, विनिमय देखील अशाच प्रक्रियेतून निर्माण होतो. मानवाचा आर्थिक विकास हा नैसर्गिक विकासाचा एक अविभाज्य घटक आहे. पण त्याकरिता आर्थिकदृष्ट्या सर्जनशील असणारी माणसे हवीत.
निसर्गाकडून देणगी रूपाने मिळालेल्या वस्तूंआधारे गावाची अर्थव्यवस्था सुरू होते. पण त्याला मानवी प्रयत्नाची, कष्टाची आणि प्रज्ञेची आवश्यकता असते. शिंपी, सोनार, हस्तकला कामगार मूल्यवर्धनाद्वारे उत्पादनाला व आर्थिक व्यवहाराला चालना देतात. जिथे विविधता असते, तिथे संपन्नता, सुबत्ता असते. आणि संपत्ती, तिथे उपलब्ध होणाऱ्या आर्थिक ऊर्जेचा वैविध्यपूर्ण वापर आणि पुनर्वापर करून निर्माण होत असते. ज्याप्रमाणे निसर्गाV self reliant, self sustaining आणि sustainable जाती, प्रजाती पहातो तसेच अर्थव्यवस्थेचे आहे. उद्योगधंद्याच्याबाबतीत देखील नवीन होणाऱ्या बदलाला जे तोंड देऊ शकत नाहीत ते डबघाईला येतात व नाश पावतात. उलट जे बदलानुसार स्वतः बदलतात ते टिकून राहतात. आणि नावीन्य, गुणवत्ता या संकल्पनांद्वारे बलाढ्य अर्थव्यवस्थेलादेखील तोंड देऊ शकतात-त्यांच्यावर मात करतात. उदाहरणार्थ जपान, कोरिया, इ. लेखिकेने ज्याप्रमाणे निसर्गात प्रवाही स्थैर्य असते त्याचप्रमाणे व्यापारी कंपन्या, सरकार, देशाची अर्थव्यवस्था, संस्कृती या सर्व प्रवाही स्थैर्य सांभाळणाऱ्या आहेत असे विधान केलेले आहे. दुभाजन करणे, नवीन मार्ग शोधणे, सकारात्मक प्रतिसंदेशाचा वेध घेणे, साद देणे, ऋणसंदेशांचे नियंत्रण करणे आणि आपत्काळात स्वतःमध्येच बदल घडवून आणणे हे उपाय सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे अनपेक्षित परिणामांची शक्यता मात्र कायमची गृहीत धरावी लागते. निसर्ग स्वतःच्या स्वरूपात सातत्याने सुधारणा, बदल करत असतो. मग मानव कसा अपवाद असणार ? आजपर्यंत अनेक अभ्यासकांनी अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, कशी वाढली, विकसित झाली, यावर लक्ष केंद्रीत केले पण कोणती अर्थव्यवस्था कशामुळे विकसित होते याकडे लक्ष दिले नाही. अॅडम स्मिथच्या ऋणप्रतिसंदेशाचाही लेखिकेने उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे वस्तूंच्या किंमती, आणि कामगारांची वेतन पावती या गोष्टी म्हणजे अर्थव्यवस्थेची माहिती देणारे प्रतिसंदेश आहेत अशी संकल्पनाही मांडली आहे. बाजाराच्या नियंत्रणामागे एक अदृश्य हात दडला आहे हे अॅडम स्मिथने स्पष्ट केले याचाही उल्लेख आहे. त्याचप्रमाणे मंदीवरील उपाय किन्सने मांडला यावरही विवेचन आहे. निसर्गसृष्टीत जे घडते त्याचे हे प्रतिबिंब आहे. पुस्तकातील एकंदर कल्पना नावीन्यपूर्ण व वाचनीय व मननीय आहेत. या लहानशा लेखात पूर्ण पुस्तकाचा परामर्श घेणे कठीण आहे. व त्यामुळे लेखिकेला न्याय देता येणार नाही. पर्यावरण, अर्थव्यवस्था व मानवी आर्थिक व्यवहार यांवरील हे पुस्तक अभ्यासकांनी जरूर नजरे-खालून घालावे.
यू/३, लक्ष्मीनगर, नागपूर-२२.