लेखनांतील अराजक: परिणाम व उपाय ह्या शीर्षकाचे दोन लेख १५.५ व १५.६ अंकांत प्रसिद्ध झाले. त्या लेखांवर प्रतिक्रिया जितक्या अपेक्षित होत्या तितक्या आल्या नाहीत. हा लेख लिहिण्याचा हेतू छापलेल्या भाषेत प्रमाणीकरण (standardization) यावें (प्रमाणीकरण अशासाठी की त्यामुळे सर्वांच्या वाचनाची गति वाढेल, द्रुतवाचन शक्य होईल) हा होता. शब्दाचें लिखित रूप डोळ्यांना जितकें पूर्वपरिचित असेल तितकें तें वाचण्यास, म्हणजे ओळखण्यास वेळ कमी लागतो आणि द्रुतवाचन शक्य होते, ह्याकडे मला त्या लेखांतून लक्ष वेधायचे होते. मराठीत एकेक जोडाक्षर तीनचार प्रकाराने लिहितां येतें तें असें प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्यामुळे त्याकडे जास्त निरखून पाहावे लागते आणि वाचकाचा कालापव्यय होतो ही गोष्ट वाचकाच्या लक्षात आणून द्यावयाची होती. शब्दांची रूपें जितकी व्याकरणाच्या नियमांना अनुसरून असतील तितकी ती निःसंदिग्ध अर्थ दर्शवतात ही बाब त्या लेखांतून मला स्पष्ट करावयाची होती.
१९३० किंवा ३१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेने गोवें साहित्य संमेलनांत शुद्धलेखनाचे नवे नियम स्वीकारले आणि ते प्रसृत केले. ती नियमावली जेव्हां प्रसिद्ध झाली तेव्हा तिच्याखाली एक टीप म.सा.प.च्या वतीने दत्तो वामन पोतदार यांनी घातली होती. ती टीप अशी होती ‘शास्त्रपूत लेखन दंडार्ह मानूं नये.’ ही टीप घातली गेल्यामुळे नवे नियम शास्त्रपूत नाहीत असें तीद्वारें सूचित होत होते आणि मुद्रकांना कोणताहि पर्याय वापरण्याची मुभा आहे असा संकेत तीमधून मिळत होता. पुढे काही दिवसांनी ती टीप तेथून वगळण्यात आली. नियम तेच राहिले. ज्यांना पूर्वीची टीप माहिती होती त्यांना वाटू लागले की आम्ही पूर्वीसारखें लिहूं लागलों तर तें दंडार्ह ठरेल. आणि १९६२ मध्ये पुन्हां जेव्हां साहित्य महामंडळाने नियमावलि केली तेव्हां तिच्यासोबत स्पष्ट कल्पना दिल्या की ह्या लेखन-पद्धतीला अनुसरून नसलेलें लेखन कोणत्याहि शासकीय पुरस्कारासाठी विचारांत घेण्यात येणार नाही. ह्या नियमांचा अर्थ असा झाला की, जुन्या पद्धतीने केलेले लेखन अप्रमाणीकृत (destandardize) केले आहे म्हणून नवीन नियम न पाळल्यास शासन लेखकाला दंड करील. शासनाने असा दंडा उगारल्यामुळे ज्यांना मनांतून पटत नव्हते त्यांनादेखील शासनाचे नियम पाळणे भाग पडले.
ह्या तीस वर्षांच्या अंतराने केलेल्या नियमांमुळे सामान्य लेखकांच्या मनांत आपण लिहितों तें चूक की बरोबर हा संभ्रम निर्माण झाला आणि दुसरीकडे एकूणच नियमांविषयीं अनादर निर्माण झाला. हा नियमांविषयींचा अनादरच आज शुद्धलेखनाच्या अराजकांत परिणत झालेला आढळतो. फार थोडी पुस्तकें आज शुद्धलेखनदृष्ट्या स्वच्छ छापलेली आढळतात. चांगल्या प्रतिष्ठित पुस्तकांच्या लेखनांतहि एकसारखेपणा आढळत नाही.
शुद्धलेखन हे व्याकरणाचे अनुप्रयुक्त (applied) अंग आहे. त्यामुळे तें व्याकरणापासून वेगळे काढतां येत नाही. व्याकरणाचा पहिला नियम असा आहे की जे बोलले आणि/अथवा लिहिले जातें तें नियमांत बसवणे. व्याकरणाचे नियम हे आदर्शमूलक (normative) नसतात. ते वस्तुनिष्ठमूलक (positive) असतात. भाषेमध्ये ती कशी लिहिली जाते, ती कशी बोलली जात आहे एवढे सांगण्याचा आणि त्यांचे विश्लेषण करण्याचा वैयाकरणांना अधिकार आहे. ती कशी लिहिली जावी हे सांगण्याचा अधिकार नाही. नवे नियम करून वैयाकरणांनी अधिकारातिक्रमण केले आहे. नवे नियम लेखकांच्या सोयीचे कसे होतील ह्याचा विचार केला आहे; त्यांना जास्त नियम लक्षात ठेवण्याची गरज पडूं नये अशा उद्देशांनी नवे नियम घडविले आहेत. वाचकांची सोय पाहिलेली नाही.
लेखनाचे नियम कितीहि सोपे केले तरी ते पाळू न शकणारे लोकच बहुसंख्येने असणार! माझ्या अंदाजाप्रमाणे हजार लोकांत जास्तीत जास्त पांच लोकांना म्हणजे (०.५%) इतक्या लोकांना लेखनाचे नियम नीट अवगत होतील.
ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत आणि चित्रकला ह्या कला जे शिकतात, त्यांतील फार थोडे, हजारांत एक दोन, त्यांत प्रवीण होतात. त्याचप्रमाणे सर्वसाधारण जनता त्या लेखन नियमांपासून दूर राहील. महाराष्ट्रांत दहा कोटी लोक राहतात. त्या दहा कोटींपैकी जास्तीतजास्त पांच लाख लोकांना भाषा चांगल्या प्रकारे लिहितां येईल अशी अपेक्षा करतां येते आणि ही क्षमता असणारे लोक हुडकून काढून त्यांच्यापर्यंत हे नियम नीट पोहचविण्याची गरज लक्षात येते. आपली भाषा सौष्ठवपूर्ण आणि नियमानुसार लिहूं शकणाऱ्यांची ही पांच लाखांची संख्या महाराष्ट्रांत फार कमी नाही. दहा कोटी वाचक आणि त्यांचे पांच लाख लेखक हे चित्र, हे प्रमाण, अत्यंत विलोभनीय आहे. परंतु दुःखाची गोष्ट अशी की आज पांच लाख तर दूर पण पांचशे लेखकसुद्धां नियमानुसार लिहूं शकणारे राहिलेले नाहीत. आज प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे आणि इतर साहित्य, मुख्यतः लहान गावांतून छापून येणारे लेख बघा वाचकाला प्रत्येक घासाला खडा लागल्याचा अनुभव येईल.
लेखन शुद्ध (एकसारखें) असल्याने सामान्य वाचकांची सोय होत असतें एवढेच मला मुख्यतः नोंदवायचे आहे. शब्दांची रूपें डोळ्यांना ओळखीची झाली की ती ओझरती बघून त्यांचा अर्थ लक्षात येतो. ओळखीच्या माणसांचे नेहमीचे कपडे बदलले की त्याला ओळखायला जसा वेळ लागेल, तसे काहींसें येथेहि घडते. निरखून पाहिले की ते ओळखता येते. पण प्रत्येकच शब्द निरखून पाहावा लागला तर ते वाचन कंटाळवाणे होते. प्रमाणभाषेतील कादंबरी व अल्पपरिचित बोलीभाषेतील कादंबरी यांत काय वाचणे सोपे आहे याचा विचार करावा. अपरिचित रूपें वाचण्याचा कंटाळा येतो हे कबूल करावेच लागेल. आज बालभारतीच्या पुस्तकांच्या पलीकडे ज्यांचे वाचन गेलेलेच नाही अशी मंडळी आतां चाळिशीला आली आहेत. बालभारतीने जोडाक्षरांच्या बाबतींत आपल्या लहान मुलांच्या डोळ्यांना अत्यंत वाईट संवयी लावल्या आहेत. एकीकडे त्यांची शास्त्रपूत लेखन वाचण्याची क्षमता मारून टाकलेली आहे, त्यांच्यासाठी कोणत्याहि जड विषयाचे लेखन वाचणे हे शिक्षेसारखे झाले आहे आणि दुसरीकडे सर्व लेखनमुद्रण अतिशय पसरट करून कागदाची प्रचंड नासाडी केली आहे. पाठ्यपुस्तकें व वह्या ह्यांच्यासाठी लाखो टन कागद दरवर्षी वापरला जातो. तो निर्माण करण्यासाठी जंगले आणि पाणी यांचाहि फार मोठ्या प्रमाणावर नाश झाला आहे, पर्यावरणाची अपरिमित हानि झाली आहे. ह्या अपराधाबद्दल कोणाला जबाबदार धरावे आणि अपराध्याला कोणती शिक्षा करावी असा मला वाटू लागले आहे.
आमच्या लहानपणी टाइपरायटर्स थोडे होते, कोर्ट-कचेऱ्यांतील सगळे कागद हस्तलिखित असत. खटला हायकोर्टात गेला की तेथील न्यायाधीशांना ते सगळे हस्तलिखितरूपांतील कागद वाचणे जिकरीचे होऊ नये ह्यासाठी ती पुस्तकें छापून मिळत. एकेक अक्षर लावून वाचण्याची गरज असें पुस्तक छापल्याने राहत नसे. कोणत्याही लेखनाचा आणि अर्थात् मुद्रणाचा हेतु लेखकाच्या मनांतला आशय वाचकांच्या मनांत विनायास पोहचावा असा असायला हवा. लेखन आणि मुद्रण डोळ्यांसाठी असते. अर्थ सांगण्यासाठी असते, त्याचा मनांत वाचतांना उच्चारांशी संबंध ठेवण्याची गरज नसते. प्रत्येक माणूस आपल्या मुखाच्या रचनेप्रमाणे आणि आपल्या संवयीप्रमाणे उच्चार करतो. तो उच्चार न समजला तर ऐकणाऱ्याला त्याचा अर्थ बोलणाऱ्याकडून समजून घेता येतो; त्याला विचारतां येतो. लेखन आणि मुद्रण वाचतांना ही सोय नसते. म्हणून तेथें शब्दांची पूर्वपरिचित (जी शब्दकोशांमध्ये सांपडतील अशीं) प्रमाणीकृतरूपें अर्थनिश्चयनासाठी वापरावीं लागतात.
हस्तलिखितें बहुदा मोठ्याने वाचून दाखविण्यासाठी लिहिली जात होती, तर मुद्रित पुस्तकें मूक वाचनासाठी घडवलेली असतात. डोळ्यांना अर्थ दाखवणारी असावी लागतात. प्रत्येक शब्दाच्या रूपांत जितकी निःसंदिग्धता असेल तितकें बरें असतें. लेखनाचे मुद्रणांत परिवर्तन करतांना ही काळजी घ्यावी लागते.
श्री. ठकार यांच्या पत्रामध्ये (ह्या अंकामधील पत्रसंवाद पाहावा) “शुद्धलेखनांतील अराजक अस्तित्वांतले नियम सर्वत्र पाळले जात नसल्यामुळे निर्माण झाले आहे.” असें वाक्य आहे, परंतु अराजकाचे कारण तेवढेच नाहीं. १९८७ मध्ये प्रसिद्ध केलेली शुद्धलेखन-नियमावली हीहि अराजकाचे मूळ आहे. कारण व्याकरण हे पीरींळींशीलळशपलश नाही. लेखन कसे असावें हे सांगण्याचा अधिकारच मुळी वैयाकारणाला नाही. लेखनाचे नियम हे अत्यंत सावकाशपणे उत्क्रांत होत आलेले असतात. मुद्रणामुळे ते स्थिर होतात. व्याकरणाच्या काही नियमांनी (शब्दसिद्धि) नवे शब्द घडवले जातात. त्यांचे लेखन पूर्वी मुळींच झालेले नसते. तें पूर्णतया नव्यानेंच भाषेत प्रवर्तित केले जातात. ते पहिल्याने जसे नियमानुसार लिहिले गेले तसेच पुढेहि लिहिले जावे लागतात कारण कोशांत त्यांची तीच नियमसिद्ध रूपें सांपडतात. शुद्धलेखनांतील अराजक हा लेख लिहितांना मला ह्याच गोष्टीकडे अंगुलिनिर्देश करायचा होता हे पुन्हां येथे सांगतो. आज मराठीतील प्रतिष्ठित प्रकाशनसंस्था त्या (नव्या) नियमांचे पालन करतात. कारण तसें न केल्यास त्यांच्या प्रकाशनाला पुरस्कार मिळत नाहीत, हे एक, आणि दुसरे हे नियम करून चाळीस वर्षे झाली असल्याने जुन्या नियमांप्रमाणे लिहिण्याची संवय मोडली आहे. मराठीच्या पुष्कळ प्राध्यापकांनादेखील जुन्या नियमांचे सोपपत्तिक कारण बहुदा माहीत नाही.
“आतां हे नियम बदलल्याने मोठ्या अराजकाला आमंत्रण दिल्यासारखे होईल” असे श्री. ठकार ह्यांना वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे मराठी साहित्य महामंडळाने १९९० साली हे सारे नियम पुन्हां बदलण्याचा घाट घातला होता आणि नव्याने अराजकाला आमंत्रण दिले होते. त्यांचा तो बेत साधला नाही. त्याचे कारण डॉ. गं.ना.जोगळेकरांना विचारतां, ‘अजून हेच नियम लोकांच्या अंगवळणी पडायचे आहेत. तेव्हा ते इतक्यांत बदलायचे नाहीत’ असे त्यांनी म्हटल्याचे कळले. तें ऐकून मी चकितच झालो होतो. कारण टायपिस्टला एका कळफलकाची संवय झाली की लगेच तो बदलायचा व नवीन शिकवायचा अशांतला हा प्रकार आहे. ह्यामुळे वाचनाची गति कमी होते व अराजकाला निमंत्रण दिले जातें हें आजवर कोणी लक्षात घेतले नाहीं. लेखकांची अधिकाधिक सोय पाहण्याचा यत्न मात्र केला. एवढ्याच कारणासाठी ‘झाले आहे, ह्याऐवजी ‘झालंय’ असें वापरणे अयोग्य आहे असे माझे मत आहे. आणि तें ठकारांनाही मान्य आहे. लेखनांत बोली दाखवितांना सरसकट किंवा प्रत्येक वेळी उच्चार हुबेहूब दाखविण्याची गरज मला कधींच समजली नाही. अवतरण-चिह्नांत असलेला मजकूर बोलण्यांतला आहे हे समजणे फार अवघड नाहीं.
व्याकरणाच्या नियमांप्रमाणे पायमोडकी अक्षरें शब्दाच्या शेवटींच फक्त घेतां येतात. शब्दांच्या मध्ये येणारे व्यंजनचिह्न हे पुढच्या स्वरचिह्नाला चिकटलेच पाहिजे असा संस्कृत शब्दांच्या बाबत नियम आहे. त्यामुळे धिक् +कार = धिक्कार असे शब्द अर्धा क आणि पुढे दुसरा क (क्क ) असें न लिहितां क च्या खाली क (क्क) असे लिहून, सद्गुण, सत्+गुण = सद्गुण, उद्ध्वस्त – उदस्त, उद्घाटन – उद्घाटन, विद्वत् +रत्न – विद्वद्रतक, तदाँरा, श्रीमद्भगवद्गीता, अशी लिहावी लागतात. असो.
अनुच्चारित अनुस्वारांबद्दल सांगायचे तें असें की त्या अनुस्वारांच्या लेखनाने डोळ्यांना अर्थ जास्त स्पष्टपणे कळत असेल तर ते अनुस्वार ठेवले पाहिजेत अशा मताचा मी आहे. ते अनुस्वार घातल्याने अर्थहानि कधीच होत नाही.
लेखन जितकें निःसंदिग्ध असेल तितका संदर्भावर अवलंबून राहण्याचा त्रास वाचतो आणि मधलेमधले शब्द निवडून द्रुतगतीने वाचतां येते. एवढ्यासाठी निःसंदिग्ध लेखन आवश्यक आहे. ह्रस्व-दीर्घाच्या बाबतींतसुद्धा हेच धोरण अवलंबिले पाहिजे आणि त्यामुळेच पुष्कळ ठिकाणी सामासिक शब्दांचा पदच्छेद करतां येतो. आणि अर्थग्रहण सोपे होते. पुढे काही बाबतींत ठकारांचे आणि माझें एकमत आहे तेव्हां त्याबाबतींत वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही.
कोशांत लिहिणे इष्ट नाहीं ‘ असा परिच्छेद ठकारांना नको आहे परंतु मला तो हवा आहे याचे कारण कोश पाहण्याची गरज १९६२ नंतरच्या छापलेल्या पुस्तकांतील शब्दांच्या अर्थासाठीच नव्हे तर तत्पूर्वी जुन्या शुद्धलेखनाप्रमाणे छापलेल्या पुस्तकांतील शब्द पाहण्यासाठीसुद्धा असते. मधला १९३० पासून आजपर्यंतचा हा सर्व काळ अराजकाचा मानून, त्यामुळे लोकांच्या वाचनाची गति कमी झाली आहे हे जाणून, तेवढा काळ बाजूला सारून, जुन्याशी आपली लेखनपद्धति जोडून घेतली पाहिजे असें माझें मत झाले आहे आणि तेवढ्यासाठीच माझे लेख मी जुन्या पद्धतीने छापले आहेत. ते तसें छापल्याने काही अर्थहानि झाली आहे काय ते वाचकांनी कळवावें.
श्री ठकार ह्यांच्या पत्रांतला ६ वा परिच्छेद पाहावा. मी माझ्या लेखांत जो जातिवाचक उल्लेख केला आहे त्याविषयी त्यांचा गैरसमज झालेला दिसतो. उच्चाराप्रमाणे केलेले लेखन-मुद्रण योग्य असें म्हटल्याबरोबर “आजपर्यंत झालेले लेखन ‘उच्चवर्णीयांनी आपल्या उच्चाराप्रमाणे केले ते आम्हांला अमान्य असा एका कोपऱ्यांतून सूर निघतो.” मला कोणत्याहि वर्णाला उच्च म्हणावयाचे नाही. सर्व वर्ण समान आहेत असावयाला हवे म्हणून लेखन (त्यापेक्षांहि मुद्रण) उच्चारानुसारी नको, प्रमाणीकृत हवे. त्यांत शक्य तितका जास्त एकसारखेपणा पाहिजे. तो एकसारखेपणा १९३० पर्यंत होता. त्यानंतर दोन पर्याय निर्माण झाले. आणि १९६२ नंतर तीन पर्याय झाले. सोबत भाषेचे शिक्षण बिघडले साधे संधि आणि समास आणि अक्षरगणवृत्ते आणि जुजबी व्याकरण पूर्वी व्ह.फा. (व्हाकुलर फायनल) पर्यंत स्पष्टपणे समजत असे तें आज एम्.ए., पी.एच्.डी. पर्यंत कळत नाहीं. त्यामुळे भाषेचे एकूण आकलनच कमी झाले. जुन्या नियमांप्रमाणे छापलेली हरि नारायण आपटे, लोकहितवादी, टिळक, आगरकर, परांजपे, रानडे इतकेच नव्हे तर केतकर, भोपटकर, अत्रे, विनोबा, य.रा.दाते, चिं. वि. वैद्य, राजवाडे, वा.म.जोशी, लक्ष्मीबाई टिळक हे सारे गद्यलेखक आणि पद्य वा काव्यलेखक नव्या वाचकांना कंटाळवाणे झाले. प्रचलित नियमांप्रमाणे केशवसुत आणि त्यानंतरचे सगळे कवि ह्यांची काव्ये नव्या निरनुस्वार पद्धतीने छापली पाहिजेत. परंतु ‘सत्यकथेनें’ तो नियम डावलून त्यांची काव्ये १९३० च्या नियमांप्रमाणेच छापली. आमच्यासारख्या मुद्रकांना ‘म्हणी’ कोणत्या नियमांत बसवावयाच्या असा प्रश्न पडला कारण चिपळूणकरांपूर्वीचे गद्य जुन्या पद्धतीने छापावयाचे असा सरकारी फतवा आहे. कोणती म्हण कोणत्या काळांतली हे न सुटणारे कोडें आहे. कोशरचना करतांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख ठकारांनी केलाच आहे.
आम्हां मुद्रकांना जुनी काव्ये वा गद्य छापावयाचे असल्यास त्याचे नियम शिकावेच लागतात. वाचकांनाहि कोणत्याहि पोथीवरची टीका न वाचतां ती समजावी अशी इच्छा असेल तर ते नियम शिकावेच लागतात. आम्हां मुद्रकांची आणि वाचकांची तीन प्रकारचे नियम शिकण्यांतून सुटका नाही. लेखकांनी कसेंहि लिहिले तरी ते आम्ही, मुद्रकांनी सुधारून घ्यावे अशी अपेक्षा आहे. सगळ्या पोथ्या जुन्या पद्धतीने छापणे भाग आहे. अलिकडेच एका पुस्तकांत ज्ञानेश्वरीतील उतारे मला छापवून घ्यावे लागले. त्याचा किती त्रास झाला! माझें बहुतेक सगळे ह्या विषयावरचे लेखन मुद्रक आणि प्रकाशक म्हणून आलेल्या अनुभवांतून स्फुरलेले आहे.
सर्व मराठी शब्द नीट लिहावयाला शिकण्यासाठी एक तर संस्कृतचे प्रारंभिक ज्ञान पाहिजे नाहीतर कोशांचा वापर करावयाला पाहिजे. आजच्या मराठी लेखकांना दोन्ही उपलब्ध नाहीत. कोणतीहि भाषा चांगली लिहायची असेल तर कोश आणि इतर संदर्भसाहित्य हाताशी ठेवलेच पाहिजे. कोश शब्दांचा अर्थ पाहण्यासाठीच वापरायचे नसतात तर त्यांचा आपण केलेला वापर बरोबर होत आहे ह्याची खातरजमा करण्यासाठींहि वापरावयाचे असतात हे मराठीच्या लेखकांना आणि त्याहून मुद्रकांना कधीतरी कळायला हवे.
मराठीच्या लेखनाविषयीचे प्रचलित नियम करून आतां ४० वर्षे झाली आहेत. अजून ते नियम कोणाच्याहि अंगवळणी पडले नाहीत ‘फार थोडे मुद्रक जागरुक आहेत’ ह्याचे कारण माझ्या समजुतीप्रमाणे त्या नियमांचा पाया ढिसाळ आहे. ती लेखनमुद्रण उच्चारानुसार असावे ह्या भ्रामक समजुतीवर आधारित आहे. ह्या समजुतीमुळे विभिन्न ठिकाणच्या बोली बोलणारे लेखक शब्द कसे लिहावे, शब्दांचे प्रमाणीकृत रूप कोणतें ह्याविषयी सतत संशयांत असतात. मनांतल्या मनांत वाचावयाचे लेखन अर्थबोध करून देणारे हवें हे जाणून लेखन-नियम करायला हवे. उच्चारबोध मुद्रणामध्ये गौण मानला पाहिजे.
ठकारांनी त्यांच्या पत्राच्या आठव्या परिच्छेदांत केलेली ‘प्रमाणभूत शब्दकोश निर्मितीची सूचना’ ताबडतोब अंमलात आणावयाला हवी. मात्र विद्यमान नियम बदलू नयेत ह्या त्यांच्या सूचनेचा फेरविचार करावा. माझ्या लेखामध्ये केलेल्या सूचना (सप्टें.२००४) बदलण्याचे कारण मला दिसत नाही. ठकार म्हणतात, नियमानुसार मुद्रितशोधन करणारी माणसें संख्येने अगदी कमी आहेत ह्या वस्तुस्थितीचा लाभ घेऊनच जुने नियम पुन्हां अंमलात आणणे इष्ट होईल. सगळ्यांनाच नवीन शिकवायचे आहे असे समजून योग्य तें शिकवावें.
श्री नंदा खरे यांच्या पत्राविषयीं,
डोळ्यांना अर्थ दाखवणारें लेखन प्रमाणभूत मानल्याबरोबर नियम बनवणाऱ्यांच्या पुष्कळशा समस्या दूर होतात. खऱ्यांनी पूर्वी, म्हणजे किती जुनें हा, असा प्रश्न विचारला आहे. जुनें म्हणजे अंदाजे शंभर वर्षांपूर्वीचे मुद्रणोत्तर. मुद्रणपूर्व लेखन म्हणजे बखरी आणि पंडिती काव्य, हे प्रत्येकाला वाचावें लागतेच असे नाही. पण तुकाराम, ज्ञानेश्वर ह्यांची काव्ये जी मुद्रित स्वरूपांत उपलब्ध आहेत ती पुस्तके वाचण्याचा नव्या पिढीला कंटाळा आहे. आणि आज जे कोणी वाचक आहेत ते अंदाजे वयाची चाळिशी ओलांडलेले आहेत. तरुण लोकांच्या वाचनाच्या संवयी बिघडवण्यामध्ये ‘बालभारतीच्या’ लेखनपद्धतीचा आणि खरे म्हणतात त्या ‘एनिथिंग गोज’ ह्या समजुतीचा परिणाम असला पाहिजे असे मला वाटले. तेवढ्यासाठी ते लेख लिहिण्यास प्रवृत्त झालो.
नव्या लेखनाच्या पद्धतींत अनुस्वार गाळल्याने प्रत्येक ठिकाणी अर्थात बदल होतातच असे मला म्हणायचे नाही परंतु अनुस्वार दिल्याने पुष्कळ ठिकाणी अर्थनिश्चयनास साहाय्य होते. एवढेच मला नोंदवायचे आहे. ( मला खाऊ दे. आणि मला खाऊ दे. अशी वाक्ये. पक्षानीं/पक्ष्यांनी, माशांना/माश्यांना अशी रूपें लिहिल्यामुळे पक्ष/पक्षी, मासा/माशी हे डोळ्यांना दिसते.)
“लेखननियमांशी, लिपीशी खेळणारी मंडळी जुनी पुस्तकें कधीच कोणी वाचू शकणार नाही ह्यांकडे दुर्लक्ष करतात”. अशा आशयाचें माझें विधान आहे. विनोबांनी लोकनागरी लिपीचे खिळे पाडून घेतले आणि त्यांची प्रकाशनें त्या लिपीत छापायला सुरुवात केली. सावरकरांनीहि त्यांच्या कल्पनेप्रमाणे कांही नवे खिळे पाडून घेतले होते. (‘लिपिशुद्धीचे आंदोलन’ हे त्यांचे पुस्तक बघा.) पण काही दिवसांनी लोक आपल्या लिपीत छापलेले वाचण्याचा कंटाळा करतात हे जाणवल्यानंतर त्यांनी त्या नव्या लिपीचा आग्रह मागे घेतला. मात्र बालभारतीनें लिपीशी चालवलेला खेळ गेली अंदाजे चाळीस वर्षे सातत्याने चालू आहे. त्यामुळे वाचकांचे झालेले नुकसान कदाचित् कधीच भरून येणार नाही अशी मला भीति आहे. त्यांना जी वाचण्याची संवय झाली तें सोडून दुसरें वाचण्याचा त्यांना कंटाळा येतो असें माझें निरीक्षण आहे. हा सारा संदर्भ माझ्या त्या वाक्यामध्ये होता हे मी आतां येथे पुन्हां नमूद करतो.
ज्यांना उपजतच वाचनाची गोडी आहे अशांचे नुकसान होत नाही. त्यामुळे जुनी पुस्तकें कधीच कोणी वाचूं शकणार नाहीत हे माझें विधान अतिव्याप्त झाले आहे. नव्या पद्धतीच्या लेखनामुळे आकलनांत येणारी अडचण फार मोठी नाही. पण तें वाचतांना अपरिचिताला त्यांचा अडथळा होत असणारच. (आम्हांला जसा ‘अशुद्ध’ मुद्रणाचा होतो तसा.) त्यांची गति मंदावणारच आणि त्या मंद गतिमुळे असें वाचन कमी आनंददायक होणार म्हणून ते टाळण्याची प्रवृत्ति होणार असें माझें अनुमान आहे.
‘यद्यपि बहुनाधीषे’ या श्लोकामध्ये व्याकरण येणाऱ्याच्या ठिकाणी मला तरी आढ्यता वाटली नाही. फार काही शिकला नाहीस तरी मुला तूं व्याकरण शीक, म्हणजे अर्थाचा अनर्थ होईल असें लिखाण तुझ्याकडून होणार नाही. असा हितोपदेश करतांना तो मला जाणवतो. शास्त्रपूत लेखन दंडार्ह मानूं नये याचा संदर्भ मी पूर्वी दिला आहे.
शास्त्रपूत लेखन ज्यांना येणार नाही त्यांना हिणवण्याचा विचार माझ्या तरी मनांत नाही. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमधला संवाद कोणत्याहि अडथळ्यांविना व्हावा अशीच माझी इच्छा आहे. त्यासाठी तीनचार प्रकारचे लेखननियम एकाच वेळी अस्तित्वांत ठेवावे असें माझें मत मी पूर्वी नोंदविलेंच आहे.
बोललेल्या भाषेचे प्रमाणीकरण मला नको आहे. लेखनाचे जे पूर्वी प्रमाणीकरण झाले आहे ते मधल्या काही नियमांमुळे अप्रमाण ठरविले गेले. तसें तें अप्रमाण मानूं नये एवढाच माझा आग्रह शास्त्रपूत लेखन दंडार्ह मानूं नये हे विधान करतांना होता. लेख मोठा झाला आणि त्यांत काही प्रमाणांत पुनरुक्ति झाली त्याबद्दल क्षमा मागतो.
मोहनी भवन, खरे टाऊन, धरमपेठ,नागपूर-४४० ०१०.