या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण कशावर विश्वास ठेवावा ? असा प्रश्न आपण विचारला होता, आणि त्याचे उत्तर अर्थात् सत्य विधानांवर असे एका वाक्यात दिले होते. परंतु यावर एक आक्षेप असा घेतला जाऊ शकेल की सत्य विधानावर विश्वास ठेवावा हे उत्तर पूर्णपणे बरोबर नाही. सत्यावर विश्वास ठेवणे नेहमीच इष्ट असेल असे नाही. कित्येकदा सत्यदर्शन अनिष्टही असू शकते. उदा. एखाद्या मनुष्याला जर गंभीर आजार झाला असेल तर पुष्कळदा रोग्याला डॉक्टर ते सांगत नाही. रोगी कदाचित मानसिक धक्क्याने आणि निराशेने हातपाय गाळील, आणि रोगाला प्रतिकार करण्याची त्याची शक्तीच नाहीशी होऊ शकेल. अशा वेळी त्याला खरी वस्तुस्थिती न कळविता त्याच्या आजाराचा मुकाबला करणे इष्ट असते.
एवढेच नव्हे, तर आक्षेपक पुढे असेही म्हणेल की ईश्वरावरील श्रद्धा (जरी ईश्वर कदाचित् अस्तित्वात नसला तरी) मानवांना शक्तीचा स्रोत म्हणून अतिशय उपयोगी पडते. श्रद्धेच्या बळावर मनुष्य अचाट कामेही करू शकतो, आणि त्याच्या तुलनेत अश्रद्ध मनुष्य नाउमेद बनून नुसताच बसून राहतो. विशेषतः समाजातील बहुसंख्य दरिद्री आणि अशिक्षित लोक अस्मानी आणि सुलतानी आपत्तींनी इतके गांजलेले असतात की त्यांतून त्यांची सुटका करण्याचे उपाय उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत ते संकटांचा सामना करतात केवळ ईश्वरावरील श्रद्धेच्या साहाय्याने. आपण विवेकवादी त्यांच्या संकटांचे निवारण तर करू शकत नाही, परंतु त्यात साह्यभूत होणारी श्रद्धा मात्र हिरावून घेत आहोत. हे कितपत समंजस किंवा विवेकी होईल ? अठराविश्वे दारिद्रय, सर्व प्रकारचे दुर्धर आजार आणि अन्य भयानक संकटे इत्यादींना धैर्याने तोंड देत सामान्य मनुष्य आयुष्याची वाटचाल करू शकतो याचे कारण त्याची श्रद्धा. ती नाहीशी करून आपण त्याच्यावर उपकार करीत नसून त्याच्या दुरवस्थेत भर घालत आहोत.
या युक्तिवादाचा निष्कर्ष असा आहे की सत्य सर्वथा इष्ट असते, ही गोष्ट आपल्याला प्रथम सिद्ध करावी लागेल. सत्याचा शोध कसा लावावा या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाने बिनचूक दिले असेल; पण आपण सत्य सर्वदा स्वीकारावे ह्या मताची सिद्धी विज्ञान देत नाही. सत्य हे विज्ञानाचे परम प्राप्तव्य असेल, परंतु ते मनुष्यमात्राचे परमप्राप्तव्य आहे हे सांगण्याचा अधिकार विज्ञानाचा नाही. आणि ते आपले (निदान एक) परमप्राप्तव्य आहे या मताची सिद्धी मिळेपर्यंत सत्य सर्वदा इष्ट असते हे मत शंकास्पद राहणार. या आक्षेपाला विवेकवाद्याचे उत्तर काय आहे ?
आपण आतापर्यंत केलेली वाटचाल क्षणभर डोळ्यांखालून घालू या. आपण कोणते कर्म करावे? असा प्रश्न आपण विचारला होता, आणि विवेकवादाला संमत असे उत्तर कोणते याचा शोध करीत होतो. अन्य शब्दांत आपला प्रश्न असा होता की आपण कोणती साध्ये आपल्यापुढे ठेवावी ? पण या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब न देता आपण दुसऱ्या एका प्रश्नाकडे वळलो होतो. कोणतेही साध्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक किंवा अनेक कर्मे करावी लागतात. उदा. आपल्याला गरम पाणी हवे असेल तर गरम पाणी मिळविणे हे आपले साध्य होईल, आणि हे साध्य प्राप्त होण्याकरिता आपल्याला काही कर्मे (उदा. पाणी तापविणे) करावी लागतील. म्हणजे काही कर्मे आपण साध्य म्हणून करतो, परंतु त्याकरिता अन्य काही कर्मे साधन म्हणून करावी लागतात. या साधनरूप कर्मांचा विचार आपण दुसऱ्या लेखांकात केला. ही साधनरूप कर्मे विवेकी कशी होतील या प्रश्नाचे उत्तर आपण असे दिले की आपल्या स्वीकृत साध्याचे साधन म्हणून जे कर्म आपण करणार आहोत ते कर्म जर त्या साध्याचे पर्याप्त आणि कार्यक्षम साधन असेल, तर ते कर्म एका अर्थाने (म्हणजे साधन म्हणून) विवेकी आहे. आपण जर क हे साध्य निवडले असेल, तर ते साध्य आपल्याला मिळवून देऊ शकणारे पर्याप्त साधन स्वीकारणे विवेकी होईल आणि अपर्याप्त साधने स्वीकारणे अविवेकी होईल, हे उघड आहे. अमुक साध्याचे अमुक पर्याप्त साधन आहे, अशी माहिती देणारी सत्य विधाने म्हणजे नैसर्गिक आणि सामाजिक क्षेत्रांतील कार्यकारणाचे नियम होत, आणि आपली कर्मे सफल व्हायची असतील तर हे नियम आपल्याला ज्ञात असावे लागतील. म्हणजे आपली इष्ट साध्ये प्राप्त करण्याकरिता आपल्याला ती कशाने (कोणत्या साधनांनी) प्राप्त होऊ शकतील याचे ज्ञान (अर्थात सत्य ज्ञान) असल्याशिवाय जर आपण कर्मे करू लागलो तर आपली कर्मे सफल होतीलच असे नाही. एखादी गोष्ट एकदा आपले साध्य म्हणून स्वीकारल्यानंतर त्याच्या प्राप्तीचा बंदोबस्त करणे विवेकाचेच लक्षण आहे. उलट जर आपण साधनाच्या पर्याप्ततेविषयी बेफिकीर राहिलो, आणि भलतीच किंवा अपुरी साधने वापरली, तर आपण अविवेकाने वागलो हेच सिद्ध होईल. म्हणून आपण असे म्हणालो की साध्यसाधनाच्या क्षेत्रात सत्य जाणून घेणे अनिवार्य आहे, आणि हे म्हणणे निर्विवादपणे सत्य आहे हे मान्य करावे लागेल.
आता आपण आक्षेपकाच्या युक्तिवादाकडे वळू शकतो. त्याचे म्हणणे सकृद्दर्शनी सयुक्तिक दिसते यात संशय नाही. आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात की जेव्हा सत्य बोलणे अनिष्ट असते. तसेच हेही खरेच आहे की श्रद्धा हा स्फूर्तीचा आणि शक्तीचा स्रोत होऊ शकतो. तेव्हा सत्य नेहमीच आपले साध्य असावे ही गोष्ट निरपवादपणे खरी नाही असे प्रथमदर्शनी तरी दिसते. या आक्षेपाकडे आता वळू. सत्य कित्येकदा इष्ट गोष्टीला विघातक असते हे मान्य करूनही आपण अशा प्रसंगी असत्याचा स्वीकार करावा हे मान्य करता येत नाही. असत्याचा स्वीकार कोणी करायचा ? ज्याला सत्य कळले आहे, आणि ते आपल्या इष्ट साध्याला विघातक आहे हे ज्याच्या लक्षात आले आहे, त्याने असत्य स्वीकारावे असे सुचवायचे आहे काय? तसे असेल तर ते एक अशक्य गोष्ट करायला सांगण्यासारखे आहे. कारण ज्याला एखाद्या गोष्टींविषयीचे सत्य कळले आहे तो त्याच्याविरुद्ध गोष्ट स्वीकारू शकेल काय ? एखादे विधान सत्य म्हणून जाणणे आणि त्याचा स्वीकार करणे या गोष्टी दोन नाहीत, एकच आहेत. ज्याला सत्य कळले आहे तो त्याचा स्वीकार न करणे अशक्य आहे. असत्य म्हणून मला माहीत असलेल्या एखाद्या विधानावर माझा विश्वास आहे असे म्हणणे वदतोव्याघात आहे, कारण एखाद्या विधानावर माझा विश्वास आहे याचा अर्थ मी ते सत्य समजतो. ज्याच्यावर माझा विश्वास आहे ते विधान वस्तुतः असत्य असू शकते; परंतु ते असत्य आहे हे मी स्वीकारतो आणि त्याच्यावर विश्वासही ठेवतो हे मात्र अशक्य आहे.
पण मग अनेकदा सत्यदर्शन अनिष्टही असू शकते, असे जे आपण वर म्हणालो ते खरे नाही काय? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की ही गोष्ट बरीच गुंतागुंतीची आहे आणि तिचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे अवश्य आहे. आपण घेतलेल्या उदाहरणात समजा अ ही व्यक्ती आजारी आहे, आणि तिला एक दुःसाध्य रोग झाला आहे. आपला रोग दुःसाध्य आहे हे सत्य अ ला माहीत नाही. ते माहीत आहे ब ला, त्याच्या नातेवाईकांना आणि डॉक्टरला, आणि या मंडळींचे असे मत आहे की अ ला हे सत्य कळता कामा नये. अशा परिस्थितीत अ ला त्याच्या प्रकृतीविषयीचे सत्य सांगून काही उपयोग नसल्यामुळे, आणि ते न सांगितल्यास उपचारास, यश येण्याचा संभव अधिक असल्याने, त्याला सत्य न सांगता असत्य सांगावे हे सयुक्तिक दिसते. परंतु ब ने (म्हणजे अ च्या नातेवाईकांनी आणि डॉक्टरांनी) तरी सत्य जाणून घ्यावे की नाही? की त्यांनीही त्याचा तपास न करता उपचार करावेत? याचे उत्तर त्यांनी सत्य जाणून घेणे अवश्य आहे हेच असू शकते. कारण ते सर्वच जर त्याबाबतीत अंधारात असतील तर त्यांना इष्ट असणारा अ च्या आजाराचा प्रभावी इलाज होणे दुरापास्त होईल. तेव्हा आपले साध्य हस्तगत होण्याकरिता त्याचे स्वरूप आणि त्याची साधने यांच्याविषयी सत्य ज्ञान असणे अवश्य आहे ह्या विधानाला वरील आक्षेपाने बाधा येत नाही हे उघड आहे. ___ यापुढील मुद्दा श्रद्धेमुळे श्रद्धावानाला प्राप्त होणाऱ्या शक्तीचा, प्रयत्नाला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा. आता हे खरे आहे की कोणतेही काम करायला घेतल्यानंतर त्याचे यश बऱ्याच प्रमाणात आपण त्याकरिता किती प्रयत्न करतो यावर अवलंबून असते. काही माणसे स्वभावतः आशावादी असतात, तर काही निराशावादी. आशावादी माणसे सामान्यपणे अधिक प्रयत्न करतात, तर निराशावादी प्रयत्न मध्येच सोडून देतात. त्यामुळे निराशावादी लोकांपेक्षा आशावादी लोक यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. तीच गोष्ट उद्योगी आणि आळशी माणसांची, आणि उत्साही आणि निरुत्साही माणसांची. हे स्वभावविशेष आहेत, आणि त्यात प्रयत्नाने फारसा बदल घडून येत नाही. श्रद्धेचाही परिणाम आशावादीनिराशावादी, उद्योगीआळशी किंवा उत्साहीनिरुत्साही या स्वभावविशेषानुसार होण्याचा संभव असतो. म्हणजे आपल्याला ईश्वराचे साह्य आहे ही श्रद्धा आशावादी, उद्योगी किंवा उत्साही मनुष्यावर जो परिणाम घडवून आणील त्याच्या उलट परिणाम निराशावादी, निरुद्योगी आणि निरुत्साही माणसावर घडवून आणील. उद्योगी माणसाला त्याची श्रद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यास प्रोत्साहन देईल, परंतु आळशाला त्याची श्रद्धा आळसाला उत्तेजन देईल. ईश्वराच्या मनात आपण हा प्रयत्न करू नये असेच असेल असे तो म्हणण्याचा संभव असतो. तसेच आशावादी मनुष्य उद्योग न करता असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून बसून राहण्याची शक्यताच अधिक.
ईश्वरावरील श्रद्धा आपल्या जीवनात उपयुक्त असते हा जो श्रद्धावाद्यांचा मुद्दा आहे तो जरी क्षणभर युक्तिवादाकरिता मान्य केला तरी त्यात एक अडचण आहे. ती म्हणजे श्रद्धा ही गोष्ट आपल्या ताब्यात असणारी गोष्ट नाही. अमक्यावर श्रद्धा ठेव असे म्हटल्याने अश्रद्ध मनुष्य श्रद्धावान होऊ शकत नाही. श्रद्धा ठेवणे आपल्या अधीन नसते. आपण श्रद्धा ठेवीत नाही; आपली श्रद्धा बसते. आणि ती काढून घेता येत नाही; ती उडून जाते. ज्याप्रमाणे अमुक माणसावर तू प्रेम कर किंवा तमुक माणसाचा द्वेष कर असे कोणाला सांगितल्याने तो कोणावर प्रेम करू शकत नाही, आणि कोणाचा द्वेष करू शकत नाही, प्रेम द्वेष इत्यादि भावना आपल्या मनात उद्भवाव्या लागतात, त्याचप्रमाणे श्रद्धेचीही गोष्ट आहे.
श्रद्धावानाला आपल्या खडतर जीवनात सांत्वन मिळते असे म्हणतात त्याकडे आता वळू. आपल्यावर संकटपरंपरा कोसळली तर श्रद्धावान म्हणतो की, माझ्या नशिबात हेच होते, किंवा ईश्वराची हीच इच्छा होती, किंवा माझ्या पूर्वजन्मीच्या दुष्कर्माची फळे मी भोगतो आहे. परंतु या श्रद्धांनी दुःखी माणसांचे सांत्वन होते म्हणजे काय होते ? मनुष्यस्वभाव इतका सोशीक आणि लवचीक आहे की तो कोणत्याही परिस्थितीशी जळवून घेतो.केवढीही दुरवस्था आली तरी मनुष्य तिच्यात जगायला शिकतो. असे नसते तर जगात अन्यायाने रोगराईने पीडलेली जी असंख्य माणसे आहेत ती जिवंत राहिलीच नसती. दुःख झाले असे म्हणत असतानाही ते सहन करीत जीवनाला चिकटून राहणे हा जीवनाचा धर्मच आहे. त्याकरिता ईश्वरावरील श्रद्धेची गरज नाही. एक नैसर्गिक चिवटपणा जीवनातच आहे. श्रद्धावादी तिला फक्त श्रद्धा हे नाव देतो एवढेच.
अज्ञ, अडाणी, अल्पशिक्षित असा माणसांची जी श्रद्धामय मनःप्रवृत्ती असते ती कदाचित काही मानीव समाधान देत असेल, पण त्यात एक मोठा तोटा आहे. तो म्हणजे अशी माणसे कुणाही लबाड, लुच्च्या बुवांच्या थापांना बळी पडण्याचा. श्रद्धा असणारे लोक अर्थातच असेही मानतात की भूतभविष्य जाणणारे बुवा आहेत, अतिनैसर्गिक शक्ती असणारे गुरु आहेत, भुतेखेते आणि ग्रह यांच्या पीडेचा बंदोबस्त करू शकणारे मांत्रिक आणि ज्योतिषी आहेत, मंत्र आणि अंगारा यांनी रोग बरे करणारे सिद्ध पुरुष आहेत. सर्व श्रद्धावान लोक प्रत्यही या लोकांकडून लुबाडले जातात. ग्रहपीडेपासून मुक्त होण्याकरिता, भूतबाधेपासून सुटका मिळविण्याकरिता, कष्टाने मिळविलेला बहुमोल पैसा ते उधळत असतात. लोखंडाचे रूपांतर सोन्यात करून देतो म्हणणारे, पैशाची दामदुप्पट करण्याची हमी देणारे शेकडो लफंगे सगळीकडे मोकाट फिरत असतात, आणि सापडेल त्या भोळ्याभाबड्यांचा निर्दयपणे फसवत आणि लुबाडत असतात. जर लोकांना कळले की मंत्रांनी सर्पाचे विष उतरत नाही, अंगाऱ्याने आजार बरे होत नाहीत, हस्तसामुद्रिक, फलज्योतिष इत्यादि सर्व थोतांड आहे, तर या लबाड लोकांच्या फसवणुकीपासून त्यांचे रक्षण होईल. दुर्दैवी आणि पीडित लोकांना मिळणारे सांत्वनही आपण विवेकवादी काढून घेतो आहोत असे म्हणणाऱ्या लोकांच्या लक्षात हे येत नाही की त्या सांत्वनाची केवढी मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. आणि तिच्या मोबदल्यात त्यांना काही मिळत नाही ते नाहीच! या सर्व भाकड आणि भोंदू गोष्टी टिकून आहेत याचे एकमेव कारण विवेकाचा अभाव. विवेकाचा थोडाही उपयोग जर आपण केला तर ह्या सर्व गोष्टी पाहता पाहता नाहीशा होतील.