सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या बालपणी एक घटना माझ्या मनावर कोरली गेली. आम्ही वाड्यात राहत होतो. आमच्या घरी काही नातेवाईक मंडळी मुक्कामाला आलेली होती. खरे तर त्यांचा काश्मीरदर्शनासाठी जाण्याचा बेत होता. त्या निमित्ताने घरून रवाना होण्याआधीचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी कॅरम खेळण्याची टूम निघाली.
माझे वडील कॅरम खेळत असत. तेव्हा पाहण्यांपैकी वयस्काबरोबर, प्रतिस्पर्धी भिडू म्हणून माझ्या वडिलांना बोलावले गेले. खेळ सुरू होण्याआधी पाहुणे मंडळींनी कॅरम खेळण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांसारखे अनेक नियम सांगितले. माझ्या वडिलांनी ते सर्व ऐकून आणि समजून घेतले. मग पाहुण्यांनी माझ्या वडिलांना पृच्छा केली की, तुमचे काही नियम असल्यास सांगा. माझ्या वडिलांनी म्हटले की, अनेक नियम तर तुम्ही खुलासेवार सांगितलेले आहेतच. तेव्हा माझे आणखी काही नियम नाहीत. माझा एकच नियम आहे, तो म्हणजे, तुम्ही सांगितलेले खेळाचे नियम उभय पक्षाच्या खेळाडूंना समान रीतीने बंधनकारक राहतील.
ठरल्यानुसार खेळ खेळला गेला. एक खेळाडू जिंकला. एक हरला. खेळामध्ये ते सामान्यतः घडणारच. पाहुण्यांना प्रवासाला निघण्यापूर्वी जी आनंदाची आणि उत्साहाची पार्श्वभूमी हवी होती तशी मिळाली. काम फत्ते झाले. सांगण्यासारखे काय, तर मला जन्माकरता बोध मिळाला की, “खेळाचे कोणतेहि नियम उभय पक्षाच्या खेळाडूंना समान रीतीने बंधनकारक असावेत.’ आम्हा उद्योजकांना आमच्या कारखान्यातील कामगाराला कामावरून कमी करावयाचे असल्यास सगळ्यांत शेवटी कामावर ठेवलेल्या कामगाराला सयुक्तिक कारण देऊन नियमानुसार काढता येते. त्यासाठी नुकसानभरपाईदेखील कामावरून काढण्याच्या शेवटच्या दिवसाआधीच नियमानुसार द्यावीच लागते. कामावरून कमी करण्याचे कारण सयुक्तिक नसल्यास किंवा सुयोग्य नुकसानभरपाई दिली गेली नसल्यास कामगार न्यायालय त्या कामगाराला पुन्हा पूर्ववत् नोकरीवर रुजू होण्याचा आदेश देऊ शकतात.सध्या वर्तमानपत्रांमध्ये मुस्लिम धर्मातील त्रिवार तोंडी उच्चारणाने अंमलात येणारा “तलाक” योग्य आहे काय, याचा ऊहापोह काही मंडळी करीत असतात. मला त्या वादात पडण्याचा उद्देश नसला तरी, त्या विषयाबाबत माझ्या मनांत तार्किक दृष्टीने विचार उद्भवतात, ते असे.
अ) सामान्यतः विवाह दोन भिन्न लिंगी व्यक्तींचा होतो. ब) विवाह करताना पुरुषाचा विवाह त्याआधी झालेला असला तरी पुरुषाला चार विवाह एकावेळी करण्याची तरतूद आहे. क) पुरुषाला पुनर्विवाह करण्यासाठी आधीच्या पत्नीच्या परवानगीची गरज नाही. ड) पुरुषाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या पत्नीला तलाक देता येतो. ई) असा तलाक विवाहानंतर पुरुषाला केव्हाही त्रिवार तोंडी “तलाक’ शब्द उच्चारणाने अमलात आणता येतो. त्यासाठी विशिष्ट कारणाची गरज नाही.
“कोणतेही खेळाचे नियम उभय पक्षाच्या खेळाडूंना समान रीतीने बंधनकारक असावेत’. या वरील कॅरमच्या खेळाच्या नियमाप्रमाणे:
मुस्लिम विवाह नियमानुसार अ) विवाह करताना स्त्रीचा विवाह पूर्वी झालेला असताना, स्त्रीला दुसऱ्या पुरुषाबरोबर आणखी एक विवाह. असे एकावेळी चार विवाह होईपावेतो पुनर्विवाह एकाचवेळी करण्याची तरतूद नाही. ब) विवाहानंतर स्त्रीला केव्हाही त्रिवार तोंडी उच्चारणाने “तलाक” अमलात आणता येण्याची तरतूद नाही. विवाहाला आवश्यक एक पुरुष आणि एकस्त्री या घटकांची निर्विवाद गरज आहे. मग मुस्लिम विवाह कायदा पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना (अ) चार विवाहांची संधी का नाकारतो? (ब) समानतेच्या नियमाप्रमाणे स्त्रियांना केव्हाही त्रिवार तोंडी उच्चारणाने
“तलाक” अमलात आणण्याची तरतूद का करीत नाही?
म्हणजेच हा कायदा विवाहासंबंधी पूरक आणि आवश्यक अशा पुरुष आणि स्त्री या उभय घटकांना समान संधी देण्याच्या कसोटीवर उतरत नाही, असे म्हणायचे काय ? शकुंतला सदन, ७५, न्यू रामदासपेठ, लेंड्रा पार्क, नागपूर ४४० ०१०.