दर बारा वर्षांनी महाराष्ट्रात, त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे एकाच वेळी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ऑगस्ट २००३ ते ऑगस्ट २००४ ह्या मागील वर्षात हा धार्मिक सोहळा येथे पार पडला. सदर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शोध घेण्याचा हा छोटेखानी प्रयत्न.
कुंभमेळा भरण्याबाबत काही कथा ‘कुंभमेळा’ ह्या उत्तम कांबळे लिखित पुस्तकात आहेत. पैकी पुढे दिलेली कथा ही चारही (प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक) कुंभमेळ्यांना लागू पडते. ‘खूप खूप वर्षांपूर्वी देवांनी समुद्रमंथन सुरू केले. दानवही त्यांच्या मदतीला होते. बराच काळ मंथन झाल्यावर अमृत बाहेर आले. इंद्राचा पुत्र जयंत याने हा अमृतकुंभ घेतला व तो स्वर्गाच्या दिशेने म्हणजे आपल्या निवासस्थानाकडे जाऊ लागला.