Choose Life या पुस्तकाचे मलपृष्ठावरील अवतरण खालीलप्रमाणे : (टाइम साप्ताहिक, अमेरिका यांच्या अंकातून ): अर्नोल्ड टॉयन्बी यांचेवर टीका करणारे आहेतच. पण त्यांची गणना आइन्स्टाइन, श्वाइट्झर किंवा बरट्रांड रसेल, यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संतांच्या मालिकेत होते. अनेकानेक विषयांवरील त्यांच्या मतांची चौकशी केली जात असे. डाइसाकु इकेडा त्यांच्या इतर ग्रंथांतून, व्याख्यानांतून आणि लेखांतून इकेडा यांनी ‘जागतिक अन्न बँक’, ‘संरक्षण खर्चात कपात’ व ‘आण्विक शस्त्रांचा त्याग’ याविषयी ऊहापोह केला आहे. त्यांचा सर्वाधिक ओढा मात्र मानवी समूहांतील युद्धविरोधी भावनांची वाढ या विषयांकडे आहे. इकेडा (इ) : अंतःप्रेरणा (Intuition) आणि विवेक (reason) एकमेकांस पूरक असतात. म्हणजे असे की, विवेक अंतःप्रेरणेचे कार्य गृहीत धरतो, तर अंतःप्रेरणेत विवेक सुधारणा, दुरुस्त्या करतो, जरूर ते खुलासे करतो व प्रकाश टाकतो. विवेकाचा वापर अनेक वेळा केला की, अंतःप्रेरणेतून उपजलेल्या शहाणपणास (wisdom) एक पद्धत किंवा शिस्त लागते व त्यावर जास्त प्रकाश पडतो. विवेक सर्वसाधारणपणे विश्लेषणात्मक दृष्टिकोन वापरून, किचकट विषयाचे विश्लेषण करून, त्याची सोप्या आणि छोट्या भागांत विभागणी करतो, तर अंतःप्रेरणा एखाद्या विषयाचे समग्र ग्रहण करून त्याचा थेट तळच गाठते, त्याच्या महत्त्वाच्या भागात, गाभ्यात पोचते. या विवेचनावरून असे वाटेल की, अंतःप्रेरणा व विवेक हे परस्परविरोधी आहेत. मात्र मला असे वाटते की मनुष्याच्या शहाणपणाच्या संदर्भात अत्यंत निकट असलेल्या या दोन गोष्टी आहेत व दोन्हीद्वारे मनुष्याच्या स्वभावाचे उन्नयन होत असते. टॉयन्बी (टॉ) : इंद्रियांद्वारे नोंदली जाणारी माहिती ही शास्त्रीय अभ्युपगमांचा (Hypothesis) कच्चा माल असते. हा अभ्युपगम वरील कच्च्या मालाविषयीचा एक तात्पुरता खुलासा असतो. त्यानंतर त्याची सिद्धता तपासावी लागते. सिद्धता तपासण्याच्या दोन पद्धती आहेत व त्या दोन्हींचा वापर अनिवार्य आहे. एक परीक्षा विवेकाने करावयाची. आज तपासणीसाठी आपल्यापुढे असणारा अभ्युपगम हा इतर अभ्युपगमांशी जुळतो किंवा नाही, तसेच, आजच्या, काही शर्तीना पात्र राहून तात्पुरत्या मान्यताप्राप्त ज्ञानाशी तो कसा मेळ खातो, हे तपासावयाचे. दुसरी परीक्षा म्हणजे ज्या आधारभूत नोंदींवर (phenomena) हा अभ्युपगम आधारित आहे त्यांचा व या निष्कर्षाचा मुकाबला करावयाचा, व हा अभ्युपगम आधारभूत नोंदीविषयी पुरेसा खुलासा करतो काय, हे तपासावयाचे. त्यातील काही नोंदी या अभ्युपगमाशी विसंवादी तर नाहीत ना, हे तपासावयाचे. हे उघडच आहे, की, कुठलाही अभ्युपगम हा अचूक असल्याचे निश्चितपणे व अंतिमतः सिद्ध होऊ शकत नाही. हे उघड असण्याचे कारण म्हणजे, आपल्याकडे असलेल्या नोंदी, हा आपला कच्चा माल, याचा कुठलाही संच हा परिपूर्ण असल्याची संपूर्ण खात्री किंवा ग्वाही आपण देऊ शकत नाही. भविष्यकाळात कधीही, आपण पूर्वी नोंद न घेतलेली एखादी बाब आपल्या निदर्शनास येऊन ही नवी बाब आपल्या मूळ संचाचाच एक भाग असल्याचे आपणास आढळू शकेल. नवीन निरीक्षणातून कदाचित असेही दिसू शकेल की, आजपर्यंतचा मान्यताप्राप्त निष्कर्ष जुन्या व नव्या निरीक्षणातील विसंवादित्वामुळे, त्यांतील भेदामुळे चुकीचा ठरू शकेल. विसंवादी सिद्ध होणारी एखादीच बाब, घटना वा गोष्ट आजपर्यंत या नोंदींविषयी केलेले विवेचन व त्याच्यातील निष्कर्षास पदभ्रष्ट करू शकेल.
अभ्युपगमाचा मूलस्रोत कोणता? अभ्युपगम इंद्रियांद्वारे जमा झालेल्या माहितीद्वारे आपणास उपलब्ध होत नाहीत. अभ्युपगम म्हणजे नोंदविलेली माहिती नव्हे, तर या माहितीचे ते विवेचन होय. अभ्युपगम आपल्याला विवेकाद्वारे उपलब्ध होतात असेही नाही. आपली विवेकबुद्धी अभ्युपगमांचे परीक्षण करते, त्यांची समीक्षा करते, पण ती या अभ्युपगमास जन्म देऊ शकत नाही, त्यांचा मूलस्रोत होऊ शकत नाही. विवेकाचे कार्य एखादा अभ्युपगम मुळात उपलब्ध असल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही. विवेक आणि इंद्रियगोचर निरीक्षणे ही दोन्ही जाणिवेच्या, जागृतीच्या पातळीवरच कार्यरत असतात. अभ्युपगमांचा उगम होतो तो अंतर्मनाच्या, नेणिवेच्या पातळीवर, आणि मग तो जाणिवेच्या पातळीवर अवतरतो. विवेकबुद्धी व इंद्रियगोचरता हे सर्जनशील नाहीत. मानवी मनातील सर्जक कृती ही अंतःप्रेरणेतून निर्माण होते आणि त्याचा मूलस्रोत हा नेणिवेच्या पातळीवर असतो. इ. तत्त्वज्ञानाधिष्ठित विश्वचित्रनिर्मितीमागील शास्त्रवेत्ते आणि धर्मवेत्ते या दोघांचीही कार्यपद्धती काय असेल, याचे तुम्ही स्वच्छ व योग्य शब्दांत स्पष्टीकरण दिलेले आहे. विवेक आणि तर्क ज्या क्षेत्रांत प्रवेश करू शकत नाहीत, तेथे फक्त अंतःप्रेरणाच आपल्यास शिरकाव करून देऊ शकते. मात्र अंतःप्रेरणेच्या बहधा व बहतांश व्यक्तिनिष्ठ स्वरूपामळे जर काही चूक भूल झाली. तर ती मानवास आत्मसंतुष्टतेकडे ढकलू शकते. अंतःप्रेरणेतून निर्माण झालेली समज, दर्शन, हे विवेकाने शहानिशा करून, पारखून घेणे आवश्यक आहे. या व्यवहाराकडे पाहता, जेव्हा विवेक आणि अंतःप्रेरणा एकमेकांना पूरक असतात, तेव्हा आपली जाणीवेची पातळीही बदललेली असणे आवश्यक आहे. या जाणीवेच्या पातळीस विवेकवादी अंतःप्रेरणा किंवा अंतःप्रेरित विवेक असे म्हणण्यास हरकत नाही.
भौतिकीच्या क्षेत्रातील काही थोर विचारवंतांच्या उदाहरणाने माझा मुद्दा जास्त स्पष्ट होऊ शकेल. आइन्स्टाइनचा सापेक्षता सिद्धान्त किंवा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणीय कार्याबद्दलचा शोध हा त्यांच्या अंतप्रेरणेचे फळ होते, व हे दोघेही थेट प्रज्ञावंत होते. पण या दोन्ही घटनांमागे अंतःप्रेरणेतून घडलेल्या निर्मितीच्या शेवटच्या निर्णायक क्षणांचे मागे, त्यांचे घोर विवेकवादी चिंतन हेच होते. या थोर साक्षात्कारांची तुलना, ज्याचा आपणा सर्वांनाच अनेक वेळा अनुभव आलेला आहे अश्या योगायोगाने, सहजासहजी सुचणाऱ्या चमकदार कल्पनांशी करणे अशक्य आहे. ज्यांचा या (साक्षात्कारी) घटनेशी संबंध नसतो त्यांच्या दृष्टीने, अंतःप्रेरणेतून उपलब्ध झालेले सत्य निष्कर्ष हे अभ्युपगमच असतात व तसे असल्याने त्यांची सिद्धता देणे आवश्यक असते. मात्र जोरदार, तर्कशुद्ध विचारातून उपलब्ध झालेले, अंतःप्रेरणेस जाणवलेले सत्य ज्याला गवसले त्याला या सिद्धतेची काही आवश्यकता नाही. मला मांडायचे आहे ते असे की, अश्या प्रकारच्या घटनांतील जी अंतःप्रेरणा ही योगायोगावर अवलंबून नसते त्या अंतःप्रेरणेस मी विवेकवादी अंतःप्रेरणा म्हणतो.
तुमचा मुद्दा मला समजला व तो तसा योग्यच आहे. मात्र आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की व्यक्तींच्या एवढेच नव्हे तर पूर्ण समाजाच्याही जागृत व सुप्त प्रेरणाही एकाच समतल पातळीवर कार्यरत असतात. इंद्रियगोचर ज्ञान आणि विवेक हे दोन्हीही जागृतीच्या पातळीवर कार्यरत असल्याने, वेगवेगळ्या व्यक्ती त्यांना जाणविणारी निरीक्षणे व त्यांची मीमांसा कशी होते याची तुलना करू शकतात. त्यांच्या निरीक्षणांतून व मीमांसेतून गुणधर्मांचे साधारण तपशील व साधारण निष्कर्ष ते काढू शकतात. या प्रकारच्या साधारण तपशिलास व निष्कर्षास आपण वस्तुनिष्ठ निष्कर्ष असे म्हणतो. याचा अर्थ असा की हे निष्कर्ष हा एखाद्याच व्यक्तीची खासगी मते, दृष्टिकोन नव्हेत, ज्यामुळे ते इतरांहून वेगळे, समाजाहून वेगळे असू शकतात. मात्र हे मिळते जुळते वस्तुनिष्ठ निष्कर्ष व त्यातील वस्तुनिष्ठता त्या त्या व्यक्तीच्या जागृत मनांतील मूळ वस्तू/घटना याबद्दलच्या सत्याविषयीची निखळ व अचूक प्रतिबिंबेच आहेत याची खात्री करण्याचा काहीच मार्ग आपल्याला उपलब्ध नसतो. कदाचित् ते निव्वळ भ्रम असू शकतील.
काही अंतःप्रेरणा या व्यक्तिनिष्ठ असतात व त्या व्यक्तीपुरत्याच मर्यादित असतात. या वैयक्तिक अंतःप्रेरणा इतरांच्या दृष्टीने न पटण्याजोग्या असू शकतात. प्रत्येकाच्या बुद्धीच्या दृष्टीने स्वयंसिद्ध असत नाहीत, पण, असे असले तरी, त्यांना मतपरिवर्तन झालेले अनुयायी मिळतातच. शास्त्रज्ञ, कवी आणि धार्मिक दार्शनिकांच्या अंतःप्रेरणा या प्रकारात मोडतात. मात्र, जेवढे संशोधन झाले आहे, त्यावरून असे दिसते की, सुप्त, अर्धजागृत मनाचे अनेक पृथक् थर असावेत. सी-जे-युंगने म्हटल्याप्रमाणे, व्यक्तिगत अंतःप्रेरणेच्या खाली, त्याहून खोल, अंतर्मनामध्ये मिथके तयार करणारा एखादा थर असावा, यालाच त्याने ‘आदिप्रतिमा’ असे म्हटले आहे. जाणीवजागृतीच्या पातळीवर ज्याप्रमाणे सर्वांचे व्यवहार साधारणपणे सारखेच असतात, तशीच ही मिथकेही सर्वांमध्ये असतात. एकसारख्या आदिप्रतिमा अनेक समाजांमध्ये सण-समारंभात व लोककलांतून आढळून येतात. तसेच सुधारित, नागर समाजातील नाटके व कादंबऱ्यातूनही या आदिप्रतिमा आणि कथानके अनेक संस्कृतींमध्ये वेगळ्या स्थळी व काळांत निर्माण झालेल्या कृतींतून आपल्याला भेटतात. आदिप्रतिमांची मानसिक ताकद मोठी असते, ती आपल्यावर कब्जा करू शकते. या प्रतिमा काही वेळा माणसाच्या जागरूक विवेकापेक्षा बलवत्तर ठरून, विचारपूर्वक त्याने ठरविलेला मार्ग सोडून वागावयाला त्याला भाग पाडतात. इ. युंगच्या आदिप्रतिमांनाच ‘समाजमन’ म्हणतात, अशी मला शंका येते. याचा अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनाच्या तळाशी, मानवाच्या विश्वातील आगमनापासूनच्या अनुभवांचा एक साठाच जणू अस्तित्वात असतो व तो प्रत्येक माणसास त्याच्या मागील पिढीकडून मिळतो. हे अनुभव सर्व समाजांना समानच असतात, पण ते असतात सुप्त व आच्छादितच. धर्माच्या उदयास बहुधा अंतःप्रेरणा हा आधार मानणे सुरक्षित आणि सोयीचे आहे. पण निव्वळ अंतःप्रेरणा हाच ज्याचा आधार अशी धर्म-कल्पना पटण्याजोगी नाही. त्याला विवेकाचे पाठबळ मिळाल्यावरच, अंतःप्रेरणेतून निर्माण झालेला धर्म अस्तित्वात येऊ शकतो. या अर्थाने मला आग्रहपूर्वक मांडायचे आहे ते असे की, अंतःप्रेरणा ही विवेकाधिष्ठितच हवी. त्याचप्रमाणे विवेकालाही अंतःप्रेरणेच्या बळावरच उभे राहायला हवे. म्हणून, अंतःप्रेरित विवेकवादाबद्दलही मी आग्रही आहे…
माझा असा विश्वास आहे की, शास्त्रीय ज्ञान व धर्म दोन्ही व्यक्ती व समष्टीच्या अव्यक्त अंतःप्रेरणास्रोतांतून दोघांनाही आवश्यक असणारी अंतःप्रेरणा मिळवितात. या बाबतीत, शास्त्रवेत्त्यांचा अभ्युपगम व दार्शनिकाचे दर्शन एकमेकांच्या जवळपासच असते. पण शास्त्रवेत्ते त्यांच्या अंतःप्रेरणेची पडताळणी जागृतीच्या पातळीवर करताना दार्शनिकांपेक्षा जास्त कडक व काटेकोरपणे करतात. विश्वाच्या प्रकृतीबद्दलच्या व मानवी जीवनाच्या अर्थपूर्णतेबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे देताना, त्याला सामोरे जाताना, दार्शनिकांची प्रवृत्ती काही गृहीतकांचा आधार घेणे, त्यांचा वापर करणे, अश्या प्रकारची असते. बहुसंख्य लोकांच्या मनात केव्हा ना केव्हा निर्माण होणाऱ्या या मूलभूत प्रश्नांना, ज्याची तपासणी, पडताळणी करता येईल, अश्या प्रकारची उत्तरे देता येत नाहीत. ही मानवी मनाच्या मर्यादेच्या बाहेर आहेत. तरीही हे मूलभूत प्रश्न मनात येतातच आणि त्याला तातडीने उत्तरे मिळण्याबद्दल आपला आग्रहही असतो. दार्शनिकांनी दिलेली उत्तरे ही गृहीतकांवर (वेसार) आधारित म्हणजेच पडताळणी न करता येणारी या स्वरूपाची असतात. (मूळ ग्रीक शब्द वेसार याचा अर्थ सर्वसाधारण मान्यताप्राप्त सत्याच्या विरोधी मत).
शास्त्रज्ञ वस्तुस्थिती व घटनांचे निरीक्षण व नोंदी करणे हेच उद्दिष्ट ठेवतात, तसेच, त्यांचे कार्यकारणभाव, विवेकाने उकलून दाखविण्याचा प्रयत्न करतात व त्यांचे निष्कर्ष तपासून पाहण्याचा प्रयत्न करतात. शास्त्राच्या विपरीत धर्म आपण ज्या जाणिवेत जन्मला आलो व ज्या जाणिवेत जीवन घालवतो त्याविषयीचा एक गूढ नकाशाच आपल्यापुढे ठेवतो. हा नकाशा, जरी तर्कावर व कल्पनांवर आधारित असला तरी, त्याशिवाय आपला निभाव लागणार नाही. जीवनाची ही गरजच आहे. शास्त्रीय संशोधनास, परीक्षणास, उपलब्ध असणाऱ्या विश्वाच्या छोट्याश्या तुकड्याची केलेली शास्त्रीय सर्वेक्षणे व त्यांचे बहुतांश सर्वमान्य निष्कर्ष यापेक्षा वर उल्लेखिलेल्या धार्मिक नकाशाची आपल्याला खूप जास्त व्यावहारिक गरज आहे. अर्थात् शास्त्राचीही जीवनास गरज आहेच. मात्र हे आवश्यक असे शास्त्रीय ज्ञान, हे प्राथमिक स्वरूपाचे असते. शास्त्रीय निरीक्षणे व त्यांची मीमांसा यांची गरज अश्मयुगीन प्राथमिक हत्यारे बनविण्यासाठी होती. मानवी प्रजातीस अस्तित्वासाठी हे प्राथमिक शास्त्र पुरेसे होते. मात्र त्यानंतरची शास्त्राची प्रचंड घोडदौड ही मानवी अस्तित्वाच्या दृष्टीने अनावश्यक, अवाजवी आहे, एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात ती शेवटी मानवी आत्मघातात परावर्तित होऊ शकते. इ. मानवी इतिहासाच्या आजच्या काळात, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे धर्म व शास्त्र या दोन्ही मानवी जीवनाच्या गरजा आहेत. आता दोन्हीही गरजा आहेत हे ठरल्यावर, त्या दोन्ही एकमेकांच्या विरोधात ठाकता कामा नयेत. खरे म्हणजे शास्त्राचा आधार धर्म, तर धर्म हा शास्त्रीय विवेकावर आधारित, असे असावयास हवे. माझा दृढ विश्वास आहे की, धर्म व शास्त्रातील एकरूपतेने मानवी जीवनावर दृश्य स्वरूपाचे परिणाम होऊ शकतील. या संदर्भात अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे “धर्मविरहित शास्त्र हे पांगळे, तर शास्त्रविरहित धर्म हा आंधळा असतो” हे उद्गार ज्यावेळी त्याने उच्चारले, तेव्हापेक्षा आज जास्त महत्त्वाचे वाटतात.
टॉ. शास्त्र व धर्म यांचा वाद होण्याची खरे पाहता गरज नाही. तसा तो होऊ नयेही. जीवन जगताना मानसिकदृष्ट्या जीवनाकडे पाहण्याचे हे परस्परपूरक असे दोन मार्ग आहेत. धर्माच्या क्षेत्रात प्रवेश होण्यामध्ये शास्त्रास त्याचे स्वनिर्मित असे अडथळे आहेत. हा प्रवेश शास्त्राच्या प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष पुराव्याने तपासणी करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीस धक्का लावल्याशिवाय, या वैशिष्ट्यास सुरुंग लावल्याशिवाय व ज्यांची तपासणी व पडताळणी होऊ शकत नाही अशा गृहीतकांच्या घोषणेशिवाय होऊ शकत नाही. धर्माने काही वेळा शास्त्राच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे, पण तिथे शास्त्राने स्वामित्व हक्काचा दावा केल्यामुळे धर्मास माघार घ्यावी लागली आहे. अर्थात् या माघारीमुळे धर्माचे क्षेत्र मात्र अस्पर्श राहिले आहे. इ. धर्म व अंतःप्रेरणा दोन्ही मानवाच्या हितासाठीच तर आहेत. आपण सर्व मानवांमध्ये या मूल्यांबद्दलची यथार्थ जाणीव निर्माण करण्याची गरज आहे. आपण ही जबाबदारी घ्यावयाचे ठरविले, तर, धर्म व शास्त्र यांच्या परस्परपूरक, साहाय्यकारी संबंधांचा धांढोळा घेणे आपल्याला शक्य होईल. असे केल्याने, सर्व मानवमात्रास धर्माच्या क्षेत्रात सुलभपणे प्रवेश करणे शक्य होईल.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे धर्मद्रष्टे फक्त अंतःप्रेरणेवर अवलंबून असतात. मूलभूत प्रश्नांना ते गृहीतके, सिद्धान्त यांच्या आधारे उत्तरे देतात. तिकडे पाहावे तर शास्त्रज्ञ विवेकवादी खुलासे, उत्तरे, त्यांतून उद्भवणारी परीक्षणे यांच्या मर्यादेत स्वतःस बांधून ठेवतात. समजण्यायोग्य खलाशासाठी ते मानवी विवेकबुद्धीवरच अवलंबून राहतात.
अंतःप्रेरणा आणि विवेक यांचे परस्परापासून वेगळे स्वभाव आपण एकदा समजून घेतले, त्यांच्या उपयुक्ततामूल्याची जाणीव आपल्याला झाली, तर धर्म व शास्त्र यांच्यातील दरी आपल्याला पार करता येईल, व त्यामुळे नवीन, आधुनिक समाजास धर्म पचविणे सोपे जाईल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर शास्त्राने व धर्माने त्यांच्या स्वतःच्या क्षेत्राच्या बाहेर पडणे व एकमेकांचे सन्मुख होणे आवश्यक आहे. मला असे म्हणावयाचे नाही की त्यांनी एकमेकांच्या क्षेत्रावर आक्रमण करावे, तर याच्या उलट ते एकमेकांच्या जवळ येत असताना त्यांनी एकमेकांचा आदर करावा. ते कितीही जरी जवळ आले, तरीही, शास्त्रीय पद्धती धर्माच्या क्षेत्रावर कधीही आक्रमण करू शकणार नाहीत.
संपर्क : ‘पद्मावती’, २० शिरगावकर सोसायटी, कोल्हापूर – ४१६ ००८
मूळ लेखक : अर्नोल्ड टॉयन्बी व डाइसाकु इकेडा