‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’ हा इंग्रजी शीर्षक असलेला मराठी चित्रपट. दिग्दर्शिका अदिती देशपांडे. नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या झालेल्या प्रभावातून पुरतेपणी भानावरही आले नव्हते, तर एक प्रतिक्रिया कानावर आली, ‘चावून चावून चोथा झालेला विषय आहे’ प्रतिक्रिया व्यक्त करणारा अर्थात पुरुष! ज्याला मिसेस् राऊतच्या वेदनांशी आपली नाळ जोडता येईल, तो कोणीही अशी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. मिसेस् राऊत ज्या परिस्थितीतून गेली आहे तिथे तुम्ही स्वतःला ठेवा अन् मग आपण काय केले असते, ह्याचा विचार करा. मेंदूला झिणझिण्या येतील. “एखादी स्त्री जी कोणाचीच नसते ती सर्वांचीच असते का?’ हा प्रश्न तुम्हालाही पडल्यावाचून राहणार नाही. समाजाचे संरक्षक कवच तिच्याभोवती असावे की समाजाच्याच भक्ष्यस्थानी तिने पडावे?
हे सत्य आहे की विषय म्हटले तर जुनाच आहे. स्त्रीवर समाजाकडून, विशेषतः पुरुषवर्गांकडून होणारे अन्याय, अत्याचार हा सनातन विषय आहे. परंतु तो पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून, उदा. सिनेमा, दूरदर्शन मालिका, नाटक, कथा, कादंबऱ्या इ.इ. ह्यातून आजही मांडावाच लागतो. ह्याचे कारण असे की आजही वास्तव फार आमूलाग्र बदलले आहे असे म्हणता येत नाही.
या ठिकाणी हे मान्य करायला हवे की स्त्रियांच्या उत्थानासाठी पुरुषांनी केलेले प्रयत्न विसरता येणार नाहीत. इतिहासाचे ऋण समाजाने, विशेषतः स्त्रीसमाजाने, मान्य केलेच पाहिजे. हा वादाचा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे की आजही चिकाटीने हा विषय रेटावा लागतो. चित्र थोडेफार बदलले असले तरी फार बदलले असे म्हणता येत नाही. त्यामुळे ‘चावून चोथा’ झालेला विषय असला तरी तो पुनःपुनः मांडावा लागतो.
आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. प्रगतीही भरपूर झाली. वैज्ञानिक शोधांचे फायदे पूर्णपणे जरी नाही तरी बऱ्याच प्रमाणात जनसामान्यांपर्यंत पोहचलेल आहेत. जीवनमान सुधारले. कालच्या स्त्रीपेक्षा आजची स्त्री अनेक क्षेत्रात कुशलतेने वावरतेय. वेगवेगळी क्षेत्रे ज्यावर केवळ पुरुषांचाच अधिकार होता असे वाटत होते अशीही क्षेत्रे तिने काबीज केली आहेत. दिग्दर्शनाकडे अदिती देशपांडे ह्याच भावनेने वळल्या हे त्यांनी वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखतीतून कळले. किरण बेदी, कल्पना चावला, मीरा बोरवणकर, कमला सोहनी, गीता साने, अनुताई वाघ, कमलाबाई होस्पेट अशी अनेक मागच्या आजच्या पिढीतील स्त्रियांची नावे घेता येतील. ही प्रगती एकीकडे आणि दुसरीकडे मात्र आजही स्त्रीकडे पाहण्याचा भोगवादी दृष्टिकोन बदलला आहे असे म्हणता येईल? स्त्री, मग ती कोणत्याही वयाची असो, समाजात सुरक्षितपणे, निर्भयपणे वावरू शकते? चार वर्षांची मुलगी असो, तरुण असो, विवाहित असो, विधवा असो, वृद्ध असो, कोणत्याही वयाची स्त्री ही बलात्काराच्या, पुरुषी वासनेला बळी पडण्याच्या भयापासून मुक्त आहे? वर्तमानपत्रातून सतत ह्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. चार वर्षांच्या मुलीवर २८/३० वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार करून तिचा खून केला. (धनंजय चॅटर्जीचे उदाहरण ताजेच आहे.) ६५ वर्षांच्या वृद्धेवर, तिचा नातू शोभेल अशा, १७ वर्षांच्या मुलाने बलात्कार केला, इ. इ. काय दर्शवते हे वास्तव? ह्यात आणखी भर पडते ती एकतर्फी प्रेमातून विद्रूप केलेल्या, बळी पडलेल्या युवतींची. एकीकडे वेगवेगळी पुरुषी वर्चस्वाची क्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या स्त्रिया आहेत, हे वास्तव आहे. तर दुसरीकडे वरील चित्रदेखील वास्तवच आहे. ह्या दोन्ही वास्तवांचा तटस्थपणे विचार केला तर दुर्दैवाने आजही आपल्याला हा निष्कर्ष काढणे भाग आहे की पुरुषाचा स्त्रीकडे बघण्याचा ‘भोगवादी’ दृष्टिकोन बदललेला नाही. तो जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत स्त्री ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र, मुक्त होणार नाही.
या ठिकाणी पुरुषाचा स्त्रीकडे बघण्याचा भोगवादी दृष्टिकोन बदलण्याची जशी गरज आहे तशीच स्त्रीची स्वतःकडे बघण्याची दृष्टीही बदलायला हवी. स्त्रीला स्वतःलाही आपण पतीच्या सुखासाठी, समाधानासाठी आहोत असे वाटते. आजही ‘ह्यांना आवडत नाही म्हणून मी तसे करीत नाही’ अशा प्रतिक्रिया सुशिक्षित महिला वर्गाकडून ऐकायला मिळतात. मी स्त्री आहे म्हणून इथे कशी जाऊ? हे मला कसे करता येईल? ते मला जमेल का? अशी नकारात्मक भूमिका स्वीकारण्याची गरजच नाही. येथे कोणी कोणाची बरोबरी करण्याचा प्रश्न नाही. स्त्रीला मुक्त व्हायचे आहे ते पुरुषापासून असा अर्थ नाही. तर तिच्यावर पुरुषी वर्चस्वामुळे लादलेल्या बंधनातून, तसेच तिने स्वतःच स्वतःच्या पायात घातलेल्या संस्कार-रूढींच्या बेड्यांमधून तिला मुक्त व्हायचे आहे. काही बंधने दृश्य असतात, तर काही अदृश्य ! ती दिसत नाहीत, फक्त जाणवतात. त्यातून तिला मुक्त व्हायचे आहे. अलिकडे समोर येत असलेले जे वास्तव आहे त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. अत्याचार, अन्याय केवळ पुरुषच स्त्रियांवर करतात असे नाही, स्त्रियाही पुरुषांवर करतात हे मला मान्य आहे. ‘पत्नी-पीडित पतिसंघटना’ स्थापन होताना दिसताहेत. पण तरीही मला वाटते हे अपवादात्मक असणार. तरळक असणार.
स्त्री/पुरुष दोघांनाही भयमुक्त वातावरणात जगता आले पाहिजे, वावरता आले पाहिजे. असा समाज निर्माण होईल का? किती पिढ्या ह्यासाठी खर्ची घालाव्या लागतील? माहीत नाही. कितीही पिढ्या खर्ची घालाव्या लागल्या तरी हरकत नाही. अशा समाजनिर्मितीचे स्वप्न गांधीजींनी पाहिले होते. त्यांना ‘लशूपव लळेश्रेसू’, लिंगभेदाच्या वर उठणे अपेक्षित होते. पुरुषांमधील चांगल्या गुणांचा विकास स्त्रियांमध्ये व्हावा आणि स्त्रियांमधील उत्तमोत्तम गुण पुरुषांनी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. असा समाज हा पुरुषप्रधान जसा असणार नाही तसेच स्त्रीप्रधानदेखील असणार नाही. गांधीजींना तो ‘मातृत्वप्रधान’ अभिप्रेत होता. ‘मातृत्व’ ह्या संकल्पनेचा गांधीजींना अभिप्रेत अर्थ अतिशय व्यापक आहे. मातृत्व हे केवळ स्त्रीशी संबंधित नाही. ज्या अर्थाने आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो, पांडुरंगाला, तुकोबाला माऊली म्हणतो तो अर्थ गांधीजींना अभिप्रेत होता. समजा असा समाज निर्माण झाला तर ह्या समाजातील स्त्री-पुरुष सहजीवनही वेगळ्या प्रकारचे असेल. अशा आदर्श समाजाची निर्मिती हे एक स्वप्न गांधीजींनी पाहिले होते. त्या स्वप्नाला वास्तव बनविण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वचजण कटिबद्ध होऊ या.
३/४, कर्मयोग, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर.