इंग्रजी शिकलेल्या उच्चभ्रू वर्गातील एखाद्यासमोर ‘जात’ या शब्दाचा उच्चार केला तरी तो अस्वस्थ होईल. रागाने लालबुंद होईल. पूर्वग्रहदूषित म्हणून हिणवेल व तुम्हाला चक्क वेड्यात काढेल. त्याच्या मते ‘ते’ जातपात मानत नाहीत. कधी कुणाची जात विचारत नाहीत, जातीवर आधारित व्यवहार करत नाहीत वा कुठलेही निर्णय घेत नाहीत, अशांना आपण फक्त एकच प्रश्न विचाराः ‘तुमचे लग्न जातीतच झाले आहे ना ?’ उत्तर बहुधा ‘होय’ असेल व त्याला पुष्टी म्हणून ‘आयुष्यात फक्त एकदाच मी लग्नाच्या वेळी जात पाळली होती’, असे गर्वाने सांगतील. परंतु ही एकच गोष्ट जातिव्यवस्थेला जिवंत ठेवत आहे, तिला चिरतारुण्य व अमरत्व बहाल करत आहे, याची कदाचित त्यांना कल्पना नसेल. त्यासारख्यांच्या या संकुचित वृत्तीमुळेच विवाहसंस्थेमधून जातिव्यवस्था आणखी बळकट होत जात आहे. उच्चभ्रू वर्ग नेहमी वाचत असलेल्या वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने भरलेल्या विवाहविषयक जाहिरातींची पाने चाळल्यास अमेरिकेत शिक्षण घेतलेले डॉक्टर्स, एम.बी.ए. ग्रॅज्युएट्स, संगणक तज्ज्ञ इत्यादी सर्वांना आपापल्या जातीतलीच बायको हवी असते हे लक्षात येईल. परंतु हाच उच्चभ्रू वर्ग सार्वजनिक ठिकाणी जातिव्यवस्थेविरुद्ध आरडाओरड करत असतो व खाजगीत मात्र जातीची सर्व बंधने पाळत असतो. भारतीय दांभिकतेचे एक जिवंत व मासलेवाईक असे हे उदाहरण आहे. तरीसुद्धा सर्व भारतीयांना सरसकट ढोंगी असे म्हणता येणार नाही. हे वैशिष्ट्य फक्त उच्चविद्याविभूषित, शहरी उच्चभ्रू वर्गापुरते मर्यादित आहे व हा वर्ग संपूर्ण भारतीय समाजाच्या मानाने अगदी नगण्य आहे.