अंधश्रद्धा १:
भारतामधील नागरीकरणाचा वेग सातत्याने वाढतो आहे. वास्तव : नागरीकरणाचा वेग विसाव्या शतकात वाढला हे खरे आहे. स्वातंत्र्यानंतर तर ही प्रक्रिया अधिकच जोमदार झाली होती. १९५१ साली १३.३१ टक्के भारतीय शहरात राहत होते. १९७१ साली हेच प्रमाण २४.२० टक्के झाले. परंतु त्यानंतर मात्र भारतातील नागरीकरणाचा वेग कमी कमी होत आहे. २००१ साली हे प्रमाण २७.८० झाले आहे.
अंधश्रद्धा २:
येत्या १०-२० वर्षांत भारतामधील ५० टक्के लोकसंख्या शहरांत राहत असेल. वास्तव : नागरी लोकसंख्यावाढीचा दशवार्षिक वेग केवळ ३ टक्के आहे. हा दर स्थिर राहिला तरी पुढील काही दशकांत तरी नागरी लोकसंख्या ५० टक्के होणे शक्य नाही. किंबहुना २०११ साली ३२ टक्के तर २०१६ साली ३३.७ टक्के लोकसंख्या नागरी असेल असा अंदाज २००२ सालच्या जनगणनेनंतर केला गेला आहे. (Statistical Outline of India 2003 2004, TSL. Dept. of Economics & Statistics)
अंधश्रद्धा ३:
मुंबईची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. आणि दररोज ३०० कुटुंबे या महानगरात स्थलांतर करतात अशी विधाने राजकारणी नेहमी करतात. वास्तव: गेल्या दहा वर्षांची आकडेवारी बघता मुंबई महानगरात दर दिवशी ५४५ लोकांची भर पडत होती. (स्थलांतरित व नवीन जन्मलेले, वजा मृत्यू पावलेले) प्रत्येक कुटुंबात सरासरी पाच माणसे असतात असे मानले तर एकूण १४५ कुटुंबांची भर मुंबईत रोज पडत असते असे मानले तर एकही मूल तेथे जन्माला येत नसेल असा निष्कर्ष काढावा लागेल.
अंधश्रद्धा ४:
मुंबई आणि इतर महानगरांत घरांचा तुटवडा असतो, घरबांधणी कमी असते म्हणून लोक झोपड्यात राहतात. वास्तव : सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत ५० टक्के, म्हणजे सुमारे ६० लाख लोक झोपड्यात राहतात हे खरे आहे. पण त्याचवेळी सुमारे ३ लाख घरे आज केवळ मुंबई शहरातच रिकामी पडली आहेत. १९९१ साली ही संख्या २.४० लाख होती. प्रत्येक घरात पाच लोकांना जागा देण्यासाठी धोरण आखले तर कोणतीही घरबांधणी न करता १५ लोख लोकांना निवारा मिळू शकेल!
अंधश्रद्धा ५:
वैज्ञानिक पद्धतीने, सांख्यिकीय अंदाज करण्याची पद्धत नगरांच्या आणि नागरीकरणाच्या स्फोटासंबंधी भीती उत्पन्न करण्यात मोठा हातभार लावते. असाच एक अंदाज डेव्हिस किंग्जले यांनी १९६५ साली ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकात लेख लिहून वर्तविला होता. त्याला युनोच्या लोकसंख्यावाढीच्या अंदाजाची जोड होती. २००० साली भारतामधील सर्वांत मोठ्या शहराची लोकसंख्या किमान ३.६० कोटी आणि कमाल ६.६० कोटी असेल असे भविष्य त्यांनी वर्तविले होते! वास्तव: २००१ सालच्या जनगणनेनुसार भारतामधील सर्वांत मोठे महानगर मुंबई हे १.२२ कोटी लोकांचे आश्रयस्थान होते. मुंबई विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील ठाणे, नवीन मुंबई, डोंबिवली, मीरा-भायंदर वगैरे सर्व शहरांची एकत्रित लोकसंख्या १.६० कोटी होती. श्री किंग्जले यांचे भविष्य खोटे ठरले हे आपले भाग्यच म्हणायला हवे.
अंधश्रद्धा ६ :
लोकसंख्या वाढीचे अंदाज सांख्यिकीय पद्धतीने काढले जातात. देशांच्या अशा अंदाजित लोकसंख्येच्या आधारावरून नगरे-महानगरे यांच्या लोकसंख्येचीही भाकिते वर्तविली जातात. त्यावरून प्रकल्पांची गणिते केली जातात. ही सर्व वैज्ञानिक पद्धत असल्याने ‘सत्य’ म्हणून स्वीकारण्याची प्रथा प्रचलित आहे. वास्तव : गेल्या पन्नास वर्षांत देशी-परदेशी तज्ज्ञांनी वर्तविलेले लोकसंख्यावाढीचे अंदाज चुकूनही बरोबर आलेले नाहीत. महानगरांच्याबाबतीमधले अंदाज तर असंख्य पटींनी चुकलेले दिसतात. बहुसंख्य महानगरे अंदाजापेक्षा कमी वेगाने वाढली, तर काही लहान-मध्यम शहरे वेगाने वाढून त्यांचे तज्ज्ञांचे अंदाज फोल ठरविले. खाली चार भारतीय महानगरांच्या लोकसंख्येचे अंदाज आणि प्रत्यक्ष संख्या दिल्या आहेत. त्यामुळे अंदाज आणि त्यावर आधारित प्रकल्प हे वास्तवात ‘ज्योतिष्यांच्या भविष्यां’ इतकेच भरवशाचे असलेले दिसतात! अंदाज म्हणजे वैज्ञानिक सत्य नव्हे.
१९८३ सालच्या अंदाजानुसार भारतामधील २००५ मधील सर्वांत मोठे शहर कोलकाता हे असेल असा तज्ज्ञांचा होरा होता. प्रत्यक्षात मुंबईचा क्रमांक पहिला आहे आणि कोलकाताचा नंबर आता दुसरा झाला आहे.
लोकसंख्या (लाखांत)
१९७१ १९८१ १९८१ २००१ २००१
(प्रत्यक्ष) (अंदाज) (प्रत्यक्ष) (अंदाज) (प्रत्यक्ष)
कोलकाता ७१ ९५ ९१.९४ १६६ १३२
मुंबई ८५ ८२.४३ १६० १२२
दिल्ली ५७.२९ १३३ १२७
चेन्नई ४४ ४७.८९ ८२ ६४.२४
टीप: महानगरांच्या लोकसंख्येचे अंदाज सातत्याने चुकत आहेत याची कारणे काय असावीत असा आ.सु.च्या वाचकांना प्रश्न पडेल. वाचकांनीच या कारणाचा शोध घेऊन त्याची चर्चा आ.सु.मधून घडवावी ही अपेक्षा आहे. अंधश्रद्धा ७ : महानगरे आणि त्यांच्या परिघामधील प्रभावाखाली येणारे भौगोलिक प्रदेश यांच्यामध्ये विविध सीमारेषा आखलेल्या असतात. व्यवस्थापनेच्या सोईसाठी आणि नियोजनासाठी त्यांचा उपयोग होतो. वास्तव : मुंबई महानगरच्या परिक्षेत्रात पाच म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आणि तीन महानगरपालिकांचा समावेश होतो. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबई या महापालिका तर अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भायंदर या नगरपालिकांचा समावेश असलेला भूभाग नियोजनासाठी मुंबई-विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत मोडतो. स्थानिक प्रशासन त्याच्या अंतर्गत विभागांसाठी नागरी नियोजन करते. मनमानी राजकीय व्यवहारातून प्रत्येक शहराचा विकास होतो. असे असले तरीसुद्धा लोक मात्र आपल्या व्यवहारांसाठी अशा सीमांमध्ये अडकून पडत नाहीत. वास्तवात त्यांना मुंबई-प्राधिकरणाच्या क्षेत्रातील विविध शहरांत आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार करावे लागतात. या सर्व विभागासाठी एक सर्वव्यापी वाहतूक आराखडा नसूनही लोक ती व्यवस्था सामायिकपणेच वापरत असतात. प्रत्येक शहराने स्वतःची वाहतूक व्यवस्था वेगळी उभारणे आणि एकमेकांच्या हद्दी न ओलांडणे हे धोरण वास्तवात फसते. पाणी, वीज, वाहतूक, सेवा (शिक्षण, आरोग्य) दूरध्वनी या सामायिक सेवा संयुक्तपणे-सलगपणे पुरविणे हे आवश्यक असताना त्याचे तुकडे-नियोजन होते. आणि या एकाच टापूच्या प्रदेशात नागरी स्पर्धा सुरू होते. व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण वास्तवात गोंधळ, अपुरेपणा, आर्थिक घोटाळे यांना प्रोत्साहन देतो. म्हणूनच नियोजनाचे प्रयत्न कठीण होतात. नागरिकांना त्याचा कोणताही फायदा होत नाही. वास्तवात जुन्या श्रीमंत मुंबईमध्ये सेवा तुलनेत स्वस्त आणि नव्या शहरांत अत्यंत महाग असे स्तरीकरण मात्र स्पष्टपणे वाढत जाते.