इसवी सनापूर्वी ६०० वर्षांपासून ते आजपर्यंत भारतीय विचारांत वारंवार भेटणारे एक मत शहरांना वाईट मानते व नागर जीवनशैलीला दुष्ट मानते. पण नागर जीवनशैली हे सुसंस्कृत माणसांचे एक लक्षण आहे, असे मतही साधारण तितक्याच (इ.स.पूर्वी ६००) प्राचीन काळापासून व्यक्त केले जात असे. ‘अर्थशास्त्रा’त कौटिल्याने आणि ‘कामसूत्रा’त वात्स्यायनाने नागर जीवनाची भलावण केली आहे.
हे नागर पक्षाचे द्वेष्टे दृष्टिकोन. इ.स. पूर्व आठव्या ते चौथ्या शतकांमधील काळात आर्यसमाजातील तीन प्रमुख वर्णांमधील सत्ता व प्रभावाबाबतच्या संघर्षातून घडले आहेत. ब्राह्मण नेहमीच नगरविरोधी असत आणि वेद व उपनिषदांसारखे ब्राह्मणी ग्रंथ नागर जीवनाच्या विरोधात ग्रामीण जीवनशैलीचे गुणगान करतात. सुरुवातीच्या काळात आर्य मूलतः ग्रामीण लोक होते व या काळात ब्राह्मणांचा प्रभाव व सत्ता अमर्याद असत. क्षत्रिय हा वर्ण जसजसा प्रबळ झाला तसतशी जनपदे व भूक्षेत्रे एकत्र होऊन नगरांचा उगम झाला. नागर क्षत्रियांविरुद्ध आगपाखड करत आपला नैतिक प्रभाव कायम राखण्याच्या प्रयत्नांतून ब्राह्मणांनी नगरविरोधी मतांचा प्रसार केला.
वर्णावर्णांमधील संघर्षातून जैन व बौद्ध यांसारख्या (क्षत्रिय) धर्माचा उदय झाला. या दोन्ही धर्मांमध्ये नागर जीवनशैलीत काहीही दुष्ट मानले जात नाही. सुमारे इ. स. पूर्व ६०० पासून नगरे संख्येने व सुबत्तेने झपाट्याने वाढत गेली. मौर्य काळात नगरांची चरमसीमा गाठली गेली. क्षत्रियांची राजसत्ता व वैश्यांची आर्थिक सत्ता यांच्या प्रभावाखाली ब्राह्मणी नगरद्वेष्टा प्रभाव कमी झाला; इतका, की पुढे कौटिल्य व वात्स्यायन या ब्राह्मणांनीच नागर संस्कृतीची पाठराखण केली. पण इसवी आठव्या शतकापर्यंत कालचक्राचे एक पूर्ण आवर्तन होऊन बौद्ध व जैन धर्म मागे पडून ब्राह्मणी हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन झाले. इसवी सनाच्या अकराव्या शतकात उत्तर भारतात मुस्लिम सल्तनती रुजल्या आणि क्षत्रिय व वैश्य या वर्णांचे वर्चस्व नष्ट झाले. ब्राह्मणी नगरविरोधी मूल्ये देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर, ग्रामीण भागात रुजली व आजपर्यंत ती तेथेच तगून आहेत. गमतीची बाब ही की विसाव्या शतकात नगरविरोधी ब्राह्मणी मतांची सर्वांत सक्षम मांडणी वर्णाने वैश्य असणाऱ्या ‘राष्ट्रपित्याने केली. खरे तर वैश्य हा वर्ण वृत्तीने सर्वांत नागर होता. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणी नेतृत्वाखाली सामाजिक-आर्थिक विकासाच्या रूपात स्पष्टपणे नागरी कल रुजवला गेला आहे.
नागर व नगरविरोधी मतांमधील तरल आणि उपरोधगर्भ मतमतांतरे भारतीयांनाही नीटशी समजत नाहीत, व परकीयांना तर अगम्यच वाटतात. हे मतभेद व त्यांमधील बारकाव्यांच्या फरकांचे बहुधा कधीच पूर्ण निराकरण होणार नाही अखेर ती दोन हजारांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. गांधीवादाचा नगरविरोध जगजाहीर आहे, पण त्या पंथाला आज फारसे अनुयायी उरलेले नाहीत. राजकारणी मात्र अजूनही ते मत त्यागायला तयार नाहीत. ही (नाठाळ) नाराजी आज विक्षिप्त वाटू लागली आहे. याचा एक दुष्परिणाम असा की धोरणांबाबतची कथणी व प्रत्यक्षातील करणी यांच्यातील तफावत वाढत आहे.
‘अर्बनायझेन अँड अर्बन सिस्टिम्स इन इंडिया’ (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९८९ या ग्रंथातून.)