इ.स. पूर्व ४००० च्या सुमारास मेसोपोटेमिया येथे जगातील पहिले नगर उदयाला आल्याचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडले. गॉर्डन चाइल्ड यांच्या सिद्धान्तानुसार अश्मयुगाच्या अखेरच्या पर्वात शेतीचा शोध लागला. या कृषिक्रांतीच्या विस्तारासोबत आणि परिणामी भटक्या, अन्नशोधक मनुष्यप्राणी ग्रामीण वस्त्यांमध्ये स्थिरावला. कृषिक्रांतीच्या काळात विपुल होत गेलेल्या अन्नसाठ्यांमुळे काही गावांचे नगरांत रूपांतर होणे सुरू झाले. ह्या नागरी क्रांतीचा पहिला उच्च बिंदू म्हणजे मेसोपोटेमियामधील ऊरूक हे नगर. पुढे ही नागरीकरणाची प्रक्रिया वेगवान होत गेली. जागतिक नागरी क्रांतीचे स्वरूप विसाव्या शतकात अधिक स्पष्ट झाले. ग्रामीण भागातून नागरी प्रदेशांत होणाऱ्या लोकसंख्येच्या जागतिक स्थलांतराचा अनुभव या सिद्धान्ताला पोषक असाच होता. नागरी क्रांतीचा हा सिद्धान्त व्यापक, प्रस्थापित, सर्वमान्य झाला.
या प्रस्थापित मतप्रवाहाला पहिले आव्हान दिले तेसुद्धा पुरातत्त्वशास्त्रज्ञांनीच. कटाल हुयुक आणि जेरिको या सुमारे इ.स.पू. ८००० आणि ६००० वर्षांपूर्वीच्या नगरांचे अवशेष सापडले ते विसाव्या शतकाच्या मध्यावर. या नव्या संशोधनामुळे ‘नागर’ क्रांती सुरू होण्याचा काळ आधी वाटला होता त्यापेक्षा तीन हजार वर्षे तरी मागे न्यावा लागला.
जेन जेकब यांनी या नव्या पुरातत्त्व संशोधनाच्या आधारे आधीच्या सिद्धान्ताला खोडून काढले. त्यांनी त्यांच्या इकॉनॉमी ऑफ सिटी (१९६९) या पुस्तकात त्यांचा नवा दृष्टिकोण मांडला. अन्न आणि शिकारीसाठी भटकणाऱ्या माणसांनाही गरजेपेक्षा अधिक अन्न मिळत होते, आणि यातूनच मानवी टोळ्यांची देवाण-घेवाण करण्याची प्रथा सुरू झाली असावी. नैसर्गिक मालाची, उदा. विशिष्ट दगडांची, हत्यारांची, काठ्यांची, चामड्यांची, अन्नाची देवाण-घेवाण होणाऱ्या ठिकाणी वस्ती स्थिरावण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी, असे त्यांनी सप्रमाण मांडले. या स्थिरावण्याच्या काळातच देवाण-घेवाणीमधून आधी काही वस्तूंची निर्मिती सुरू झाली असवी. (उदा. शिकारीची हत्यारे, चामड्यांची गाठोडी, आभूषणे वगैरे). यामुळे नव्या व्यापाराला चालना मिळाली. अशा उत्पादनाच्या आणि व्यापाराच्या ठिकाणी मोठी लोकसंख्या एकवटून मालाची, लोकांची, विविधता वाढली. त्यांची जोडणी वाढली, व्यामिश्रता वाढली. अशाच नगरांमध्ये आधी पशुपालन, आणि नंतर शेतीचा शोध लागला, असे जेकब यांनी मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार नगरे आधी अस्तित्वात आली आणि मगच शेती क्रांती झाली. शेतीची कला आत्मसात केल्यावर शहराच्या परिघावरील, दूरच्या जंगलातील जमीन लागवडीखाली आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी. अशा त-हेने लहानलहान शेतीप्रधान खेड्यांची वस्ती सर्वत्र पसरली असावी, कृषिक्रांतीमुळे नगरे नव्हेत तर नगरांमुळेच कृषिक्रांती झाली असे त्यांचे प्रतिपादन आहे. आजचे नगरशास्त्राचे अभ्यासक या दोन्ही शक्यता मान्य करतात. नागरी व्यवस्था या व्यामिश्र आणि स्वयं-संघटित रचना आहेत. साध्या सरळ कार्यकारण-संबंधातून त्यांचा अभ्यास करणे अपुरे असते, असे आता शास्त्रज्ञ मानतात.
(सेल्फ ऑर्गनायझेशन अॅण्ड सिटी या पुस्तकातून)