एबक्झर हॉवर्ड
व्यवसायाने कारकून असणारे एबक्झर हॉवर्ड हे तसे सामान्य गृहस्थ, पण त्यांच्या ‘गार्डन सिटी’ या आदर्शवादी नगररचनेच्या संकल्पनेच्या सहाय्याने त्यांनी खरे तर जगाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यांच्या या उद्याननगराच्या कल्पनेला सामाजिक सुधारकांच्या गटाने तर उचलून धरलेच, पण त्यामुळे नागरी नियोजनाचे आयामच मुळी बदलून गेले. औद्योगिक शहरांच्या गर्दी, गोंधळ, काजळी ह्यांनी भरलेल्या १९ या शतकातील लंडनच्या अनुभवावर उमटलेली ती तीव्र प्रतिक्रिया होती. त्या काळातील स्वप्निल समाजसुधारकांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यात पडले होते. मोठ्या नगरांना पर्याय म्हणून तीस हजार वस्तीच्या लहान लहान उद्याननगरांची साखळी-रचना हॉवर्ड यांनी कल्पिली. प्रत्येक नगरात रहिवासी आणि उद्योगांचे विभाग वेगळे करण्याची, ‘झोन’ ठरविण्याची कल्पना त्यांनी मांडली. ती आज प्रचलित झाली आहे. नगरातून हद्दपार झालेल्या निसर्गाला त्यामध्ये केंद्राचे स्थान आहे. तसेच प्रत्येक शहराभोवती हरित पट्टा ही कल्पनाही त्यात मूलभूत आहे, स्वयंपूर्ण नवीन शहरे उभारण्याची, स्थलांतरितांची व्यवस्था लावण्याची ही पद्धत जगभर फैलावली आहे. आधुनिक नगररचनाशास्त्राचा पायाच हॉवर्ड यांनी घातला. आणि त्यांच्या हयातीतच अशी शहरे वास्तवात आलेली बघण्याचे भाग्यही त्यांना लाभले. लिच्वर्थ आणि वेल्विन ही दोन नगरे त्यांच्या हयातीत निर्माण झाली. पुढे या संकल्पना युरोप, अमेरिका आणि जगातील सर्व देशांत फैलावल्या.
मोठी शहरे मोठ्या लोहचुंबकासारखी असतात. लोकांना आकषून घेतात. ओढून घेतात. याला पर्याय म्हणून ग्रामीण आणि नागरी कल्पनांची सांधेजोड करून बांधलेली नवीन शहरे त्यांनी कल्पिली. सर्व नागरी विभाग एकमेकांपासून अलग केल्याने दाटीवाटी, गोंधळ आणि प्रदूषण कमी होईल ही त्यांची अपेक्षा होती. या त्यांच्या क्रांतिकारी कल्पना मोठ्या प्रमाणावर राबविल्या गेल्या त्या अमेरिकेत. पण याच संकल्पनेच्यासाठी धावणारी अमेरिका मोटारींची गुलाम झाली. त्यासाठी पर्यावरणाचा नाश केला गेला. प्रचंड रस्ते आणि असंख्य मोटारी यांच्या आहारी गेलेल्या नागरी अमेरिकेचा ऊर्जावापर आज त्यांना घातक मार्गांनी न्यायला कारणीभूत झाला आहे. गर्दी कमी झाली हे खरे पण माणसेही एकाकी झाली आणि सामाजिक जीवनच हरवून गेले अशी आज अमेरिकेची अवस्था झाली आहे.
ली कार्बुझिए (१८८७-१९६५)
ली कार्बुझिए हे आधुनिक वास्तुशास्त्रकलेचे, आंतरराष्ट्रीय वास्तुशैलीचे महत्त्वाचे शिल्पकार, कलाकार आणि नगररचनाकार म्हणूनही त्यांची मोठी ख्याती. आधुनिक यंत्रसंस्कृतीने त्यांना भारले होते. ‘घर म्हणजे राहण्याचे यंत्र’ अशासारखी त्यांची वक्तव्ये बरीज गाजली. यंत्र, ऊर्जा आणि कार्यक्षमता यांना त्यांनी दैवत मानले होते. अत्यंत टोकाच्या, गूढ अशा विवेकवादाचे, समाजवादी राजकीय आदर्शाचे ते पुरस्कर्ते होते. भूमितीवर त्यांचा नितान्त भरवसा होता. त्यांच्या इमारती ह्या साध्या सरळ रेषांच्या, भूमितीय शिस्तीच्या होत्या. हॉवर्ड यांना ३० हजारांची लहान शहरे आदर्श वाटत. तर कार्बझिए यांनी तीस लाख लोकांसाठी क्रांतिकारी नगरयोजना सादर करून त्या काळी खळबळ माजवली होती. तीस लाख नागरिकांना सामावण्यासाठी प्रचंड उंचीच्या इमारती, मोठे रुंद रस्ते, प्रचंड परिसरात निर्माण करण्याचे त्यांचे आराखडे अद्भुत होते. भूमितीय रेषांपलिकडची कोणतीही ‘आभूषणे’ त्यांना वर्ण्य होती. काच, सिमेंट, स्टील यांचा वापर करून ‘उपयुक्ततावादी, उत्तुंग इमारती उभारणे अशी त्यांची नगरनियोजनाची कल्पना होती. या त्यांच्या ‘इनऑरगॅनिक’ पद्धतीच्या विचारांना, रचनांना सर्वांत जास्त प्रतिसाद लाभला तो साम्यवादी रशियातून आणि फ्रान्समध्ये घुसलेल्या फॅसिस्ट “विची’ सरकारकडून. तेथेही त्यांना फार काळ थारा मिळाला नाही, पण त्यांच्या टोलेजंग इमारतींच्या रचना मात्र जगभर प्रसिद्धी मिळवून गेल्या.
भारतामधील चंदीगढ हे संपूर्णपणे नवे शहर वसविण्याचे आराखडे करण्यासाठी पंडित नेहरूंनी त्यांना पाचारण केले. १९५१ साली चंदीगढ प्रकल्प ली कार्बुझिए यांच्या ताब्यात दिला गेला. निवडलेल्या जागेवरची राहती वस्ती हलवून संपूर्ण नव्याकोऱ्या आधुनिक शहराने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली आणि चंदीगढही प्रसिद्ध झाले. चंदीगढ हे इतिहासाच्या ओझ्यापासून मुक्त असणारे भारतीय शहर झाले. स्वतंत्र भारतातील वास्तुशास्त्रज्ञ आणि नगररचनाकारांची एक संबंध पिढीच या या ‘जादुई’ वास्तुतज्ज्ञाच्या रचनांनी भारावली. यात नवल नाही.
गर्दी, दाटीवाटी यांपासून मुक्त शहरी विभाग; औद्योगिक विभाग शहरापासून दूर नेण्याचे धोरण; रुंद आणि मोटारींसाठी सुयोग्य रस्ते, मोठ्या बागा; अश्या अनेक संकल्पना भारतात आल्या. त्यांचे पितृत्व ली कार्बुझिए यांचेकडे जाते. सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक भारतीय वस्त्यांच्या रचनांवर याच शैलीचा प्रभाव आजही मोठ्या प्रमाणांवर टिकून असलेला दिसतो.
फ्रैंक लॉइड राईट (१८१७-१९५९)
फ्रँक लॉइड राईट हे अमेरिकेमधील सर्वांत महान वास्तुशिल्पकार मानले जातात. त्यांच्या वास्तुरचना म्हणजे अमेरिकन लोकशाहीची आभूषणे. झुंडीच्या मानसिकतेला स्पष्ट विरोध करणारे राईट हे क्रांतिकारी व्यक्तिस्वातंत्र्याचे पाठिराखे. त्यांची सामाजिक क्रांतीची रचना समाजवादी विचारांच्या ली कार्बुझिए यांना छेद देणारी. अशा या राईट यांनी त्यांच्या आदर्श नगररचनेचा आराखडा जेव्हा अमेरिकेत सादर केला, तेव्हाही तो धक्कादायक ठरला. प्रत्येक कुटुंबाला एक एकर जमीन आणि त्यावर त्याचे स्वतंत्र घर हा त्यांच्या नगरांच्या रचनेचा आदर्श होता. जमीन वाटप आणि मलभत नागरी सेवा परवठा इतक्यापुरतीच सरकारची भूमिका मर्यादित असावी ही त्यांची अपेक्षा होती. जमिनीचा तुकडा आणि स्वतंत्र, स्वायत्त, सौंदर्यपूर्ण, सुटसुटीत घरे ही त्यांची संकल्पना सबंध अमेरिकेने डोक्यावर घेतली. टेलिफोन आणि खाजगी मोटार या दोन क्रांतिकारी तंत्रज्ञानांमुळे जुन्या गजबजलेल्या नागरी वस्तीच्या रचनेच्या सर्व कल्पना कालबाह्य झाल्या आहेत, असे त्यांनी मांडले आणि अमेरिकेने ते विचार आपलेसे केले. न्यूयॉर्क, शिकागोसारखी महानगरे निकालात निघतील हे त्यांचे भविष्य मात्र खोटे ठरले. या भाकितांमागेही गर्दीचा तिरस्कार ही भावना सर्वांत प्रबळ असावी. प्रत्येक नागरिकाने स्वतंत्र व्हावे. शारीरिक आणि बौद्धिक अशी दोन्ही श्रमांची कामे प्रत्येकाने करावीत. त्यांच्या या सर्व विचारपद्धतीला ‘नैसर्गिक’ (ऑरगॅनिक) असे संबोधले जाते.
राईट यांच्या रचनांची हॉवर्ड आणि कार्बुझिएच्या रचनांबरोबर नेहमी तुलना केली जाते. राईट आणि कार्बुझिए दोघेही मोटारींच्या वाहतुकीला प्राधान्य देत नागरी नियोजनाचा विचार करीत. हॉवर्ड यांची उद्यानांची कल्पना राईट यांना मान्य होती. पण त्यांच्या सार्वजनिक, सामाजिक मालकीला त्यांचा विरोध होता. हॉवर्ड आणि कार्बुझिए हे दोघेही नियोजनाच्या केंद्रीकरणाचे पुरस्कर्ते होते. तर राईट यांचा सरकारी नियोजनाला, सार्वजनिक नियंत्रणाला तीव्र विरोध होता. आधुनिक नगरांचा विचार करणाऱ्या या तीनही व्यक्ती जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यांचा भर भौतिक रचनांवर होता, आणि त्याद्वारे मानवी समाज घडवता येईल अशी त्यांची श्रद्धा होती. मानवी समाजातील आर्थिक-सामाजिक प्रक्रिया शहरांना बरेवाईट आकार देतात हा विचारच त्यांच्या काळात नव्हता. आजही तो फारसा फैलावलेला नाही. आधुनिक नागरी-विकासावर अशा आधुनिक वास्तुतज्ञांचा आजही मोठा प्रभाव आहे. पण या गत शतकातील आदर्श नगर विचारापासून मोकळे झाल्याशिवाय नगररचना धोरणांना आणि नियोजनाला वास्तवात भविष्य नाही हे मात्र नक्की!
संदर्भ: The City Reader, R. T. Legates and F. Stout, (Eas) 1996, Routledge, London and New York.