संपादकीय

विशिष्ट शहरे आणि त्यांच्या विशिष्ट समस्या यांच्यावरील लेख मराठी नियतकालिकांमध्ये आढळतात. काही वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेने मुंबईच्या स्थितीवर एक दस्तऐवजही घडवला होता. पण नागरीकरणाची प्रक्रिया, नगररचना आणि नगर व्यवस्थापन, यावरील तात्त्विक लिखाण मराठीत अपवादानेच आढळते. ही परंपराही जुनीच आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील काही फुटकळ संदर्भ आणि जैनांच्या बहात्तर कलांच्या यादीत नगररचनेचा समावेश सोडता या विषयाकडे भारतीयांचे लक्ष फारसे गेलेले दिसत नाही.

मोहेंजोदडोच्या काळापासून भारतात नगरे रचली जात आहेत व त्यांचे व्यवस्थापनही होत आहे. आज नगरशासकांच्या व्यवहारात मात्र शास्त्र कमी जाणवते, तर लालफीत व भ्रष्टाचाराचीच ‘याद राखली’ जाते. या पार्श्वभूमीवर सुलक्षणा महाजन व त्यांच्या सहलेखकांनी उत्तम दर्जाचे विश्लेषक लिखाण घडवले हे कौतुकास्पदच नव्हे, तर आश्चर्यकारक आहे.

एक अस्वस्थ करून विचारांना चालना देणारा निष्कर्ष पाहा नगररचनाशास्त्र हे यंत्ररचनाशास्त्रासारखे नाही, तर ते शेती किंवा फलोद्यानांच्या शास्त्रासारखे आहे. काही ढोबळ सूत्रे आहेतही, पण प्रत्येक नगर/फळझाड मात्र आपापल्या विशिष्ट तऱ्हेनेच घडते-वाढते! सामान्य-विशिष्ट अशा सूत्रांच्या ताण्याबाण्यातून जे घडते त्याचा अर्थ लावून त्याला इष्ट दिशा देण्याचा प्रयत्न करावा लागतो! असो वाचालच!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.