उद्योग, घरे आणि माणसे या तीन घटकांच्या एकत्रित संलग्न प्रक्रियेतून निर्माण होणारा भूभाग म्हणजे नागरी वस्ती. पोषक वातावरण मिळाले की ह्या घटकांमधून एखाद्या भूक्षेत्राचा विकास सुरू होतो. जसे जसे विकासाचे क्षेत्र विस्तारते तसा रिकामा भूभाग, परिसर इमारती, रस्ते अशा गोष्टींनी भरून जायला लागतो. यांच्या पाठोपाठ मालमत्तांनी, इमारतींनी व्यापलेला नागरी परिसर जुना होण्याची प्रक्रिया सुरू होते. कालांतराने अशा वस्तीमध्ये साचलेपणा, येऊ लागतो. वाढीचा काळ संपतो. वस्ती कुंठित होते. यासोबतच आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलायलाही सुरुवात होते. अशा वस्तीच्या क्षेत्रात सतत नवीन नवीन गोष्टींची भरत पडत राहिली नाही तर अशा वस्त्यांची वाढ आणि विकास होण्याऐवजी हे क्षेत्र जुनाट घरे, आणि बंद उद्योगांचे माहेरघर होते. कार्यक्षम लोक वस्ती सोडून स्थलांतर करायला लागतात. राहिलेले लोक जुन्याचे नूतनीकरण करण्यास असमर्थ होतात.
शहरांच्या कोणत्याही विभागात ही प्रक्रिया होण्याचे टाळायचे असेल तर नैसर्गिक, जुने होण्याची प्रक्रिया थोपवावी लागते. पण अशाच वेळी तेथले सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांचे संबंध इतके गुंतागुंतीचे झालेले असतात की साध्या, सोप्या वाटणाऱ्या धोरणांचा साचलेपणा दूर करण्यासाठी काहीएक उपयोग होत नाही. उलट भाबड्या धोरणांचे विपरीत परिणाम होऊन प्रश्न अधिकच गंभीर होतात.
(अर्बन डायनॅमिक्स या पुस्तकामधून)