विशिष्ट शहरे आणि त्यांच्या विशिष्ट समस्या यांच्यावरील लेख मराठी नियतकालिकांमध्ये आढळतात. काही वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेने मुंबईच्या स्थितीवर एक दस्तऐवजही घडवला होता. पण नागरीकरणाची प्रक्रिया, नगररचना आणि नगर व्यवस्थापन, यावरील तात्त्विक लिखाण मराठीत अपवादानेच आढळते. ही परंपराही जुनीच आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील काही फुटकळ संदर्भ आणि जैनांच्या बहात्तर कलांच्या यादीत नगररचनेचा समावेश सोडता या विषयाकडे भारतीयांचे लक्ष फारसे गेलेले दिसत नाही.
मोहेंजोदडोच्या काळापासून भारतात नगरे रचली जात आहेत व त्यांचे व्यवस्थापनही होत आहे. आज नगरशासकांच्या व्यवहारात मात्र शास्त्र कमी जाणवते, तर लालफीत व भ्रष्टाचाराचीच ‘याद राखली’ जाते.