परिसंवाद

(चार विचारवंतापुढे पाच प्रश्न मांडले गेले. मांडणी जराजराशी वेगळी असूनही मतांचा गाभा मात्र समान असल्याचे दिसते.) प्रश्न १: भारतीय मध्यमवर्ग कोणत्या अर्थी इतर देशांमधील मध्यमवर्गापेक्षा वेगळा आहे ? आदित्य निगम: आर्थिकदृष्ट्या उपभोक्ता वर्ग सगळीकडे सारखाच असतो. राजकीय-सामाजिक चित्र मात्र (भारतात) गुंतागुंतीचे आहे. दलित, मुस्लिम, हिंदू असे राजकीय आशाआकांक्षांमुळे वेगवेगळे गट पडले आहेत पण ते वेगाने ‘वैश्विक’ होत आहेत. नेहरूयुगात अभिजनवर्ग इंग्रजी जाणणाराच असे. आज भाषिक, प्रांतिक इत्यादी गट विकसित होऊन काँग्रेसचे पतन झाले आहे, आणि प्रांतिक पक्ष वाढले आहेत. अशा परिस्थितीत एकच एक मध्यमवर्ग मानणे भ्रामक ठरेल. हा वर्ग एकीकडे नवे विचार आत्मसात करून बुद्धिजीवीही होत असतो, तर दुसरीकडे प्रतिगामी आणि फॅसिस्ट आंदोलनेही त्यातच बहरतात. लालबहादुर वर्मा: मध्यमवर्ग उच्चवर्गासारखा श्रीमंत व सन्मानितही नसतो, आणि निम्नवर्गासारखा गरीब आणि अपमानितही नसतो. तो प्रगती आणि अधोगती या दोन्हीतही गतिमान असतो. युरोपात नगरे (बुर्ग) आणि नागरी (बूझर्वा) वर्ग एकत्रच उत्क्रांत झाले. भारतात मात्र मध्यमवर्गाची वाढ रोगट त-हेने झाली. युरोपात नवजागरण, धर्मसुधार, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती अशा टप्प्यांनी मध्यमवर्ग समाजवादापाशी पोचला. भारतातील मध्यमवर्ग वसाहतवादी राजकारणातून घडला. आणि (यामुळे) त्याच्या आत्मविश्वासाचे व स्वाभिमानाचे नीटसे पोषण झाले नाही म्हणूनच तो उदारीकरण जागतिकीकरणाच्या लाटेत गटांगळ्या खात आहे. रवि सिन्हा: आधुनिकतेच्या युगात घडलेला पाश्चात्त्य मध्यमवर्ग क्रांतिकारी आणि युगप्रवर्तक सुरुवातीनंतर भांडवलशाही शोषण, स्वार्थ, वर्चस्व यात गुंतला. क्रांतिकारकतेच्या निकषावर खुजा असलेला भारतीय मध्यमवर्ग फक्त उत्पन्न, उपभोग, जीवनमान या पातळीवरच इतर मध्यमवर्गांसारखा आहे. भगवान सिंह : इथे भांडवलशाहीही नीट विकसित झाली नाही, आणि मध्यमवर्गाने सर्वहारा वर्गापासून नीट फारकतही घेतली नाही. भारत सोडूनच्या मुस्लिम (बहुल) देशांमध्ये क्रुसेडस (ख्रिस्ती-इस्लामी धर्मयुद्धे) आणि नंतर थेट साम्राज्यवादी ढवळाढवळीचा इतिहास आहे. भारतीय मुस्लिमांना हा इतिहास नसल्याने इतरत्र दिसणारी तीव्र निषेधाची भावना इथल्या मुस्लिमांमध्ये नाही. (त्या मानाने) ही निषेधाची भावना आणि लोकशाही मूल्यांचा हास, हे हिंदूंमध्ये जास्त आहे. सामान्य मुस्लिम मध्यमवर्गी (यामुळे) हिंदूंपेक्षा जास्त रूढीवादी, संकुचित व नुकसान सोसूनही पारंपारिक मूल्ये जपणारा झाला आहे. प्रश्न २ : तांत्रिक प्रगतीची फळे चाखणाऱ्या मध्यमवर्गातच सामंती अभिरुची स्फोटकतेने का वाढत आहे ? निगम : आधुनिक विचारवंतांनी, विशेषतः रॅशनलिस्टांनी भोळसटपणाने “वैज्ञानिक वृत्ती’ मुळे अविवेक नष्ट होईल असे मानले आहे. आज ही धारणा बाळगणे शक्य राहिलेले नाही. विचार सत्ता-समीकरणांमधून घडतात. सत्ता हस्तगत करण्यासाठी उपयुक्त विचार घडतात. आजची धार्मिक वृत्ती ही अशी घडली आहे. वर्मा: तांत्रिक विकासाने सांस्कृतिक विकास होईलच असे नाही. अंधश्रद्धा आहेतच.(तिकडे) भांडवलशाहीने सामंतशाहीला हरवले. इथे तर आधुनिकीकरणही पूर्ण नाही. पदोपदी भांडवलशाही आणि सामंतीवृत्ती मध्ये समझौते होतात. सिन्हा: भारतीय मध्यमवर्ग कधी क्रांतिकारी रूपात ढाळला गेलाच नाही.इथे उपभोक्ता भांडवलशाही सामंतशाहीवरील मुलाम्यासारखी आहे. इथल्या माणसांमध्ये रक्त वाहते तशीच श्रेणीबद्धताही. सिंह: गजानन मुक्तिबोधांच्या शब्दांत भारतीय मध्यमवर्ग ‘अधिक शिश्नोदरपरायण’ होत गेला आहे. पण आजचे गुन्हेगारीकरण सामंती मूल्यांतून आलेले नाही. (उलट) ते सामंती व्यवस्थेतल्या मानवी मूल्यांच्या अवशेषांच्या नाशातून घडत आहे. प्रश्न ३: मध्यमवर्गाच्या जातीय आणि वर्गीय जाणिवा कितपत विकसित आहेत ? निगम: मध्यमवर्गाला जातिभावनेपासून सुटे करता येत नाही. वर्गभावनाही आहे मजबूत, पण ती व्यक्तिकेंद्री आहे, तिच्यातून कोणतीही सामूहिक मागणी उभी राहत नाही. वर्मा: ‘कर्मणा’ची जागा ‘जन्मना’ने घेतली, आणि यातून संकुचित आणि आत्मघातकी जातिव्यवस्था घडली. दलितांमध्येही जातिविरोध न दिसता अधिकाधिक जातीयवाद दिसतो, तो याच अनैतिक, अवैज्ञानिक, मागास वृत्तीमुळे. सिन्हा: जातिभावना लुप्त होऊन वर्गभावना जागायला हवी. प्रत्यक्षात उलटे घडत आहे. प्रश्न ४ आणि ५: मध्यमवर्गात नेतृत्वक्षमता असते, असे ऐतिहासिक घटनांच्या आधाराने अनेक समाजशास्त्रज्ञ मानतात. सामाजिकराजकीय दृष्टीने मध्यमवर्गाची सध्याची स्थिती कशी आहे ? भविष्यात काय असेल खरेच नेतृत्वगुण दिसतील की जे काही घडेल ते परिस्थितीच्या रेट्यामुळे व महत्त्वाकांक्षांमुळे घडेल? उत्तरे देणाऱ्यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरे जवळपास एकत्रपणेच दिली आहेत. म्हणून ही जुळणी केली आहे. निगम: मुळात भारतीय मध्यमवर्ग एकसंध नाही. त्यात नेतृत्वक्षमता नसते. सर्व संघर्ष याच वर्गात घडतात, पण त्याला महत्त्व देणे अयोग्य ठरेल. आज इतिहास आणि त्याचे लेखन यांवर संघर्ष उभा आहे. ‘भारतीयत्वा’ चा अर्थही चर्चेत आहे. या संघर्षामध्ये मध्यमवर्ग महत्त्वाचा ठरेल. पण त्याला जुने तर्क कठोरपणे तपासून नवे तर्क लढवावे लागतील. यात ‘इंटेलिजेंशिया’ला महत्त्व येईल. वर्मा : जो नव्या आव्हानांना भिडेल तोच स्तर टिकेल.परिस्थितीचा रेटा आणि महत्त्वाकांक्षाही गुणवत्ता आणि नेतृत्वक्षमतेचा स्रोत ठरू शकतील. आज मध्यमवर्ग आव्हाने झेलायला तयार नाही. हिंदीभाषी क्षेत्रात तर श्रेणीबद्धता, मागासपणा याने कोंडी झालेली दिसते. इतर वर्गांपेक्षा यात विभ्रम /नखरे व अवडंबर (भंपकपणा) जास्त आहे म्हणून हा वर्ग इतिहासग्रस्त झाला आहे. सामान्यांसोबत इतिहासाचे धडे जाणून इतिहास घडवू धजला, तरच हा वर्ग नेतृत्व पुरवू शकेल. सिन्हा: भारतात भांडवलशाहीने क्रांतिकार स्थिती येऊ दिलेली नाही. ती येईल आणि त्यावेळी हा वर्ग नेतृत्व पुरवेल. मध्यमवर्गाची वास्तविकता (दीपंकर गुप्ता यांच्या ‘मिस्टेकन मॉडर्निटी’ या पुस्तकातून संदीप सौरभ यांनी अनुवादित केलेला उतारा.) भारतातील टेलेव्हिजन संचांची संख्या कॅनडाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, इथल्या पदवी-पदविका धारकांची संख्या फ्रान्सच्या लोकसंख्येइतकी आहे, असली आकडेवारी भारतातील अभिजनवर्ग गर्वाने सांगत असतो. पण इथे मनगटी घड्याळे वापरणाऱ्यांची संख्या १९.७ कोटी आहे, ५ कोटी लोकांकडे दूरदर्शन संच आहेत, ३ कोटी मोटरमालक आहेत, वगैरे आकडे एकूण लोकसंख्येच्या मानाने फार कमी आहेत. घड्याळधारकांना मध्यमवर्गीय मानले तरीही हे आकडे कमीच आहेत. १९९६ मध्ये नॅशनल काऊन्सिल ऑफ अॅप्लाईड इकॉनॉमिक रीसर्चने भारतातील ‘उच्च उत्पन्न वर्गांच्या उत्पन्नाची सरासरी ३,३६० डॉलर्स वार्षिक असल्याचे नोंदले. (सुमारे दीड लक्ष रुपये, याच काळात राष्ट्रीय दरडोई सरासरी उत्पन्न सुमारे अकरा हजार होते सं.) अमेरिकेत हा आकडा वर्षाला २१,८०० डॉलर्स होता. दर हजार व्यक्तींमागे उपभोग्य वस्तूंच्या संख्याही असाच फरक दाखवतात. (मोटर कार्स अमेरिका २१४, भारत ३.१; फ्रिज अ.२५१, भा. ७.७, वॉशिंग मशीन्स अ.२८९, भा. १.५; रंगीत टीव्ही अ.३६५, भा.७.१) याशिवाय भारतात क्रयशक्ती कमी असल्याने वस्तू इतरत्र वापरल्या जातात त्यापेक्षा जास्त काळ वापरल्या जातात. शिक्षणातही गुणवत्ता नियंत्रणाच्या अभावामुळे पदव्याही उपभोग्य वस्तूंसारख्याच असतात. इतरांशी संपर्क साधणे, स्वतंत्र विचार करणे, चांगले ‘करियर’ निवडणे, या सगळ्यात पदव्यांचा उपयोग समाधानकारकपणे करता येत नाही. मुंबई-दिल्लीत श्रीमंत असणे न्यूयॉर्कमध्ये श्रीमंत असण्यापेक्षा फार वेगळे आहे. इथे श्रमांचे मूल्य कमी आहे आणि सोळा लाख श्रीमंत वर्गाला लाखो गरिबांची मदत आवश्यक असते. इथला मध्यमवर्ग (उत्पन्नांच्या) मध्यापेक्षा (median) खूप मागे आहे. म्हणजे श्रीमंत फार श्रीमंत आहेत!” पाश्चात्त्य मध्यमवर्गात बहुतेक लोक येतात आणि सोईसंरक्षणाच्या राजकारणाची फार गरज नसते. तो मध्यमवर्ग उपभोगाच्या आधाराने नव्हे तर इतर वर्गांशी असलेल्या नात्याने ठरवला जातो. या नात्यांमुळेच लोकशाही व सामाजिक संस्था घडून, सरकारी संस्थांचे आकुंचन होऊन तो मध्यमवर्ग व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रणेता झाला. या कसोटीवर भारतीय मध्यमवर्ग पूर्णतः अयशस्वी ठरला आहे. गरिबांच्या मदतीच्या गरजेमुळे भारतीय मध्यमवर्गाला आपली समाजातील संख्या वाढून नको आहे. सार्वजनिक संस्था सबळ करण्याऐवजी इथे आपापल्या गटाला संरक्षण मिळावे यासाठीच हा वर्ग धडपडतो. व्यक्तिस्वातंत्र्याऐवजी सोई मिळवायला झटतो. लोकशाहीचे फायदे नाकारत सर्व समस्यांचा दोष गरिबांवर टाकतो. लोकशाही संस्थांवर विश्वास ठेवणाऱ्यांना हा भारतीय मध्यमवर्ग ‘पाश्चात्त्यांचे पाठराखे’ म्हणून हिणवतो. या परिस्थितीत या मध्यमवर्गाकडून खऱ्या आधुनिकीकरणाचा पुरस्कार होईल असे मानणे म्हणजे आकाशातल्या ताऱ्यांची अभिलाषा बाळगणे आहे. समाजातल्या इतर गटांशी नाते जोडण्याच्या संदर्भात हा वर्ग कधीही आपल्या पुराण्या विचारांना तिलांजली देण्यास तयार होणार नाही. त्याने असे करून आधुनिक होण्यात त्याचे नुकसान आहे आणि भरपाईचा उपाय त्यांना दिसतच नाही. मध्यवर्ग का संस्कृति का वह दासः विविध विश्वास विधायक, निखिल ज्ञान, विज्ञान नीतियों का उन्नायक ! उच्च वर्ग की सुविधा का शास्त्रोक्त प्रचारक, प्रभु सेवक, जन वंचक वह, निज वर्ग प्रतारक ! भोग शील,धनिकोंस्पर्धी, आत्म-वृद्ध, संकीर्ण-हृदय, तार्किक, पाप पुण्यसन्त्रस्त, अस्थियों वाक् कुशल, धी दी, अति विवेक से निर्मल ! मध्यवर्ग का यशःकामी, व्यक्तित्व प्रसारक, पर श्रमजीवी वह, यदि श्रमिकों नव युग का वाहक हो, नेता, लोक प्रभावक! – सुमित्रानन्दन पंत युगवाणी से जीवन-प्रिय व्यापक बहु अति, मति! का कोमल, मानव, वह परिजन पत्नी-प्रिय, निष्क्रिय! अभिभावक, हित हो का ही कविता बरीच संस्कृतप्रचुर असल्याने मराठी वाचकांनाही जड जाऊ नये असे वाटल्याने मूळ हिंदी रूपातच उद्धृत केली आहे.

(२) जुलै २००४ च्या अंकात जॉर्ज ऑरवेलचे नॅशनॅलिझमवरचे विचार दिले आहेत. हा समूहवाद आहे राष्ट्रवाद नव्हे. या विचारांवर समकालीन परिस्थितीचा प्रभाव दिसतो. हिटलर, मुसोलिनी, माओ, स्टॅलिन ह्यांनी नॅशनलिझमच्या बुरख्याखाली प्रचंड जनसंहार केला परंतु त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर पुनः प्रज्वलित झालेली राष्ट्रभावना काही खोटी ठरत नाही.

ग्रीकांनी दारीयसच्या आक्रमणाचा विरोध करून इ.स. पूर्व ५४० मधे ग्रीक राष्ट्र संघटित केले तेव्हापासून ही ज्योत जगभर फिरत आहे. ह्या राष्ट्रभावनेच्या अभावामुळेच भारतावर गेली हजार वर्षे परचक्रे येत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादाची शिकवण व त्यास पोषक अशी इतिहासाची मांडणी आवश्यक आहे. ऑरवेलने दाखविलेले दोष येथल्या सेक्युलरवाद्यांमध्येही आहेत. त्यांचा सर्वधर्मसमवाद, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोण राष्ट्रवाद नाकारतो, जेम्स लेनला स्वीकारतो, व देशहिताबद्दल उदासीनता दाखवितो.अशा परिस्थितीत राष्ट्रवाद बळकट करणे हेच ध्येय आमच्या समोर हवे.

(१) ऑर्वेल ‘नॅशनॅलिझम’ या शब्दाचा वापर ‘पण त्याच्या नेहमीच्या अर्थापेक्षा हा वापर वेगळ्या अर्थाने करणार आहे’ (पृष्ठ १५२, अंक १५.४) असे नोंदूनच करतो. भाषांतरातही आवर्जून ‘राष्ट्रवाद’ हा रूढ, प्रचलित शब्द न वापरता ‘नॅशनॅलिझम’च लिहिण्याचे कारणही नेहमीच्या अर्थाशी संभाव्य गल्लत टाळण्याचेच होते. सर्वधर्मसमभाव आणि सेक्युलॅरिझम, रिलिजन आणि धर्म, या प्रतिशब्दांच्या वापरामुळे उत्पन्न झालेला (बहुतांशी मतलबी!) शब्दच्छल टाळण्यासाठीच ते पथ्य पाळले.

(२) इतिहासाची मांडणी कारणमीमांसेच्या पातळीवर विचारप्रणालीनुसार बदलते, हे निर्विवाद पण तथ्ये किंवा घटिते नाकारणे, दुर्लक्षिणे, ही ‘मांडणी’ न राहता बनवाबनवी होते.

(३) सेक्युलरवाद्यांमध्येही जेम्स लेन स्वीकारला जातो, देशहिताबद्दल उदासीनता असते, हे निराधार दोषारोपण आहे. प्रश्न एखाद्या विचारधारेच्या मुख्य प्रवाहाने सरसकट भूमिका घेण्याचा असतो एखाददुसरे अपवादात्मक उदाहरण ‘फुगवणे’ हा राष्ट्रवाद नव्हे तर ऑर्वेलने वर्णिलेला नॅशनॅलिझमच आहे. सं.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.