लोकांनी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात गणेशविसर्जन न करता त्या मूर्ती लाक्षणिक विसर्जन करून दान द्याव्यात हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. या दान दिलेल्या मूर्तीचे निर्गत मग अन्य ठिकाणी पर्यावरणाला विशेष हानी न पोचविता केले जाते. पूर्णतः धार्मिक अंगाने विचार केला तर गणपतिविसर्जन हा भाग परंपरेचा अधिक आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी व सांगता पूजा केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीत देवत्व नसते. त्यामुळे या आंदोलनाने धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ होत नाही. याउलट लोकसंख्यावाढीमुळे, मूर्तीचे आकारमान वाढल्याने, त्यांच्या बनविण्याच्या पद्धतीत व साधनात बदल झाल्याने आणि नैसर्गिक जलस्रोतांची हानी झाल्याने पारंपारिक गणेशविसर्जन बदलले आहे. या बदलात भक्तांना चांगले वाटावे असे काहीच नाही. उदा. विसर्जन करावयाची मूर्ती ज्याच्या हाती द्यायची तो माणूस दारू पिऊन आलेला, मूर्ती पोकळ असल्याने त्यांचे पाण्यावर तरंगणे, पूर्ण विघटन न झाल्याने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचे अवशेष मिळणे, विसर्जन करताना पूर्वी विसर्जित केलेल्या मूर्तीना तुडवत जावे लागणे, मोठ्या मूर्ती तरंगायला लागल्या तर त्यांना फोडून त्यांचे विसर्जन करणे इत्यादी. हे सर्व घडत असल्याने, पाणी प्रश्न जाणवत असल्याने आणि पर्यावरण हासाची कल्पना असल्याने मूर्ती दान करा अशा पर्यायांची वाढती मागणी असते. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतून ही मोहीम गेल्या पाच-सहा वर्षांपासून चालू आहे. ठाणे शहरात ती आम्ही (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा) गेल्या वर्षी राबवली. तिचा हा वृत्तांत.
पूर्वपीठिका कुठल्याही परंपरेस असते त्याप्रमाणे ठाणे शहरास धार्मिक संवेदनशील तसेच सुसंस्कृत सहनशील अशा दोन्ही परंपरा आहेत. ठाणे शहरात पंधरा वर्षांपूर्वी अंनिसचा (त्यावेळची एकत्रित) कार्यक्रम उधळला गेला होता. तेव्हा शिवसेनेने यात पुढाकार घेतला होता. सुमारे चार वर्षांपूर्वी डॉ. दाभोळकरांचा कार्यक्रम ठाण्यातील एका महाविद्यालयात होणार होता, पण ऐनवेळी तो दबावामुळे रद्द झाला. भाई वैद्य यांची एक सभा धार्मिक कारणांनी उधळून लावली होती. शिवसेनेची कडवी व हल्ली बजरंगदलाची हुल्लडी प्रतिक्रिया ठाण्यात ऐकू येत असते. मअंनिस धार्मिक बाबतीत तटस्थ असल्याने खरे तर असा विरोध होता कामा नये. पण लोकांनी विचारी बनावे यातच बरेचदा धार्मिक/राजकीय नेतृत्वाचा -हास दडला असतो, हे माहीत असल्याने विविध अन्य कारणे देऊन हे नेतृत्व वैचारिक चळवळींचा विरोध करते त्यातलाच हा भाग समजायचा.
ठाण्यातील जिज्ञासा नावाच्या एका विज्ञान-प्रसारक संस्थेने ठाण्यातील सरस्वती शाळेतील मुलांच्याकरवी गणपति विसर्जनावर (१९९८ साली, मासुंदा तलावातील) एक प्रकल्प केला होता. गणपतिविसर्जनामुळे अंदाजे वीस टन प्लास्टर ऑफ पॅरिस/माती/रंग तलावात जाते, असे पाहणी करून शोधले होते. सोबत निर्माल्यही जात असल्याने तलावातील जैविक विश्वाची कमालीची हानी होत असे. या अहवालास चांगली प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर पर्यावरण दक्षता मंच या पद्धतीची माहिती दरवर्षी घेऊ लागला होता, तर हरियाली व अन्य संस्थांच्या पुढाकाराने गणपतिविसर्जनाच्या वेळी निर्माल्य विसर्जित न करण्याची चळवळ राबवली जात होती. या चळवळीत मग महापालिका, स्काऊट व गाईड यांची मुले सहभागी होऊ लागली. या सर्वांमुळे निर्माल्य तलावात जायचे जवळपास थांबले. लोकही या चळवळीस विरोध (शाब्दिक) करायचे थांबले. गणपतिविसर्जनाचे परिणाम लक्षात घेऊन हरियाली, जिज्ञासा व अन्य पर्यावरणप्रेमी संस्था व व्यक्तींनी कायमस्वरूपी गणपती ही चळवळ सुरू केली. ही चळवळ सुमारे चारशेच्यावर घरातून पोचली असावी असे मानण्यास जागा आहे. जेव्हा आम्ही प्रचारार्थ हिंडत होतो तेव्हा ‘आम्ही आता कायमस्वरूपी गणपती आणला आहे’ असे सांगणारे भेटत असत. ठाणे शहरात अंदाजे साठ हजार घरगुती तर एक हजार सार्वजनिक गणपती बसतात. घरगुती गणपतीचे वजन चार किलो धरले आणि सार्वजनिक गणपतीचे शंभर किलो धरले तर सर्व मिळून तीनशेचाळीस टन होतात. बहुतेक गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसचे बनविलेले असतात. मातीच्या मूर्तीची संख्या तशी नगण्य असते.
पूर्वतयारी चळवळीची योजना आखणे हा पूर्वतयारीचा मोठा भाग होता. साधनसामुग्री व कार्यकर्ताबळ किती मिळेल याचा अंदाज घ्यायचा होता. शिवाय संभाव्य धोके व त्यांवर उपाययोजना करावयाची होती. यासाठी विविध संघटना व कार्यकर्ते यांच्या आम्ही भेटी घेतल्या. सोलापूरला याच चळवळीत पंचांगकर्त्या दात्यांनी चळवळीस पाठिंबा दिला होता, स्वतःच्या घरची गणेशमूर्ती दान केली होती, व त्याचा परिणाम चांगला झाला. डोंबिवलीतील कार्यकर्ते एस्.एस्.शिंदे यांनी गणपतिविसर्जनावर गाणे लिहून दिले. हे गाणे लोकांना आवाहन करताना फार उपयोगी पडले. श्रमिक सेवादलाच्या शैलेश पोळांनी पंधरा ते वीस शाळकरी मुलामुलींची चमू विसर्जनाच्या दिवशी आणण्याचे कबूल केले, म्हणून विसर्जनाच्या दिवसाच्या कार्यकर्त्यांची गरज पूर्ण झाली.
समविचारी संघटनांनी योजनेचे स्वागत केले व आपला पाठिंबा दिला. गणेशविसर्जनाच्या दिवशी वाहतुकीचा खोळंबा होतो त्यामुळे दान केलेले गणपती पुढील ठिकाणी कसे न्यायचे, ते दान केल्यावर कुठे ठेवायचे, विसर्जित गणपती पाण्याचा संसर्ग झाल्याने ठिसूळ बनतील मग काही भलते घडायच्या आधी ते तिथून हलवणे योग्य, गणपती खूप कमी मिळाले किंवा गणपती खूप जास्त मिळाले तर काय करायचे, निर्माल्य गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणवले की तेथे एवढी गर्दी होते की कार्यकर्ते ओळखू येत नाहीत व त्यांचा संपर्क तुटतो, अशा संभाव्य अडचणी होत्या. दान केलेल्या गणपतींचे निर्गत पर्यावरणास हानी न होता कसे करावे हा प्रश्न तसा अनुत्तरितच होता. या कारणाने विसर्जित गणपती दान करा हा कायमस्वरूपी तोडगा नाही, हे काहींनी सांगितले. त्यामुळे ‘पर्यावरणमित्र गणेशमूर्ती’ (जैविक रंगांची व विघटनशील मातीची) वा ‘कायमस्वरूपी गणेशमूर्ती’ या योजनांचा पुरस्कार त्यांनी करायला सांगितला.
प्रिसिजन फिशरीज कंपनीच्या रेशम ठाणेकरांनी या बाबतीतील व्यावहारिक व्यवस्थेच्या अडचणी कशा दूर केल्या जाऊ शकतात याबद्दल सांगितले. मासुंदा तलावाचे व्यापारिक कंत्राट घेतल्यानंतर गणेशविसर्जनाच्या वेळच्या अडचणी त्यांना माहीत होत्या. मासुंदा तलाव हा चोहोबाजूने दाट लोकवस्ती असलेला तलाव. ठाण्यातील जुन्या वस्तीतच हा तलाव असल्याने गणेशविसर्जनाची परंपरा येथे बरीच जुनी असावी. गाळ साचून हा तलाव उथळ होऊ लागल्याने १९९३ साली महापालिकेने यातील पाणी रिकामे करून गाळ काढला होता. नंतर तलावाची देखभाल करणे व या देखभालीचा खर्च न देता त्याऐवजी व्यापारी हक्क देणे या उद्देशाने महापालिकेने हा तलाव त्यांच्या कंपनीस दिला होता. त्याचा भाग म्हणून तलावात माशांची पैदास करणे, ते काढून विकणे व तलावात नौकानयन करणे असा या व्यापारीकरणाचा भाग आहे. माशांची योग्य पैदास होण्यासाठी पर्यावरणाची काळजी त्यांना आपोआप घ्यावी लागत होती. गणेशविसर्जनानंतर ही पैदास कमी होते हा त्यांचा अनुभव होता. यावर उपाय म्हणून प्रिसिजन फिशरीजने गणपतिविसर्जनाची सोय विनामूल्य पण संघटित करायचे ठरविले. या योजनेत त्यांचे कामगार नौका घेऊन घाटावर आलेल्या मूर्ती स्वीकारतात. मग त्यांचे तलावात एका विशिष्ट ठिकाणी विसर्जन करतात. हे विसर्जन झाल्यावर काही दिवसात त्या ठिकाणातील मूर्ती वा त्यांचे भग्न अवशेष काढले जातात व त्यांना खाडीत नेऊन परत विसर्जित केले जाते. हे त्यांच्यासाठी बरेच जिकिरीचे काम होते. पण माशांच्या पैदाशीवरील परिणामांमुळे ते तसे करू लागले होते. अर्थात हे करणे फारसे जाहीर नसले तरी बहुतेक भक्तांना त्याची कल्पना होती व त्याबद्दल थोडी नाराजीही होती.
ही व्यापारी संस्था पर्यावरणरक्षणाचे काम करीत असली तरी स्वयंसेवी संस्था वा कार्यकत्यांना त्याबद्दल राग/वैषम्य असलेले जाणवले. मासुंदा तलावात ते काम करत असल्याने चळवळीचे ठिकाण मासुंदा न करता रायलादेवी करावे असा सल्ला दिला गेला. रायलादेवी हे नववस्तीत असल्याने तेथे कदाचित परंपरागत भावनांचा उद्रेक होणार नाही असाही त्यात सुप्त विचार असेल. हे सर्व ऐकताना आमच्या मनात एक निश्चित योजना तयार होत गेली. या योजनेत चळवळीचे ठिकाण, वेळ, उद्दिष्ट, प्रचाराची व्यवस्था दान करण्याची जागा, निर्गतीचे धोरण यांचा समावेश होता. चळवळीचे पहिले वर्ष असल्याने वेळेवर पाच तरी गणपती मिळतील की नाही अशी शंका आमच्या मनात विसर्जनाच्या वेळेपर्यंत होती. कदाचित याच शंकेपोटी आम्ही मासुंदा तलावावरच ही चळवळ प्रथम करायची असे ठरवले. गणेशविसर्जनाचे पर्यावरणावर होणारे परिणाम लोकांना कळावेत व त्यांनी त्याच्यावर विचार करू लागावे हे चळवळीचे एक मुख्य उद्दिष्ट होते. जरी आमच्या आंदोलनास कमी प्रतिसाद मिळाला तरी हा उद्देश साध्य होऊ शकला असता. आणि त्यासाठी जास्त पारंपारिक मासुंदा तलाव हे योग्य ठिकाण होते.
सरकारी संस्था, ठाणे महानगरपालिका ही ठाणे शहरातील तलावांची वैधानिक जबाबदारी असलेली संस्था. तलावातील पर्यावरणाचा घात रोखू पाहणाऱ्या चळवळीने महापालिकेकडे परवानगी व मदत मागणे हे स्वाभाविकच आहे. त्याप्रमाणे तशी विनंती करणारे पत्र घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलो. (या लेखात सरकारी पदांवरील माणसांचा मुद्दाम वैयक्तिक उल्लेख केलेला नाही.) आयुक्तांना प्रथम भेटीतच ही कल्पना आवडली व त्यांनी काही प्रमाणात मदत देण्याचे व परवानगी देण्याचे मान्य केले. महापालिकेचे आरोग्यखाते विसर्जनाच्या दिवशीची व्यवस्था बघते. यात महापालिकेचे कामगार निर्माल्य गोळा करणे व स्वच्छता बाळगणे या जबाबदाऱ्या घेतात. प्रचाराचा भाग म्हणून महापालिका एक पत्रक काढणार होती, दान करण्याच्या ठिकाणी मंडपाची सोय (पाऊस पडला तर खबरदारी म्हणून), मूर्ती हलविण्यासाठी वाहनाची सोय, हा मदतीचा भाग होता. सरकारी संस्थांची दप्तरदिरंगाई सोडल्यास, ठाणे महापालिकेने, ज्यात आयुक्त व आरोग्याधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश होतो, आम्हाला चांगली मदत केली. पण दप्तरदिरंगाईने कधी कधी आमच्या तोंडचे पाणी पळाले होते.
पोलिसांचा प्रतिसाद खूप चांगला होता. विसर्जनाच्या दिवशी कार्यकर्त्यांना पिकेटिंग करायची परवानगी, आमच्या वाहनांना उभे करण्याची परवानगी आणि काही गैरप्रकार होऊ नये म्हणून सुरक्षितता देण्याची गरज यासाठी आम्ही पोलीस सह आयुक्तांना पत्र घेऊन भेटलो. त्यांनी आमच्या योजनेचे चांगले स्वागत केले. त्यांच्या कार्यालयातील उपायुक्त लातूरला असताना ही चळवळ झाली होती व त्याचा त्यांना अनुभव होता. त्यामुळे त्यांनीही चर्चेत भाग घेतला. आमच्या मदतीच्या मागण्यांपुढे जाऊन त्यांनी आम्हाला मदत दिली. पोलीस आपल्या अखत्यारीतल्या गणेशोत्सवांच्या कार्यकर्त्यांना बोलावून परिस्थिती नियंत्रित करीत असतात. या सभांतून आम्हाला बोलावणे द्यायचे त्यांनी ठरवले. अशा रीतीने प्रचारालाही हातभार लावला.
निर्गत दान केलेल्या मूर्तीचे काय करायचे हा सर्वांत कळीचा प्रश्न होता. यावर बरेच पर्याय होते पण प्रत्येकात भावनात्मक गुंतागुंत होती. रंग हे जास्त हानिकारक असतात.हे रंग जड धातूंचे बनलेले असतात व जीवितहानी करणारे असतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांचा पुनर्वापर होणे गरजेचे असते. पण दान केलेले गणपती कोण घेणार ? मातीचे गणपती असल्यास त्या मातीचा पुनरुपयोग करता येतो. कुंभार, मूर्तिकार या मूर्ती घेण्यास कबूल होतात असा इतरत्र अनुभव होता. विविध मूर्तिकारांचे असे मत पडले की मातीच्या मूर्ती ठाण्यात जवळपास नसतातच. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती फारतर परत रंगकामात डागडुजी करून विकता येतील. पण देणारे व घेणारे यांच्या भूमिकेबद्दल आम्ही साशंक होतो. प्लास्टर ऑफ पॅरिस बनविणाऱ्या कारखान्यांना याबद्दल विचारणा करायची सूचना आली होती पण त्यावर अंमल करता आला नाही. सिमेंट उत्पादकांना, बांधकाम व्यावसायिकांना आम्ही विचारले, पण त्यांचा याबाबत निरुत्साह होता. एक तर किती गणपती मिळतील याचा अंदाज लागत नव्हता. शिवाय बरेच गणपती मिळाले तरी त्यांचे वजन हे त्यांच्या दृष्टीने नगण्य होते. दुसऱ्या कुठल्याही पर्यायात पर्यावरण हानी टाळता येण्यासारखी नव्हती. शेवटी दगडाच्या खाणींमध्ये साचून राहिलेल्या पाण्यात, दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने निर्गत करावयाचे ठरले. ठाण्याबाहेर अशी ठिकाणे आम्ही पाहून आलो. वनखात्याच्या अखत्यारीतील या जमिनीत त्यांची परवानगी घेऊन हे केले गेले. भावनात्मकदृष्ट्या हे सोयीचे होते. अर्थात हे ठिकाण पर्यावरणशास्त्राचा विचार करता पूर्णपणे सुरक्षित नव्हते.
साधने व प्रचार अशा पद्धतीच्या चळवळीस बराच खर्च येतो. हा पैसा प्रामुख्याने प्रचारासाठी होता. पत्रके, बॅनर व पोस्टर्स यात बराच पैसा खर्च होतो. पत्रकाच्या दहा हजार प्रती काढल्या. शेवटी त्या कमी पडल्या व परत छापाव्या लागल्या. पत्रके शाळांमधून वाटली. यात शाळा उत्साहाने सहभागी झाल्या. डी.के. जाधवांनी स्वतःच कष्ट करून पोस्टर्स तयार केली. तीन बॅनर्स केले व लावले. एकंदर गणेशोत्सवातील वातावरण पाहता दृश्य प्रचार नगण्य होता. पैशाची मदत व्हावी म्हणून आम्ही रोटरी क्लब्जना विचारले. बहुतेकांनी आमचे विचार मांडायला आपल्या साप्ताहिक बैठकींना बोलावले. यातून काही प्रचार झाला, पण निधी जमा झाला नाही. एका रोटरी मंडळाने त्यांच्या निर्माल्याच्या पिशवीवर आमचा संदेश छापला. काहींनी मदत देऊ केली पण प्रत्यक्षात दिली नाही. आजूबाजूच्या निवास संकुलांत आम्ही पत्रके सूचना फलकावर लावण्यास दिली, पण पन्नास टक्क्याहून कमी ठिकाणी ती प्रत्यक्ष लागली. प्रचाराचा एक भाग म्हणून दोन दिवस आधी पत्रकार परिषद ठेवली होती. दाभोळकरांना त्यासाठी बोलावले होते. पत्रकार परिषद चांगली झाली पण प्रत्यक्षात बातमी आलीच नाही वा एका कॉलमची आतल्या पानावर आली. महापालिकेचे पत्रकही याच सुमारास निघाले पण त्यास विशेष प्रसिद्धी मिळाली नाही. एकंदरीत प्रचार कमी पडतो आहे असे वाटत आम्ही विसर्जनाच्या तयारीला लागलो.
विसर्जनाच्या दिवसात विसर्जनासाठी किती गणपती मिळतात याबाबत आम्ही साशंक होतो. आमच्यापैकी (मअंनिस) व समविचारी संघटनांपैकी एकाच्याही घरी गणपती येत नसे. त्यामुळे हमखास एक मिळावा असे ठिकाण नव्हते. काही जणांनी गणपती देण्याचे मान्य केले होते, पण त्यांचे विसर्जन नव्हते. आम्ही तीन दिवस उभे राहायचे ठरविले होते. दीड दिवसांच्या वेळी, गौरीगणपतिविसर्जनाच्या दिवशी व अनंतचतुर्दशीच्या दिवशी. प्रत्येक वेळी कोणीतरी सन्मानीय व्यक्ती उपस्थित असेल अशी योजना होती. मासुंदा तलावाला पारंपरिकरीत्या तीन विसर्जनाचे घाट आहेत. त्यातील दोन ठिकाणी प्रिसिजन फिशरीजने बोटीतून विसर्जनाची सोय केली होती. एक घाट त्यांनी बंद केला होता. त्या बंद घाटापाशी उभे राहायचे असा आमचा बेत होता. त्यानुसार आम्ही तीन वाजल्यापासून उभे राहिलो होतो. जवळच्या घाटांवर जिथे विसर्जन होत होते तिथे आमचे प्रतिनिधी उभे राहून आमच्या मोहिमेकडे लक्ष वेधत होते. थोड्याच वेळात आम्हाला पहिला गणपती मिळाला. आणि हळूहळू ती संख्या वाढू लागली. गणपती जास्त संख्येने मिळत आहेत हे कळल्यावर आही आपले बस्तान विसर्जन होत असणाऱ्या घाटाकडे नेले. आम्ही विनंती करावी आणि लोकांनी मानावी, हे दर तीन गणपतींमागे एक या वेगाने घडू लागले, आणि हेच प्रमाण शेवटच्या दिवसापर्यंत चालले. पहिल्या दिवशी आम्हाला दान देण्याच्या मोहिमेची विशेष माहिती द्यावी लागत असे. नंतरच्या वेळी मात्र जवळपास अर्ध्या लोकांना ही योजना समजली होती. आम्हाला गणपती मिळतात हे पाहिल्यावर प्रसारमाध्यमांनाही जोर चढला. रोजच्या वर्तमानपत्रात याचे आकडे व फोटो येऊ लागले. केबल चालकांनी आमच्या प्रत्येक ट्रकचे शूटिंग केले व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. एकंदर मोहिमेत आम्हाला हजार मूर्ती मिळाल्या असाव्यात. बहुतेक दान नोंद ठेवून करण्यात आले. ज्यांनी दान केले नाही त्यातील तीस टक्के लोकांनी यावेळी घरून विचार करून आलो नव्हतो पण पुढील वर्षी देऊ असे सांगितले. या दरम्यान कित्येक हृद्य प्रसंग घडले. एका घरच्या मुलाने आपल्या आईवडिलांना व आजीआजोबांना पटवले होते. आमचे पत्रक त्यांच्या शाळेत वाटले गेले होते त्याचा हा परिणाम. आम्हा सर्वांना व त्याच्या आईवडिलांना याचे कौतुक व अभिमान वाटत होता. आम्ही केवळ तीन दिवस ही मोहीम आखल्याने काही जण तक्रार करत होते. तर दुसऱ्या घाटावरचे लोक ‘आमच्याकडे या’ असे सांगत होते. शेवटच्या दिवशी दुसऱ्या घाटावरही लोकांनी उत्स्फूर्तपणे मूर्ती जमा केल्याचे कळले. मग आम्ही त्यांच्या निर्गताची सोय केली.
विरोध मोहिमेला होणाऱ्या विरोधाच्या दोन बाजू होत्या. एका बाजूस पर्यावरणप्रेमी होते. त्यातील काहीजणांना ही मोहीम सवंग वाटत होती व पर्यावरणरक्षणाकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही अशी तक्रार होती. निर्गताची न सुटलेली समस्या पाहता या मित्रांच्या भावना आम्हाला पटण्यासारख्या होत्या. वृक्षवल्ली नावाच्या संस्थेने पत्रकावरचे त्यांचे नाव याच कारणाने गाळण्यास सांगितले होते. भावनांचा व विवेकाचा जनमानसातील तिढा कसा सोडवायचा व सोडवताना नेमकी कुठे तडजोड करायची, हे न उलगडणारे गुपित आहे. घटना घडल्यावर त्याचा अन्वयार्थ लावता येतो किंवा विश्लेषण करता येते पण आधी काय करायचे हे समजत नाही.
दुसऱ्या बाजूस परंपरावादी होते. सनातन प्रभात ही संस्था वगळता त्यांचा संघटित विरोध झाला नाही. पण त्यांच्या बोलण्यातून त्यांची तिडीक दिसत होती. यातील काहीजण विसर्जनामुळे प्रदूषण होते व ते चांगले नाही हे मान्य करणारे होते. पण त्यांचा राग आम्ही याच तलावात घडणारे इतर प्रदूषण का थांबवत नाही व विसर्जनाच्या मागे का लागतो, ह्यासाठी होता. कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर वा त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर या मोहिमेचा संबंध नव्हता. याचा परिणाम चांगला झाला व राजकीय पक्षांनी याबाबतीत मुद्दाम कुरापत काढली नाही. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने स्वतःचा गणपती दान केला व आमचे कौतुक केले. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने निर्गत नीट होत नाही असे नंतर सांगून गोंधळ उडविण्याचा प्रयत्न केला, पण तो वस्तुस्थितीस धरून नव्हता म्हणून फसला.
सनातन प्रभात नावाची एक गूढवादाचा पुरस्कार करणारी संस्था आहे. यांनी थोड्याच दिवसांत संघटित विरोध सुरू केला. त्यांचा प्रयत्न पूर्णतः शांततापूर्ण होता. गणेशविसर्जन तलावात केल्याने मांगल्याचे सर्वत्र प्रसारण होते अशी त्यांची भूमिका होती. तलावात विसर्जन झालेल्या जलाचे बाष्पीभवन होऊन मांगल्याचा पाऊस पडतो व विसर्जित गणपती दान केल्यास मांगल्यात घट होईल, अशी त्यांची भूमिका होती. आमच्यापेक्षा जास्त संख्येने, जास्त साधनसामुग्री घेऊन व आर्जवातून त्यांनी हा विरोध केला. या विरोधाचा थोडा परिणाम शेवटी होत असावा असे वाटते. या लोकांशी बोलण्याची संधी मी सोडली नाही. कृत्रिम रंगाने होणारी हानी त्यांना सांगितली व त्यांना ती पटल्यासारखी वाटली. मातीचा नैसर्गिक रंगाने युक्त गणपती करायचा कारखाना त्यांची संघटना काढणार होती. हा कारखाना मात्र त्यांना जमला नाही.
यश व यशाचे वाटेकरी अतिशय कमी कार्यकर्ताबळ व साधनसामुग्री घेऊन आम्ही यात उतरलो होता. विसर्जनापूर्वीच्या काळात प्रामुख्याने ठाण्याच्या तीनच कार्यकर्त्यांनी काम केले. यातील अर्ध्याहून कितीतरी जास्त वाटा वंदना शिंदे यांनी उचलला होता. वेळ, श्रम, संघटन व पैसा या सर्वात त्यांचा सहभाग होता. त्या पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याने सरकारी कार्यालयात जाणे शाळांमधून हिंडणे, प्रचाराची भाषणे करणे, पत्रक तयार करणे ही सर्व कामे त्यांनी केली. उरलेल्या दोघांचा सहभाग या सर्वात थोड्या प्रमाणात होता. विसर्जनाच्या दिवशी मात्र हे कार्यकर्ताबळ कमाल तीस या संख्येपर्यंत पोचले असावे. यांतील वीस जण शाळकरी मुले होती. त्यांचा उपयोग विचार पटवून देण्यास कमी होत असे. भक्तांची आर्जवे करणारे दहा जण, व प्रत्यक्षात ने आण करणारे वीस जण, अशी कामाची विभागणी होती. निर्गतासाठी यातीलच काही जण जात असत. मोहिमेसाठी काही प्रथितयश व्यक्ती येऊन गेल्या. त्यांच्या उपस्थितीचाही परिणाम चांगला झाला. यासोबत एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे, लोकांना बदलाचा ठोस कार्यक्रम समोर दिसत असेल तर लोक बदलतात. विसर्जित गणपती दान करा या मोहिमेने असा कार्यक्रम दिल्याने तो यशस्वी ठरला. ठाणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या दरम्यान चर्चा झाली व तलावातील विसर्जन थांबविण्याचा ठराव झाला. त्यासाठी ठाणे खाडीत घाट बांधायचे ठरले. यावर्षीही तलावातील वसर्जन थांबेल असे दिसत नाही, पण त्यादृष्टीने हालचाल सुरू झाल्याचे वाटते. या निमित्ताने पर्यावरणाचा प्रश्न लोकांसमोर परत आला व त्यांनी त्यावर विचार केला हेच या मोहिमेचे यश समजायला हरकत नाही. बी ४/११०१, विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कंपाऊंड, ठाणे (प.) ४०० ६०१.