स्वाती जोशी, नवनिर्मिती, ‘साकार’, 564 ब, शनिवार पेठ, पुणे- 30
‘प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन एक चिंतन’ (ले. भा. स. फडणीस) या लेखावरील प्रतिक्रिया.
गणित विषय मुलांना शिकवताना, शिक्षकांबरोबर काम करताना, मुलांना संख्यांबाबतचे मूलभूत संबोध अवगत न झाल्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या प्राथमिक क्रिया करताना मुलांच्या हातून चुका घडत राहतात, याचा सतत अनुभव येत राहतो. फडणीस सर म्हणतात त्याप्रमाणेच नुसती घोकंपट्टी करून, नुसते पाठांतर करून गणित विषय समजणार नाही, तर त्यासाठी संकल्पनांच्या मुळापर्यंत मुलांना घेऊन जायला हवे.
नियम पाठ करण्यापेक्षा तो नीट समजून घेतला तर तो मुलांच्या अधिक चटकन् लक्षात राहतो हेही अनुभवास येते.
नियम समजण्यासाठी तो मुलांनी स्वतः शोधणे आवश्यक आहे असे मला वाटते.
नवनिर्मिती या संस्थेतर्फे आम्ही प्राथमिक गणित शिकवण्यासाठी ‘करा व शोधा’ ही पद्धत वापरतो. या पद्धतीत नियम शोधावेत, प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा असते.
अंकांत मांडल्यामुळे गणिताची अमूर्तता वाढते. वस्तुभाषा, चित्रभाषा व नंतर गणिताची चिह्नांची भाषा या टप्प्याने गेल्यास गणिताची अमूर्तता कमी होते. यासाठी नवनिर्मितीने साहित्य संच बनविले आहेत. याशिवाय काड्या, स्ट्रॉ, खडू, दगड अशा सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्याचाही वापर करता येईल.
नवनिर्मितीच्या या पद्धतीचा वापर करून महाराष्ट्रात 106 शाळांमध्ये तर महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी गणित शिकवले जात आहे.
खाली नमुन्यादाखल एक उदाहरण देत आहे.
ठोकळे वापरून वेगवेगळ्या मापांचे चौरस बनवा असा प्रश्न शिक्षकांनी मुलांना द्यायचा.
मुले स्वतः करून बघत शोधतात की 1, 4, 9, 16, 25 ठोकळे वापरून चौरस बनले.
त्यानंतर मुलांना या संख्यांना गणितात वर्गसंख्या म्हणतात असे सांगितले की ती नियम बनवतात ‘सर्व वर्ग संख्यांचे चौरस बनतात’.
नवनिर्मितीच्या पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये गणित शिकवले जाते. ज्या शिक्षकांनी ही पद्धत तंतोतंत वापरली त्या वर्गातील 80% मुलांनी 80% क्षमता आत्मसात केल्या. यावरून असा विश्वास वाटतो की गणिताचे सार्वत्रिकीकरण होणे शक्य आहे.
केशवराव जोशी, ‘तत्त्वबोध‘ चेकनाका, हायवे, नेरळ, 410101
मार्च 2003 पान 478, 479 वरील धर्मांतर लपविल्याची खोटी उदाहरणे छापून व ती खोटी आहेत असे माझे 7-03-03 चे पत्र filibuster आहे असा शेरा मारून, (वास्तविक माझ्या पत्रावर comments करण्याचा संपादकांना अधिकार नाही. वृत्तपत्र शिक्षण देणाऱ्या विद्यापीठातील तज्ज्ञांना विचारावे) आणि मोहनीचे ‘मुस्लिमांचे धर्मांतर करणे थांबले आहे – ख्रिश्चनांचे चालू आहे’ हे खोटे विधान छापून नोव्हें. 02) खरे जनतेला बुद्धिप्रामाण्यवादी करणार आहेत अशी मनीषा बाळगणे हाच बुद्धिभेद आहे.
पाणीवाटप, रस्तेजोडणे, विमानसेवा मिळाली की अमरनाथ, पंढरपूर, अहमदाबाद, पुरी येथील लाखोंची गर्दी व त्यावरील खर्च कमी होईल असे मला वाटत नाही. फक्त वाटवेच म्हणू शकतात की नास्तिक होणे सोपे आहे.
ज्याप्रमाणे संत समाजाला वर्षानुवर्षे सदाचरण शिकवितात तसेच बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी ईश्वर, आत्मा, पुर्नजन्म इ. वर सतत हल्ला केला पाहिजे व जनतेची मानसिकता बदलली पाहिजे. तेच कार्य महत्त्वाचे आहे.
[” नुसतेच खंडनमंडन बरेचदा आग्रही, कधीमधी व्यक्तिगत पातळीला जाते.”! पृष्ठ 183, आजचा सुधारक, अंक जुलै 2004, (15.4)]
अशोक विद्वांस, 8, Wethersfield Drive PLAINSBORO, N. J. 08536, U.S.A.
आसुच्या एप्रिल 2004 च्या अंकात ‘आजचे विज्ञान व अध्यात्म- दुसरी बाजू’ या जुमडे यांच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून हे पत्र.
प्रथम परिच्छेदातच श्री जुमडे ह्यांनी ‘दोन भिन्न ज्ञानशाखा’ असा मथळा देऊन अध्यात्माला ज्ञानशाखेची प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न केला आहे. परंतु ज्ञान तर्कसंगत, अनुभवप्राप्य व अनुभूतिशील असते असणे आवश्यक आहे. आध्यात्मिक ज्ञान ह्यांपैकी एकाही कसोटीतून पार उतरत नाही. अध्यात्माबद्दलच्या सर्व गोष्टी केवळ कल्पनेवर आधारित असतात. त्यांना मान्य करून घ्यायला श्रद्धेचा जबरदस्त पाठिंबा लागतो. त्यांना प्रायोगिक किंवा तर्कशुद्धरीत्या तपासणे शक्य नसते. ह्या कारणास्तव अध्यात्माला ज्ञानाची शाखा मानणे हे ‘ज्ञान’ शब्दाच्या प्रचलित व्याख्येचा व्याप खूप खूप वाढविला तरच शक्य आहे. असे करणे मला जरूरी किंवा योग्य वाटत नाही.
पान 37 च्या थेट मथळ्यावरचा उतारा असा आहे “अदृश्य बाजू रूपाला आधारभूत असते असे मानले (उदा. दृश्य शरीराला अदृश्य प्राण व जाणीव यांचा आधार असतो) म्हणजे त्या दृश्य विश्वाला आधारभूत असे काहीतरी तत्त्व असले पाहिजे हे तर्काने आपोआपच येते.” हे विधान पूर्णतः निराधार आहे. प्रथम अदृश्य बाजू रूपाला आधारभूत असते असे का मानायचे ? शरीराला प्राणाचा आधार असतो असे कशावरून? ह्या निराधार मान्यतेवर आधारित असलेल्या विधानाचा उत्तरार्ध ‘तकनि आपोआपच येतो’ ह्यात तर्क कुठे आला? जेथे ‘प्राण’ ही संज्ञाच केवळ एक कल्पना आहे व तिला श्रद्धेवाचून इतर कोणताही आधार नाही, तेथे ‘दृश्य शरीराला अदृश्य प्राणाचा आधार असतो’ असे विधान करण्यात काय अर्थ आहे?
पान 38 वरील दुसऱ्या परिच्छेदाच्या अंती श्री जुमडे विचारतात किंवा वस्तूंचे आपसांतील नियम सापडले ते तसे का, कुणी कशासाठी, कसे बनवले, ह्याचे उत्तर विज्ञानाकडे आहे का? “मान्य आहे की सर्व प्रश्नांची उत्तरे आज विज्ञानाकडे नाहीत. परंतु, केवळ ह्या कारणानेच असे नियम बनवणारा कोणीतरी (ईश्वर?) असलाच पाहिजे अशी कल्पना करणे म्हणजे प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांचे दार कडीकुलूप लावून बंद करणे असेच झाले. हा अभिगम ज्ञानोपार्जनासाठी सपशेल चुकीचा आहे.
पुढे श्री जुमडे लिहितात : ” ‘मिथ्या’ ह्या शब्दामुळे ‘निराशावाद’ पसरवणे हा हेतू मुळीच नाही.” हेतू तसा असो वा नसो परंतु ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ ह्या शिकवणीमुळे हिंदू समाजाच्या मानसात जो प्रचंड निराशावाद, नियतिवाद किंवा दैववाद माजलाय तसा इतर कोणत्याही समाजात नाही. ‘काय करणार ? एकेकाचे नशीब!’ किंवा तत्सम विधान करून स्वतःला दैवाच्या आधीन करणे हे हिंदू मन ज्या सहजरीत्या करू शकते तसे इतर कोणीही करणार नाही. मला वाटते ‘ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या’ च्या ऐवजी जर ‘जगत् सत्यं ब्रह्म मिथ्या’ अशी शिकवण हिंदुधर्माने दिली व हिंदुसमाजाने स्वीकारली तर प्रत्येक हिंदूचे, हिंदुसमाजाचे व पर्यायाने हिंदुस्तान देशाचे ‘देव’ सुधारेल.
पुढे ते लिहितात “संत एकनाथांनी काशीहून आणलेली गंगा रामेश्वरला नेताना तहानेने व्याकुळ झालेल्या मरणोन्मुख गाढवाच्या तोंडात घातली हे ह्या शिकवणीचे उत्कृष्ट उदाहरण आहे’. माझ्या मते ह्या उदाहरणातच ‘हिंदू’ शिकवणीच्या वक्रोक्तीची परिसीमा आहे. प्रथम म्हणजे एकनाथांनी असे खरोखर केले होते का, कुणास ठाऊक? बहुतेक, इतर अनेक संतांबद्दल जशा बऱ्याच किंवदंती प्रचलित असतात तशीच हीसुद्धा एक किंवदंतीच असेल. पण क्षणभर असे मानून चालू या की एकनाथांनी खरोखरच असे केले असेल. पहिला प्रश्न हा पडतो की इतर अनेक समाजकार्ये, सेवाकार्ये समोर असताना एकनाथांना काशीची गंगा रामेश्वरला उचलून नेण्याचा उपद्व्याप करायची काय आवश्यकता होती? असो. अधिक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गाढवाच्या जागी एखादा अस्पृश्य असता तर एकनाथांनी ती गंगा त्याच्या तोंडात घातली असती का? मला वाटते, नसती घातली. व त्यालाच मी वक्रोक्तीची परिसीमा – height of irony म्हणतो. मी पाहिलेली वस्तुस्थिति अशी होती मी एका खेडेगावी वाढलो. तेथे अस्पृश्यांसाठी गावाबाहेर वेगळी वसाहत व वेगळी विहीर होती. उन्हाळ्यात त्या विहिरीचे पाणी आटत असे त्या विहिरीचे पाणी त्या अंत्यज समाजाला पुरणे अशक्य व्हायचे व तिथल्या बायका, भंगिणी, 2-3 कोस चालत जाऊन डोईवर पाणी आणायच्या. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा, “गावातील इतर विहिरींचे पाणी तुम्ही घेऊ शकता असा शब्द एकदाही गावातील उच्चभ्रू पंडितांच्या तोंडून निघाला नाही. अहो चार पायांचे गाढव कशाला, ही तर दोन पायांची, तुमच्या आमच्यासारखी माणसे होती. आपल्या तथाकथित धर्मधुरंधरांनी किंवा संतांनी ‘ह्या माणसांना तुमच्या विहिरीतील पाणी घेऊ द्या’ अशी शिकवण कधी दिली होती का? आज 21 व्या शतकात तरी अशी शिकवण देणारा संत आपल्यात आहे का 2 उत्तर क्षोभजनक ‘नाही’ असे आहे.
एक शेवटचा प्रश्न मांडून पत्र संपवितो. पान 40 वर 14 व्या ओळीत श्री जुमडे म्हणतात, “आजही असे संतसदृश सत्पुरुष आपल्यात आहेत व पुढेही राहतील.” आजही आपल्यात ‘संत’ आहेत ह्या विधानाशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण, प्रत्येक वर्षी भारतात उन्हाळा तापायला सुरुवात झाली की लगेच ही ‘संत’ मंडळी मुंबईचे विमानतळ गाठतात व शक्य त्या घाईने लंडन किंवा न्यूयॉर्क-शिकागोला हजर होतात. नोव्हेंबरनंतर जेव्हा लंडन-न्यूयॉर्क थंडीने थिजायला लागतात तेव्हा मात्र ही संतमंडळी मायदेशी निघून जातात ! मला प्रश्न पडतो तो असा की, “आम्हा अमेरिकन लोकांना ‘शांति’पाठ शिकवणारी ही संतसदृश सत्पुरुष मंडळी कधी काश्मीर, अफगाणिस्तान किंवा इराण-इराक, पॅलेस्टाइनला जातात का?” अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या फुशीमुळे आतंकवाद्यांनी जेव्हा इंडियन एयरलाइन्सचे विमान काबीज केले होते तेव्हा ह्या संतांपैकी एकाला तरी काबूलला जाऊन तालिबानांना शांतिपाठ शिकवायची आठवण का नाही झाली? अशी ही ‘शिकवण’ सांगणाऱ्या अध्यात्माला कोणत्या आधारे जुमडे ‘ज्ञानशाखा’ म्हणतात हे मला तरी अनाकलनीय आहे.
आसुच्या मे 2004 च्या अंकात वाचलेल्या दोन गोष्टींबद्दल प्रतिक्रिया म्हणून हे पत्र लिहीत आहे.
(1) ‘आम्ही नागरिक’ ह्या स्तुत्य प्रयत्नाबद्दलचे आपले संपादकीय वाचले. उपक्रमाबद्दल पुरविलेली सर्व माहिती, व संविधानात मानलेल्या मूल्यांची झीज दाखविणारी सर्व उदाहरणे स्वयंसिद्ध सत्यासारखी उघड आहे. त्याबद्दल वादाचा प्रश्नच नाही. पत्रिकेवर सह्या करणाऱ्या सर्व व्यक्तींना भरपूर सामाजिक मान्यता आहे. परंतु संबंध उपक्रमात एक मुख्य अडचण दिसते. ती म्हणजे, हा उपक्रम सिद्ध करायला ज्यांच्याशी झोंबी द्यावी लागेल ती सर्व मंडळी मातब्बर आहेत. सर्वांचे हात सगळीकडे पोचलेले आहेत. कायद्याचे रक्षण करायची ज्यांची सर्वप्रथम जबाबदारी आहे असे पोलीस व न्यायखाते ह्या मंडळींच्या अधीन आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याशी झोंबायला कोण ‘माई का लाल’ पुढे धजणार आहे? थोडक्यात प्रश्न आपण सर्वांनी प्राथमिक शाळेत असताना वाचलेला ऐकलेला आहे, Who will bell the cat? ह्या प्रश्नाचा, We the people चा उपक्रम उभारणाऱ्या मंडळींना विसर तर झाला नाही ना?
(2) श्री चंद्रकांत मुळे यांच्या पत्राचे उत्तर देताना पान 95 वरील दुसऱ्या परिच्छेदात आपण लिहिले आहे : “काँग्रेसला निवडून देणे किंवा मोदींना निवडून देणे ही दोन्ही बुद्धिहीनतेची लक्षणे आहेत; आणि त्यांच्यामध्ये अन्य धर्मांधांबद्दल द्वेष निर्माण होऊ शकणे हेही गुजराथ्यांच्या निर्बुद्धपणाचे लक्षण आहे”. मी गुजराथचा आहे. साहजिकच आपल्या भाषेमुळे शब्दांमुळे मला अतिशय वाईट वाटले. मागील 50 वर्षांत झालेल्या 10 (2) निवडणुकांनी हे सिद्ध केले आहे की भारतीय नागरिक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असला तरीही स्वतःच्या मताचे मूल्य त्याला कळलेले आहे व प्रत्येक वेळी संधी मिळाल्यावर त्याने स्वतःचा हा दंडक निर्णायकरीत्या वापरला आहे. ज्या इंदिरा गांधी व काँग्रेसला त्याने 1971 साली भरमसाट बहुमताने निवडून आणले त्याच इंदिरेला व काँग्रेसला मतदारांनी लाथेने तुडवून सत्ताभ्रष्ट केले; पण पुन्हा 1980 मध्ये त्यांच्याच हाती सत्ता सोपवली. थोडक्यात, बहुतेक मतदाराला स्वतःचा स्वार्थ व स्वतःचे सुख समजते. तदनुसार गुजराथच्या मतदाराने नरेंद्र मोदींचे शासन मान्य केले. कदाचित ही गोष्ट (तुमच्यासारख्या) काही लोकांना नापसंत असेल. परंतु, केवळ त्या कारणास्तव गुजराथ्यांना ‘निर्बुद्ध’ म्हणणे अयोग्य आहे. ह्या न्यायाने आपण सर्वच वागायला लागलो तर भारतात ‘बुद्धिमान’ लोकांची संख्या नगण्य होईल.
श्याम कुलकर्णी, पुणे
जून 2004 च्या आ.सु. च्या अंकातील पुण्याच्या वाचक मेळाव्यात श्री. विजय तेंडुलकर यांनी व्यक्त केलेले विचार वाचून चांगदेव चौदाशे वर्षे जगून कोराच, तसे चौदा वर्षे आ.सु. वाचून तेंडुलकर अखेर अंधश्रद्धच हे पाहून ‘हेंचि फळ काय मम तपाला’ अशी संपादकांची भावना झाली असेल असा अंदाज आहे.
‘नास्तिकसाधना’ हा श्री. मिलिंद वाटवे यांचा लेख वाचून लहानपणीच्या पुस्तकात वाचलेली ‘दगडाची आमटी’ ही कथा आठवली. या गोष्टीत कंजूष माणसाकडे आलेला पाहुणा आमटी कंजूष माणसाकडून मिळत नाही, म्हणून एक युक्ती करतो. ‘आज मी दगडाची आमटी करतो’ असं तो जाहीर करतो. कंजूष माणसास पैसे वाचवण्याचा हा नामी उपाय काय आहे याची उत्सुकता लागते. पाहुणा दोन दगड स्वच्छ धुऊन पाण्यात टाकून ते पाणी उकळायला ठेवतो व आता थोडी डाळ मिळेल तर बरं, आता थोडा गूळ मिळाला तर बरं असं म्हणत रहातो व आमटीची कृती जाणण्याच्या उत्सुकतेने तो कंजूष माणूसही ते ते पदार्थ पुरवीत राहतो. अखेरीस ती आमटी नेहमीचीच होते व पाहुणा त्यातील दगड काढून फेकून देतो. नास्तिकसाधनेत ‘नास्तिक’ हा शब्द म्हणजे दगड व साधना म्हणजे आमटी. असो!
पु. नी. फडके, स. 15 भरतनगर, नागपूर-440033
आजचा सुधारक मधील बहुतेक ऐतिहासिक लेख प्राचीन भारतीय इतिहासाचे अज्ञान दर्शवितात. नर्मदेच्या दक्षिणेकडची नागर वस्ती इ.स. पूर्व 300 नंतर मौर्यकाळात स्थापन झाली आहे हे ऑर्किऑलॉजीने अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे ह्याचा तुमच्या लेखकांना पत्ताच नसतो. त्यामुळे आंबेडकर-टिळक ह्यांनी केलेल्या विधानांमध्ये फेरफार करावे लागतात हे सुद्धा माहिती नसते. टिळकांचे Arctic Home in the Vedas ह्या ग्रंथाप्रमाणे भारतीय आर्य उत्तर ध्रुवावर राहत होते हे आज कोणीच मानत नाही. ह्या आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धान्त खोटा आहे हे तुमचेच एक लेखक डॉ. नी. र. वन्हाडपांडे ह्यांनी सिद्ध केले आहे. पण लक्षात कोण घेतो ?
दक्षिणेत उत्तरभारतीयांच्या वसाहती मौर्य कालात कशा झाल्या ते Indian through the Ages ह्या माझ्या पीएच.डी. थेसीस मध्ये सिद्ध केले आहे व ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे पण ते वाचेल कोण ?
श्री. मधुकर कांबळे (एप्रिल-04, अंक 15.1) ह्यांचा लेख असाच अज्ञानावर आधारित आहे. आजच्या हिंदूसमाजातील पूजाविधी, सोळा संस्कार व इतर चालीरीती ह्या अथर्ववेदातील सूक्तांवर आधारित आहेत. त्यांची रचना इ.स. पूर्व 600 च्या सुमारास पेशावर (तक्षशिला) भागात कशी झाली हे माझ्या (संशोधक जून-03 ) लेखात स्पष्ट केले आहे. ह्या काळात भारतात सोळा गणराज्ये होती व सर्वांच्या चालीरीती भिन्न होत्या. त्यांमध्ये एकसूत्रता आणण्याचा प्रथम प्रयत्न अथर्ववेदाने केला आहे. असे कर्मकांड बौद्धजनासाठी निर्माण करावे असे भगवान बुद्धाला काही वाटले नाही. त्याचा भर आध्यात्मिक उन्नतीवर होता.
मनुस्मृती इ. स. पूर्व 300 च्या अगोदर लिहिली गेली. त्याचा रचनाकार एक नसून विविध गणराज्यांमध्ये असलेल्या चालीरीती त्यामध्ये एकत्र केल्या आहेत. त्या काळी पठाणांमध्ये बाप सर्वसत्ताधारी असायचा, बाजारात उभे करून मुलीला विकायचा, नवरा मेल्यावर नातेवाईक पत्नीला चितेवर ढकलून जाळायचे, ही पठाणांमधील प्रथा ग्रीक लेखकांनी लिहून ठेवली आहे. पण बाकीच्या गणराज्यांत बहुपतित्व होते ते द्रौपदीच्या कथेत आपणास दिसते. उत्तरेस मेघवाहन व दक्षिणेस सातवाहन सर्व राजांची नावे आईंवरून आहेत. दक्षिणेत सर्वत्र मातृसत्ताक पद्धती होती. तेथे सतीचा प्रश्नच नव्हता.
बुद्धाअगोदर उत्तरेत तीनच प्रमुख वर्ण होते. निषाद, चांडाळ, कोळी अशा फार थोड्या जाती शूद्रात गणल्या जात- अथर्ववेदाने परकीयांना नात्यस्तोम विधीने हिंदुधर्मात आणून प्रथम शूद्र वर्णात प्रवेश दिला व नंतर गुणकर्मशः वरच्या वर्णात जाण्याची मोकळीक दिली. जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते ।
दक्षिण भारतातल्या एकाही जातीचे नाव मनुस्मृतीत आढळत नाही. ही व्यवस्था मौर्यकाळानंतर उत्तरेकडून वेगवेगळ्या गणराज्यातून आलेल्या जनसमूहांमुळे निर्माण झाली आहे. त्याचा निर्माता कोणीही नाही. उगाच हिंदू समाजाला बडविण्यात अर्थ नाही.