महाराष्ट्र नाभिक महामंडळाने नाभिक समाजातील तरुण व्यावसायिकांना प्रशिक्षण मिळावे व रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने सलून आणि ब्युटी पार्लरबाबत एक आधुनिक प्रशिक्षण शिबिर, पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अलीकडेच आयोजित केले होते. त्या शिबिराच्या वेळी रंगमंचावर केस कापण्याचे प्रात्यक्षिक, अर्थातच, दाखविले गेले. त्यामुळे रंगदेवतेच्या पावित्र्याचा भंग झाल्याची तक्रार मराठी नाट्य व्यवस्थापक संघाने केली असून, यानंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना रंगमंदिर उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणीही केली आहे.
सर्वप्रथम हे मान्य केले पाहिजे, की नाट्य व्यवस्थापक संघाचा, रंगदेवतेच्या पावित्र्याचा मुद्दा संपूर्णतः गैरलागू आहे. रंगकला पवित्र व केस कापण्याची कला तेवढी अपवित्र हे मान्य होण्यासारखे नाही. वर्णव्यवस्थाच सुरू ठेवण्याची मूलतत्त्ववादी अशी ही दृष्टी असून, तिचा निषेध केला पाहिजे. नाभिक संघाने म्हटले आहे, की मुंजीच्या वेळी घरामध्ये केशकर्तन केलेले तुम्हाला चालते. त्या वेळी आवश्यक तर नाभिकाला जास्तीची बिदागी देऊनही यजमान आपल्या घरी पाचारण करतात. असेही अनेक जण आहेत, की केस कापण्यासाठी दुकानात न जाता, वेळोवेळी नाभिकालाच घरी बोलावितात….. नाट्य व्यवस्थापन संघ कोणत्या काळात जगत आहे ? ज्यांना तुम्ही उच्चवर्णीय समजता, त्यांच्यापैकी काही जणांनी स्वतः केस कापण्याची कला शिकून घेऊन स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. श्रमाची प्रतिष्ठा जो माणूस जाणतो, तो कोणत्याही व्यवसायाला तुच्छ लेखणार नाही आणि पावित्र्याचा भंग झाल्याचा सोवळेपणा करणार नाही.
नैतिक आचरण
आपण करीत असलेल्या व्यवसायामध्ये आपापले नैतिक आचरण चोख आहे किंवा नाही हे ज्याने त्याने पाहावे, पावित्र्य म्हणता, ते तिथेच असणार आहे. आणि तसे जर नाट्य व्यावसायिकांनी पाहायचे ठरविले, तर इथे क्षणोक्षणी निरनिराळ्या पातळ्यांवर अपवित्र वर्तन सुरू असल्याचे लक्षात येईल.
त्याची सुरुवातच मुळी रंगमंदिराच्या तारखांचे वाटप कसे होते, इथपासून होताना दिसेल. तारखांचे वाटप कित्येकदा टेबलाखालून होते किंवा ‘पडद्यामागे’ होते, त्याचे काय ? नाट्यसंमेलनाच्या वेळी त्या त्या गावामधील यजमान नाट्यसंस्थेला लुबाडले जात असल्याची जाहीर तक्रार, नगरच्या नाट्यसंमेलनामध्ये करावी लागली, त्याचे तरी कारण काय ? आजही अक्षरशः एक-दोन नाट्य निर्मात्यांनाच संपूर्ण नाट्यव्यवसायाची मक्तेदारी मिळाली असल्याचे जे चित्र दिसते आहे, त्याचे तरी कारण काय असावे ? नाट्यप्रयोगाच्या व्यवस्थापनासाठी जो खर्च झाल्याचे टिपण व्यवस्थापक देतात त्या टिपणाबद्दल नाट्यप्रयोग करणाऱ्यांना काहीच म्हणायचे नसते काय ? गेल्या दहापंधरा वर्षांमध्ये नाट्यव्यवसायामध्ये जे नाट्यनिर्माता म्हणून उतरले आहेत, त्यांच्यापैकी खरोखरीच किती जणांनी रंगभूमीचा व नाट्यव्यवसायाचा गंभीरपणाने विचार केल्याचे आपल्याला सांगता येईल ? आज व्यावसायिकांपेक्षा धंदेवाईक निर्माते संख्येने जास्त आहेत, हे खरे की खोटे? नाट्यप्रयोगाची तिकीट विक्री खरे तर फारशी झाली नसतानाही, तिकीट विक्रीच्या प्लॅनवर ती झाल्याचे दाखवावे आणि त्या निमित्ताने होता होईल, तो ‘काळ्या’चे ‘पांढरे’ करावे, असे या व्यवसायामध्ये कोणीच कधीच वागले नाही असे म्हणता येईल का ? पहिल्या प्रयोगापासून नाट्यप्रयोगामध्ये भूमिका करीत आलेल्या कलाकाराला, परदेशामधील प्रयोगामधून मात्र अर्थकारणाचे निमित करून वगळावे व दुसऱ्यालाच उभे करून काम भागवून घ्यावे, या प्रकारातल्या नैतिकतेबद्दल काय म्हणाल ?
रंगमंचावर केस कापले म्हणून तुम्ही ओरडता ! प्रयोगानंतर या रंगमंचावर कोणी कोणी काय काय प्रकार केले, हे तर तुम्हाला सगळ्या तपशिलासह माहीत आहे. त्या वेळी तुम्ही असा जाहीर निषेध केल्याचे तुम्हाला तरी आठवते आहे का ते बघा! तसा निषेध, तुम्हाला आणि कित्येकांना परवडणारा नव्हता, हे खरे की नाही ?
‘रंगदेवतेला आणि प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्यप्रयोगाची सुरुवात करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कोण ती रंगदेवता ? आपण मानलेली, सगळ्यांनी कल्पना केलेली रंगदेवता. त्या अमूर्त रंगदेवतेचे मूर्त रूप नाट्य व्यवसायाच्या नैतिकतेमध्येच आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणूनच रंगमंचावर केशकर्तनाला बंदी असावी, अशी मागणी करताना, वर्णाश्रमावर आधारित पावित्र्याचा मुद्दा फेकून दिला पाहिजे. रंगभूमीचा वर्तमानकाळातील जाणिवांशी संबंध पाहिजे, असे म्हणायचे, आणि त्याच रंगभूमीने वर्णाश्रमाच्या बाजूने उभे राहायचे हे निखालस चूक आहे.
रंगमंदिर कोणाला द्यायचे ?
आता, नाभिक संघाबद्दल नाभिक संघाने नाट्य-व्यवस्थापन संघाचा निषेध केला हे ठीक झाले. पावित्र्याचा उपस्थित केलेला मुद्दा, हा माणसाच्या आत्मसन्मानाचा अधिक्षेप करणाराच होता, याबद्दल शंका नाही. पण कुस्तीगीर संघाने, त्यांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध व्हावे, अशी मागणी लगेचच केली आहे, हे नाभिक संघाला माहीत झाले असेलच. तर मग आता, कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी, पाककलेच्या प्रशिक्षणासाठी, बागकामाच्या प्रशिक्षणासाठी, शिवणकामाच्या प्रशिक्षणासाठी, संगणक प्रशिक्षणासाठी, हास्यक्लबसाठी अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणासाठी नाट्यगृह उपलब्ध व्हावे, अशी मागणी आली तर या सगळ्या उपक्रमांसाठी ते द्यावे काय ?
रंगभूमीचा गाढा अभ्यास व अनुभव असलेले डॉ. राजीव नाईक यांनी त्यांचा, ‘खेळ नाटकाचा, एक पडदा आणि तीन घंटा’ या पुस्तकामध्ये एक अप्रतिम निरीक्षण नोंदविले आहे. त्यांनी म्हटले आहे, “प्रत्येक समाज काही अवकाश घडवत असतो. समाजाच्या अनेक गरजा असतात. मुलांना शिकवायचं असतं. रोग्यांवर उपचार करायचे असतात. कज्जे मिटवायचे असतात. लग्नं लावायची असतात. मासे विकायचे असतात… खेळायचं असतं. भटकायचं असतं. मेलेल्यांची वासलात लावायची असते. हे सारं काही एकाच जागी होऊ शकत नाही. म्हणून मग समाज यासाठी वेगवेगळे अवकाश घडवतो. शाळा, इस्पितळ, न्यायालय, कार्यालय, बाजार… मैदान, बागा, स्मशान, …. आता समाजाला नाटक पाहायचं असेल, तर तो नाटकघर बांधेलच, आणि तरच बांधेल…….”
प्रयोगजीवी कलांसाठी, नाट्य-संगीत-नृत्य यांच्यासाठी जर आपण ‘बालगंधर्व’ किंवा इतर काही रंगमंदिरे उभारली असतील तर तिथे अन्य गोष्टीसाठी ‘अवकाश’ निर्माण करायचे की नाही, हे समाजानेच ठरवायचे आहे.
नाभिक संघाचे केशकर्तनाच्या प्रशिक्षणाचे शिबिर बालगंधर्व रंगमंदिरात झाल्याने, पावित्र्याचा भंग वगैरे काही झालेला नाही… प्रश्न आहे, ज्या त्या ‘अवकाशा’चा ते निर्माण करण्यामागील हेतूंचा… आणि अर्थातच परंपरेचा.
समाजानेच त्याचा विचार करायचा आहे.