1996 साली ब्रिटनमधील विश्व हिंदू परिषदेने एक सचित्र व गुळगुळीत पुस्तक प्रकाशित केले. हिंदू धर्माचि स्पष्टीकरण शिक्षकांसाठी मार्गदर्शिका’ या नावाच्या या पुस्तकात ‘वर्गात हिंदू कल्पना व विषय शिकवण्याबाबतच्या सूचना’ आहेत. ब्रिटिश शालापद्धतीतील माध्यमिक व उच्च वर्गामध्ये वापरासाठी हे पुस्तक आहे. आज पुस्तक दुसऱ्या आवृत्तीत उपलब्ध आहे.
पुस्तक ब्रिटिश शिक्षकांना सांगते की हिंदू धर्म हे चिरंतन निसर्गनियमांचेच दुसरे नाव आहे.’ वैदिक ऋषींनी शोधून काढलेले आणि नंतर आधुनिक भौतिकशास्त्रज्ञांनी व जीवशास्त्र्यांनी पुष्टी दिलेले हे नियम आहेत, असा दावा आहे. यानंतर गणित, भौतिकी, खगोलशास्त्र, वैद्यक आणि उत्क्रांतीचे शास्त्र यांच्या वेदांमधील उल्लेखांचे ठार चुकीचे व आत्मतुष्ट ‘स्पष्टीकरण’ आहे. शिक्षकांनी वेदांना प्राचीन धर्मग्रंथ न मानता ‘हे हिंदुधर्मग्रंथ वैज्ञानिक लेखन समजले जावेत’ अशी सूचना आहे. आधुनिक विज्ञानाची शिकवण सारी वेदांमध्ये आहेच आणि पदार्थ (मॅटर), ईश्वर, मनुष्य या साऱ्यांबद्दल वेद जे जे सांगतात त्याला त्याला आधुनिक विज्ञान पुष्टीच देते, असे सांगून वेद आणि आधुनिक विज्ञान यांच्यात कोणताही विरोधाभास किंवा संघर्ष नसून ती ‘एकाच सत्याची दोन भिन्न नावे आहेत’, असा दावा केलेला आहे.
ब्रिटनच नव्हे, तर कॅनडा व अमेरिकेतही वैदिक आर्य भारत हे विश्व संस्कृतीचे ‘मूलस्थान’ असल्याची ग्वाही देणारे प्रचार वाङ्य उपलब्ध आहे. एखाद्या ‘समाजा’चे स्वतःच्या संस्कृतीबद्दलचे मत नोंदण्याच्या इच्छेतून अनेक पाश्चात्य सरकारे या हिंदुत्वाच्या प्रचाराला मदत करत आहेत.
पण मला या धोकादायक ‘यँकी हिंदुत्वा विषयी इथे लिहायचे नाही. माझा रोख यँकी हिंदुत्वाच्या ‘डाव्या’ अंगावर आहे. पश्चिमेकडून आयात केलेल्या ‘आधुनिकोत्तर’ विचारांमधून अनाहूतपणे वैदिक विज्ञानाच्या हिंदुत्ववादी प्रचाराचे होणारे समर्थन, हा माझा विषय आहे. गेल्या दोनेक दशकांमध्ये आधुनिक विज्ञानावरील ‘मूलभूत’ टीका ह्या पाश्चात्त्य विद्यापीठांमध्ये ‘फॅशनेबल’ झाल्या आहेत. त्या ‘आधुनिकोत्तर’ व ‘सामाजिक रचनावादी’ या नावांनी ओळखल्या जातात. या टीकांमध्ये आधुनिक विज्ञान ही ज्ञान मिळवण्याची मूलतः पाश्चात्त्य पुरुषसत्ताक व साम्राज्यवादी पद्धत मानली जाते. अनेक भारतीय मूळ असलेल्या पण आज पश्चिमेत रुजलेल्या विचारवंतांनी आधुनिक विज्ञानावरील ही आधुनिकोत्तर टीका घडवली आहे. त्यांना या टीकेतून आधुनिक विज्ञानाने ज्ञान कमावण्याच्या अ-पाश्चात्त्य पद्धतींवर अत्त्याचार केले, हे दाखवायचे आहे.
वेद हे आधुनिक विज्ञानाचे ‘केवळ एक वेगळे नाव’ आहे, या हिंदुत्ववादी प्रचाराला ह्या डाव्या म्हणवणाऱ्या टीकाकारांनी जो तात्त्विक पाठिंबा पुरवला आहे, त्याचे विश्लेषण करायची माझी इच्छा आहे.
वस्तुनिष्ठ व वैश्विक ज्ञानावर हल्ला करताना हे आधुनिकोत्तर विचारवंत हिंदुराष्ट्रवाद्यांच्या फशी पडले आहेत. प्रत्येकच दृष्टिकोन आपापल्या पातळीवर आणि आपापल्या संदर्भामध्ये इतर दृष्टिकोनांइतकाच खरा असतो, हे आधुनिकोत्तर मत आपसूकच हिंदुत्ववादी प्रचाराशी जुळत जाते. याचा परिणाम असा होतो की वेद-वेदान्ताच्या आध्यात्मिक शिकवणींमध्ये अनुभवजन्य विज्ञानही आहेच, असा धादांत खोटा पण ‘आवाजी’ प्रचार होऊ लागतो. असले वेदांचे ‘वैज्ञानिकीकरण’ (scientisation) भारतात विवेकी किंवा अनुभवजन्य परंपरा तर रुजवत नाहीच, पण भारतीय धर्मग्रंथाच्या आध्यात्मिक संदेशांनाही अपरिमित इजा करते. वेदांमधील मिथके आणि विज्ञानातील शास्त्र ज्ञान यांची ही सरमिसळ विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचे विकृतीकरण करून वैज्ञानिक आणि धार्मिक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे नुकसान करते.
आपण ‘मार्गदर्शिक’ मागचा युक्तिवाद तपासू, ‘अनेक खरी वैज्ञानिक तथ्ये मांडणारे वेद हे ‘वैज्ञानिक लेखन मानले जावे’, असा दावा आहे. काय आहेत, ही ‘खरी वैज्ञानिक तथ्ये’ ? मुख्य उदाहरण आहे ‘त्रिगुण’ संकल्पनेचे पदार्थ आणि आत्मा हे एकच आहेत, या वेदांती संकल्पनेत याचा उगम आहे. भूतमात्राच्या विश्वाचे आत्मा-तत्त्व हे अविभाज्य अंग आहे, इथून सुरुवात करून गुणतत्त्व सांगते की सर्व पदार्थ तीन आध्यात्मिक-नैतिक ‘गुण’ दाखवतात. सत्त्वगुण शुद्ध, शांत, श्रेष्ठ ज्ञानाचा चाहता असतो. अशुद्ध, अज्ञ, निष्क्रिय असा तमोगुण असतो. चौकस, सक्रिय, इहलोकी फायदा कमावू इच्छिणारा, असा रजोगुण असतो.
विश्व हिंदू परिषदेची ‘मार्गदर्शिका’ सांगते की आधुनिक विज्ञानही कणांमध्ये धन (positive), ऋण (negative) आणि न भार (neutral) असे (विद्युत्) भार मानतेच ! अशा रीतीने मुळात आध्यात्मिक नैतिक ‘गुण’ अणूंवरही रोपले जातात, आणि इथून सुरुवात करून वेदांमधील गुण-संकल्पनेची सिद्धता’ इतरत्रही लागू केली जाते – उदा. आयुर्वेद. या ‘वैज्ञानिक सिद्धते’च्या आधाराने ‘मार्गदर्शिका’ ब्रिटिश शिक्षकांना सांगते की धर्माचे चिरंतन नियम आणि वैज्ञानिक नियम यांच्यात संघर्ष नाही.
हिंदुत्वप्रचारातला एक हास्यास्पद मंत्र आहे हा आधुनिक विज्ञान आणि हिंदू धर्म यांच्यात संघर्ष नाही. प्रत्यक्षात आधुनिक विज्ञानातून जे काही कळते ते ठामपणे नैतिक गुण आणि ‘शक्तींना’ फार कशाला, निसर्गातील ‘जाणिवेला खोटे ठरवते. वैदिक विश्वोत्पत्तिशास्त्र निसर्गाला ईश्वरी जाणिवेचे प्रकटन मानते आणि आधुनिक विज्ञानाच्या निष्कर्षांप्रमाणे हे ठामपणे खोटे आहे.
आधुनिक विज्ञानात आणि हिंदुधर्मात संघर्ष नाही हे तर चुकीचे आहेच, वर विज्ञानाचे निसर्गाचे आकलन ठामपणे आणि पूर्णपणे हिंदुधर्माच्या “चिरंतन नियमांना” जे भूतमात्र आणि आत्मा यांचे अद्वैत शिकवतात त्यांना खोटे पाडते.
खरे तर यामुळेच ‘केवल जाणीवेच्या हिंदू मतात आधुनिक विज्ञानाला ‘फक्त एक वेगळे नाव’ म्हणून सामावून घ्यायची हिंदुत्ववाद्यांना निकड भासते.
जर हिंदू प्रचार ब्रिटनमध्ये या पातळीला जाऊ शकतो, तर भारतात काय होत असेल याची कल्पना करा. तिथे तर हिंदुत्ववाद्यांचे केंद्र सरकार, त्याची माध्यमे, शिक्षण आणि संशोधनाशी निगडित संस्था वगैरे काय नाही करू शकणार ? अल्पज्ञात हिंदू तत्त्वांमध्ये आधुनिक विज्ञानाची तत्त्वे ‘शोधणे’ हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत धोरण आहे.
अमेरिकेत सेक्युलर शाळांमध्ये ख्रिस्ती रूढी घुसवणाऱ्या अमेरिकेतील रूढीवादींनी नैसर्गिक घटनांच्या कारणांमध्ये ‘ईश्वर’ हेही कारण घुसडले. या पाचरीसारख्या ‘ईश्वरीय विज्ञाना’ ने सेक्युलरांच्या पंथाला धक्का द्यायचा प्रयत्न अमेरिकेत झाला पण अमेरिकन रूढीवाद्यांना फक्त कोर्ट आणि विधानसभांशी लढायचे होते. भारतातले सरकार तर वेदांच्या पाचरीने मुळातच क्षीण अशा सेक्युलर शिक्षणपद्धतीला उखडू पाहत आहे. एकदा का हिंदुधर्ममताला ‘विज्ञान’ म्हटले, की भारतीय शासनव्यवस्था भारताला ‘आधुनिक’ आणि ‘सेक्युलर’ म्हणू शकते- ‘नाही तर आपल्या मदरशांमधून विज्ञानाला बाद करणारे ते सीमेपारचे इस्लामी मूलतत्त्ववादी पाहा । धार्मिक शिक्षणाला ‘सेक्युलर’ म्हटले की धार्मिक बुद्धिभेदाला ‘सेक्युलर शिक्षण’ म्हणता येते.
शासकीय मदतीने ज्योतिषशास्त्र आज [2 जाने. 2004 / 16 जाने 2004] भारतात भूकंपाच्या भाकितांपर्यंत पोचले आहे. वास्तुशास्त्र व वैदिक गणितांसारख्या शाखांना शासकीय मदत मिळते आहे. रक्षामंत्रालय प्राचीन ग्रंथांमधील ‘जादुई’ क्षमता आपल्या अस्त्रशस्त्रांना देऊ पाहत आहे. आरोग्य मंत्रालय गोमूत्रावर संशोधन करत आहे ज्याने ‘एड्स’पासून ‘क्षया पर्यंत बरेच काही ‘दुरुस्त’ होते. मंत्रतंत्राने कायकाय सुधारता येईल ते पाहायला सरकारी व खाजगी धन ओतले जात आहे. चमत्कार, अंधश्रद्धा, सान्यांना महत्त्वाच्या व्यक्तींकडून, अगदी खासदारांकडूनही प्रतिष्ठा पुरवली जात आहे.
‘वेद म्हणजेच विज्ञान’ ह्या कल्पनेला दोन प्रकारे पुष्टी देण्यात येते. एक मार्ग म्हणजे सर्व वेद-वाङ्य आधुनिक विज्ञानाशी जुळत जाते आहे अशी घोषणा करणे.. दुसरा मार्ग म्हणजे वास्तुशास्त्र, फलज्योतिष्य, आयुर्वेद, ध्यानधारणा, अशी सगळी शास्त्रे वैदिक विचारधारेनुसार, पॅराडाईमनुसार वैज्ञानिक आहेत, असे मानणे.
पहिली वाट समरूपता, एकरूपता शोधत जाते जसे, गुणसिद्धान्त आणि परमाणूंचे विद्युद्भार. इथे वेगवेगळ्या संस्कृतींची विज्ञाने वेगवेगळी असतात, असा ‘सांस्कृतिक सापेक्षतावाद’ नाही. इथे फक्त प्रचलित वैज्ञानिक तत्त्वे आणि हिंदुधर्मातल्या कल्पना ‘एकसारख्या’ किंवा ‘एकाच अर्थाच्या’ आहेत, आणि म्हणून धर्माधारित कल्पना आधुनिक आणि विवेकनिष्ठ आहेत, असे ठासून सांगितले जाते.
दुसरी वाट जास्त मूलभूत पातळीवर वेगळी आहे. इथे ‘साक्षात्कारांतून मिळालेले ज्ञान’ अद्वैती वेदान्ती हिंदुमताप्रमाणे वैज्ञानिक आहे, असा सापेक्षी दावा असतो. आधुनिक विज्ञान ख्रिश्चन ज्यू-इस्लामी अशा ‘सेमिटिक’ धर्मांच्या घटकवादी (रिडक्शनिस्ट) मतांमधून येते, तर हिंदुविज्ञान अद्वैताच्या साकल्यवादी (होलिस्टिक) वृत्तीतून येते. पण दोन्ही सारखीच विवेकी आहेत अशी मांडणी केली जाते. ह्यायोगे पहिला (समरूपतेचा मार्गही वैध ठरवला जातो. आणि वैदिक विज्ञानासारखी ‘पर्यायी विज्ञाने’ ही वैध ठरवली जातात.
मी आधुनिकोत्तर आणि सामाजिक रचनावादी (postmodern and social constructivist) मतमांडण्या या हिंदुत्ववादी मांडण्यांना कसा आधार पुरवतात, ते दाखवू इच्छिते. पण आधी माझा ‘आधुनिकोत्तर’ चा अर्थ पाहायला हवा.
आधुनिकोत्तरवाद हा एक कल आहे, एक वृत्ती आहे. तिचे मुख्य लक्षण म्हणजे आधुनिकतेच्या गाभ्याशी जो प्रबोधनाचा, ‘एन्लायटनमेंट’चा विचार आहे, त्याला विरोध असणे. दोन्ही ‘वादां’ची सरळसोट वर्णने अशक्य आहेत. पण ढोबळपणे प्रबोधनवादाचे वर्णन असे करता येईल सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये वैज्ञानिक क्रांतीनंतर अंधश्रद्धा, पारंपरिक बाबावाक्ये, धर्म, आदींना चिकित्सक विवेकाने विरोध करणे म्हणजे प्रबोधनवाद. आधुनिक विज्ञानाची वाढ हे याचे मुख्य उदाहरण. सेक्युलर वैज्ञानिक ज्ञानाने माणसांची स्थिती सुधारता येईल, या आशेवर प्रबोधनाचा भर होता. आणि माणसाची स्थिती’ यात केवळ भौतिक विचार नव्हता, तर सोबत नैतिक आणि सांस्कृतिक विचारही होता. जरी या वादाचा किंवा ‘चळवळी’चा मुख्य जोर युरोप-अमेरिकेत असला तरी भारत, चीन, जपान, दक्षिण अमेरिका, इजिप्त व पश्चिम आशियातही प्रबोधनवादी प्रभाव होत होता. पण या (अमेरिका-युरोप वगळता) प्रदेशांत वसाहतवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाने प्रबोधनाला निष्प्रभ केले.
आधुनिकोत्तर लोकांचा या विज्ञानाधारित ‘विजययात्रे’वर विश्वास नाही. अज्ञान दूर होऊन जगाची स्थिती सुधारेल, याबद्दल ते निराशच नव्हे तर वैफल्यग्रस्त आहेत. या वैफल्याच्या भावनेतून ते सर्वांना, सगळीकडे मान्य होईल अशी ‘वैश्विक सत्ये’ असल्याचेच नाकारतात. प्रबोधनवाद्यांची सत्याकडे वाटचालीची ‘महाकथा’ नाकारून आधुनिकोत्तर विचार स्थानिक परंपरांवर विश्वास टाकतात. या स्थानिक परंपरा विवेकावरच विश्वास न टाकता ‘पावित्र्य’, यंत्रे व उपकरणविरोधी आणि थेट अविवेकी विचारांनाही सामावून घेत असतात याचे आधुनिकोत्तरांना वावडे नाही.
आधुनिकोत्तरवादाला पूरक असा सामाजिक रचनावाद विज्ञानावरील अविश्वासाला दुजोरा देतो. यात इंग्लंड व फ्रान्समधील अनेक (जराजरासे वेगळे) विचारप्रवाह आहेत. सर्वांच्याच मतानुसार आधुनिक विज्ञान कोणत्याही वस्तुनिष्ठ सत्याकडे सरकत नसते. ते निसर्गाकडे एका विशिष्ट संस्कृतिबद्ध तऱ्हेने पाहते – पण अशा इतरही अनेक तन्हा आहेत, व त्यांच्यात डावेउजवे करता येत नाही… विज्ञानाचा कार्यक्रमच नव्हे, तर प्रत्यक्ष ‘ज्ञानसाठा’ ही मुख्यतः पाश्चात्त्य समाजाने ‘रचलेला’ आहे, आणि तो फक्त प्रस्थापित पाश्चात्त्य हेतूंना व सांस्कृतिक कलांना प्रतिबिंबित करतो.
हाच युक्तिवाद वापरत आशिष नंदी व वंदना शिवांसारखे नवगांधीवादी ‘स्थानिक विज्ञाना’चा पुरस्कार करतात. हे विज्ञान भारतीय संस्कृतीशी जुळते असायला हवे. रजनी कोठारी, वीणा दास, क्लॉड आल्वारेज, शिव विश्वनाथन, या मान्यवरांनीही या विचारप्रवाहात स्वतःला झोकले आहे. ‘स्वदेशी (देशभक्त) विज्ञान’, पर्यावरणवादी व स्त्रीवादी चळवळींमध्येही या विचारधारेचे अनेक लोक आहेत. इतरही विचारधारांचे (Post- colonialism व subaltern studies) पार्थ चतर्जी, गायत्री स्पिव्हाक, होमी भाभा, दीपेश चक्रवर्ती वगैरे लोकही विवेकवादी व सेक्युलर विचारप्रणालींऐवजी ‘स्थानिक ज्ञानाचा पुरस्कार करतात. या साऱ्या विचारधारा सामाजिक न्याय, पर्यावरणाचे संरक्षण, स्त्रीहक्कांची जपणूक, अशा परंपरेने ‘डाव्या’ विचारांच्या चळवळींशी निगडित आहेत.
आधुनिकोत्तरांचा व सामाजिक रचनावाद्यांचा विज्ञानविरोध सर्व धर्माच्या पुरस्कर्त्यांना आवडतो, कारण यामुळे त्यांना वैज्ञानिक शोधांमुळे निसर्गाबद्दलच्या आपल्या (धार्मिक) धारणा बदलण्यातून मुक्ती मिळते.
त्यातही आधुनिकोत्तरांच्या सांस्कृतिक सापेक्षतावादाशी व साकल्यवादी भूमिकांशी हिंदुत्ववाद्यांचा सूर विशेषत्वाने जुळतो. या लेखात मी आधुनिकोत्तरांची ‘संकर-तत्त्वा’ची संकल्पना आणि पर्यायी विज्ञानाची संकल्पना या दोहोंचा तपास करणार आहे. (अपूर्ण)
[काही दिवसांपूर्वी एका स्नेह्याने एक गठ्ठा साताठ जणांतर्फे वर्गणी भरली – पण सोबतच प्रश्न केला की विवेकवादासारख्या ‘कालबाह्य’ विचारधारेवर ‘आजचा सुधारक’ का बेतला गेला आहे! ही स्नेही उदारमतांची, डाव्या विचारांची पुरस्कर्ती होती. तिच्या ‘निष्ठा’ आमच्या निष्ठांशी जुळल्या होत्या. पण ती ‘ताज्या’ विचारधारांचा अभ्यास करणारी व त्यांच्यातील फॅशनेबल /अ-फॅशनेबल फरक नोंदणारी होती.
आमचा विवेकवाद ‘फॅशनेबल’ नाही हे नव्याने जाणवून जरा वाईट वाटले पण ‘फॅशनी’ बदलतील, आणि तरीही माणसांची स्थिती (भौतिक, नैतिक, सांस्कृतिक (म्हणजे नेमके काय ?)) सुधारायला विवेकवादच उपयोगी पडेल, या ठाम धारणेतून काही मांडणी करावी अशी तीव्र इच्छा झाली. या इच्छेची काहीशी पूर्ती करणारा मीरा नंदा यांचा दोन भागांतील लेख फ्रंटलाईन’ ने 2 आणि 16 जानेवारी 2004 ला छापला. योगायोगाने याच काळात आजचा सुधारक’ चा विज्ञान विशेषांकही प्रकाशित झाला.
मीरा नंदांच्या रटगर्स (Rutgers) विद्यापीठातील (अमेरिका) संशोधनावरचे प्रॉफेट्स फेसिंग अॅक्स : पोस्टमॉडर्न क्रिटीक्स ऑफ सायन्स अँड हिंदू नॅशनॅलिझम’ हे पुस्तक लवकरच भारतात प्रकाशित होणार आहे. पण त्यांचा ‘फ्रंटलाइन’ मधील लेख आजच आपल्यापुढे ठेवत आहोत. – सं.]