जगात गरीब असतात, हे आपल्याला माहीत असतं. भारतासारख्या गरीब, शेतीप्रधान देशातले गरीब म्हणजे फारच गरीब असतील; आपल्याला कळतही असतं. पण त्यांच्या जगण्याकडे आपण कधी निरखून पाहात नाही. पर्यटनाच्या वा इतर निमित्ताने हिंडताना कधी असे गरीब लोक दिसले, तर आपण त्या दर्शनाचा क्षणभर चटका लावून घेतो आणि आपल्या मार्गाला लागतो. तळागाळातल्या लोकांची जाणीव आपल्यासाठी एक ‘घटना’ असते. त्या घटनेवर हळूहळू इतर घटनांचे ठसे उमटत जातात आणि गरिबीच्या दर्शनाचा ठसा पुसट होत जातो. त्याची आठवण तेवढी उरते. त्या आठवणीला जर आपण स्वतःला संवेदनाशील म्हणवून घेत असलो, तर आपण मनाच्या कोपऱ्यात नीट जपतो. तिला आपल्या सामाजिक जाणिवेचं, आपल्या समग्रतेच्या भानाचं प्रतीक बनवतो.
पण आपल्याला आठवणीची आठवण हवी असते. मूळ अनुभूती नको असते.
[पी. साईनाथ यांच्या एव्हरीबडी लव्हज् ए गुड ड्राऊट या पुस्तकाचे हेमंत कर्णिक यांनी दुष्काळ आवडे सर्वांना! या नावाने भाषांतर केले (अक्षर प्रकाशन मार्च 2003). त्यातील अनुवादकाच्या मनोगतातील हे निरीक्षण.]