भ. पां. पाटणकर, 3-4-208, काचीगुडा, हैदराबाद – 500007
तुम्ही मांगे मला लिहिलेल्या दोन पत्रात दोन सूचना केल्या होत्या. एक म्हणजे विधायक लिहावे व दुसरे म्हणजे त्रोटक लिहावे.
जून 2004 च्या अंकातील ‘उलटे नियोजन’ हा लेख मला काही विधायक वाटला नाही. काय करायला हवे याचे काहीच विवेचन त्यात नाही. धरणे बांधायलाच नको होती का? त्यातले पाणी पिण्यासाठी वापरायला ‘नाही’ म्हणायला पाहिजे होते का? पाऊस तरी प्रशासनाच्या हाती नाही म्हणून देवाचे आभार मानून आपण आपले कार्य केल्याचे समाधान मानायचे?
जुमडे, ठकार, जोशी यांनी जे लिहिले आहे त्यात त्रोटकपणाही नाही आणि एखाद्या नेमक्या मुद्द्याचे प्रवाही विवेचनही नाही. एकमेकांची सुटी वाक्ये काढून त्यांनी त्यावर टिप्पण्या केल्या आहेत. अशा टिप्पण्यांतून वाचकांना काही खास मिळत असेल असे मला वाटत नाही हे माझे व्यक्तिगत मत. आ. सुच्या वाचकांची मते मी कशी चाचपणार? त्यांना अशा टिप्पण्या चांगल्या वाटत असतील तर ठीक आहे.
“मूल्ये, भावना इत्यादींसाठी तात्त्विक आधार विज्ञानातून मिळत नाही अशी पाटणकरांची (अनेकांप्रमाणे असलेली) समजूत ही विज्ञानाकडे संकुचित दृष्टीने पाहिल्याने निर्माण होते” असे ठकार म्हणतात, हा संकुचितपणाचा दोष आ. सु.नेच स्वतःकडे घ्यायला पाहिजे कारण आ.सु.च्या विज्ञानविशेषांकात मूल्ये आणि भावना यांना विज्ञानाचा काही आधार दाखवलेला नाही. ठकार यांच्या त्या अंकातील लेखात ‘आध्यात्मिक सत्या’ विषयी चर्चा आहे. मीही संतांनी वर्णिलेले ‘आध्यात्मिक सत्य’ मानत नाही. पण आपण सर्वच लोक काही भावनांचे अस्तित्व मानतो, काही मूल्यांचे फक्त मनात असलेले अस्तित्व मानतो.
आ. सु.ने हे दोन विषय ‘विज्ञानविशेषांकात घेतले नाहीत हा कशाचा पुरावा आहे? की विज्ञान हे फक्त स्वतः सिद्ध सत्याचा शोध घेत असते. आपल्या मनाच्याबाहेर ज्यांना अस्तित्व नाही त्या भावना, ती मूल्ये यांचा स्रोत कुठे आहे याचा शोध ‘विज्ञान’ घेत नाही. हेच आ.सु.चा ‘विज्ञानविशेषांक’ मौनातून सांगतो.
[ शेवटचा परिच्छेद मान्य विज्ञानाच्या मर्यादा विशेषांकाच्या व्याप्तीतून गाळल्या, त्या याचमुळे. परंतु कानाने दिसत नाही, डोळ्याने ऐकू येत नाही हे ठसवल्याने काय सिद्ध होईल? आपल्या मनात इतर कोणत्या ज्ञान कमावण्याच्या मार्गाने मूल्य व भावना यांचे ज्ञान होत असल्यास कळवावे. परंतु हे ज्ञान मात्र विज्ञानाला बाह्य जगाचे ज्ञान जितपत खात्रीलायकपणे व सार्वत्रिकपणे होते तितपत पातळी गाठणारे हवे. विज्ञानाच्या मर्यादा विशेषांकातून गाळून वाचकांचे नुकसान झालेले नाही, कारण आपण त्या वारंवार दाखवून देत आहातच. आमचे मौन या दृष्टीने त्रासदायक ठरलेले नाही.सं.]
राजीव जोशी, ‘तत्त्वबोध, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड- 410101
कामगारांचे आरोग्य व शिक्षण याबाबत चर्चा करण्यासाठी दि. 04 मे 2004 रोजी कल्याण-अंबरनाथ उद्योजक संघटनेच्या एका बैठकीत निमंत्रित म्हणून हजर होतो. त्यावेळी विविध कंपन्यांच्या मॅनेजर्सची इतर प्रश्नांवरील मते ऐकावयास मिळाली. मानव संसाधन विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दोन परदेशी प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. येथील मॅनेजर्सनी परदेशी प्रतिनिधींना सुनावले की, Hire and Fire ही अमेरिकन पद्धती घातक आहे, कंपन्यांनी कामगारांना कुटुंबाचा एक घटक म्हणून वागविले पाहिजे. Job security दिली पाहिजे, इत्यादी. Job security देऊन कामे कशी करून घ्यावयाची हा मॅनेजमेंटच्या कौशल्याचा भाग आहे. असा अनुभव मला इतर चर्चांमध्येसुद्धा आला आहे. किलोस्कर प्रभृतींचा अनुभव असाच आहे.
मध्यमवर्गीयांकडे उदारमतवादी दृष्टिकोन असू शकतो. ज्यावेळी या मताचा पगडा मोठ्या गटावर असतो त्यावेळी त्याचा परिणाम सर्व समाजजीवनावर होतो. यामध्ये मतदानाचा कल याचासुद्धा अंतर्भाव असतो. राममंदिर आदि प्रश्नावर बरेच ‘विचारवंत’ इतके बहकले होते की, गुजरातेमधील नरसंहाराबाबत हे बुद्धिमंत संवेदनाहीन होते. समाजातील विद्वेष वाढविण्याचे प्रयत्न झाले. ‘मी नथुराम बोलतोय’ या नाटकाला मिळालेल्या (बुद्धिमंतांच्या) प्रतिसादावरून समाजात भिनलेल्या विषाच्या प्रमाणाची कल्पना दिसून येते. याचे कुमार केतकर यांनी विश्लेषण केले आहे. (लोकसत्ता दि. 17 मे 2004) नरसंहारानंतर गुजरातमध्ये भरघोस यश मिळविणाऱ्या भाजपची अल्प कालावधीत केवळ गुजरातच नव्हे तर सर्व भारतभर इतकेच नव्हे तर दिल्ली, मुंबई सारख्या महानगरात पीछेहाट झाली. सुप्रीम कोटनि दिलेली चपराक इ. कारणे असतील.
कार्ल मार्क्सच्या मते “Thought is a material force if it grapples masses.” विचार समाजात का आणि कसे बळावतात? अंधश्रद्धा, असहिष्णुता यांची का वाढ झाली? चंगळवाद आणि अंधश्रद्धा, असहिष्णुता यांच्यात काही एक परस्पर संबंध आहे काय? सेवाक्षेत्र आणि इतर क्षेत्रातील सहजची कमाई आणि चंगळवाद यांच्यात काही एक परस्परसंबंध आहे काय? जगत् सुंदरी, विश्व सुंदरी आणि तत्सम झगमगत्या प्रतिमांना अफाट प्रसिद्धी देण्यामागे चंगळवाद वाढविण्याचे षडयंत्र होते काय? एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात शास्त्रज्ञ आणि इतर विचारवंत यांना जग आमूलाग्र बदलण्याची इच्छा आकांक्षा होत्या आणि अंधश्रद्धा, असहिष्णुता यांच्याविरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली. न्यूटनीय भौतिकीच्या आशा आणि अनिश्चिततेच्या तत्त्वामुळे नैराश्य यामुळे समाजाच्या सार्वत्रिक मानसिकतेवर परिणाम होतो काय? या आणि इतर अनेक प्रश्नांची समाजशास्त्रीय चिकित्सा आवश्यक आहे. अंधश्रद्धा, असहिष्णुता यांच्या प्रभावाखालील समाज उपयोजित विज्ञानाला, उपयोजित विवेकवादाला विरोध करेल. कदाचित या चिकित्सेसाठी पुरेशी साधने नसतीलही, परंतु विचार निर्मिती, वर्धन यांचा (उपयोजित तसेच मूलभूत तार्किक) विवेकवादी चळवळीवर फार मोठा परिणाम असल्यामुळे या चर्चेसाठी वाचक आणि इतर विचारवंत, कार्यकर्ते यांना ‘आजच्या सुधारक’ ने वेळोवेळी आवाहन करून पाठपुरावा करावा, तसेच द्विरुक्तिचा धोका पत्करून उपयोजित तसेच मूलभूत / तार्किक विवेकवादी विचारांना पुन्हः पुन्हा प्रसिद्धी द्यावी.
वाचकांच्या मेळाव्याचे स्वरूप व्यापक असावे, दोघांमधील वादाचे स्वरूप बैठीकीला येऊ नये यासाठी अधिक भाष्य करण्याचे मी दि. 01 मे 2004 रोजी निग्रहाने टाळले. परंतु तो चर्चा पुढे चालू रहावी यासाठी हा पत्रप्रपंच.
[1) आम्ही प्रत्येक वाचक हा लेखकही होऊ शकतो, असे समजतो. हे वारंवार सांगितले गेले आहे, आणि जोशींना तर तसे पत्रही टाकले होते. अग्रक्रमांबद्दल दृष्टिकोनातले बारीकसारीक फरक वगळत जोशींच्या सूचना मान्यच आहेत व त्यांनी त्यांना आवडेल त्यावर लिहिले तर स्वागतच आहे.
2) शेवटच्या परिच्छेदाआधी जोशी दोन जुन्या वादांबाबत लिहितात. संपादनातील निर्णयांचे स्पष्टीकरण दिले जाणार नाही, हे वाचक मेळाव्यात जाहीर केले होते. त्या निर्णयावर मी अजूनही ठाम आहे. संपादक (नंदा खरे )]