[पॉलेमिक’ या नियतकालिकाच्या पहिल्याच अंकासाठी (ऑक्टोबर 1945) जॉर्ज ऑवेलने मे 1945 मध्ये ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम’ हा लेख लिहिला. जॉर्ज ऑर्वेलचे मूळ नाव एरिक ब्लेअर, (1992-1950). त्याने आयुष्यात नाझीवाद आणि स्टालिनची कम्यूनिझम अशा दोन सर्वाधिकारशाही (Totalitarian) राज्यव्यवस्था पाहिल्या. त्याने भारतीय पोलिस सेवेचा अधिकारी म्हणून ब्रह्मदेशात साम्राज्यशाहीही जवळून पाहिली. आज त्याची प्रतिमा सर्वाधिकारशाहीचा कट्टर विरोधक अशी आहे. त्याच्या ‘अॅनिमल फार्म’ आणि ‘नाइन्टीन एटीफोर’ या कादंबऱ्या आजही जगभर वाचल्या जातात. त्याचे सखोल विश्लेषक त्याला ‘पंचायत राज’ सारख्या विकेंद्रित राज्यव्यवस्थेचा पुरस्कर्ता मानतात. ‘सोशल अॅनाकिंझम’ सामाजिक अराजकवाद, या काहीशा दिशाभूल करणाऱ्या नावाने ही विचारप्रणाली ओळखली जाते व कधीकधी ‘सामाजिक’ हे पद गाळलेही जाते!
त्याचा ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम’ हा लेख आजच्या भारतीय स्थितीत महत्त्वाचा वाटतो. मुळात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इंग्रज बुद्धिजीवी-विचारवंत वर्गाचे पूर्वग्रह दाखवणारा हा लेख जे ‘गुणधर्म’ नोंदतो, ते आजच्या भारतीय स्थितीत अनेकानेक वर्गांना लागू पडतात. ब्राह्मण्यवादी / मनुवादी ब्राह्मणेतरवादी/दलितवादी, हिंदुत्ववादी, इस्लामवादी, विज्ञानवादी, अध्यात्मवादी, स्त्रीवादी, पितृसत्तावादी, स्थितिवादी, परिवर्तनवादी, गांधीवादी, लोहियावादी सर्व सर्व विचारधारांच्या पाईकांमध्ये ‘नॅशनॅलिझम’ चे दोष आढळतात. खरे तर जागोजागी कंसांमध्ये समांतर भारतीय उदाहरणे देण्याचा मोह होतो!
लेखाच्या शेवटचा भाग अनिवार्य भावविवशतेवर विवेकाने मात कशी करावी हे दाखवतो.
हे संक्षिप्त भाषांतर करताना आधुनिकीकरणाचा आणि भारतीयीकरणाचा मोह टाळला आहे. काही आज असंबद्ध ठरलेले संदर्भ व उदाहरणेही टाळली आहे. पण मूळ युक्तिवादाची ‘चव’ देण्याइतके संदर्भ व उदाहरणे राखलीही आहेत. – संपादक]
बायरन एके ठिकाणी long eueur हा फ्रेंच शब्द वापरतो आणि सोबतच नोंदतो की इंग्रजीत तो शब्द नाही, पण इंग्लंडात तो भाव मात्र भरपूर प्रमाणात आहे. अशीच आपल्या सर्व विषयांबाबतच्या विचारांवर परिणाम करणारी एक सवय आपल्याला असते, पण तिला आपण अजून नाव दिलेले नाही. मी नजीकच्या अर्थाचा म्हणून त्या सवयीसाठी ‘नॅशनॅलिझम’ हा शब्द वापरणार आहे, पण त्याच्या नेहमीच्या अर्थापेक्षा हा वापर वेगळ्या अर्थाने करणार आहे. ही एखाद्या विशिष्ट भूक्षेत्राशी किंवा समूहाशी निगडित भावना नाही. ती सहजपणे एखाद्या पंथाच्या चर्चला किंवा वर्गालाही चिकटू शकते. कधीकधी तर कोणत्याच बाबतीत निष्ठा न जागवता ती कशाच्या तरी विरोधातही असू शकते.
माणसांना कीटकांसारखे एखाद्या वर्गीकरणात बसवता येते; लक्षावधी, कोट्यावधी माणसांना सरसहा चांगले-वाईट लेबल लावता येते; स्वतः च्या निष्ठा एखाद्या राष्ट्राशी किंवा इतर कोण्या घटकाशी जोडून मग भल्याबुऱ्याचा विचार न करता त्या ‘निष्ठास्थळा’च्या महत्त्व संवर्धनासाठीच आपण योजले गेले आहोत असे मानता येते; या मानसिक सवयींना मी नॅशनॅलिझम म्हणतो. नॅशनॅलिझमची देशभक्तीशी गल्लत करू नये. या दोन कल्पना इतक्या सैलपणे वापरल्या जातात की कोणतीही व्याख्या चुकीची ठरवता येते. पण या कल्पनांमध्ये फरक करायलाच हवा, कारण त्या कधीकधी एकमेकांविरुद्ध भावभावनांनाही जन्म देतात. एखादे भौगोलिक क्षेत्र किंवा एखादी जीवनपद्धती सर्वोत्कृष्ट आहे असे मानूनही इतरांना त्या क्षेत्राखाली आणण्याची किंवा इतरांवर ती जीवनपद्धती लादण्याची इच्छा नसणे, ही झाली देशभक्ती, सांस्कृतिक किंवा सैनिकी दृष्टीने ही बचावात्मक भावना आहे. नॅशनलिझमला मात्र सत्तेच्या आकांक्षेपासून वेगळे काढता येत नाही. प्रत्येक नॅशनॅलिस्ट आपल्या निष्ठास्थळाशी समर्पित भावाने जोडलेला असतो. त्या निष्ठास्थळाचे महत्त्व वाढवणे आणि प्रसार करणे यातच त्याच्या जीवनाचा हेतू असतो.
जेव्हा हा शब्द जर्मनी – जपानसारख्या देशांतील बदनाम चळवळींना लावला जातो तेव्हा हे सारे उघड असते. नाझीवादासारख्या प्रकाराबद्दल आपण ‘बाहेरचे’ लोक साधारणपणे सारख्याच गोष्टी पाहून एकसारखीच मते घडवतो. पण मी नॅशनॅलिझम हा शब्द एका वेगळ्या, विस्तारित अर्थाने वापरतो, त्यात कम्युनिझम, राजकीय कॅथलिसिझम, झिअनिझम (ज्यू बाद), अँटिसेमिटिझम (ज्यू-द्वेष), ट्रॉट्स्कीइझम, युद्धविरोधवाद, हे सारेच बसते. त्यात एखाद्या सरकाराला किंवा देशाला-विशेषतः स्वतःच्या देशाला-निष्ठा वाहिल्या जात नाहीत. कधीकधी तर ज्याला निष्ठा वाहिली जाते तो घटकच अस्तित्वात नसतो जसे, ज्यूअरी, इस्लाम, ख्रिश्चनडम, प्रोलेटारियट (कामगारवर्ग), श्वेत वंश, या कल्पना पहा. त्या तीव्र भावना जागवतात, पण मुळात तसे काही आहे यावरच गंभीर प्रश्नचिन्हे आहेत. त्यांच्या सर्वमान्य व्याख्याही नाहीत..
हेही जाणायला हवे की नॅशनॅलिझम ही वृत्ती फक्त कशाच्या तरी विरोधातही असू शकते. जसे, ट्रॉट्स्कीवादी कशाच्याही पक्षाचे नसून फक्त सोव्हिएत रशियाविरोधी असतात. नॅशनॅलिझमचा माझा वापर समजायला हे अंग समजून घेणे आवश्यक आहे. नॅशनॅलिस्ट फक्त स्पर्धात्मक विचार करतात, कशाचा तरी किंवा कशाच्या विरोधाचा तरी. आपल्या निष्ठास्थळाच्या स्तुतीसाठी किंवा आपल्या द्वेषस्थळाच्या हानीसाठी ते आपली मानसिक क्षमता वापरतात. त्याचे विचार नेहमी जय, पराजय, मान, मानहानी यांभोवतीच फिरतात. त्यांना इतिहास, विशेषतः समकालीन इतिहास, वेगवेगळ्या शक्तिस्रोतांच्या चढउतारांमधूनच दिसतो. जगातली प्रत्येक घटना आपल्या निष्ठास्थळ / द्वेषस्थळाला पूरक मारक रूपातच दिसते. पण नॅशनॅलिझम ही केवळ यशाची पूजा नव्हे तसे असते तर नॅशनॅलिस्ट नेहमी सरशीच्या पक्षाकडे धावला असता. नॅशनलिस्ट आपली निष्ठा कशाला तरी अर्पण करतो, आणि मग आपल्या निष्ठास्थळाला यश मिळते आहे, त्याचे महत्त्व वाढते आहे, असे स्वतःला पटवून देतो- भलेही वास्तव काहीही असो, स्वतःची फसवणूक, धादांत खोटेपणा करतानाही स्वतःचा पक्ष ‘सत्या’चा असण्याची खात्री ही नॅशनॅलिझमची आवश्यक अंगे आहेत.
ही लंबी चौडी ‘व्याख्या’ पाहिल्यावर नॅशनॅलिस्ट वृत्ती ब्रिटिश विचारवंतांमध्ये विस्तृत प्रमाणात आढळते, हे बहुतेकांना पटेल आणि हेही पटेल की सामान्यजनांपेक्षा विचारवंतांमध्ये ही वृत्ती प्रमाणाने जास्त असते. अनेक विषयांशी मानापमानाच्या भावना इतक्या एकजीव झाल्या आहेत की त्यांच्याबाबत विवेकाचा वापर करणे अशक्यप्राय झाल आहे, हे गांभीर्याने राजकीय विचार करणाऱ्यांना जाणवेल.
जसे, जर्मनीला हरवण्यात अमेरिका, इंग्लंड आणि रशिया यांपैकी कोणाचा वाटा सर्वात महत्त्वाचा होता? तत्त्वतः या प्रश्नाचे विवेकीच नव्हे तर ठाम उत्तरही देणे शक्य असावे. प्रत्यक्षात मात्र प्रत्येकजण स्पर्धात्मक विचार करून आधी उत्तर निवडून मगच पुरावे शोधेल आणि हिशोब करणे अशक्य होईल. आणि या प्रश्नाशी निगडित प्रश्नांच्या लडीच्या लडी आहेत. खरे उत्तर हवे असेल, तर या प्रश्नात रस नसलेली व्यक्ती गाठावी लागेल, आणि त्यामुळे उत्तराला महत्त्वच उरणार नाही. आपल्या काळात युद्धाबाबतच्या आणि राजकीय भाकितांचा इतिहास ‘वाईट’ आहे, याचेही कारण हेच. आपल्या तज्ज्ञांपैकी कोणालाही 1939 सालचा रशिया-जर्मनी करार ‘दिसला नाही. पीटर ड्रकरला रशिया आणि जर्मनीचे एकीकरण होताना दिसले, तर मार्क्सिस्टादी डाव्यांना कराराची चाहूलही लागली नाही. जेव्हा करार जाहीर झाला तेव्हा त्यावर वेगवेगळी मते दिली गेली आणि ती सगळी ताबडतोब खोटीही ठरली. प्रत्येक मत संभाव्य काय याचा विचार न करता रशियाला बरेवाईट ठरवण्यासाठीच घडवलेले होते. पण राजकीय आणि सैनिकी भविष्यवेत्ते कुडबुड्या ज्योतिष्यांप्रमाणे कोणतीही चूक ‘पचवू शकतात, कारण त्यांच्या अनुयायांना तथ्यांचे विश्लेषण नको असते तर फक्त नॅशनॅलिस्ट निष्ठा गोंजारून, संचलित करून हव्या असतात.
साहित्यिक आणि सौंदर्यशास्त्रीय मतांमध्येही अशाच विकृति दिसतात. एखाद्या भारतीय राष्ट्रवाद्याला किप्लिंग आवडणे किंवा हुजूर पक्षाच्या माणसाला मायाकोव्हस्कीच्या कविता आवडणे अशक्यच होऊन बसते. ज्या कृतीमागच्या प्रवृत्ती आपल्याला आवडत नाहीत त्या कलाकृती म्हणून निकृष्ट ठरवल्या जातात. कर्मठ नॅशनॅलिस्टाला ही हातचलाखी करताना स्वतःचा खोटारडेपणा जाणवतही नाही.
संख्येचा विचार केला तर इंग्लंडात पारंपरिक जिंगोइझम (साम्राज्यवादाचे बटबटीत ब्रिटिश रूप) हा नॅशनॅलिझमचा सर्वात प्रभावी अविष्कार आहे. अनेकांना हा प्रकार गेल्या डझनभर वर्षांत वाढल्याचे जाणवते पण हा सामान्यांचा भाव आहे. माझा रोख विचारवंतांवर आहे, आणि त्यांच्यात जिंगोइझम तर सोडा, देशभक्तीही संपलेली आहे. कुठेकुठे नव्या रूपात तिचे पुनरुत्थान दिसतेही, पण नगण्य विचारवंतांच्या नॅशनॅलिझमचे मुख्य रूप म्हणजे कम्यूनिझम- पण व्याख्या ऐसपैस आहे, पार्टीही त्यात येते, सहप्रवासीही येतात आणि रशियाप्रेमीही. रशियाला ‘पितृभू’ मानणारे, रशियाच्या सर्व कृतींचे समर्थन करणारे आणि रशियाचे हेतू सफल व्हावे यासाठी झटणारे, या साऱ्यांना इथे कम्यूनिस्ट मानले आहे. हा गट प्रभावी आहे, पण इतर छटांच्या नॅशनॅलिझम्सही आहेत. त्यांच्यात फरकांचे मुद्दे आहेत, पण साम्यस्थळे नोंदण्यातून हा प्रकार समजणे सोपे जाते.
आज जे स्थान कम्यूनिझमचे आहे ते दहावीस वर्षांपूर्वी राजकीय कॅथलिसिझमचे होते. [ यानंतर जी. के. चेस्टर्टनच्या कॅथलिकधार्जिणेपणाची, फ्रेंच, इटली, स्पेन, पोर्तुगाल या लॅटिन देशांवरील निष्ठेची बरीच चर्चा ऑर्वेल करतो.सं.] वास्तवाचे आकलन, साहित्यिक रुची, अगदी नैतिक मूल्यांबाबतही चेस्टटनच्या धारणा त्याच्या नॅशनॅलिस्ट निष्ठांमुळे कोलमडतात.
राजकीय कॅथलसिझम आणि कम्युनिझममधली साम्ये उघड आहेत, पण स्कॉटिश राष्ट्रवाद, झिअनिझम, अँटिसेमिटिझम, ट्रॉट्स्कीवाद, साऱ्यांमध्ये हेच गुणधर्म आढळतात. सगळ्या नॅशनॅलिझम्स एकसारख्या आणि एकाच मनोधारणेच्या असतात. असे म्हणणे अतिसुलभीकरणाचे होईल, पण काही बाबी सार्वत्रिक असतात.
ऑब्सेशन (पछाडल्यासारख्या अनिवार्यतेने सतत एखादी क्रिया किंवा विचार करणे):
कोणताही नॅशनॅलिस्ट आपले निष्ठास्थळ सोडून व त्याचे इतर निष्ठास्थळांवरचे वर्चस्व सोडून कशावरही विचार, लेखन व भाषण करत नाही. आपली निष्ठा लपवणे त्यांना अशक्यप्राय वाटण्याइतके कठिण जाते. आपल्या निष्ठास्थळाचा पुसटसाही अवमान, किंवा स्पर्धक निष्ठास्थळांची जराशीही भलामण त्यांना असह्य वाटते. अशावेळी काहीतरी तीव्र उत्तर देणे त्याला आवश्यक वाटते. जर निष्ठास्थळ एखादा देश असेल (भारत, आयर्लंड) तर नॅशनॅलिस्टाचा दावा असतो की राजकीय व सैनिकी बळातच नव्हे, तर कला, साहित्य, क्रीडा, भाषेची संरचना, निवाशांचे सौंदर्य, हवामान, निसर्गसौंदर्य, पाककला वगैरे बाबतीतही त्याचे निष्ठास्थळ इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. मग ध्वजांच्या उंच्या, वृत्तपत्री मथळ्यांचे तुलनात्मक आकार, नावे घेतली जाण्याचा क्रम अशा साऱ्यांबद्दल नॅशनॅलिस्ट हळवा होतो. नामकरणाला अपार महत्त्व देतो. झगडून स्वातंत्र्य मिळवलेले देश बहुधा आपले नाव बदलतात. कधीकधी तर एकापेक्षा जास्त नावे वापरली जातात आणि प्रत्येकाशी वेगवेगळ्या भावना निगडित असतात. ‘देशभक्त’, ‘निष्ठावंत’ अशी नावे तर स्वभावतःच भावनिक असतात, पण त्यांच्याबद्दल दोन पक्षांचे कधीच एकमत नसते. नॅशनॅलिस्टांना स्वभाषेचा प्रसार आणि परभाषांचा संकोच यात नेहमीच रस असतो-इंग्लंडात हे बोलीभाषांबाबतच्या गर्वातून दिसते.. इंग्रजद्वेष्टे अरिकन आवर्जून इंग्रजी मुळांचे वाक्प्रचार टाळतात. शब्दांचे लॅटिनीकरण किंवा जर्मनीकरणही नॅशनॅलिझमनुसार बदलते. स्कॉटिश लोक ‘लोलंड’ बोलीचे अभिमानी असतात आणि समाजवाद्यांना बीबीसीची उच्चारणशैली चिडीस आणते. ‘शत्रू’ च्या प्रतिमांचे दहन, जत्रेतल्या नेमबाजीच्या टारगेटांसाठी ‘शत्रू’ची चित्रे वापरणे, असला ‘सहवेदनात्मक जादूटोणा ‘ ही (Sympathetic Magic) नॅशनॅलिस्टांना भावतो.
अस्थिरता (चंचलता): नॅशनॅलिस्ट निष्ठा बदलूही शकतात. बरेचदा निष्ठा परदेशाला वाहिलेलल्या असतात. कधीकधी तर थोर नॅशनॅलिस्ट नेते आणि नॅशनॅलिस्ट पक्षांचे संस्थापक त्या ‘नेशन चेही नसतात. स्टॅलिन, हिटलर, नेपोलिअन डी व्हॅलेरा, डिझरायली, प्वांकरे, बीव्हरब्रूक ही उदाहरणे आहेत. ‘महा-जर्मनी ‘वादाचा जनक ह्यूस्टन चेंबरलेन इंग्रज होता. साहित्यात गेली शेपन्नास वर्षे ‘बाहेर’ निष्ठा वाहिलेली नॅशनॅलिझम वारंवार दिसते. अनेक सद्यकालीन इंग्रज साहित्यिकांच्या निष्ठा रशियावर आहेत.
गंमत म्हणजे, वर्षानुवर्षे पुजलेली निष्ठास्थळे टाकून नव्या जागी निष्ठा वाहणेही दिसते. एच. जी. वेल्स (आऊटलाईन ऑफ हिस्टरी) आणि त्याच्या अनेक समकालीनांची त्या काळातील अमेरिकाभक्ती आजच्या त्यांच्याच रशियाचे गोडवे गाणाऱ्या साहित्याइतकीच अतिशयोक्त आहे. निष्ठावंत कम्यूनिस्टांनी झटक्यात कडवे ट्रॉट्स्कीवादी होणे नित्याचे आहे. युरोपातील फॅसिस्ट चळवळींचे बहुसंख्य कार्यकर्ते कम्यूनिस्टांमधून ‘भरती’ केलेले होते आणि काही दिवसांत ‘उलटी गंगा’ ही दिसेल. टिकून राहते ती निष्ठा कशावर निष्ठा?” या प्रश्नाचे उत्तर बदलूही शकते आणि निष्ठास्थळ काल्पनिकही असू शकते.
याचे इतरही परिणाम आहेत. स्वतःच्या वर्गाबाहेर देशाबाहेर निष्ठा असलेली व्यक्ती अत्यंत उथळ, मूर्खपणाची, बटबटीत, दुष्ट आणि खोटारडी विधाने करायला मोकळी होते स्वतःच्या गटाबाबत जे म्हणणे हास्यास्पद ठरले असते, ते म्हणू धजते. इथे निष्ठास्थळाबाबतचे अज्ञानही उपोयगी पडते. जेव्हा इथली शहाणीसुर्ती माणसे रशिया आणि लालसेनेबद्दल बकवास करतात तेव्हा आपल्याला त्यांचा वास्तवाशी सांधा ‘सरकला आहे, हे स्पष्टपणे जाणवते. आज इंग्लंडात विचारवंत म्हणवल्या जाणाऱ्यांनी देशभक्त असणे नवलाईचे आहे. विचारवंत म्हणून त्यांना जे काही जनमत माहीत असते, ते देशप्रेमात अडथळा ठरते. भोवतालचे सारेजण नाराज, शंकेखोर असे असतात. निष्क्रियतेमुळे किंवा घाबरटपणामुळे विचारवंतांनाही तसेच रहावे लागते आणि स्वाभाविक निष्ठास्थळाबद्दल उदासीन व्हावे लागते. पण यातून खरेखुरे आंतरराष्ट्रीयत्वही निपजत नाही. ‘पितृभू’ तर हवी असते, आणि ती स्वदेशाबाहेर शोधावी लागते. एकदा का ती सापडली की ज्या भावनांपासून आपण मुक्त आहोत असे विचारवंत मानतात त्यांना ते मुक्तद्वार देतात. देव, राजा, साम्राज्य, यूनियन जॅक ही सारी प्रतिके त्यागून ती वेगळ्या नावांनी स्वीकारली जातातत. सर्व पापे लादून बोकडाचा बळी (Scapegoat) दिला की मोक्षाची वाट मोकळी होते.
वास्तवाबाबत उदासीनता : दोन वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती सारखीच आहे हे न उमगणे, हे नॅशनॅलिस्टांचे वैशिष्ट्य असते. ब्रिटिश हुजूर पक्षाचा नेता युरोपात स्वयंनिर्णयाच्या हक्काचे समर्थन करतानाच भारतात त्याला विरोध करेल, आणि त्याला यात विसंगती असल्याचे जाणवणारही नाही. कोणत्याही कृतीला बरेवाईट ठरवले जाते ते कृतीवरून नव्हे, तर कर्त्यावरून छळ, ओलीस ठेवणे, वेठबिगार, बनावट कागदपत्रे, राजकीय हत्या, सामान्यांवरील बाँबहल्ले, सक्तीचे विस्थापन, खटल्यांशिवायची कैद, अशा कोणत्याही कृत्याला ‘आपली’ बाजू जबाबदार असली तर कृत्यात काहीही गर्हणीय दिसेनासे होते. उदारमतवादी गोटातल्या ‘न्यूज क्रॉनिकल’ ने जर्मनांनी फाशी दिलेल्या रशियनांचे फोटो घृणास्पद पाशवीपणाची उदाहरणे म्हणून छापले, आणि वर्षा दोन वर्षांत कौतुकाने रशियनांनी फाशी दिलेल्या जर्मनांचे फोटो छापले. असाच दुटप्पीपणा इतिहासाच्या वाचनातही दिसतो. स्पॅनिश इंक्विझिशन, स्टार चेंबर, सर फ्रान्सिस ड्रेकने जिवंत स्पॅनियाडांना बुडवणे, फ्रेंच राज्यक्रांती, 1857 च्या बंडखोरांना तोफेच्या तोंडी देणे, असल्या क्रिया ‘योग्य’ कारणासाठी केल्या गेल्या असे स्वतःला पटवून दिले की त्या नैतिकदृष्ट्याही ‘तटस्थ’ ठरवल्या जातात. स्पेन, रशिया, चीन, हंगेरी, मेक्सिको, अमृतसर, स्मन येथे गेल्या पंचवीस वर्षांत अत्याचार झाले. पण या घटना निंदनीय होत्या की नाही ते मात्र पाहणाऱ्याच्या राजकीय प्रवृत्तीनुसारच ठरवले गेले. नॅशनॅलिस्टांना आपल्या बाजूचे अत्याचार निंदनीय तर वाटत नाहीतच, पण (शक्यतो) ऐकूही येत नाहीत. सहा वर्षे हिटलरच्या इंग्रज भगतांना डाखाव आणि बुखेनवॉल्डच्या छळछावण्यांबद्दल काहीही ऐकू आले नाही, आणि जर्मन छळछावण्यांची तीव्र निर्भत्सना करणाऱ्यांना तशाच रशियन छावण्या ओझरत्याच दिसल्या. 1933 साली लाखोंना मारणारा युक्रेनियन दुष्काळ कोण्याच रशियाधार्जिण्या इंग्रजाला माहीतही नाही. दुसऱ्या महायुद्धातील पोलिश व जर्मन ज्यूंच्या नरसंहाराची बातमी (आजही अनेक इंग्रजांचे अँटिसेमिटिझमचे कवच भेटू शकलेली नाही. नॅशनॅलिस्टांच्या विचाराने काही गोष्टी खऱ्याही असतात आणि खोट्याही, माहीत असतातही आणि नसतातही. माहीत असलेली गोष्ट सत्य असली तरी ती विचारांपासून दूर ढकलली जाते किंवा ‘मोजली’ जाते, पण अगदी स्वतःशीही तिला कबूल केले जात नाही.
प्रत्येक नॅशनॅलिस्टाला इतिहास बदलता येईल ही कल्पना पछाडते. त्याच्या मनोविश्वाचा काही भाग जसे त्याला घडून हवे होते तसे घडलेच, या काल्पनिकेने (fan- tasy) व्यापलेला असतो. तिथे स्पॅनिश आर्मांडा यशस्वी ठरते. शक्य तेव्हा या काल्पनिकेचे तुकडे इतिहासाच्या पुस्तकांत दाखल होतात. आपल्या काळातले बहुतेक प्रचारकी साहित्य असे ‘बनावटी’ आहे. तथ्ये घडवली जातात. तारखा बदलल्या जातात. लोकांचे उद्गार संदर्भहीन करून भलतीकडे नोंदले जातात. ज्या घटना घडायला नको होत्या असे वाटते त्यांचा उल्लेख टाळला जातो. चंग के शेकने शेकडो कम्यूनिस्टांना जिवंतपणी उकळत्या पाण्यात टाकले. पण राजकारणातील बदलांमुळे तो फॅसिझमबिरोधी गोटात आला, आणि डाव्यांचा हीरो ठरला. प्रचाराचा हेतू नेहेमीच समकालीन धारणा बदलण्याचा असतो. इतिहासाचे पुनर्लेखन करणारे मात्र त्यांना वाटणारी सत्ये भूतकाळात घुसडता येतात, असे मानतात, ट्रॉट्स्की रशियन क्रांतीत महत्त्वाचा नव्हता हे दाखवायला केलेली बनावट कागदपत्रे नुसतीच खोटारडी ठरत नाहीत. ते करणाऱ्यांच्या मनातल्या काल्पनिका त्यांचे कागदपत्रे बदलणे समर्थनीय ठरवू लागतात.
अशी वस्तुनिष्ठतेबाबतची उदासीनता जोपासायला जगाचे भाग एकमेकांपासून तुटलेले असणे सोईस्कर ठरते. काय घडते आहे ते कोणालाच नीटसे कळत नाही. सगळ्याच घटनांबद्दल शंका वाटू लागतात. दुसऱ्या महायुद्धातील एकूण मृतांची संख्या काढायला गेल्यास लक्षच नव्हे तर कोटींच्याही चुका संभवतात. युद्धे, नरसंहार, दुष्काळ, क्रांती, यांबाबतच्या सतत येणाऱ्या बातम्यांमुळे ऐकणाऱ्यांच्या मनात एक अवास्तवतेची भावना उपजते. 1944 च्या वॉर्सा उठावात चूक बरोबर काय होते? पोलंडातल्या जर्मन गॅस- भट्ट्यांचे सत्य काय? बंगालचा दुष्काळ खरा कुणामुळे घडला? सत्य बहुधा शोधता येईलही, पण उत्तरे वर्तमानपत्रांमधून इतक्या बेईमानीने मांडली जातील की सामान्य माणूस एक तर मतच बनवणार नाही, किंवा छापलेले सारेच खरे मानू लागेल. टोकाची मतेही मान्य ठरतील कारण सिद्ध होऊ शकणारेही नाकारता येईल.
आणि जरी नॅशनॅलिस्ट हार-जीत, मानापमान यांवर कुढत असतात तरी त्यांना वास्तवाशी घेणेदेणे कमीच असते. आपण दुसऱ्यांच्या पुढे जात आहोत, हा विश्वास टिकून राहायला सत्याचा तपास उपयोगी नसतो. बहुतेक नॅशनॅलिस्ट चर्चा शाळकरी वादविवादांच्या पातळीवरची असते- अनिर्णायक, कारण दोन्ही पक्षांना ते ते जिंकल्याची खात्रीच असते. काही नॅशनॅलिस्ट तर विजयाची स्वप्ने आणि वास्तवाशी फारकतींमुळे दुभंग व्यक्तिमत्त्वाचे होतात.
(अपूर्ण)