2,340,000,000,000
नुकत्याच संपलेल्या निवडणूक नाट्यासोबत एक ‘आर्थिक’ उपकथानक घडले. 13 मे ला निकाल लागले आणि ‘डाव्यांच्या मदतीने कॉंग्रेसचे सरकार बनणार हे उघड झाले. 14 ते 16 मे या काळात काही डाव्या नेत्यांनी सरकारकडून त्यांना असलेल्या अपेक्षांविषयी काही विधाने केली. या विधानांनी म्हणे भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘एंजिन’ असलेल्या शेअरबाजारात घबराट माजली. उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांचे मनोबल खचले. त्यामुळे आर्थिक स्थितीचा निदेशक जो ‘सेन्सेक्स’, तो 17 मे रोजी गडगडला. एका दिवसात भारतीय कंपन्यांच्या भांडवलात सुमारे एक-षष्ठांशाची घसरण झाली. डाव्यांच्या अपरिपक्क अर्थशास्त्रामुळे किती प्रचंड नुकसान झाले, हे दाखवण्याची जणु वृत्तपत्रांमध्ये स्पर्धांच सुरू झाली.