1 मे 2004 रोजी संध्याकाळी पुण्याला स्नेहसदन येथे आजचा सुधारकच्या वाचकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी आजचा सुधारकचे सुरुवातीपासूनचे वाचक आणि हितचिंतक ज्येष्ठ साहित्यिक श्री विजय तेंडुलकर होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आ.सु.चे वाचक आले होते. शंभरएक वाचकांच्या उपस्थितीत जी चर्चा झाली तिचा अहवाल पुढे देत आहोत.
आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री. रा.प. नेने म्हणाले की इतर अनेक मासिके बंद पडत असताना एक वैचारिक मासिक सातत्याने चौदा वर्षे चालविण्याचे धाडस आ. सु.ने केले आहे. हे साध्य करण्यासाठी वाचकांचे सहकार्य आवश्यक असतेच. त्यांचे विचार आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला आहे. मासिक सुबोध तर ठेवायचे पण त्याचा दर्जा घसरू द्यायचा नाही हे ह्या मासिकाला साधले आहे.
ह्यानंतर नन्दा खरे यांनी मासिकाच्या बदललेल्या दरांबद्दल वाचकांना माहिती दिली. सध्याचा चाळीस पानाचा अंक अठ्ठेचाळीस पानी करण्याचा विचार बोलून दाखविला. आ.सु. प्रत्येक वाचकाकडे संभाव्य लेखक म्हणून बघतो असेही ते म्हणाले. आणि वाचकांना आपली मते मांडण्यासाठी त्यांनी आवाहन केले.
नेरळचे श्री राजीव जोशी म्हणाले की विज्ञानाच्या वाढीने विवेक वाढेलच असे नाही. आ.सु. ने विवेकवादालाच वाहून घ्यावे. काही पत्रे छापली जातात, काही छापली जात नाहीत, ह्यामागे कोणते धोरण असते हे समजत नाही. विज्ञानवाहिनीच्या ‘फिरती प्रयोगशाळा’ ह्या उपक्रमातील एक सदस्य श्री जयंत फाळके म्हणाले की काम पटले तर लोक देणग्या देतात तेव्हा आ.सु.ने देणग्या स्वीकाराव्यात.
कोल्हापूरचे डॉ. सुभाष आठले ह्यांनी वाचकांनी आपल्या ओळखीच्या ग्रंथालयांना हे मासिक ठेवण्याची शिफारस करावी, अशी सूचना केली.
श्री दिवाकर मोहनी ह्यांनी आ.सु.चे धोरण सर्वांसमोर मांडले. आ. सु. जाहिरात घेणार नाही, देणगी मागणार नाही पण अनाहूत आलेले अर्थसाहाय्य स्वीकारण्यास आ.सु.ची हरकत नाही. राजीव जोशी यांच्या आक्षेपांना उत्तर देताना नन्दा खरे म्हणाले की आ.सु.चा विवेकवादाच्या उपयोजनावर भर आहे. तसे लेख आ.सु.त स्वीकारले जातात पण पत्रोत्तरांतून कितपत प्रबोधन होते हे सांगता येत नाही. पत्रे 2-3 पानी येतात ती कापावी लागतात. चर्चेची पातळी खाली जात नाही ना हेही पहावे लागते. पण एखादा लेख का छापला नाही ह्याचे उत्तर देता येत नाही.
श्री बाबा आढावांनी आ.सु.शी असलेल्या भावनिक नात्याचा उल्लेख करून आ.सु.फार गहन होत आहे असा आरोप केला. देशातील घडामोडींपासून विवेकवाद वेगळा काढणार आहात का, असा प्रश्न करून वैचारिक पातळीवर जाती-चिकित्सा झाली पाहिजे अशी सूचना केली. विवेकवादाचा प्रचार आपण करतो, पण दुसऱ्या बाजूला प्रच्छन्नपणे एक दहशतवाद पोसला जातो आहे असे ते म्हणाले.
‘ भाषेच्या गहनतेबद्दल स्पष्टीकरण देताना मोहनी म्हणाले की ते स्वतः मुद्रक आहेत, लेखक नाहीत, तसेच नन्दा खरे उपयोजित शास्त्रज्ञ आहेत त्यामुळे आ.सु.तील भाषेकडे उदार दृष्टीने पाहावे.
आ.सु.च्या वाचक मेळाव्याला इतक्या संख्येने लोक उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री देवदत्त दाभोळकर म्हणाले की हे नियतकालिक चालवणे ही आपलीही जबाबदारी आहे असे वाचकांनी समजले पाहिजे. आपल्याला ज्याबद्दल आस्था आहे त्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की आ.सु.शी संबंध आस्थेचे आहेत पण सहमतीचे आहेत असे नाही. भारतात असलेल्या मानवी ऊर्जेचा शोध घ्यायला आ.सु.ने शिकले पाहिजे.
आ.सु.ला पैशाची काळजी वाटत नाही असे सांगून खरे म्हणाले की महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व पत्रव्यवहार होत नाही. नद्या जोडणी प्रकल्प, सुवर्ण चतुष्कोण, सरकारी अर्थनीती ह्यांवरील लेखांवर प्रतिक्रिया येत नाहीत. उद्या जगणे कठीण होईल तेव्हा हे विषय आज निरीश्वरवादापेक्षा महत्त्वाचे आहेत हे पटेल. आ.सु.मध्ये ह्या सगळ्यांची दखल घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो.
किर्लोस्कर स्त्री-मनोहरचे संपादक श्री मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले की तात्त्विक चर्चेपेक्षा विवेकवादाच्या उपयोजनाला महत्त्व आहे. विवेकवाद तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तो उपयोगी आहे हे सिद्ध होईल. आ. सु.ने वैचारिक उपक्रमांची प्रयोगशाळा व्हावे. वैचारिक पुस्तकांचा परिचय त्यात यायला हवा. एखादी चर्चा सलग काही अंक चालणार असेल तर दर अंकात चर्चेचे पूर्वसूत्र थोडक्यात देऊन पुढचा भाग द्यावा. वैचारिक पुस्तकांची जाहिरात घ्यायला हरकत नाही त्यातून पैसा मिळेल आणि तत्त्वनिष्ठा भंगणार नाही.
मराठी मातृभाषा नसलेले तरी आ.सु. वाचणारे ताहेरभाई पूनावाला म्हणाले की मी नास्तिक झालो म्हणून नाही, तर सय्यदनांना मी विरोध केला म्हणून मला वाळीत टाकले. बाबा आढावांनी मला आ.सु. ची ओळख करून दिली. आता आ.सु. ही माझी नवविचारांची काठी बनली आहे.
विजय तेंडुलकरांनी आपण एक वाचक म्हणूनच बोलणार आहोत, अध्यक्ष म्हणून नाही, असे स्पष्ट करून 14 वर्षे आपण आ.सु.चे वाचक आहोत असे सांगितले. ते म्हणाले : वाचक म्हणून माझे वेगळेपण हे की विवेकवाद, विवेक, ह्या विषयाशी माझा काहीही संबंध नाही. अंधश्रद्धेशिवाय मी जगू शकत नाही. आयुष्यात श्रद्धा बाळगून जगलेल्या माणसांचे आयुष्य तपासून बघताना मला वाटते ही अंधश्रद्धा तर नव्हती? आपण ज्यावर श्रद्धा ठेवली ते नव्हतेच. स्टॅलिनच्या राजवटीत रशियात झालेला कम्युनिझमचा पराभव युरोपातील विचारवंतांना स्वीकारता आला नाही, त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही. हीसुद्धा एका अर्थी अंधश्रद्धाच. माणसाच्या मनातील असुरक्षिततेची भावना वाढते आहे. मग त्याने विवेकाने जगायचे कसे? ज्याच्याकडे रग आहे त्यालाच ते पेलू शकेल.
आ.सु. मधील तात्त्विक चर्चा अशा पातळीची की आयुष्याशी त्याचे नाते काय, असे वाटायचे. मला त्याचे एक वेगळेच आकर्षण वाटले. रोजच्या जगण्यापासून दूरच्या विषयांवर माणसे लिहितात, चर्चा करतात, ह्याचे आश्चर्य वाटले. आयुष्यात, लेखनात मला त्याचा उपयोग नाही, पण तो वाचणे हे माझे व्यसन आहे.
आ.सु. च्या नव्या टप्प्यावर आयुष्याशी नाते जोडणारे विषय हाताळले जाताना दिसतात, जे आवश्यक आहे. रोजची वर्तमानपत्रे दैनिके वाचून माझा गोंधळ वाढतो पण आ.सु.त गंभीर विषय सोप्या भाषेत उलगडून सांगितले जातात. आ. सु.ची पृष्ठसंख्या वाढली तरी त्याचे बांधेसूद रूप तसेच रहावे. वाढलेली पाने भरण्यासाठी नको ते लेख छापण्याची आपल्यावर वेळ येऊ नये. जगण्याच्या प्रश्नांकडे विवेकाने पहायला शिकवा. लेनच्या पुस्तकाचे राजकीयीकरण झाले, सेनच्या पुस्तकाचा उल्लेख करताना लबाड्या, अप्रामाणिकपणा होत आहे. जगण्यासाठी विवेकवादाची गरज तीव्र होत आहे.
माध्यमांची विश्वासार्हता गेली आहे. ब्रेनवॉशिंग भयावह प्रमाणात होत आहे. चार पाने का होईना विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या दैनिकाची आज गरज आहे. कोणाकडे भीक न मागता, मदतीची अपेक्षा न करता जे वाटते ते लिहिणे व छापणे आ.सु.ने करावे.
मासिकाचा वाचकवर्ग उतारवयाचा आहे, पण नव्या स्वरूपातील हे मासिक तरुणांच्या हाती जावे, त्याचा प्रसार व्हावा म्हणजे आ.सु.ने आणखी एक नवा टप्पा गाठला असे म्हणता येईल. आजचे गांभीर्य टिकवून संपादकीयांत, लेखांत थोडा आवेश, आक्रमकता आणावी. विचार करायला लागला की माणूस कृती करतो का? अनेकानेक कृती अविचारानेच केल्या जातात. अविचाराने काही छापलेत तरी ते खोटे नाही, हे आम्हाला माहीत असेल. पण आज उत्स्फूर्त रागाची गरज आहे.
श्री. तेंडुलकरांच्या भाषणानंतर भरत मोहनी ह्यांनी उपस्थितांचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरता सर्व प्रकारची मदत केल्याबद्दल श्री. ताहेरभाई पूनावाला, श्री टी. बी. खिलारे व श्री अन्वर राजन ह्यांचे आभार मानले.