खूप संख्येने माणसांना हल्ली असुरक्षिततेच्या, भयाच्या, अनिश्चित भविष्य- कालाच्या कल्पनेने ग्रासलेले असते. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे अनेकांनी मनःशांती गमावलेली असते व ती मिळविण्यासाठी गुरु गाठणे, नाम घेणे, देवभक्ती करणे व त्यासाठी तीर्थयात्रा करणे, योगासने, सिद्धसमाधियोग, गुरूंच्या लिखाणाचे वाचन करणे, कॅसेटस् ऐकणे, मौनशिबिरात दाखल होणे वगैरे नाना प्रयत्न अनेकजण करत असतात.
खरे पाहता आजचे जीवन पूर्वीच्या कोणत्याही युगाशी तुलना करता अधिक सुरक्षित आहे. पंचमहाभूतांशी व वन्यप्राण्यांशी झगडा क्वचित् कोणाला करावा लागतो. समाजाच्या व विज्ञानाच्या प्रगतीमुळे बरेचसे रोग नष्टप्राय झाले आहेत. शिल्लक रोगांवरही बऱ्यापैकी उपाय आहेत. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमुळे गरिबीचे प्रमाण पूर्वी कधीही नव्हते इतके कमी झाले आहे. भूकबळी पडणे ही अपवादात्मक व वृत्तपत्रांत ठळकपणे छापण्याइतकी दुर्मिळ घटना झाली आहे. पेन्शन, ग्रॅच्युईटी यांमुळे वृद्धापकाळातील आर्थिक काळजीदेखील समाजाच्या बऱ्याच मोठ्या भागाला भेडसावत नाही. अशा रीतीने जीवनातील सुरक्षितता पूर्वी कधीही नव्हती इतकी वाढूनही समाजातील व्यक्तींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. याचे कारण काय?
अलगता हे या असुरक्षिततेच्या भावनेचे मूळ कारण आहे असे, मला वाटते. एकत्र कुटुंब पद्धतीचा -हास, विज्ञानाच्या प्रगतीमुळे, आर्थिक सुस्थितीमुळे वाढलेली स्वयंपूर्णता, या स्वयंपूर्णतेमुळे दैनंदिन जीवनात आपले निकटचे कुटुंबीय वगळता इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे न लागणे, इतकेच काय, पण त्यांचा संपर्क, सहवास व त्यांच्याशी संवादही कमी होणे, यामुळे व्यक्तींचा व त्यांच्या लहान कुटुंबांचा एकटेपणा वाढतो. सर्व समाजाच्या फायद्यासाठी आपल्या मुला-नातवंडांच्या करता करावयाच्या आर्थिक तरतुदीत थोडी कपात करण्याची कल्पनाही व्यक्तीला सहन होत नाही, विचारात घेण्याजोगी वाटत नाही. अर्थात् अशीच आत्यंतिक स्वार्थी वागणूक समाजातील इतर व्यक्तीही करणार, अशीही खात्री व्यक्तीला वाटते, आत्मौपम्य बुद्धीने. त्यामुळे कोणत्याही संकटाच्या वेळी आपण व आपले लहान कुटुंब निराधार असणार, आपल्या मदतीला कोणी येणार नाही, याची जवळजवळ खात्रीच व्यक्तीला वाटत असते व त्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढते. यावर उपाय म्हणून ती व्यक्ती अधिकच तरतूद व संचय करते. अधिकच स्वार्थी बनते व त्यामुळे बाकी समाजापासून अधिकच तुटते. या उपायाने मूळ असुरक्षिततेचे दुखणे कमी न होता वाढतेच.
पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत अनेक व्यक्ती राहत. ही कुटुंबे उभी (अनेक पिढ्या) व आडवी (चुलत, मामे भावंडे) पसरलेली असत. त्यामध्ये विधवा स्त्रिया, विधुर पुरुष, पोरकी मुले, कर्तबगार नसलेल्या पुरुषांच्या बायका-मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, शारीरिक-मानसिक अपंग व्यक्ती, सर्वांची काही ना काही व्यवस्था केली जाई. त्यामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक आधारही असे. सर्व एकत्र कुटुंबासाठी म्हणून कर्त्या स्त्री-पुरुषांना आपल्या सख्ख्या मुलांवरील माया थोडी पातळ करून, त्यांच्यासाठी करावयाची तरतूद किंवा चालू खर्च कमी करून एकत्र कुटुंबाची देखभाल करावी लागे व त्यात कोणाला गैर वाटत नसे.
आपल्याला निराधार, एकटे, असुरक्षित वाटायला नको असेल, तर आपणच इतरांना आधार, सहवास व सुरक्षितता दिली पाहिजे. असा आधार, सहवास व सुरक्षितता इतरांना देता यावी म्हणून आपल्या मुलांची व पुढील पिढ्यांची तरतूद करण्याची, त्यासाठी संचय करून तो वारसा हक्काने पुढील पिढ्यांना देण्याची आपली इच्छा मर्यादित ठेवावी लागेल. आपल्या पुढील पिढ्यांची खरी सुरक्षितता त्यांना वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीत नसून, समाजाकडून त्यांना मिळणाऱ्या आधारात, आपलेपणात आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे.
पूर्वीच्या समाजात फक्त एकत्र कुटुंबव्यवस्थाच होती असे नाही. कुटुंबाबाहेरील व्यक्तींचे सहकार्य घडीघडी लागत असे. कोणत्याच शेतकऱ्याची नांगरट, पेरणी, कापणी इतरांचे सहकार्य घेतल्यावाचून पार पडू शकत नसे. जन्मापासून विवाहापर्यंत व नंतर मृत्यूपर्यंत कोणतेच महत्त्वाचे कार्य एकट्या कुटुंबाच्या बळावर पार पडत नसे. रानात प्रातर्विधीला जाणे, पाणवठ्यावर आंघोळीला/धुण्याला/पाणी भरण्यास जाणे, बाजाराला जाणे, या सर्वच गोष्टी एकमेकांच्या सहवासाने, सहकार्याने केल्या जावयाच्या. या सर्वांमधून सर्व समाजामध्ये जे सहकार्याने, आपुलकीने देवाण-घेवाणीचे जे जाळे तयार होई, त्यामुळे एकटेपणाची, निराधाराची, असुरक्षिततेची भावना नष्ट होई. आता यांपैकी कोणत्याच कामास आपल्या ब्लॉकच्या, घराच्या बाहेर पडायचे कारण नाही, कार्यालयाला पैसे मोजून सर्व कामे एकट्याच्या बळावर पार पाडता येतात, ही आजची परिस्थिती आहे. प्रत्येक कुटुंब हे एक बेट झाले आहे. त्यामुळे आर्थिक समृद्धी येऊनही मानसिक समृद्धी येत नाही. आश्वासकता लाभत नाही.
पूर्वीच्या एकत्र कुटुंबाकडे आता जाता येणार नाही. पूर्वीच्या सहकारी, परस्परावलंबी जीवन पद्धतीकडे आता परत जाता येणार नाही. पण जाणीवपूर्वक आपल्या लहान कुटुंबाचा विस्तार करून कुटुंब व समाज यांतील आदान-प्रदान ‘वाढवावे लागेल. हे आदान-प्रदान जसे आर्थिक जबाबदारी/गुंतवणूक वाढवण्याचे असेल तसेच बौद्धिक व शारीरिक श्रम व वेळ यांचा स्वयंस्फूर्तीने समाजासाठी, सामाजिक संस्थांमार्फत उपयोग करण्याचेही असेल.
सध्याच्या असुरक्षिततेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जबरी चोरीची भीती. समाजातील दरिद्री व्यक्ती आपल्या मालमत्तेची जबरी चोरी करेल व त्यामध्ये आपल्याला शारीरिक दुखापतदेखील होऊ शकेल. समाजातील आर्थिक विषमता कमी होत जाऊन आत्यंतिक दारिद्र्य नष्ट व्हावे अशी आपण पावले उचलल्यास या जबरी चोऱ्यांचे प्रमाण खूप कमी होऊ शकेल व सुरक्षितता वाढेल. गरिबी ही बहुतेक वेळा जन्मजात असते. गरिबी शिक्षणाचा अभाव अक्षमता गरिबी, असे दुष्टचक्र निर्माण झाले आहे. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी गरिबांनाही पुरेसे व चांगले शिक्षण देता येईल असा निधी उभा करण्याची आवश्यकता आहे. या निधीतून मदत करून उच्च शिक्षणदेखील प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला देण्याची सोय करता येईल. व्यावसायिक शिक्षणाची किंमत अलीकडे खूप वाढल्यामुळे मध्यवमर्गीय पालकांच्या मनात आपल्या हुषार मुलांना उच्च शिक्षण कसे देता येईल, ही जी नवीन असुरक्षितता निर्माण झाली आहे, ती असुरक्षिततादेखील नष्ट होईल. पण मग त्यासाठी त्या निधीला पैसा देण्याची तयारी दाखवावी लागेल. हा पैसा जिवंतपणी देणग्या व कर म्हणून जसा देता येईल तसाच मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेचा किमान अर्धा भाग या निधीला देण्याची मृत्युपत्राने व्यवस्था करून देता येईल. आपल्या पुत्र-पौत्रांना प्रत्यक्ष मालमत्ता देण्यापेक्षा त्यांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण करणे व त्यांना जगण्यासाठी विषमता कमी असलेला एकात्म समाज निर्माण करणे, हे त्यांच्या जास्त कल्याणाचे आहे; हे पटल्यास या सर्व गोष्टी शक्य होतील.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या सुरुवातीला समाजाने शिक्षण, रोजगाराच्या संधी याद्वारे व्यक्तीचे भरण-पोषण करावे व प्रत्येक व्यक्तीने जीवनाच्या अंती आपली मालमत्ता समाजाला परत करून समाजाचे भरण पोषण करावे. अशा आदान-प्रदानाने समाजाची व त्याबरोबर व्यक्तीची ‘संभृती’, संभरण होईल. पुरातन काळी यज्ञाने, बळी देऊन, वेगवेगळी पितृ ऋण, गुरु-ऋण अशी कर्जे फेडून ही संभृती होते अशी कल्पना होती. आता मृत्युपत्राद्वारे अथवा देणग्यांच्याद्वारे आपले समाजऋण फेडून हे संभरण करता येईल. त्यामुळे एक नवा एकात्म, समाजाबद्दल कृतज्ञता वाटणाऱ्या व्यक्तींचा, विषमता बरीच कमी असलेला, समाज निर्माण होईल. व्यक्तीचा एकटेपणा, तुटलेपणा, व्यक्तीची असुरक्षित भावना व स्वतःच्या व पुत्रपौत्रांच्या भविष्याबद्दल वाटणारी चिंता अशा समाजात खूपच प्रमाणात कमी होतील.
प्राणी व पक्षी यांच्यामध्ये आई-बाप त्यांच्या पिल्लांना ती फक्त मोठी होऊन स्वतंत्रपणे आपले पोट भरायला व संरक्षण करायला समर्थ होईपर्यंतच आसरा, संरक्षण व अन्न देतात. नंतर आई-बाप व मुले एकमेकांची ओळखही विसरतात. आदिवासींमध्येही मुलांना ती लग्नाच्या वयाची होईपर्यंत म्हणजे 16 ते 18 वर्षापर्यंतच आधार देतात. नंतर लग्न झालेले जोडपे स्वतंत्र घर थाटते. वारसा हक्काने द्यायला काही मालमत्ता नसतेच. माणसाची माणूस म्हणून पृथ्वीवर येऊन साधारण 20 लाख वर्षे झाली व त्यांपैकी किमान 19 लाख 95 हजार वर्षे त्यांची अवस्था आदिवासींच्या सारखीच होती. म्हणजे मुलांना आपली मालमत्ता वारसा हक्काने देण्याची प्रथा जेमतेम 5 हजार वर्षांची, म्हणजे मानवी इतिहासात काल परवा निर्माण झालेली प्रथा आहे. म्हणजेच या प्रथेला उपजत प्रेरणेचा काहीच आधार नाही, ही एक अलीकडील समाज-अर्थव्यवस्थेमुळे पडलेली, शिकलेली प्रथा आहे. त्यामुळे प्रत्येक समाजानुसार तिचे स्वरूप वेगळे आहे. इंग्लंडमध्ये स्थावर मालमत्ता (शेतीवाडी, घरे वगैरे) फक्त प्रथम जन्मलेल्या मुलाला किंवा मुलीला मिळते. कोठे सर्व मालमत्ता स्त्रीच्या नावे असते तिच्या मुलीकडे वारसा जातो व तिचे भाऊ कारभार पाहतात. (केरळमध्ये).
सोव्हिएट रशियात मालमत्ता मृत्यूनंतर सरकारजमा होई. इस्टेट ड्यूटी / वारसा कराची पद्धत भारतात होती व अनेक देशात आजही आहे. तेव्हा व्यक्तीच्या मालमत्तेची तिच्या मृत्यूनंतर काय व्यवस्था करावयाची त्याबद्दलच्या रूढीमध्ये स्वतः मृत्युपत्राद्वारे स्वयंप्रेरणेने किंवा कायदा करून बदल केला तर त्याने व्यक्तीच्या मूलभूत जैविक प्रेरणेवर आक्रमण होते किंवा मुलांच्या मूलभूत मानवी हक्कांवर अतिक्रमण होते असे मानायचे मुळीच कारण नाही. एकतर व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेची कोणत्याही प्रकारची समाजमान्य व्यवस्था लावल्यास तिच्यावर कोणताही अन्याय होत नाही. दुसरे म्हणजे मुलांना वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता किंवा संपत्ती ही काही त्यांची स्वकष्टार्जित संपत्ती नसते. एक रूढी सोडता तिच्यावर त्यांना काहीही नैतिक हक्क सांगता येणार नाही. उलट असेही नैतिकदृष्ट्या मानता येईल की, काही मुलांना वारसा हक्काने अन्-अर्जित संपत्ती मिळणे व काही मुलांना तशी संपत्ती अजिबात न मिळणे, हे न मिळणाऱ्या मुलांना अन्यायाचे आहे व समाजधारणेच्या दृष्टीने विघातक आहे. पण सध्या मात्र वृद्धाश्रमात असे अनेक स्त्री- पुरुष भेटतात की ज्यांना त्यांच्या मुलांनी, नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडले आहे. ज्यांची मालमत्ता मुलांनी त्यांच्या मृत्युपूर्वीच त्यांना फसवून किंवा जबरदस्तीने बळकावली आहे, पण जे स्वतःला मिळणारी थोडीबहुत पेन्शन किंवा उरलेली थोडीशी मालमत्ता वृद्धाश्रमाला द्यायला तयार होत नाहीत, तर काळजीपूर्वक मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावे करून ठेवतात; या अवास्तव मायेला किंवा प्रेमाला एक विकृतीच म्हणायला हवे!
तेव्हा या विकृत, अवास्तव मायेवर विजय मिळवून आपण स्वयंप्रेरणेने आपल्या मालमत्तेचा पुरेसा भाग मृत्युपत्राद्वारे सामाजिक निधीला देऊन, त्याद्वारे कोणाही मुलाला प्राथमिक व दुय्यम शिक्षणापासून व कोणाही गुणवत्ताधारक मुलाला उच्च शिक्षणापासून आर्थिक कारणाने वंचित व्हावे लागणार नाही, अशी व्यवस्था करावयास हवी. तरच आपल्या पुत्रपौत्रांना राहण्यासाठी एकात्म, सुरक्षित व आश्वासक समाज लाभेल. 25, नागाळा पार्क. कोल्हापूर-416003