टेलिव्हिजनच्या वृत्तवाहिन्या भारतीयांच्या रोजमर्रा वापरातल्या शब्द- भांडाराला सूज आणत आहेत. अनेक नव्या संकल्पना आणि त्यांच्यासाठी वापरले जाणारे नवे शब्दप्रयोग यांच्यातून हा ‘फुगारा’ आणला जातो आहे. तसे हे नेहमीच घडत असते, पण निवडणुकींच्या काळात याला ऊत येतो. मे 2004 च्या निवडणूक काळातही हा सुजवटा-फुगवटा प्रकार भरपूर प्रमाणात दिसला. काही उदाहरणे तपासण्याजोगी आहेत.
जसे, कोणतेही सरकार नव्याने सत्तेवर आले की सुरुवातीचे काही दिवस मतदार व माध्यमे सरकारवर टीका करत नाहीत. “त्यांना काय करायचे आहे ते पाहू तर! पापपुण्याचा हिशोब उलटीकडे गेला तर मग हल्ले करू!” असा हा भाव असतो. आपले वृत्तविद्वान याला म्हणतात ‘हनीमून पीरियड’. एकदा का असे चटपटीत लघुरूप दिले की ध्येयधोरणे, वचनपूर्तीला आवश्यक असणारा वेळ, वगैरे सारेच संदर्भ बाद होतात.
पण काळ जातो. बहुतेक सरकारे फार काही मूलभूत किंवा क्रांतिकारक बदल करत नाहीत; हे लक्षात आले की काही लोकांमध्ये “ते तरी काय करणार?” असा भाव उपजतो. पण ‘शासन’ करणे पूर्णपणे तटस्थ कधीच नसते. हळूहळू फार तटस्थपणाचा कंटाळा येऊ लागतो आणि संधी मिळताच सरकार बदलायची इच्छा होते. मग येते ‘व्होट फॉर अ चेंज’. इथेही शब्दप्रयोगाचा वापर मुख्यतः ‘कशासाठी चेंज? कोणत्या दिशेने जाणारा चेंज’? असले प्रश्न टाळण्यासाठी केला जातो. फॅशनप्रमाणे कपड्यांची किंवा केस कापण्याची शैली बदलावी तसाच हा ध्येयधोरणातला ‘चेंज’ बनतो, फक्त रुचिपालट.
एखाद्या सरकारने बदल करायला सुरुवात केलीच तर काही जुने हितसंबंध दुखावले जातात. जसा काळ जातो तशी ‘दुखऱ्यां’ची संख्याही वाढते. मग क्रियाशील होतो वृत्तविद्वानांचा ‘अँटि-इन्कंबन्सी फॅक्टर’. परिस्थिती बदलत असते. प्रश्न बदलत असतात, त्याच प्रश्नांच्या तीव्रता बदलत असतात, शासनाला सुचणारी उत्तरे अपुरी पडत असतात – हे सारे गुंडाळून ठेवून आता फक्त ‘कार्यकाळ’ हे माप उरते. जेवढा कार्यकाळ जास्त, तितका त्या सरकाराविरुद्धचा ‘अँटि-इन्कंबन्सी फॅक्टर’ जास्त, असे सोपे एकरेघी गणित मांडले जाते.
आज डझनभर वृत्तवाहिन्या आणि धडपडून त्यांच्याशी स्पर्धा करू पाहणारी नियतकालिके (‘प्रिंट मीडिया’) या प्रकारच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक विश्लेषणात तज्ज्ञ होत चालली आहेत. आपल्या दिवाणखान्यांत बसून हे वृत विश्लेषण पाहणारे आणि करणारे आपण सगळेही हे अपरिहार्य असल्यासारखे या शैलीत ओढले जात आहोत भलेही आपला ‘दिवाणखाना’ नऊ फूट बाय सात फूट का असे ना!
हनीमून चेंज- अँटि-इन्कंबन्सीचे हे गणित खरी उत्तरे देते का, असा जर विचार केला, तर मात्र भारताचा ताजा इतिहास एक ठामपणे नकारार्थी उत्तर देतो.
1950 मध्ये केंद्रात सत्तेवर आलेला काँग्रेस पक्ष आणीबाणीसारख्या घटनेनंतरच बदलला—थेट पंचवीस वर्षांनी एका पिढीनंतर. पश्चिम बंगालचे केंद्राशी फटकून असलेले आघाडी सरकारही आज तीसेक वर्षे टिकले आहे. त्याचे मताधिक्य कमीजास्त होते, पण सत्ता टिकून आहे. अनेकानेक केंद्र सरकारशी ‘जुळत्या’ राज्यांमध्येही एखाद्या पिढीचे सातत्य सहज दिसते. का नाही या परिस्थितींमध्ये ‘मधुचंद्र’ संपले? आणीबाणी लादली नसती तर आजही काँग्रेस सरकार सलग सत्तेत राहिले असते, असे मानायला जागा आहे. त्या पक्षाचे सरकार नसतानाही बहुतांश काळ त्या पक्षाचेच जुने कार्यकर्ते सत्तेत होते, हेही सहज दिसेल. मग इथे अँटि-इन्कंबन्सी सोडाच, साधा चेंजही लोकांना का सुचला नाही?
की डून स्कूल सेंट स्टीफन्स सूटबूटटाय-सफाईदार ‘अॅक्सेंट’ ने दिपून जाऊन आपण वास्तवाशी फारकत घ्यायची? बरे, या विदेशी भासणाऱ्या वृत्तविद्वानांच्या स्वदेशी आवृत्त्याही कमी नाहीत. जसे नियतकालिकांच्या वार्ताहर-संपादकांना आकर्षक’ लिहिता यावेच लागते, तसेच ‘चिकनेचुपडे’ (पण स्वदेशी!) कुर्ता- पायजमावालेही जर हजरजबाबी असले तर दृक्श्राव्य माध्यमांना ते हवेच असते. मग ते ‘इन्संट हजरजबाब’ उथळ असले, अविचारी असले, खोटारडे असले तर? – तेही हवेच असतात!
13 मे 2004 ला जे दिवसभराचे ‘वृत्तमंथन’ सुरू होते त्यात एक ‘स्पिन डॉक्टर’ असा शब्दप्रयोग वापरला गेला, प्रमोद महाजनांसाठी, त्यांच्या पुढ्यातच. त्यांनाही हा अवमान असल्याचे जाणवलेले दिसले नाही! शब्दप्रयोग अमेरिकन आहे, पण ब्रिटिश मुळाच्या आणि भारतात अफाट लोकप्रियता लाभलेल्या क्रिकेटच्या खेळातही तो लागू पडतो.
स्पिन बोलरचे, फिरकी गोलंदाजाचे कौशल्य हे की त्याने टाकलेला चेंडू मूळ दिशेने न जाता ‘भलतीकडेच’ वळतो व मूळ वेगाने न जाता त्याचा वेग अनपेक्षितपणे कमीजास्त होऊ शकतो. अर्थातच चेंडू खेळण्याच्या प्रयत्नातील फलंदाज चुकायची शक्यता वाढते व तो लवकर ‘आऊट’ होतो. थोडक्यात म्हणजे वास्तव काय हे फसवेपणाने दाखवणारा, तो ‘स्पिनर’, किंवा अमेरिकन बोलीमध्ये ‘स्पिन डॉक्टर’.
असे वेगवेगळे स्पिन डॉक्टर्स आज भारतातल्या राजकीय पक्षांना आवश्यक वाटू लागले आहेत. त्यांना बहुतेक वेळा ‘प्रवक्ता’ असे नाव असते. ‘प्रवक्ता’ म्हणजे पक्षाची भूमिका लोकांना सांगणारा. पण बहुधा प्रवक्ते फक्त वास्तवाचे वर्णन पक्षाच्या सोईनुसार करणारे असतात, फसवेगिरीतले तज्ज्ञ.
वृत्तवाहिन्यांची खरी जबाबदारी वास्तवाचे दर्शन लोकांना घडवण्याची असते. पण मुळात वृत्तवाहिन्या (आणि वृत्तपत्रेही!) ‘व्यापारी’ संस्था असतात. कोणाकडून तरी कशाच्या तरी मोबदल्यात काही विशिष्ट तऱ्हेने वास्तव दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव असतो. जाहिरातदार हा मोठा दबावगट वृत्तवाहिन्यांना ‘फिरकी’ टाकायला प्रवृत्त करत असतो आणि जाहिराती देणारेच राजकीय पक्षांवरही आपल्या सोईचे कायदे कानून करण्यासाठी, अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या कडक-नरम अंमलबजावणीसाठी दबाव आणत असतात. हे कमीजास्त सफाईने होत असते. कधी बटबटीतपणे, कधी जाणवणारही नाही अशा तरलपणे.
” जसे, 14 मे 2004 ला संघ परिवाराचे ‘मुखपत्र’ मानले जाणारे नागपूरचे ‘तरुण भारत’ हे वृत्तपत्र पाहावे. आदल्या दिवशी आपल्या बोलावित्या धन्याचे पानिपत झाले, हे वास्तव दडवणे तर शक्य नव्हते, त्यामुळे मथळा होता, “डाव्यांच्या पाठिंब्याने केंद्रात काँग्रेसचे सरकार.” पहिल्या पानावरील इतर मथळे असे—“विदर्भात भगवी लाट : कॉंग्रेसचा सफाया!”, “राज्यातील 48 पैकी 25 जागा युतीला”, “– आणि गडकरी वाहिन्यांचे हीरो,” याशिवाय एक विशेष संपादकीयही पहिल्या पानावर झळकले, “अभिनंदन! वैदर्भी दणक्यासाठी!!” दोन बातम्या चौकटींमध्ये आहेत, एक विदर्भातल्या विजेत्यांच्या फोटोंचा संच, आणि “ओरिसा रालोआने राखले, कर्नाटकात भाजपा सर्वांत मोठा पक्ष”.
हा बटबटीतपणा आहे. राज्यात अर्ध्यावर जागा आमच्या हे सांगताना तीन जागा गमावल्याचे वास्तव ‘स्पिन’ केलेले आहे. नितीन गडकरी नागपुरातील संघपरिवाराचे नेते असल्याने त्यांचे गुणगान आहेच. पण सोबतच एक वास्तव झाकायच्या प्रयत्नात दुसरे एक वास्तव उघडे पडले आहे ते म्हणजे संघपरिवाराला असलेली डाव्यांबाबतची भीती आणि घृणा !
हा बटबटीतपणा टाळण्यात कुशल असणारे जयराम रमेश, प्रमोद महाजन, कपिल सिब्बल, अरुण जेटली, सीताराम येचुरी, सुषमा स्वराज आदि नेते आता आपल्या नको तितक्या ओळखीचे आहेत. ते आश्वासक सुरात बोलतात. प्रेक्षकांची समज चांगलीच ‘उच्च’ आहे असे सुचवणारी परिभाषा बहुतेक वेळा योग्य तऱ्हेने, पण अधूनमधून चुकीची वापरतात. प्रेक्षक याने सुखावतात. पण कितीही ‘उंची’ देऊन बॉलला स्पिन दिला तरी डॉक्टरसाहेबांचा गर्व आणि अरेरावी समोरच्यांबाबतच्या सुप्त तुच्छतेतून ठोकावतातच.
मुळात वृत्तवाहिन्या सरासरीने साताठ मिनटेच सलग मजकूर देतात. ’24X7′ म्हणवणारी वाहिनीही खऱ्या मोजमापात आठवड्यात 168 ऐवजी जेमतेम 42 तासच ‘बातम्या’ देते. पण हेही भरून काढणे अवघड झाल्याने सेकंदाच्या बातमीवर मिनिटाची टिप्पणी आणि चर्चा करावी लागते. आपण फार काही देत नाही, हे दडवायला साताठ मिनिटांचे तुकडे पाडणे, “आपण खोलात जाऊ, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर” असले भरताड, ‘कलात्मक’ पण निरर्थक दृश्य-माहिती (visuals) व आलेख, हे सारे अत्यावश्यक असते. आणि या दरम्यान वाहिन्यांचे स्पिन डॉक्टर्स आणि त्यांच्या पुढ्यातले स्पिन डॉक्टर्स सतत मिलाफी कुस्ती खेळत असतात. अखेर दोन्हीकडच्या कठपुतळ्या नाचवणारी बोटे एकच असतात.
12 मे 2004 च्या सुस्तीत एक बातमी ओझरती दिली गेली — अनिल अंबानींनी सोनिया गांधींची भेट घेतली! मग बहुधा स्पिन दडवण्याच्या गरजेतून ही बातमीही ‘लुप्त’ झाली. पूर्वीचे सुभाष गुप्ते-सनी रामादीनसारखे स्पिन बोलर्स आवर्जून लांब बाह्यांचे सदरे घालत, ते उगीच नसे!
ही भाषेची सूज, हा भाषेचा फुगारा साबण-तेलांच्या जाहिरातींमधून आलेला आहे. ‘एज डिफाईंग फॅक्टर’ (वयवाढीला न घाबरणारा घटक!), ‘त्वचेचे आणि केसांचे लाड’ करणारे साबण, ‘वाट्टेल ते’ करू देणाऱ्या मोटर कार्स, हे सारे आपल्या पचनी पडले आहे. पण हा उथळ, पोरकट प्रकार आहे.
राजकारणाचे तसे नाही. राजकारण हा समाजाला एकत्र बांधून ठेवणारा, समाजाच्या सुखशांतीला दिशा देणारा प्रकार असायला हवा. हे भान सुटून यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (भाजपा मित्रपक्ष) राजकारणातील स्पिनला गुळगुळीत दाढीच्या (“कहो तो ऑफिसही न जाऊँ!”, ‘घोटलेला’ पुरुष बायकोला म्हणतो!) पातळीवर नेऊन ठेवले. पावसाळा नीट झाला नाही तर त्याचा चटका बसू नये म्हणून निवडणुका अलिकडे ओढल्या. त्यात चंद्राबाबूंवरील हल्ल्याचे उपकथानकही होतेच. निवडणुकीचे मुद्दे म्हणावे तर ‘भारत उदय’ (जो कालपरवाच झाला), ‘इंडिया शायनिंग’ (एकाएकी), ‘फील गुड’ (बेकारी, उपासमार, वाढत्या आत्महत्या, वाढती विषमता) असे बेगडी मुद्दे. कोणत्याही घोषणेत अमुक करा, अमुक करू या, अमुक करतो, अशी भाषा नाही.
ही तुच्छतावादाची, उपेक्षावादाची, cynicismची परिसीमा म्हणायला हवी. आधीही स्पिनर्स होते, नव्हते असे नाही. पण अगदी ‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही’ हे आणीबाणीच्या काळातले घोषवाक्यही तुच्छतावादी नव्हते. ‘आराम हराम है’, ‘जय जवान, जय किसान’, ‘गरीबी हटाओ’ तसे झाले का हे विवाद्य असेल, पण सूर तुच्छतेचा नव्हता, उपेक्षेचा नव्हता. स्पिन वास्तवाला दडवत नव्हता. पातळी साबण – तेल- पिझ्झाची नव्हती.
समाजापुढचे खरे प्रश्न कोणते आणि ते सुटायला काय करायला हवे याचे चुकीचे आकलन आज राजकारणाचा भाग बनू लागलेले आहे. नवे सरकारही या दलदलीत रुतणारच नाही, ‘चकव्या’ने मतिभ्रष्ट होऊन दिशाहीन भटकणारच नाही, अशी आशा करणे भोळेपणाचे ठरेल.
मग प्रश्न उरतो की आपण काय करावे. स्पिन गोलंदाजी खेळण्याचे चांगले तंत्र हे की टप्पा पडतो तिथवर डावे पाऊल टाकून टप्पा पडताक्षणीच चेंडूला दामटणे! कोणीही फिरकी मारा करत आहे असे जाणवल्यास आपल्या निकटवर्तीयांना, घरच्यांना, मित्रदोस्तांना त्या धोक्याची सूचना देऊन, ‘पाय पुढे टाकून’ आपल्याला जाणवणारा स्पिन दामटणे. हे सोपे नाही. असे करण्यात आपण फारदा स्वतः विचार न करता दुसऱ्यांच्या क्रियांना प्रतिक्रिया देण्यातच गुंतून पडू. आपण स्वतःला सांभाळले नाही तर या प्रकारावर आपले विक्षिप्त, obsessive, पछाडल्यासारखे प्रेमही जडेल. पण या सावधपणाला पर्याय आज तरी (मला) दिसत नाही.