माणसे स्वभावतःच मनकवडी असतात. इतरांचे मनोव्यापार कल्पनेने तपासण्याचे माणसांचे कौशल्य हे भाषेचा वापर किंवा बोटांपुढे आणता येणाऱ्या अंगठ्याच्या दर्जाचे मानवी वैशिष्ट्य आहे. ते इतक्या सहजपणे आपण वापरत असतो की तसले काही कौशल्य आहे हेच आपल्याला सुचत नाही. पण चार वर्षांच्या मुलाचे या क्षेत्रातले कौशल्य बहुतांश प्राण्यांमध्ये आढळत नाही. आपण जगात येतो तेच ‘इतर मनांचे आराखडे’ घडवत आणि सामाजिक प्रतिसादांप्रमाणे आराखडे बदलून घेत.
1980-90 च्या दशकाच्या मध्याजवळ सायमन बॅरन कोहेन या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाने काही सहकाऱ्यांसोबत लहान मुलांच्या मनकवडेपणाबद्दल एक महत्त्वाचा प्रयोग केला. एका ‘खाऊच्या’ डबीत पेन्सिली ठेवल्या गेला. चार वर्षांच्या काही मुलामुलींना डबीत अपेक्षित खाऊ नाही, हे ‘कटु’ सत्य पाहू दिले. मग काही प्रौढांना खोलीत बोलाविले आणि मुलांना विचारले की प्रौढांना डबीत काय मिळायची अपेक्षा असेल – ‘काय मिळेल’ नव्हे, तर फक्त ‘अपेक्षा’. सर्व मुलांनी ‘खाऊ’ हे योग्य उत्तर दिले. मुलांना स्वतःचे ज्ञान आणि इतरांच्या अपेक्षा, यांत फरक करता येत होता. बाहेरचे जग स्वतःला कसे दिसते हे इतरांना ते कसे दिसेल यापासून सुटे काढता येत होते.
हाच प्रयोग तीन वर्षांच्या मुलांवर केला तेव्हा मात्र थेट उलट उत्तर आले. सर्व मुलांना वाटत होते की ‘खाऊच्या डबीत पेन्सिली आहेत’, हे त्यांना स्वतःला असलेले ज्ञान इतरांनाही असणारच! त्या वयाच्या मुलांना इतरांच्या मनोव्यापाराची प्रतिमाने (मॉडेल्स) बनवायचे कौशल्य मिळालेले नव्हते ती मुले पोरकट ‘सर्वज्ञतेत’ अडकली होती; सगळे ज्ञान सगळ्यांना असते, अशा भावनेत रुतली होती. दोन वेगवेगळी मने, दोघांमध्ये वेगवेगळी माहिती, हे तीन वर्षीयांना सुचत नव्हते, तर चार वर्षीयांच्या सवयीचे होते.
याच प्रकारच्या स्वतःच्या आणि इतरांच्या मनांमध्ये फरक असण्याची जाणीव चिंपांझी व इतर माणसांना जवळ असलेल्या कपींमध्येही दिसते. वेगवेगळ्या माहितीच्या साठ्यांपासून सुरू होऊन बरेच क्लिष्ट विश्लेषण केले जाते, हे अनेक प्राणिवर्तनशास्त्रज्ञांना दिसून आले आहे. पण माणसे आणि कपींमधले हे कौशल्य इतर बहुतांश प्राण्यांमध्ये आढळत नाही. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये असलेल्या वेगवेगळ्या ज्ञानसाठ्यांमधून मनोव्यापारात येणाऱ्या भिन्नतेचा स्वतःसाठी उपयोग करून घेण्याचा स्वार्थ माणसे आणि कपींमध्ये आहे- इतर प्राणिसृष्टीत नाही.
हे फक्त जास्तीच्या बुद्धिमत्तेतून येते का? माणसे व कपींमध्ये दिसणारी सामाजिक बुद्धिमत्ता मेंदूमध्ये असलेल्या एखाद्या उपप्रणालीच्या, मॉड्यूलच्या रूपात अनुस्यूत असते का? की एका विशिष्ट पातळीच्या वर असलेली बुद्धीच हे घडवून आणते? आपण मेंदूंच्या रचनांचे नकाशे काढू लागलो आहोत. कोठे काय घडते याची उपयुक्त माहिती आता मिळू लागली आहे; आणि मनकवडेपणा हा बुद्धिमत्तेच्या पातळीतून न येता मानव-कपी यांच्या मेंदूच्या एका उपप्रणालीतून येत असावा, असे काही पुरावे सापडत आहेत.
गिआकोमो रिझोलात्ती या इटालियन मज्जाशास्त्रज्ञाला (Neuro-scientist) या दिशेने काही रंजक माहिती मिळाली आहे. रिझोलात्ती माकडांच्या स्नायू नियंत्रण करणाऱ्या ‘व्हेंट्रल प्रमोटर’ मेंदूक्षेत्राचा अभ्यास करत होता. एखाद्या वस्तूकडे हात करताना किंवा अन्न तोंडात घालताना या क्षेत्रातील चेतापेशी उद्दीपित होतात. वेगवेगळ्या क्रियांसोबत वेगवेगळ्या पेशी उद्दीपित होतात. यावरून आधी असे वाटले की असे पेशींचे उद्दीपन हे स्नायूंच्या हालचालींचे नियंत्रण करत असावे. पण रिझोलात्तीला एक विक्षिप्त प्रकार आढळला. एखादे माकड एखादी क्रिया करताना दिसले तरी ती क्रिया बघणाऱ्या माकडातील त्या क्रियेशी संलग्न पेशी उद्दीपित होतात! भुई धोपटण्याची संलग्न पेशी ही इतर कोण्या माकडाने भुई धोपटली तरी उद्दीपित होते! रिझोलात्तीने या पेशींना ‘आरसा-पेशी’ (mirror neurons) असे नाव दिले आहे.
मज्जाशास्त्रज्ञांमध्ये या निरीक्षणाचा नेमका अर्थ काय, यावर जोरदार चर्चा होत आहेत. इंग्रजीत माकडांच्या अनुकरणशीलतेबद्दल ‘मंकी सी, मंकी डू’ असा शब्दप्रयोग करतात—आपण ‘माकड आणि टोपीवाला’ ही कहाणी आठवू.
एक शक्यता अशी आहे की या आरसा पेशी तरल अशा अंतर्मुख करणाऱ्या मनस्थितींशी संलग्न आहेत. इतरांमध्ये संताप, कंटाळा किंवा तत्सम भावना असल्याचे जाणवले की आपल्या मनांमध्येही त्यांचे प्रतिबिंब उमटते. हे ‘उमटणे’ मनकवडेपणाचे मूळ असू शकते. तसे असेल तर ‘उपप्रणाली’च्या स्पष्टीकरणाला पुष्टी मिळते. चित्र पाहणे, ऐकणे, बोलणे, अशा ज्ञानेंद्रियांच्या कामांसाठी अशा उपप्रणाली असतात, हे आधीच समजले आहे. रिझोलात्तीला मनकवडेपणाचे मॉड्यूल सापडले का?
याला आणखी एका दिशेने पुष्टी मिळते. ‘ऑटिझम’ (autism) या विकाराने ग्रस्त लोकांमध्ये इतरांच्या मनोव्यापारांची प्रतिमाने करण्याचे कसब नसते, असे अनेक मज्जाशास्त्रज्ञांचे मत आहे. अशी माणसे आत्यंतिकतेने अंतर्मुखपणे वागतात, हे सामान्य निरीक्षकांनाही सहज जाणवते. पण जरी ऑटिस्टिकांना इतरांच्या मनोव्यापाराची दखल घेता येत नसली तरी बुद्धिमत्ता, गणिती कौशल्य, आकृती ओळख, अशा चाचण्यांमध्ये ते उत्तम कामगिरी करताना दिसतात ऑटिझम हा कमी बुद्धीचा विकार नाही. असे म्हणता येईल की ऑटिस्टिक लोक ‘मनांधळे’ असतात! (स्टीव्हन जॉन्सनच्या ‘इमर्जन्स (पेंग्विन, 2001) या ग्रंथातील ‘द माईंड रीडर्स’ या प्रकरणाच्या काही भागाचे हे भाषांतर आहे.)