चीनच्या हुनान प्रांतातले क्षिनमिन हे हजारभर वस्तीचे खेडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोड्या पाण्यातल्या गोगलगाईंमुळे पसरणाऱ्या शिस्टोसोमिॲसिस या रोगाने गावातील सारे ग्रस्त आहेत. गोगलगाईंमधून एक परजीवी कृमी शरीरांत शिरते, यकृतात आणि मूत्राशयात अंडी देते आणि रक्ताबरोबर मेंदू आणि मज्जारज्जूत जाऊन स्थिरावते. मूत्रपिंडे निकामी होतात, अर्धांगवायू होतो आणि अखेर वेदनामय अकाली मृत्यू ओढवतो. वांग झिंकुनला तीन वर्षांपूर्वी लागण झाली. त्याने 4,830 डॉलर्सची (सुमारे सव्वा दोन लाख रुपये) आपली पुंजी औषधोपचार आणि शस्त्रक्रियेने अंडी व कलिका काढून टाकण्यात खर्च केली. आता पुन्हा शस्त्रकियेची गरज आहे, पण 45 वर्षांच्या वांगकडे पैसे नाहीत. तो एकटा नाही. तो सांगतो, “सरकारला आमची काळजी नाही, ते फक्त आर्थिक विकासाकडे लक्ष देते.
“1909 साली ‘शिस्टो’चे चीनमध्ये सव्वा कोटी रुग्ण होते. त्यानंतर गोगलगाईंना मारणारी कीटकनाशके, तपासणी व उपचार असा मारा करत 1988 मध्ये रुग्णांची संख्या केवळ चाळीस हजारांवर आली. माओ झेडोंगच्या प्रेरणेने झालेल्या या मोहिमेबाबत माओंनी एक कविताही रचली. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दृष्टीने आजही मलेरियानंतरचा सर्वांत घातक असा परजीवींपासून होणारा रोग ‘शिस्टो’च आहे.
1988 साली चीनने अनेक क्षेत्रांत भांडवलशाही खाजगीकरण केले. यात स्वास्थ्यसेवाही आली. स्थानिक आरोग्य केंद्रांचे सरकारी अनुदान बंद करून त्यांना ‘आर्थिक स्वावलंबन’ करायला सांगितले गेले. गोगलगाय नियंत्रण, लसीकरण यांसारखी सर्वोपयोगी उपक्रमांची वाट ‘खर्चिक’ ठरली आणि प्रतिबंधाऐवजी महागड्या बिगरसरकारी उपचारावर रोख वळला. 1998 साली असे आढळले की चीनमधल्या दारिद्र्यरेषेखालच्या प्रजेतली अर्धी प्रजा ‘तिथे’ गंभीर आजारानंतर पोचलेली आहे! पंधरा टक्के चिनी लोकच विम्याने संरक्षित आहेत- इतर सारे व्यापारी आरोग्यसेवेची ‘गिऱ्हाईके’ आहेत. साथी हाताळण्याच्या यंत्रणा निरुत्पादक ठरवून संपुष्टात आणल्या गेल्याने नुकतीच येऊन गेलेली ‘सार्स’ साथही काही आठवड्यानंतरच हाताळली गेली. पण अजूनही रोगनियंत्रण केंद्रांना अर्धेच अनुदान मिळते व ठरलेले पैसे स्वतः कमवावे लागतात. इतर राष्ट्रे अशा केंद्रांना पूर्ण अनुदान देतात. पॅसिफिक-पश्चिम या WTO च्या क्षेत्रातील सदतीस देशांपैकी चीन ह्या एकाच देशात लसीकरणासाठी पैसे द्यावे लागतात. अशा केंद्रावर काम करणारी एक महिला सांगते, ‘आज चिनी आरोग्यसेवा विस्तार (coverage) वाढवण्याऐवजी महसूल वाढवते. ‘
माओच्या काळात आटोक्यात आलेले अनेक रोग आज नव्याने उफाळत आहेत. ‘हेपेटायटिस बी’ची लस फुकट देणे बंद केल्याने आज चीनची दहा टक्के प्रजा या रोगाची वाहक आहे, अमेरिकेची एकच टक्का. एकूण WHO च्या प्रतवारीत चिनी आरोग्यसेवा 191 देशांमध्ये 144 वी आहे. -बांगलादेशाच्याही खाली.
गोगलगाई झपाट्याने वाढत आहेत. नव्याने ‘शिस्टोग्रस्त’ होणारे वर्षाला आठ लाखांवर गेले आहेत. ‘थ्री गॉर्जेस’ या अतिमहत्त्वाकांक्षी धरणप्रकल्पाने रोगाचे क्षेत्र वाढणार आहे. सर्व पाणसाठ्यांच्या किनाऱ्यांवरचे पाणगवत चीनमध्ये कागद बनवायला वापरले जाते. हे काम करणारे सर्वजण शिस्टोग्रस्त आहेत पण रोग आटोक्यात ठेवण्यासाठीचे ‘बोनस’ मिळवायला आकडे कमी केले जात आहेत. WTO चे अंदाज सरकारी आकड्यांचा दीडपट आहेत. पाणगवत कामगार चिआंग चांग्झाओ सांगतो, “स्थानिक सरकारे आपली कामगिरी बरी दिसावी म्हणून खोटे बोलतात. पण मी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे; आणि खरे सांगणे हे माझे कर्तव्य आहे.
‘ याशिवाय चीनमध्ये बरीच प्रजा तरती, भटकी आहे. तिच्याकडे ना पैसे आहेत, ना रुजलेल्या प्रजेला असणारे हक्क. या प्रजेत रोगांचे प्रमाण स्थायी प्रजेच्या आठपट आहे. पण एक पाणगवत कर्मचारी म्हणतो तसे, “मी आजारी पडेनच-पण मला इतर काम करायचा पर्यायच नाही.'” [ टाईम (डिसें. 2003) मधील हॅना बीचच्या ‘अन्हॅपी रिटर्न्स’ या लेखाचे हे संक्षिप्त भाषांतर. चीन आणि भारत यातली साम्ये आपणच तपासण्याजोगी आहेत.]