(स्टीफन हॉकिंग ह्यांचा परिचय आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याची आवश्यकता नाही. “Black Holes and Baby Universes and other Esays” ह्या पुस्तकातील “Is Everything Determined” ह्या लेखाचे भाषांतर/रूपांतर खाली आहे. हा लेख म्हणजे हॉकिंग ह्यांनी 1990 मध्ये केंब्रिज विश्वविद्यालयात दिलेले व्याख्यान आहे. हा लेख प्रकाशित करण्यास हॉकिंग ह्यांनी दिलेल्या परवानगीकरता मी त्यांचा आभारी आहे. सुधाकर देशमुख)
शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर या नाटकात कॅशियस ब्रूटसला म्हणतो “काही वेळा तरी माणूस आपल्या प्राक्तनाचा नियंता असतो.” खरोखरच आपण दैवाला आपल्या मुठीत ठेवू शकतो का? का आपण जे काही करतो ते सर्व पूर्वनियत असते? परमेश्वर सर्वव्यापी आणि कालातीत असल्याने त्याला काय घडणार आहे हे माहीत असणार, ह्या मुद्द्यावरच नियतवादाची भिस्त आहे. असे जर असेल तर आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती कशी काय असू शकणार? आणि जर आपल्याला अशी स्वतंत्र इच्छाशक्ती नसेल तर आपण आपल्या कृत्याला जबाबदार कसे असणार? आपण जर बँकेवर दरोडा घालणार आहोत हे आधीच ठरलेले असेल तर त्याबद्दल आपल्याला शिक्षा का व्हावी?
गेल्या काही वर्षांत नियततत्त्ववादाची बाजू विज्ञानाच्या आधारावर मांडली जात आहे. विश्व आणि विश्वातील सर्व गोष्टी ह्या काही सुनिश्चित नियमांनी केल्या आहेत असे दिसते. अशा नियमांची पूर्ण रूपरेषा अद्याप जरी आपल्याला स्पष्ट झाली नसली तरी टोकाची परिस्थिती सोडली, तर काय होऊ शकते याचे ज्ञान आपणास झाले आहे. राहिलेल्या नियमांचे ज्ञान आपल्याला नजीकच्या भविष्यकाळात होईल की नाही हे सांगता येत नाही. मी आशावादी आहे. मला असे वाटते की पुढच्या वीस वर्षांत आपल्याला सर्व नियमांचे आकलन होऊ शकेल, अशी पन्नास टक्के तरी शक्यता आहे. पण असे झाले नाही तरी फारसा फरक पडणार नाही. अगदी प्राथमिक स्थितीपासून विश्वाची उत्क्रांती ज्या नियमांनी नियंत्रित केली गेली असे नियम- असे कायदेकानून-अस्तित्वात असणे ही महत्त्वाची बाब आहे. हे नियम परमेश्वराने ठरवले असणे शक्य आहे. पण तो (किंवा ती) हे नियम मोडण्याकरिता हस्तक्षेप करत नाही असे दिसते.
विश्वाचे आदिम स्वरूप परमेश्वराने निवडले असणे शक्य आहे अथवा ते विज्ञानाच्या . नियमांनी ठरवले गेले असणे शक्य आहे. कशाही परिस्थितीत (परमेश्वराने वा विज्ञानाच्या नियमांनी) विश्वातील सर्व गोष्टींची उत्क्रांती ही विज्ञानाच्या नियमांनी बद्ध आहे, हे मात्र निश्चित, अशा परिस्थितीत आपण आपल्या दैवाचे नियंते आहोत हे म्हणणे कितपत सयुक्तिक होईल? विश्वाच्या सर्व बाबींचे नियमन हे विश्वोत्पत्तीच्या एकात्मिक प्रमेयाने (Unified theory) बद्ध आहे, ह्या कल्पनेमुळे आपल्यापुढे अनेक समस्या निर्माण होतात. पहिली ही की, एकात्मिकतेचे प्रमेय हे सुटसुटीत आणि नेमक्या गणिती सूत्रांचे आहे. कुठलाही सिद्धान्त हा सोपा आणि नेमका असला पाहिजे. अशा स्थितीत क्लिष्ट गणिती सूत्रे हे विश्वातील घटनांचे बारीकसारीक तपशील कसे ठरवू शकतील? आपल्या भोवताली घडणाऱ्या व्यामिश्र आणि लहानसहान बाबींबद्दलही सुटसुटीत गणिती सूत्रे काही सांगू शकतील, ह्यावर विश्वास बसणे अवघड आहे. स्टार टी.व्ही.च्या गीतमालेत कोणते गीत पहिल्या नंबरवर असेल किंवा फिल्मफेअरच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर कोणत्या नटीचा फोटो असेल हे, किंवा अशा क्षुल्लक बाबी एकात्मिकतेच्या प्रमेयाच्या गणितीसूत्राआधारे सांगता येतील ह्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
सर्व घटनांची निश्चिती एकात्मिक प्रमेयाने होते हे म्हणणेदेखील आपण जे काही म्हणू ते देखील त्याच प्रमेयाने पूर्वनिश्चित होते असे म्हणण्यासारखे होईल. ही दुसरी आपत्ती. एखाद्या प्रमेयाने आधीच निश्चित केलेली घटना ही बरोबर असणे जरूरी आहे का? ती चूक असण्याची शक्यताच जास्त आहे, कारण एका बरोबर विधानासोबत अनेक चुकीची विधाने संभवतात. माझ्याकडे येणाऱ्या रोजच्या टपालात अनेकजण मला आँपली प्रमेये पाठवीत असतात. ती वेगवेगळी असतात तशी ती परस्परविरोधीपण असतात. तरीपण एकात्मिक निर्मितीच्या प्रमेयाने प्रत्येक प्रमेय पाठविणाऱ्या व्यक्तीचा आपण बरोबर असल्याचा विश्वास हा देखील आधीच ठरलेला असणार हे गृहीत धरावे लागेल. असे जर असेल तर मी जे काही म्हणतो त्याला अधिक खरे का मानावे? मीदेखील त्या एकात्मिक निर्मितीच्या प्रमेयाने बद्ध नाही का?
आपण आपले निर्णय घेऊ शकतो (Free Will), म्हणजे कोणतीही कृती करण्याचे किंवा न करण्याचे निर्णयस्वातंत्र्य आपल्याला आहे अशी आपली समजूत असते. ही तिसरी आपत्ती! पण जर विज्ञानाच्या प्रमेयांनी सर्व घटना पूर्वनियोजित असतील तर आपले निर्णयस्वातंत्र्य हा भ्रमच समजावा लागेल. आणि जर आपल्याला निर्णयस्वातंत्र्य नसेल तर मग आपल्या कृत्यांची जबाबदारी आपल्यावर कशी राहील? आपण वेड्या माणसाला शिक्षा करत नाही कारण त्याचे स्वतःवर नियंत्रण असत नाही हे आपल्याला माहीत आहे. जर मग एकात्मिक विश्वनिर्मितीच्या प्रमेयाद्वारे सर्वकाही पूर्वनिश्चित असेल तर आपण काय करू हे आपल्या नियंत्रणाबाहेरचे असेल. या परिस्थितीत आपल्या कृतीबद्दल आपल्याला जबाबदार कसे धरता येईल?
अनेक वर्षांपासून ही पूर्वनिश्चितीची (Determinism) चर्चा चालू आहे. प्रथम ही चर्चा तात्त्विक स्वरूपाची होती. ही चर्चा तात्त्विकच राहिली कारण आपल्याला विज्ञानाच्या नियमांचे पूर्ण आकलन झाले नव्हते. आता प्रश्न ऐरणीवर आला आहे, कारण येत्या वीस वर्षांत आपल्याला एकात्मिक विश्वनिर्मितीच्या प्रमेयाचे पूर्णत्वाने आकलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वाची आदिस्थितीपण विज्ञानाच्या नियमांनी ठरवली गेली असावी अशी आपली धारणा आहे. पुढे जे मी सांगणार आहे ते ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी नावीन्याचा किंवा सखोल अभ्यासाचा दावा करत नाही पण मला जास्तीत जास्त जेवढे शक्य आहे तेवढा प्रयत्न मी करणार आहे.
पहिल्या आपत्तीसंबंधी – आपल्या दृष्टीस पडणाऱ्या अनेक क्षुल्लक आणि किरकोळ घटकांच्या तपशिलांनी भरलेल्या ह्या गुंतागुंतीच्या विश्वाच्या निर्मितीचा उलगडा एका सुट- सुटीत आणि सापेक्षतेने सुलभ अशा प्रमेयाद्वारे करणे कसे शक्य आहे, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला क्वांटम मेकॅनिक्सच्या अनिश्चिततेच्या तत्त्वात मिळते. ते तत्त्व सांगते- एकाच- वेळी आपण स्थाननिश्चिती नेमकेपणाने करण्याचे ठरवले तर आपल्याला गती नेमकेपणाने सांगता येणार नाही, आणि जर आपण गती नेमकेपणाने मोजण्याचे ठरवले तर स्थाननिश्चिती नेमकेपणाने करता येणार नाही. ही अनिश्चितता जेव्हा वस्तू एकमेकापासून दूर अंतरावर असतात- आजच्यासारख्या-तेव्हा महत्त्वाची असत नाही. कारण स्थानाची लहानशी अनिश्चितता फारसा फरक करू शकत नाही. पण विश्वनिर्मितीच्या आदिम अवस्थेत जेव्हा सर्व घटक परस्परांजवळ होते तेव्हा ही अनिश्चितता फार मोठ्या प्रमाणावर होती. त्यावेळी विश्वाच्या अनेकविध स्थितींची शक्यताही जास्त होती. ह्या वेगवेगळ्या विश्वनिर्मितीच्या स्थितींतून विश्वाचा वेगवेगळा इतिहास असू शकणारे अनेक प्रकार उत्क्रांत होण्याची शक्यताही होती. ढोबळ प्रमाणात हे सर्व इतिहास सारखेच असणार आणि ते नियमित (Uniform, Smooth) आणि प्रसरण पावणाऱ्या विश्वाशी सुसंगतच असणार. तथापि तपशिलाच्या पातळीवर (तारकांच्या स्थिती आणि मासिकांच्या मुखपृष्ठावर कुणाचा फोटो असेल, जर त्या इतिहासात मासिके असतील तर) मात्र हा इतिहासात बरीच भिन्नता असण्याची शक्यता आहे. एवंच प्राथमिक स्थितीतील अनिश्चिततेमुळेच आपल्या भोवतालच्या विश्वाची व त्यातील तपशिलाची व्यामिश्रता निर्माण झाली आहे. ह्यामुळेच विश्वाच्या विविध इतिहासांची शक्यता निर्माण होते. दुसऱ्या महायुद्धात नाझींचा विजय झाला असाही इतिहास असणाऱ्या विश्वनिर्मितीची शक्यता होती – जरी शक्यता कमी असली तरी. पण आपण आहे तो इतिहास असलेल्या विश्वात (दोस्त राष्ट्रे जिंकण्याचा इतिहास असलेल्या विश्वात किंवा फिल्मफेअरवर विशिष्ट नटीचा फोटो असलेल्या विश्वात) आहोत इतकेच.
आता मी दुसऱ्या आपत्तीकडे वळतो. जर आपण ज्या कृती करणार आहोत त्या विश्वनिर्मितीच्या एकात्मिक प्रमेयाने ठरणार असतील तर त्या प्रमेयाने आपण काढलेले विश्वासंबंधीचे निष्कर्ष बरोबर असतील, चूक असणार नाहीत, असे का ठरवावे? आपण जे म्हणतो त्याला वैधता का असावी? माझे या प्रश्नाला उत्तर डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या कल्पनेवर आधारित आहे. योगायोगाने झालेल्या अणुसंयोगाने विश्वातील सजीव सृष्टीची निर्मिती उत्स्फूर्त (spontaneous) झाली असावी असे मला वाटते. ह्या सजीवांचे आदिम स्वरूप एकदा मोठा रेणू असणेही शक्य आहे. पण बहुधा तो डीएनए नसावा कारण डीएनए सारख्या गुंतागुंतीच्या स्वरूपाची निर्मिती केवळ योगायोगाने होणाऱ्या अणुसंयोगाने होईल ह्याची शक्यता फार कमी आहे.
जीवाच्या आदिम स्वरूपाचे पुनरुत्पादन झाले असावे. अनिश्चिततेचा सिद्धान्त आणि अणूंची तापमानामुळे इतस्ततः होणारी भ्रमंती, random thermal motion, ह्या दोन तत्त्वांच्या आधारे आपण असे अनुमान काढू शकतो की पुनरुत्पादनात चुका झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चुकांपैकी बहुतेक चुकांचा परिणाम इतका गंभीर असणार की त्यामुळे जीवांचे अस्तित्त्व किंवा त्याची पुनरुत्पादनक्षमता, दोन्हीही धोक्यात आली असणार. त्या चुका पुढील पिढीत संक्रमित होण्याची शक्यताच नाही कारण चुकांमुळे अस्तित्वच नष्ट झाले असणार. पण योगायोगाने काही चुका जीवाच्या अस्तित्वाला फायदेशीर ठरल्या असण्याची शक्यताही आहे. अशा फायदेशीर ठरलेल्या चुकांमुळे त्या जीवाच्या अस्तित्वाच्या आणि पुनरुत्पादनाच्या शक्यता अर्थातच अधिक असणार. अशा रीतीने मूळच्या असुधारित जीवाला बाजूला सारून हे नवीन जीव उत्क्रांत झाले असावेत.
डीएनए (double helix) च्या रचनेचा विकास हा आदिम अवस्थेतील झालेल्या सुधारणांपैकी एक असावा. ही अशा प्रकारची सुधारणा होती की तिने आधी असलेल्या जीवाची-ते कसेही असले तरी-जागा घेतली. जशीजशी उत्क्रांती होत गेली तसातसा केंद्रीय मज्जासंस्थेचा विकास झाला असावा. इंद्रियाकडून आलेल्या संवेदनांचा योग्य अर्थ लावून योग्य ती कारवाई करणाऱ्या जीवाच्या अस्तित्वाची आणि पुनरुत्पादनाची शक्यता जास्त असणार हे उघडच आहे. मानवाने हे दुसऱ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. आपण डीएनएच्या रचनेच्या दृष्टीने उत्क्रांत अशा वरच्या श्रेणीच्या माकडासारखेच आहोत. पण डीएनएमधील एका लहानशा बदलामुळे भाषा विकसित करणे आपल्याल शक्य झाले. याचा अर्थ आपल्याला आपला समृद्ध अनुभव आणि ज्ञान पुढील पिढीला मौखिक आणि कालांतराने लिखित स्वरूपात संक्रमित करणे शक्य झाले असावे. ह्याआधी योगायोगाने होणाऱ्या पुनरुत्पादनातील चुकांमुळे घडणाऱ्या डीएनएच्या रचनेतील बदलामुळेच आपले अनुभव पुढील पिढीला संक्रमित करणे शक्य झाले असावे. हा जो बदल आहे त्याने उत्क्रांतीचा वेग वाढवला आहे. मानव विकसित होण्यास तीन अब्ज वर्षांचा काळ लागला पण गेल्या दहा हजार वर्षांच्या काळात आपण लिखित स्वरूपाची भाषा तयार केली आहे. त्यामुळेच गुहेत राहणाऱ्या माणसापासून विश्वाच्या उत्पत्तीच्या सिद्धान्ताबद्दल प्रश्न विचारणाऱ्या माणसापर्यंत आपला विकास शक्य झाला आहे.
गेल्या दहा हजार वर्षांत मानवी डीएनए रचनेत किंवा जीवशास्त्रीय उत्क्रांतीत काहीही बदल झालेला नाही. ह्याचाच अर्थ आपली बुद्धिमत्ता आणि ऐंद्रिय संवेदनांकडून आलेल्या माहितीआधारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता ही गुहेत राहणाऱ्या माणसाच्या काळात होती तितकीच जुनी असावी किंवा त्यापेक्षाही जुनी असावी. इतर प्राण्यांना मारण्याची क्षमता आणि दुसऱ्या प्राण्यांकडून न मारले जाण्याइतके कौशल्य ह्या दोन गोष्टींच्या निवडीनेच हे शक्य झाले असावे. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी निवडीच्या तत्त्वानुसार विकसित झालेल्या मानसिक क्षमता ह्या आपल्याला आजच्यासारख्या सर्वस्वी वेगळ्या परिस्थितीतही कामाला येत आहेत, हे विशेष आहे. विश्वाच्या निर्मितीच्या एकात्मिक सिद्धान्ताचा शोध लावण्यामुळे किंवा नियतवादाबद्दलच्या अनुषंगाने उत्तरे शोधण्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत कदाचित फरक पडणार नाही. तथापि आपल्यामध्ये इतर बाबींकरता विकसित झालेल्या बुद्धिमत्तेमुळे ह्या प्रश्नांना अचूक उत्तरे शोधण्यास मदत होणार आहे.
आता मी माणसाचे निर्णयस्वातंत्र्य आणि त्याने केलेल्या कृत्याची त्याची जबाबदारी ह्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळतो. आपण कोण आहोत आणि आपण काय करावे ह्याबाबत निर्णय घेण्यास आपण समर्थ आहोत अशी आपली भावना असते. पण तो एक भ्रम असण्याची शक्यताही आहे. जसे काहीजणाना आपण ख्रिस्त किंवा नेपोलियन आहोत असे वाटते. अर्थातच त्यात काही तथ्य नसते हे उघडच आहे. म्हणजे आपल्याला काय वाटते ह्यापेक्षा एखाद्या प्राण्यात निर्णयस्वातंत्र्य आहे किंवा नाही हे त्रयस्थपणे ठरवणारी बाह्य यंत्रणा असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ गृहीत धरा की दुसऱ्या ग्रहावरील एखादी ‘लहान हिरवी व्यक्ती’ आपल्याला भेटावयास आली तर तिला स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता आहे की आपल्यासारखीच प्रतिक्रिया देण्याचा कार्यक्रम शिकवलेला तो एखादा यंत्रमानव आहे हे आपण कसे ठरवणार?
प्राण्याच्या वर्तणुकीचे अचूक भाकीत आपण करू शकतो का, हीच त्या प्राण्याला निर्णयस्वातंत्र्य आहे किंवा नाही हे ठरवण्याची तटस्थ आणि निर्णायक कसोटी मानावी लागेल. जर आपण असे भाकीत करू शकलो तर निर्णयस्वातंत्र्य नाही असेच समजावे लागेल. आणि सर्व गोष्टी पूर्वनिश्चित आहेत असेच समजावे लागेल. उलटपक्षी जर आपण असे भाकीत करू शकलो नाही तर त्या प्राण्याला आपण केलेल्या व्याख्येप्रमाणे निर्णयस्वातंत्र्य आहे असे समजावे लागेल.
एकदा आपल्याला विश्वनिर्मितीच्या एकात्म सिद्धान्ताचे संपूर्ण आकलन झाले म्हणजे आपण लोक काय करतील ह्याचे भाकीत करू शकू, ह्या बाबीवर निर्णयस्वातंत्र्याच्या आपण केलेल्या कामचलाऊ व्याख्येला एखादी व्यक्ती हरकत घेऊ शकेल, तथापि मानवी मेंदूदेखील अनिश्चततेच्या नियमाने बद्ध आहे. त्यामुळेच मानवी वर्तनात क्वांटम मेकॅनिक्सच्या अनिश्चततेच्या तत्त्वामुळे एक प्रकारची अनिश्चितता randomness दिसून येते. पण मेंदूमध्ये वापरली जाणारी ऊर्जा इतकी नगण्य असते की त्यामुळे क्वांटम मेकॅनिक्सच्या अनिश्चिततेचा परिणामही अल्प असतो. आपण मानवी वर्तनाचे भाकीत करू शकत नाही. ह्याचे कारण ते फार अवघड आहे. मेंदूच्या कार्याचे नियंत्रण करणारे मूलभूत भौतिकी नियम आपल्याला यापूर्वीच माहीत आहेत आणि ते तौलनिकदृष्ट्या बरेचसे सोपेही आहेत. पण अधिक कण गुंतलेले असतील तर गणित सोडवणे फारच कठीण होते. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या साध्या गोष्टीतही आपण फक्त दोन कणांचे गणितच सोडवू शकतो. तीन किंवा अधिक कणांच्या गणितात अंदाजाचा आधार घ्यावा लागतो आणि जसजशी कणांची संख्या वाढत जाते तसतशा अडचणीही वाढतच जातात. मानवी मेंदूत 10 किंवा 100 दशलक्ष billion billion इतके कण असतात. मेंदूची पूर्वस्थिती आणि संवेदनाच्या नोंदी जरी आपल्याला दिल्या तरी ही प्रचंड संख्या पाहता आपल्याकरता हे समीकरण सोडवणे अशक्य कोटीतीलंच आहे. त्यामुळे मानवी वर्तनाचे भाकीतही कसे अशक्य आहे हे लक्षात येईल. सुरुवातीची मानवी मेंदूची परिस्थितीही आपण मोजू शकत नाही, कारण तसे करावयाचे झाल्यास आपल्याला मेंदूचे तुकडे करावे लागतील. तसे आपण करू धजलो तरी त्यांची संख्या ही आपण नोंद करू शकू त्याहीपेक्षा जास्त असेल. शिवाय मेंदू हा आदिम स्थितीत संवेदनशील असतो. सुरुवातीच्या स्थितीत थोडाही बदल पुढे होणाऱ्या वर्तनात मोठा बदल घडवतो. म्हणून जरी आपल्याला मेंदूचे नियंत्रण करणारी मूलभूत समीकरणे माहीत असली तरी मानवी वर्तनाचे भाकीत करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणे शक्यतेपलीकडचे आहे. विज्ञानात ही परिस्थिती कोणत्याही साध्या डोळ्यांनी दिसणाऱ्या व्यवस्थेत आढळून येते. कारण त्या व्यवस्थेत कणांची संख्या इतकी मोठी असते की मूलभूत समीकरणे सोडवणे जवळजवळ अशक्य कोटीतील बाब बनते. आपण मग अशा वेळी परिणामकारक सिद्धांताचा उपयोग करतो. त्या सिद्धांतात कणांची (अव्ययाची) मोठी संख्या ही लहान संख्येत रूपांतरित करून मांडली जाते. अर्थात हे गणित नेमके असत नाही… उदाहरणार्थ द्रव पदार्थाच्या गतिशास्त्राचे fluid mechanics चे, पाण्यासारख्या द्रव पदार्थात अगणित परमाणू असतात. हे परमाणू इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सनी बनलेले असतात. असे असले तरी द्रव पदार्थाला गती, घनता आणि तापमान असलेले प्रवाही माध्यम continuous medium समजणे उचित ठरते. पदार्थाच्या गतिशास्त्राच्या कामचलाऊ सिद्धान्ताची उत्तरे नेमकी असत नाहीत – कोणत्याही हवामान खात्याचा अंदाज ऐकावा – पण ती जहाजबांधणी किंवा पाईप लाईन टाकण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतात.
द्रवाच्या गतिशास्त्राप्रमाणेच निर्णयस्वातंत्र्य आणि आपण केलेल्या कृत्याची नैतिक जबाबदारी ह्या कल्पनादेखील कामचलाऊ सिद्धान्तच आहेत. आपण जी काही कृत्ये करतो ती सर्व काही विश्वनिर्मितीच्या एकात्मिक सिद्धान्ताने नियंत्रित केली गेली असतील हे शक्य आहे. त्याप्रमाणे आपण गळफास घेऊन मरणार असे निश्चित झाले असेल तर आपण बुडून मरण्याची शक्यता नाही. तरीपण वादळात एखाद्या लहान बोटीने समुद्रात जाण्यापूर्वी आपण गळफासाने मरणार आहोत ह्याची संपूर्ण खात्री झाली असली पाहिजे. जे लोक नियतवादावर विश्वास ठेवतात आणि जे पूर्वनियत आहे ते आपण बदलू शकत नाही ह्यावर ज्यांचा विश्वास आहे ते रस्ता ओलांडताना मात्र दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवत असतात हे आपल्या परिचयाचे आहे. हेही शक्य आहे की रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना न बघणारे आपली कथा सांगण्यास जिवंतच राहत नाहीत.
आपण आपला व्यवहार सर्व गोष्टी पूर्वनियत (पूर्वनिश्चित) आहेत असे समजून करू शकत नाही. कारण पूर्वनियत काय आहे हे आपल्याला ठाऊक असत नाही. त्याऐवजी आपल्याला निर्णयस्वातंत्र्याचा आणि आपल्या कृत्याच्या जबाबदारीचा परिणामकारक सिद्धान्त वापरणे सोईचे असते. हा सिद्धान्त मानवी वर्तनाचे भाकीत करण्यास चांगला आहे असे नाही पण तोच आपल्याला वापरावा लागणार आहे. कारण मूलभूत नियमानुसार तयार होणारी अगणित समीकरणे सोडवणे आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. निर्णयस्वातंत्र्यावर विश्वास ठेवण्यास डार्विनच्या सिद्धांताचाही उपयोग करता येऊ शकेल. आपल्या कृत्याला आपण जबाबदार आहोत ह्यावर विश्वास असणाऱ्या व्यक्तींनी बनलेला समाजच कार्यरत राहून आपल्या मूल्यांचा प्रसार करू शकेल. मुंग्यादेखील एकत्रित काम करतात हे आपल्याला माहीत आहे. पण असा समाज स्थितिवादी असतो. तो अनपेक्षित आह्वान स्वीकारू शकत नाही, अथवा नवीन संधीचा विकासही करू शकत नाही.
निर्णयस्वातंत्र्य असलेल्या व्यक्तींचा एक ध्येय असलेला समूह आपल्या ध्येयाकरिता परस्पर सहकार्य करूनदेखील नवीन बदल innovation करण्याइतपत लवचीक असू शकतो. अशा रीतीने असा समाजच अधिक समृद्ध होऊ शकतो. आणि आपल्या मूल्यसंस्थेचा प्रसार करू शकतो. निर्णयस्वातंत्र्याची Free will संकल्पना ही विज्ञानाच्या मूलभूत नियमांच्या क्षेत्रापेक्षा निराळ्या क्षेत्रातील आहे. जर आपण विज्ञानाच्या नियमानुसार मानवी वर्तनाचे भाकीत करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्व-संदर्भाच्या (self referencing) तर्कशास्त्रीय शृंगापत्तीत अडकतो. जर आपण जे करतो त्याचे भाकीत विज्ञानाच्या मूलभूत नियमाप्रमाणे करू शकलो तर असे भाकीत करण्यामुळे पुढे काय घडणार आहे हेही आपण बदलू शकू. ही आपत्ती कालप्रवास शक्य झाल्यास निर्माण होणाऱ्या आपत्तीसारखीच आहे. आपण असा प्रवास कधीकाळी करू शकू असे मात्र वाटत नाही ही गोष्ट वेगळी. जर तुम्ही भविष्यात काय होणार हे समजू शकणार असाल तर तुम्ही ते बदलूही शकता. घोड्याच्या शर्यतीत कोणता घोडा जिंकणार हे तुम्हाला माहीत असेल तर त्यावर पैज लावून तुम्ही श्रीमंत बनू शकता. पण अशी कृती संभवनीयताच बदलून टाकील. काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हे समजण्याकरिता आपल्याला भविष्याकडे माघारी वळण्यानेच back to future असा प्रवास करावा लागेल.
आपण आपल्या कृत्याचे भाकीत करू शकण्याची शृंगापत्ती मी आधी सांगितेल्या आपत्तीशी संबंधितच आहे. ती आपत्ती ही की अंतिम मूलभूत सिद्धान्त, आपण अंतिम मूलभूत सिद्धान्तानुसार योग्य निर्णयावर येऊ किंवा नाही हेही ठरवू शकेल काय? तशा परिस्थितीत डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धान्त उपयोगी पडू शकेल असे मी म्हटले होते. योग्य उत्तर असे म्हणणेही कदाचित बरोबर होणार नाही. पण नैसर्गिक निवडीचे तत्त्व आपल्याला चांगल्या रीतीने उपोयगी पडतील अशा भौतिक नियमांकडे आपल्याला घेऊन जाईल. तथापि असे नियम आपण मानवी वर्तनाचा अंदाज बांधण्याकरिता दोन कारणांनी लागू करू शकत नाही. पहिले – आपण समीकरणे सोडवू शकत नाही आणि दुसरे – जरी आपण भाकीत करू शकलो तर तसे करणे व्यवस्थेलाच बाधा आणील. त्याऐवजी नैसर्गिक निवडीचा सिद्धान्त आपल्याला निर्णयस्वातंत्र्याच्या परिणामकारक सिद्धान्ताकडे नेऊ शकतो. जर आपण व्यक्तीच्या कृती ह्या त्याने स्वतःच्या निर्णयाने घेतल्या आहेत असे गृहीत धरत असू तर त्या काही बाबतीत बाहेरच्या शक्तीकडून ठरवल्या गेल्या आहेत असे आपण म्हणू शकणार नाही. जवळजवळ निर्णयस्वातंत्र्य almost free will ह्या संकल्पनेला काही अर्थ असत नाही पण आपण एखादी व्यक्ती कोणता निर्णय घेईल ह्याचा अंदाज बांधू शकलो तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला निर्णयस्वातंत्र्य नाही असा होऊ शकत नाही. जसे मी तुम्ही संध्याकाळी जेवणार आहात असा अंदाज करू शकतो पण तुम्हाला उपाशी झोपण्याचे निर्णयस्वातंत्र्य पण आहेच. अशा प्रकारच्या गोंधळाचे एक उदाहरण म्हणजे कमी होणाऱ्या जबाबदारीचे तत्त्व : एखादी व्यक्ती दबावाखाली stress असल्याने त्या व्यक्तीच्या समाजविरोधी कृत्याकरिता तिला शिक्षा दिली जाऊ नये असे म्हणणे. समाजविरोधी कृत्य करताना व्यक्ती दबावाखाली असण्याची शक्यता आहे हे खरे पण त्याचा अर्थ असा नव्हे की अशा कृत्याकरिता शिक्षा कमी करून अशी कृत्ये करण्याची शक्यता आपण वाढवावी!
आपण विज्ञानाचे मूलभूत नियम आणि मानवी वर्तनाचा अभ्यास दोन्ही वेगवेगळ्या कप्प्यात ठेवले पाहिजेत. वर सांगितल्याप्रमाणे आपण विज्ञानाच्या मूलभूत नियमानुसार मानवी वर्तनाचे भाकीत करू शकत नाही. पण नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्ताप्रमाणे आपल्यात विकसित झालेली बुद्धी आणि तर्कशास्त्राची विचारपद्धती यांचा उपयोग आपण त्याकरिता करू शकू अशी आशा करावयास हरकत नाही. दुर्दैवाने नैसर्गिक निवडीच्या तत्त्वामुळे आणखी काही आक्रमकतेसारखी वैशिष्ट्येही आपण विकसित केली आहेत. आक्रमणाचा उपयोग अस्तित्वाच्या लढाईत गुहेत राहणाऱ्या किंवा त्यापेक्षा आधीच्या मानवाला झाला असल्यामुळे ते वैशिष्ट्य नैसर्गिक निवडीनुसार अंगभूत झाले असणे शक्य आहे. पण आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या प्रचंड वाढलेल्या संहारक शक्तीमुळे सर्व मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात आल्याने आक्रमकता हे धोकादायक वैशिष्ट्य झाले आहे. आक्रमणाची ही प्रवृत्ती आपल्या डीएनएमध्ये मुद्रांकित झाली असावी हीच खरी अवघड गोष्ट आहे.. डीएनएतील जीवशास्त्रीय उत्क्रांतीमुळे होणारे बदल प्रस्थापित होण्यास कित्येक हजार वर्षे लागतात. याउलट आपली संहारक शक्ती मात्र माहितीच्या उत्क्रांतीप्रमाणे 20-30 वर्षांतच वाढली आहे. आपण आपली बुद्धी वापरून आक्रमणावर नियंत्रण आणू शकलो नाही तर मानवी भवितव्यच धोक्यात आहे. तरीपण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे. जर आपण पुढील शंभर वर्ष टिकू शकलो तर आपण दुसऱ्या ग्रहावर किंवा कदाचित ताऱ्यावर पण गेलेले असू. त्यामुळे अणुयुद्धासारख्या भयानक धोक्यातून सर्व मानवजात नष्ट होण्याचा धोका दुरावेल.
पुन्हा उजळणी – विश्वातील प्रत्येक घटना ही पूर्वनिश्चित आहे असा आपला विश्वास असला तर निर्माण होणाऱ्या अनेक आपत्ती मी मांडल्या आहेत. ही पूर्वनिश्चिती सर्वशक्तिमान परमेश्वरामुळे आहे की विज्ञानाच्या नियमानुसार आहे हा मुद्दा गैरलागू आहे. विज्ञानाचे नियम हेही परमेश्वराच्या इच्छाशक्तीचीच अभिव्यक्ती आहे असेही आपण नेहमीच म्हणू शकू.
मी तीन प्रश्नांचा विचार केला. साध्या समीकरणाच्या सहाय्याने विश्वाच्या सर्व बारीकसारीक क्षुल्लक घटना कशा काय ठरवल्या जाऊ शकतात? त्याऐवजी परमेश्वर फिल्मफेअरच्या मुखपृष्ठावर कुण्या सिनेतारकेचा फोटो असेल अशा क्षुल्लक बाबी ठरवतो असे आपण म्हणू शकू काय? क्वांटम मेकॅनिक्सच्या अनिश्चिततेच्या तत्त्वामुळे विश्वाचा एकच एक इतिहास नाही तर विविध इतिहास असलेल्या विश्वांच्या निर्मितीची शक्यता निर्माण होते. ढोबळ प्रमाणात ते सर्व इतिहास सारखेच असले तरी रोजच्या व्यवहारात त्यात पुष्कळ बदल असतील. आपण काही विशिष्ट गुणधर्म आणि तपशील असलेल्या इतिहासात आहोत इतकेच. पण कोण जग जिंकेल किंवा गीतमालेत पहिल्या नंबरवर कोणते गीत आहे ह्यासारख्या लहानसहान गोष्टींत बदल असणारा इतिहास असणाऱ्या दुसऱ्या विश्वात आपल्यासारखेच बुद्धिमान जीव आहेत अशी शक्यता आहे. असा रीतीने आपल्या विश्वातील बारीकसारीक घटनांच्या तपशिलाचे कारण मूलभूत नियमामध्ये अनुस्यूत असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सच्या अनिश्चिततेच्या तत्त्वात आहे.
दुसरा प्रश्न होता, जर प्रत्येक घटना मूलभूत सिद्धान्तानुसार पूर्वनिश्चित असेल तर आपण ज्या सिद्धान्ताबद्दल बोलतो तोही पूर्वनिश्चित असला पाहिजे. आपण जे सिद्धान्ताबद्दल म्हणतो तेही पूर्वनिश्चित असेल आणि तेही पूर्वनिश्चिततेच्या सिद्धान्तावर अवलंबून असेल तर मग पूर्वनिश्चिततेने जे ठरले आहे हे बरोबर की चूक? ते अगदी चूक किंवा गैरलागू का नाही? माझे उत्तर डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार होते. ज्या व्यक्तीने सभोवतालच्या जगासंबंधी योग्य निष्कर्ष काढले आहेत त्याच व्यक्ती टिकून राहण्याची आणि त्यांच्याकडूनच पुनरुत्पादन होण्याची शक्यता आहे.
तिसरा प्रश्न होता जर सर्वच घटना पूर्वनिश्चित असतील तर आपल्या निर्णयस्वातंत्र्याचे आणि आपल्या कृत्याकरिता आपण जबाबदार असण्याच्या तत्त्वाचे काय? आपण एखाद्या प्राण्याच्या वर्तनाचे भाकीत करू शकतो का हीच एक तटस्थ निर्णायक कसोटी एखाद्या प्राण्याला निर्णयस्वातंत्र्य आहे की नाही हे ठरविण्याकरिता लावता येईल. विज्ञानाच्या मूलभूत नियमांचा उपयोग आपण माणसाच्या वर्तनाचे भाकीत करण्यास करू शकत नाही. ह्याची दोन कारणे. पहिले – अनेक कण गुंतलेले असल्याने आपण समीकरण सोडवू शकत नाही. आणि दुसरे – जरी आपण ती समीकरणे सोडवू शकलो तरी तसे करण्याने प्रणालीतील व्यवस्थेत बदल होतील आणि त्यामुळे वेगळ्याच परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल. आपण मानवी वर्तनाचे भाकीत करू शकत नसलो तरी माणसाला निर्णयस्वातंत्र्य आहे आणि काय करावयाचे ते तो ठरवू शकतो ह्या आपल्या कृत्याला जबाबदार असणे हे आपल्या अस्तित्वाकरिता नक्कीच फायदेशीर आहे. ह्याचा अर्थ हा आपला विश्वास नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार पुनः प्रतिष्ठित व्हावयास हवा. भाषेद्वारे संक्रमित झालेली जबाबदारीची जाणीव डीएनए द्वारा संक्रमित झालेल्या आक्रमणाच्या उपजत गुणाला काबूत ठेवण्यास समर्थ आहे का हे पहावे लागेल. जर असे घडू शकले नाही तर मानवाच्या नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेचा तो शेवटच ठरेल. दुसऱ्या ग्रहमालेतील ग्रहावर राहणारे बुद्धिमान जीव जबाबदारी आणि आक्रमण ह्यांचे संतुलन राखू शकले असण्याची शक्यता आहे. पण असे असेल तर ते आपल्याशी संपर्क ठेवतील अशी आपण अपेक्षा करू शकतो. निदान त्यांचे सांकेतिक संदेश तरी आपल्याला माहीत व्हावे लागतील. शक्य आहे त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव असेल पण ते आपल्यासमोर यावयास तयार नसतील. आपला इतिहास पाहता तसेच करणे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे.
सारांश – ह्या निबंधाचा विषय एक प्रश्न होता. सर्व काही पूर्वनियत आहे काय? उत्तर होय असे आहे पण तसे नसण्याची शक्यतापण आहे कारण काय पूर्वनियत आहे हे आपणास कधीच समजू शकणार नाही! देशमुख हॉस्पिटल, उदगीर – 413517