‘आजचा सुधारक’ (जाने-फ्रेबु 2004) मधील श्री. वि. शं. ठकार यांचा वरील विषयावरील लेख बराच चिंतनीय पण विवाद्य वाटला. त्या विषयाची दुसरी बाजू सांगण्याचा हा प्रयत्न.
दोन भिन्न ज्ञानशाखा :- ज्ञानाचा शोध कसा चालतो ते प्रथम पहावयास हवे ज्ञाता (जाणणारा), ज्ञेय (जे जाणावयाचे ते, जाणावयाचा विषय) व ज्ञान ही त्रिपुटी सर्वपरिचित आहे. माणसाच्या ज्ञानार्जनातच त्याचे अज्ञान उघडे पडते आणि शेवटी माणसाला आपल्या ज्ञानापेक्षा अज्ञानाची खात्री पटते. हा एक विरोधाभास आहे. ज्ञानाचा शोध दोन दिशांनी चालतो. ज्यावेळी ज्ञेयाला प्राधान्य देऊन ज्ञानाचा शोध चालतो, त्यावेळी विज्ञानाची प्रचंड वाढ होते व जडवादी (विज्ञानवादी) दर्शनाला महत्त्व येते. उलट ज्यावेळी ज्ञात्याला प्राधान्य देऊन ज्ञानाचा शोध चालतो, त्यावेळी नीतितत्त्वांची, श्रद्धेची व आत्मज्ञानाची वाढ होते आणि सूक्ष्मवादी (अध्यात्म) दर्शनाला महत्त्व येते. जडवादी दर्शनात बाह्य जगाला ज्ञानव्यापाराचे केंद्र बनवले जाते तर सूक्ष्मवादी दर्शनात ज्ञात्याला किंवा आतील जगाला ज्ञानव्यापाराचे केंद्र बनवले जाते. अध्यात्म व विज्ञान दोन्ही अनुभवावर भर देतात. पण विज्ञानाचा पाया असणारा अनुभव पूर्ण इंद्रियाधीन असतो तर अध्यात्माचा पाया असणारा अनुभव पूर्ण इंद्रियातीत असतो. इंद्रियांना येणाऱ्या अनुभवांचे निरीक्षण, परीक्षण व वर्गीकरण करून त्यांचे नियम शोधून काढणे हे विज्ञानाचे काम आहे; तर इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सूक्ष्मतत्त्वाचे सर्व अनुभव लक्षात घेऊन जगाचे स्वरूप ठरवणे आणि जीवनाचे सर्वोत्तम मूल्य सांगणे हे अध्यात्माचे काम आहे. इंद्रियांनी निरीक्षण व बुद्धीने परीक्षण ही विज्ञानाची रीत आहे; तर विवेक आणि ध्यान ही अध्यात्माची रीत आहे. विज्ञानामध्ये बाहेर दिसणारे जग व त्यातील घटनांचे अधिकाधिक शक्तिशाली साधनांच्या साहाय्याने निरीक्षण करून त्यांचे नियम शोधून काढणे व असे करीत करीत विश्वाच्या निर्मितीचा, रचनेचा व पुढील वागण्याचा शोध घेत परिपूर्ण एकीकृत सिद्धांत शोधून काढणे हे विज्ञानाचे (निदान सैद्धांतिक पदार्थविज्ञान शास्त्राचे) ध्येय आहे. अध्यात्मामधे ‘मी कोण आहे, हे जग काय आहे, माझा व जगाचा संबंध काय आहे’ या प्रश्नांना महत्त्व आहे. दर्शनकार असे मानतात की सर्व वस्तूंना इंद्रियांनी दिसणारी म्हणजे दृश्य व इंद्रियांना न दिसणारी म्हणजे अदृश्य अशा दोन बाजू असतात. अदृश्य बाजू सूक्ष्म असून वस्तूच्या दृश्य रूपाला आधार देते. दृश्य रूपाचे ज्ञान वर सांगितल्याप्रमाणे विज्ञानाच्या क्षेत्रात पडते तर अदृश्य रूपाचे ज्ञान अध्यात्माच्या क्षेत्रात पडते. अदृश्य बाजू रूपाला आधारभूत असते असे मानले (उदा. दृश्य शरीराला अदृश्य प्राण व जाणीव यांचा आधार असतो) म्हणजे या दृश्य विश्वाला आधारभूत असे काहीतरी तत्त्व असले पाहिजे हे तर्काने आपोआपच येते. ते तत्त्व चैतन्यमय असले पाहिजे हे ही ओघाने येते कारण त्याशिवाय या विश्वातील घटनांचे स्पष्टीकरण देता येत नाही. या चैतन्यमय तत्त्वालाच अध्यात्मात आत्मस्वरूप (किंवा ब्रह्म) म्हणतात. हे तत्त्व संपूर्ण विश्वाला व त्यातील सर्व वस्तू व प्राणिमात्रांना व्यापून आहे. तर्काने हे सिद्ध झाल्यानंतर या आत्मस्वरूपाचा अनुभव घेणे ही अध्यात्मातील उच्चतम पायरी किंवा ध्येय आहे. अध्यात्मामध्ये जाणणारा (ज्ञाता) तोच व जे जाणावयाचे (ज्ञेय)ते तोच अशी स्थिती असते व ज्ञान झाले की ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान ही त्रिपुटी संपते. विज्ञानामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यापेक्षा नेहमीच वेगळे असते. यावरून अध्यात्म व विज्ञान या दोन ज्ञानशाखांचे कार्यक्षेत्र व मार्ग भिन्न आहेत असे दिसते. त्यामुळे त्यांच्यात विरोध असण्याचे कारण नाही.
परंतु शेवटी विज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. त्यापलीकडे अध्यात्माची गरज भासते. उदाहरणार्थ अमुक ठिकाणी आंब्याचे झाड का उगवले ? तर त्या ठिकाणी अमक्या माणसाने आंब्याची कोय पेरली म्हणून. पेरलेल्या कोयीमधून आम्रवृक्ष कसा निर्माण झाला याचे क्रमवार वर्णन विज्ञान करते. पण कोय पेरणाऱ्या माणसाचा हेतू काय होता, तो योग्य की अयोग्य, चांगला की वाईट याचा निर्णय देण्याची शक्ती विज्ञानापाशी नाही. कोणत्याही घटनेत असणारा हेतू विज्ञानाच्या कक्षेत येत नसल्यामुळे आणि हेतूवाचून घटना घडत नसल्याने विज्ञानाने दिलेल्या उत्तरामुळे आपल्या बुद्धीचे पूर्ण समाधान होत नाही. म्हणून विज्ञानाने निर्माण केलेले ज्ञान अत्यंत व्यवहारोपयोगी असून देखील माणसाची ज्ञानलालसा पूर्णपणे तृप्त करू शकत नाही. म्हणून विज्ञानाची कितीही वाढ झाली तरी अध्यात्माची जरूर माणसाला नेहमीच भासणार.
या संदर्भात विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम या पुस्तकाच्या श्री. वि. शं. ठकार यांनीच केलेल्या भाषांतरातील (काळाचा छोटासा इतिहास) एक दोन वाक्ये बोलकी आहेत ती अशी :-
आपल्याला वर्तवता येईल असा त्याचा अर्थ नव्हे. “आपल्याला परिपूर्ण एकीकृत सिद्धान्त जरी गवसलाच तरी सर्व घटनांचे भाकीत गणिती समीकरणानुसार मानवी वर्तणुकीचे भाकीत वर्तवण्यात तर अजूनपर्यंत आपल्याला जवळजवळ अजिबातच यश आलेले नाही.’
वरील सर्व विवेचनावरून असे म्हणता येईल की विज्ञान व अध्यात्म यांचे कार्यक्षेत्र व मार्ग भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात तुलना करणे अनावश्यक आहे. ‘अंतिम सत्य’ किंवा ‘अंतिम सिद्धांत’ यांच्या शोधांत काही टप्प्यांवर काही साम्यस्थळे असू शकतात पण त्यावरून कोण कोणाकडे झुकते वगैरे प्रश्न व त्यावरील चर्चा व त्यातून दोषारोप हे ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने उपयोगी पडत नाहीत.
अध्यात्मावरील एक आक्षेप असा असतो की गेल्या तीनचार हजार वर्षांमध्ये मानवी ज्ञानाची प्रचंड वाढ झाली आहे. विज्ञानाने अनेक शोध लावून मनुष्याला सुखी केले. अध्यात्माने काय केले ? अध्यात्मात मुळीच प्रगती झालेली दिसत नाही. या प्रश्नाचे उत्तर असे की विज्ञानाचा पराक्रम दृश्य जगामध्ये असल्याने मनुष्याच्या देहाला सुख देणाऱ्या पुष्कळ सोयी निर्माण केल्या हे समजते. अध्यात्माचे क्षेत्र अदृश्यामध्ये असल्याने त्याचा परिणाम बाह्य जगात पाहणे हेच मुळी चुकीचे आहे. तो अदृश्यामध्ये असल्याने तो अंतःकरणात अनुभवायचा असतो. अध्यात्मातील प्रगतीबाबत बोलायचे तर मनुष्यप्राणी पूर्वीपेक्षा फारसा बदलला नाही म्हणून मानवी जीवनाचे मूळ प्रश्न तसेच आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे ही ते सुटलेले नाहीत.
विज्ञानाच्या संशोधनाचा वेग व प्रगती प्रचंड आहे हे निश्चित. सर्वच क्षेत्रांत व विज्ञानाच्या सर्व शाखांत गेल्या एक दीड शतकात प्रचंड संशोधन झाले आहे. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे असे ते आहे. म्हणूनच त्यासंबंधी जनसामान्यांत खूप जिज्ञासा व कुतूहल वाढलेले आहे. पण एक प्रश्न विचारावासा वाटतो. विज्ञानाचे मूलभूत शोध हे वस्तूंमधील असलेल्याच मूळ गुणधर्मांच्या बाबतीत आहेत. त्या मूल वस्तू व त्यांचे गुण- धर्म आहेत ते तसे कुणी निर्माण केले, किंवा वस्तूंचे आपसांतील नियम सापडले ते तसे का, कुणी कशासाठी कसे बनवले, याचे उत्तर विज्ञानाकडे आहे का? जे शोधांमुळे समजले त्याचा उपयोग कसा कशासाठी करावा यावर विज्ञानाने प्रचंड काम केले आहे हे खरे.
पाश्चात्त्य स्थिती वर सांगितल्याप्रमाणे पाश्चात्त्य वैज्ञानिकांनी प्रत्येक शाखेत मनुष्याला सुख- सोयी, सुविधा निर्माण करून सर्व दृष्टीने त्याचे जीवन समृद्ध केले आहे. पण तरीसुद्धा चर्च ही संस्था टिकून आहे. रविवारच्या ‘मास’ला येशूच्या जन्मदिनी, त्याच्या क्रुसि- फिकेशन स्मृतिदिनी, एरवीही पोपच्या प्रार्थनासभांतून भरपूर गर्दी असते. लग्न समारंभ, बाप्तिस्मा, अंत्यविधी पारंपारिक पद्धतीनेच पार पडतात. अत्यंत शास्त्रीय पद्धतीचा आपला अग्निसंस्कार वैज्ञानिक दृष्टि असणाऱ्या पाश्चात्त्यांनी न स्वीकारता हजारो एकर जमीन जगभर प्रेते पुरण्यासाठी वापरणे का चालू ठेवले आहे ? विज्ञानातूनच निर्माण झालेल्या अतिप्रचंड उंच, भव्य अशा ‘बिझिनेस सेंटर’च्या इमारती माथेफिरूंनी उद्ध्वस्त केल्या- नंतर अमेरिकेच्या अध्यक्षांपासून वैज्ञानिकांसहित सामान्य लोकांनी बायबलमधीलच प्रार्थना म्हटल्या व मृतांना श्रद्धांजली वाहिली. विज्ञानामुळे त्यांच्या धार्मिक, आध्यात्मिक परंपरा त्यांनी सोडलेल्या नाहीत हे लक्षात घ्यावयास हवे.
अध्यात्म निराशावादी नाही भारतीय अध्यात्माचा मूळ गाभा आधीच सांगितल्याप्रमाणे एकच चैतन्यतत्त्व (आत्मस्वरूप, ब्रह्म) विश्वात सर्वत्र व सर्व प्राणिमात्रात व्यापलेले आहे हा आहे. त्यातूनच ‘सर्वभूत समभाव’ सिद्ध झाला. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ हे जरी तत्त्व म्हणून सांगितले गेले तरी त्याचा अर्थ अंतिम सत्य एकच आहे. बाकी सर्व सगुणरूपात विविधतेने दिसत असले तरी तो शाश्वत ब्रह्माचा खेळ आहे व त्या ब्रह्माचे अधिष्ठान त्यामागे आहे. हा खेळ शाश्वत नाही. नाशवंत आहे हे तर प्रत्यक्ष अनुभवासच येते. पण या खेळातील विलास, सौंदर्य, नेटकेपणा, कला हे नाशवंत आहेत हे माहीत असूनही त्यांचा उपभोग घेऊ नये असे हे तत्त्वज्ञान सांगत नाही. तर त्यातील अशाश्वतता ध्यानांत ठेवून त्यातच गुंतून न पडता (म्हणजे अनासक्त मनाने) त्याचा आस्वाद व उपभोग निःस्वार्थीपणे व नीतिनियमांचे पालन करून अवश्य घ्यावा. पण त्याच्या पाठीशी असलेल्या चिरंतन तत्त्वाचे विस्मरण पडू देऊ नये, हा त्याचा अर्थ. ‘मिथ्या’ या शब्दामुळे ‘निराशावाद’ पसरवणे हा हेतू मुळीच नाही. निराशावादाची, वैफल्याची जगाकडे पाठ फिरवण्याची शिकवण त्यात अनुस्यूत आहे व तीच शिकवण थोड्याफार फरकाने भगवद्गीता व सर्व संतवाङ्मयातून जनसामान्यात पसरवली असे म्हणणे वस्तुस्थितीचा विपर्यास होय. भगवद्गीतेमध्ये तर अर्जुनाच्या निमित्ताने प्रत्येक मानवास विहित कर्तव्य करताना कसा विचार करावा याचा परोपरी उपदेश करून जीवनात कसे यशस्वी व्हावे याचे एक शास्त्रच सांगितले आहे. तत्कालीन संकेत कोणत्याही ग्रंथात वापरले जाणे साहजिक आहे. स्वर्ग, नरक, यज्ञ, मोक्ष इ. त्या काळातील अनेक रूढ कल्पना आजच्या युगात संकेतार्थ ध्यानात घेऊन त्यांचे अर्थ विचारात घ्यावयास हवेत. स्वर्ग, नरक, हे चांगले-वाईट, हितकारक- अहितकारक यांचे संकेत आहेत. त्या शब्दांचे शब्दार्थच फक्त घ्यावयाचे झाल्यास सर्वच जुने ग्रंथ निरुपयोगी ठरतील. स्वर्ग, नरक या संकेतार्थावरही विश्वास नसल्यास काय करावे हा निर्णय वैयक्तिक आहे. गीतेच्या सहाव्या अध्यायात पाचव्या श्लोकात ‘मनुष्याने आपला उद्धार आपण आपलाच करावयाचा असतो, आपण स्वतःला खचू देऊ नये. कारण आपणच स्वतःचा बंधु (मित्र) असतो, आणि आपणच आपला शत्रु असतो’ हे स्वच्छ सांगितले आहे. गीतेमध्ये नीतिशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र या नावाच्या आधुनिक शास्त्राच्या तत्त्वांचा ऊहापोह भरपूर आहे. संत वाङ्मयातून तर सर्व संतांनी त्यांच्या अभंगांतून, काव्यातून व प्रत्यक्ष आचरणातून ‘सर्वभूत समभाव’ व ‘सहसंवेदना’ या गोष्टी सामान्य माणसावर बिंबवल्या आहेत. संत एकनाथांनी काशीहून आणलेली गंगा रामेश्वरला नेताना तहानेने व्याकुळ झालेल्या मरणोन्मुख गाढवाच्या तोंडात घातली हे या शिकवणुकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांनी सरकारी रोषाची पर्वा न करता धान्याची कोठारे दुष्काळात गरीब लोकांना खुली केली. एक ना दोन अशी शेकडो उदाहरणे संतचरित्रांत सापडतील.
संस्कृतीतील चढउतार जगात कोठेही सामाजिक संस्थांच्या चौकटीत माणूस जीवन जगतो. मानवी संस्कृती दिक्कालाच्या परिसरात वावरणारी घटना आहे. त्यामुळे संस्कृतींनाही चांगला व वाईट काळ असतो. त्यांचे आयुष्य त्यांच्यातील बीजशक्तीवर अवलंबून असते. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर संस्कृतीमधील प्रधानमूल्य क्षीण होते. व त्याचे कडक कवच तेवढे शिल्लक उरते. उदा. वेदकालीन समाजामध्ये यज्ञसंस्थेला मोठेच महत्त्व होते. यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या देवता यज्ञकर्त्याच्या कामना पूर्ण करतात असा बहुजन समाजाचा दृढ विश्वास झाला होता. अनेक प्रकारचे अंतिशय गुंतागुंतीचे यज्ञ प्रचारात आले व भरमसाठ कर्मकांड फोफावले. यज्ञाचा मूळ हेतूच लोपला. त्या वेळच्या समाजातील विचारवंतांना ही परिस्थिती चिंताजनक वाटली व त्यांच्या विचारमंथनांतून व खोलवर चिंतनातून उपनिषदे निर्माण झाली. शुद्ध ज्ञानाचा स्रोत उपनिषदांतून आपल्याकडे आला. वेदांचे उत्तरांग म्हणून वेदान्तात उपनिषदे धरली जातात. वेदांची ती खरी सुधारित श्रेष्ठ आवृत्ती आहे. भ्रष्ट यज्ञसंस्थेला बाजूस सारून झालेली ही निर्मिती आहे. संस्कृतीमध्ये निर्माण झालेली विकृती दूर करण्याचे काम उपनिषदांनी केले. तीच परिस्थिती पुढे अध्यात्मतत्त्वांच्या बाबतीत झाली. काळाच्या ओघात मूळ तत्त्वज्ञान नीट आकलन व्हावे म्हणून साधनेसाठी नामस्मरणासारखे सोपे, सुलभ मार्ग निघाले. पाच हजार वर्षांच्या या काळात मूळ संकल्पना विस्कळीत होऊन काही स्वार्थी मंडळींनी त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला असणार. समाज कितीही चांगला असला तरी कोणत्याही काळात कमी जास्त प्रमाणात स्वार्थी माणसे असणारच व असतातच आणि त्यामुळे काळाच्या ओघात या क्षेत्रात काही अनिष्ट प्रथा निर्माण झाल्या हे खरे. पण तो दोष त्यात्या काळातील परिस्थितीचा व योग्य दिशा दाखवणाऱ्या व्यक्तींच्या अभावाचा असणार. कारण थोड्या-थोड्या कालावधीच्या अंतराने संत ज्ञानेश्वरांपासून सर्व जातीजमातीतील संतांची मांदियाळी निर्माण झाली. आजही असे संतसदृश सत्पुरुष आपल्यात आहेत व पुढेही होत राहतील. अनिष्ट गोष्टीही कुठल्याही समाजात, संस्कृतीत केव्हाही असतातच. त्याचे खरे कारण माणूस (व समाज) आपल्यातील श्रेष्ठ व्यक्तींच्या व नेत्यांचा एका बाजूस उदोउदो व जयघोष करीत, आचरणाने मात्र त्यांचा पराभव करीत असतो. महात्मा गांधींच्या बाबतीत अवघ्या पन्नास वर्षांत त्यांच्याच ‘तथाकथित’ अनुयायांनी त्यांचे पुतळे उभारून व हार घालून पण आचाराने मात्र त्यांच्या विचारांचा कसा पराभव केला आहे हे आपल्या समोरचे उदाहरण आहे. तेव्हा दोष मूळ तत्त्वज्ञानाचा समजून वेद, उपनिषदे, भगवद्गीता यापासून गावोगावचे भोंदूबाबा, बुवा इथपर्यंत सर्वांचे एक गाठोडे बांधून समाजाच्या अधोगतीस कारण उपनिषदे, गीता यांसारखे अध्यात्माचे मेरुमणी ग्रंथ व संतशिरोमणी हे आहेत असे म्हणणे हे अतिशय दुर्दैवाचे वाटते. कर्मकांड व भक्तीचे सवंग प्रदर्शन अयोग्य असल्याचे स्पष्ट उल्लेख संतवाङ्मयात पुष्कळ आहेत.
भारताची प्राचीन प्रगति पाश्चात्त्यांच्या पुष्कळ पूर्वी भारतामध्ये कितीतरी विषयांत खूप ज्ञान झालेले होते. हे केवळ आपणच म्हणत नाही तर पाश्चात्त्यही मान्य करतात. काही वैज्ञानिक प्रगत कल्पनाही रामायण-महाभारतांतून (ज्यांना अलीकडील ‘सायन्स फिक्शन’ या प्रकारात घालता येईल) आल्या आहेत. उदा. पुष्पक विमान, युद्धातील संहारक अस्त्रे, संजयाला व्यासांनी दिलेली दिव्य दूरदृष्टी इ. विज्ञानाने या कल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत. देवाला ‘अनंत कोटी ब्रह्मांड नायक’ असे म्हणण्याची परंपरा फार जुनी आहे. त्यात अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत अशी माहिती होती असे म्हणावयास वाव आहे. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे पाश्चात्त्यांच्या कितीतरी पूर्वी आपल्याला माहीत होते. नासदीय सूक्तातील विश्वाच्या आरंभापूर्वीच्या स्थितीचे वर्णन पाच हजार वर्षांपूर्वी कोणी करू शकते ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. प्रतिभा ही एक विलक्षण गोष्ट आहे बुद्धीप्रमाणेच प्रतिभा ही एक दिव्य शक्ती आहे. वैज्ञानिकसुद्धा संशोधन करताना त्याच्या विषयांत अत्यंत तादात्म्य पावून प्रतिभेनेच एखाद्या सिद्धांताची संकल्पना करतो व नंतर त्याचे गणिती स्वरूप मांडून तपासतो.
भारतावरील आक्रमणे भारताच्या प्रगतीला व विचारांना सुमारे एक हजार वर्षे झालेल्या इस्लामी व इतर परकीय आक्रमणांमुळे खीळ बसली. या आक्रमणांमुळे आपली मंदिरे, मूर्ती भग्न करण्यात आल्या. ग्रंथ नष्ट करण्यात आले. पुढे इंग्रजांची सत्ता आल्यावर त्यांनी व इतर युरोपीय देशांनी (विशेषतः जर्मनी) आपले ग्रंथ तिकडे नेले. त्यावर अभ्यास होऊन त्यातील ज्ञान त्यांच्या दृष्टिकोनातून परत आले. इंग्रजानी मेकॉले साहेबाच्या योजनेप्रमाणे आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनांतून आपला इतिहास व इतर गोष्टी शिकवल्या. आणि एक प्रकारची पराभूत मानसिकता निर्माण झाली. ग्रंथ मुखोद्गत करण्याची परंपरा आपल्याकडे होती म्हणून बरेचसे वैदिक व उपनिषद वाङ्मय टिकून राहिले. त्यात भर मात्र पडू शकली नाही. शिवाय वैज्ञानिक शिक्षणामुळे व विज्ञानाच्या क्रांतीमुळे भारतीय तत्त्वज्ञानातील संकल्पनांचा पुरेसा अभ्यास न करता, विज्ञानवादी म्हणवणाऱ्या विद्वानांनी त्या कालबाह्य ठरवल्या.
असे असेल तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, अद्वैत तत्त्वज्ञानातून ‘सहिष्णुता’ हे वैशिष्ट्य भारतीय मनांत रुजलेले होते त्यामुळे सर्व परकीयांना सामावून घेऊन भारताने ‘सर्वधर्म समभाव’ प्रस्थापित केला. राजकारणी पुढाऱ्यांमुळे ती सहिष्णुता आता कमी होत आहे हे मात्र खरे.
खरे म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील सिद्धान्त घ्या किंवा वैज्ञानिक सिद्धान्त घ्या, सामान्य माणसाला (त्या त्या विषयात काही ज्ञान असूनसुद्धा) त्यातले कितपत आकलन होते याचा विचार केल्यास अक्षरशः अगदी तुरळक लोक सापडतील. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीच स्वतः म्हटले आहे. ‘न्यूटनच्या काळात संपूर्ण मानवी ज्ञानाचा आराखडा समजणे सुशिक्षित माणसाला शक्य होते. पण त्यानंतर विज्ञानाच्या विकासाचा वेग इतका वाढला आहे की आता ते अशक्य झाले आहे … त्यामुळे सर्व सामान्य लोकांना त्या सिद्धान्ताचे आकलन दुष्कर होते. तुम्हाला विशेषज्ञच असावे लागते आणि तरीही काही थोड्या वैज्ञानिक सिद्धान्तांचेच व्यवस्थित आकलन होण्याची आशा तुम्ही बाळगू शकता.’
” त्या मुळे अध्यात्म व विज्ञान यांतील तुलना वगैरे व त्यावरील चर्चा/वाद हे तथाकथित तज्ज्ञ व विद्वान लोकांमध्येच होतात व त्यामध्ये सामान्य श्रोता किंवा वाचक निष्कारण गोंधळात पडतो. सिद्धान्त मांडणाऱ्या शास्त्रज्ञांना मात्र यात पडायला वेळही नसतो व इच्छाही नसते / नसणार. 6 अ/2, राहुलनगर, कोथरूड, पुणे 411029