श्री विजय तेंडुलकरांच्या वक्तव्यांवर नेहमीच वाद निर्माण होत असतात. असे का होत असावे, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तेंडुलकर हे विचार करणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय ते मनाने अधिक संवेदनशीलही आहेत. त्यांनी मांडलेले मत किंवा व्यक्त केलेले विचार बुद्धीने व मनाने समजावून घ्यावे लागतात. त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ, त्यांमागची भूमिका समजावून घेतली तरच समजते. ते केवळ कोरडे विचारवंत नाहीत. मनाने ते एक सर्वसामान्य माणूस आहेत. जेव्हा ते नरेंद्र मोदीचा खून करायला निघतात तेव्हा ते खराखुरा खून करायला निघतात, असे नाही. समजा त्यांच्या हातात खरोखरच बंदूक दिली तर ते नरेंद्र मोदींवर गोळ्या झाडतील काय? अर्थातच नाही. मग त्यांच्या तशा वक्तव्याचा अर्थ काय? त्यांच्या वक्तव्यांचा शब्दश: अर्थ घेऊन त्यांच्यावर टीका करणारे असंख्य लोक आपण पाहतो. त्यांत तथाकथित विचारवंतही असतात. याचे आश्चर्य वाटते. मोठा तत्त्वचिंतनाचा आव आणून ही मंडळी तेंडुलकरांवर तुटून पडतात व आपली तथाकथित विद्वत्ता प्रदर्शित करीत असतात. तेंडुलकरांची वक्तव्ये त्यांच्या संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर समजावून घ्यायला हवीत याचा या मंडळींना विसर पडतो.
तेंडुलकर जेव्हा नरेंद्र मोदींना गोळ्या घालायची भाषा करतात तेव्हा त्यांची त्यावेळची मानसिकता आपण बघितली पाहिजे. त्या वक्तव्याच्या पाठीमागे त्यांच्या मनात मोदींविषयी व त्यांच्या गुजराथ दंगलीच्या वेळच्या भूमिकेविषयी प्रचंड राग असतो. तो राग, तो असंतोष वरील प्रकारच्या वक्तव्यांद्वारे प्रकट होत असतो. नरेंद्र मोदींविषयी आणि एकूण राजकारण्यांविषयी तेंडुलकरांच्या मनातील राग आपण समजून घेतला पाहिजे, नव्हे तसा राग प्रत्येक संवेदनशील माणसाला यायलाच हवा. आजच्या राजकारणाचा अधःपात पाहता असा राग, संताप केवळ समर्थनीयच नव्हे तर आवश्यकही झालेला आहे. प्रश्न फक्त रागाच्या अभिव्यक्तीविषयीचा आहे.
तेंडुलकरांचा संताप कितीही समर्थनीय असला तरी तो याच मार्गाने व्यक्त व्हायला पाहिजे काय, हा खरा प्रश्न आहे. रागाची अशी अभिव्यक्ती तेंडुलकरांच्या वैफल्यग्रस्ततेचा पुरावा आहे काय, हाही एक प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे नकारार्थी असले पाहिजे व त्याला अनुसरून दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक येईल काय, याचा विचार केला पाहिजे. तेंडुलकरांविरुद्धची टीका ही म्हणूनच त्यांच्या रागाच्या अभिव्यक्तीपुरती मर्यादित असली पाहिजे, असे वाटते. तेंडुलकर किमान कुणाची भीडमुर्वत न बाळगता आपला राग तरी व्यक्त करतात. या मार्गाने का होईना सामाजिक बाबतीत आपण संवेदनशील असल्याचा पुरावा ते देतात. समाजातील इतर विचारवंतांची याबाबत काय भूमिका आहे, त्यांना सध्याच्या सामाजिक शोकांतिकेविषयी काय वाटते, याचा मागमूसही लागत नाही. त्यांची संवेदनशीलता बोथट तरी झाली असावी किंवा सद्यःस्थितीतच त्यांचे हितसंबंध गुंतले असावेत. यांपैकी काहीतरी असले पाहिजे. सद्यःकालीन स्थितीचे त्यांचे आकलन सकारात्मक (?) आहे, त्यामुळे ते यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत, असे म्हटले तर प्रश्नच मिटला. तेंडुलकर ज्याप्रमाणे आपली वैफल्यग्रस्तता प्रकट करतात तसे हे विचारवंत करीत नाहीत. त्याचे कारण ही मंडळी वैफल्यग्रस्त नाहीत, अशी उत्तरे दिली जाऊ शकतात. प्रत्यक्षात सद्यःकालीन चित्र खरोखरच आशादायी आहे काय, यातून आपोआप मार्ग निघेल काय, या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. आशादायी चित्र रंगविणे सोपे व सोयीचे असते. असे चित्र रंगविण्याला कोणतीही हिम्मत लागत नाही किंवा त्यात कोणतेही नुकसान होण्याचा संभव नसतो. अशीच मंडळी तेंडुलकरांवर तोंडसुख घ्यायला प्रवृत्त होतात. त्यांना वरील निरुपद्रवी भूमिकेद्वारे आपली सामाजिकता दर्शविता येणे सोपे होते. याचा अर्थ विचारवंतांनी निराशादायक चित्रच रंगवायचे काय? याचे उत्तर अर्थातच नकारार्थी असणार आहे. परंतु असे चित्रण स्वप्नाळू असण्यापेक्षा वास्तवाधारित असावे आणि त्यामागची भूमिका स्वच्छ असायला हवी. या निराश स्थितीला सामोरे जाऊन तिचे आह्वान स्वीकारून तीमध्ये परिवर्तन करण्याची जिद्द बाळगायला हवी, असे म्हणणे आदर्शवादी असले तरी आजच्या स्थितीला ते आवश्यकही आहे. परंतु तसे करणे हे सर्वांनाच शक्य नसते. तेंडुलकरांना राग तर येतो; परंतु या मार्गाने जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाही. त्यामुळे त्यांचा राग गोळ्या घालण्याच्या भाषेतून व्यक्त होतो. तसे पाहिले तर त्यांच्या रागाकडे व रागाच्या अभिव्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता येईल. आपणास प्रथम सध्याच्या अधः पतित, भ्रष्ट व्यवस्थेचा संताप यायला हवा. तसे प्रत्यक्षात होतेसुद्धा. तेंडुलकर अशा असंख्य मनांचे प्रतिनिधित्व करीत असतात. आज असंख्य मनांत धुमसत असणाऱ्या संतापाला वाट करून देत असतात. याच दृष्टीने तेंडुलकरांच्या उद्वेगाकडे पाहायला हवे. संवेदना बोथट झालेल्या विचारवंताच्या समूहात ही संवेदनशीलता आशादायक आहे, यात शंका नाही. तेंडुलकर अशा संवेदनशील मनाचे प्रतिनिधित्व तर करतात, परंतु ते त्यांना नेतृत्व देऊ शकत नाहीत. त्यांची ती भूमिकाही नाही. ते साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्यातून, नाटकातून ही भावना उद्घोषित होणे अपेक्षित आहे. आणि तशी ती सातत्याने उद्घोषित होत असते. हे आपण पाहतो.
वरील विवेचनातून मी ‘आजचा सुधारक’च्या वाचकांसाठी खालील मुद्दे मांडत आहे : (1) तेंडुलकर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांद्वारे आजच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध त्यांचा पराकोटीचा संतापच व्यक्त करीत असतात. 2) आजच्या भ्रष्ट व चारित्र्यशून्य समाजव्यवस्थेविरुद्ध व्यक्त होणारा तेंडुलकरांचा संताप हा स्वाभाविक आहे आणि तो त्यांच्या संवेदनशील मनाचा पुरावा आहे. 3) आज असंख्य संवेदनशील मनात हा संताप धुमसत असतो. त्यामुळे तेंडुलकरांचे हे प्रतिनिधित्व महत्त्वाचे ठरते. 4) इतर विचारवंत, काही सन्माननीय अपवाद वगळता, या व्यवस्थेबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवीत नाहीत. त्यांच्या या बोटचेप्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर तेंडुलकरांची सामाजिकता उठून दिसते. 5) तेंडुलकरांच्या रागाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप समर्थनीय नसले तरी त्यांच्या तशा अभिव्यक्तीमुळे त्यांच्या संतापाची परिसीमाच प्रत्ययाला येते आणि त्यामुळे असंख्य संवेदनशील मनांत तशीच अस्वस्थता निर्माण होत असण्याची शक्यता आहे. 6) आजच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जी हिम्मत लागते, ती तेंडुलकरांमध्ये आहे. आजच्या अन्य विचारवंतांमध्ये अशी हिम्मत दिसत नाही. 7) ही विचारवंत मंडळी तथाकथित सकारात्मक दृष्टिकोनाचा, की ज्यात कोणतीही हिम्मत लागत नाही किंवा कोणतीही अडचण येत नाही, आधार घेऊन तेंडुलकरांवर तुटून पडतात. 1101, बी-1 /रेखा, कोरस टॉवर्स, वर्तक नगर, ठाणे (पश्चिम) 400606