एकलव्य या संस्थेचे काम आणि संस्थेच्या अनुभवांचे सार नजरेखालून घालणे महत्त्वाचे आहे. शासकीय शाळांतून प्रयोग किंवा उपक्रम यांना एकलव्यने विज्ञान शिक्षणाचे माध्यम बनवायचा प्रयत्न केला. त्यामुळे अनुभवाधाराने ज्ञान कमाविणे आणि ते वापरणे यांना महत्त्व मिळाले. याचा परिणाम असा झाला की अनेकांना विज्ञान सोपे आणि रंजक वाटू लागले.
इथेच सगळा घोटाळा झाला, असे मला वाटते. अनेकांना विज्ञान हा विषय रंजक आणि आवाक्यातील वाटू लागला, तसेच समजा इतर विषयांचेही झाले, तर मोठी अडचण समोर ठाकणार होती. ती म्हणजे सारेच विद्यार्थी हुशार ठरतील. त्याचवेळी अर्थार्जनाच्या चांगल्या संधी मात्र मोजक्याच राहिल्या तर निवड करायला फारशी जागा राहणार नाही. हा प्रचंड धोका होता तो शासनाने ओळखला असावा. त्याला मुळातच शासनाने पायबंद घातला. माझ्या मते एकलव्यचे उपक्रम बंद करायचे हे प्रमुख कारण होते. (प्रकाश बुरटे यांच्या पाबळच्या विज्ञानाश्रमाबाबतच्या एका अप्रकाशित टिपणातून वरील उतारा घेतला आहे.)