विज्ञानाचे समाजव्यवहारातील स्थान काळानुसार बदलत गेलेले आहे, आणि त्याला अनुरूप असा बदल वैज्ञानिकांच्या सामाजिक स्थानात व वर्तणुकीतही झाला आहे.
आधुनिक विज्ञानाने सतराव्या-अठराव्या शतकात युरोपात मूळ धरले आणि युरोपीय व्यापारी, मिशनरी व वसाहतवादी यांच्या बरोबर हे विज्ञानही जगभर फैलावले. आज आपण विसावे शतक हे विज्ञानाचे शतक होते असे छातीठोकपणे सांगू शकतो. परंतु एकोणिसाव्या शतकापर्यंत विज्ञानाचे समाजव्यवहारातील स्थान तसे काठावरचे आणि तात्त्विक व सांस्कृतिक-शैक्षणिक पातळीपुरते मर्यादितच आढळून येते. साहित्यिक, कवी, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार यांच्याच पंक्तीत वैज्ञानिकांचेही स्थान होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ‘दरबारा’त त्यांना मानाचे पान मिळे, परंतु ‘बाजारा’त मात्र त्यांच्याशिवाय अडत नसे. तंत्रज्ञान बऱ्याच अंशी स्वायत्त आणि विज्ञानापासून स्वतंत्रपणे वाढल्याने उत्पादनक्षेत्रात वैज्ञानिकांना फार किंमत नव्हती. (चर्चबरोबरचा संघर्षही बायबल-कथेच्या विरोधी असल्यामुळेच.) प्रामुख्याने विक्षिप्त, एकलकोंड्या किंवा श्रीमंत वा अन्य व्यवसायातील व्यक्ती शुद्ध ज्ञानलालसेचा पाठपुरावा करण्यासाठी वा छंद म्हणून विज्ञानक्षेत्राकडे वळत. व्यवसाय म्हणून विज्ञानाला स्थान नव्हते. तसे पाहता गॅलिलिओ आणि न्यूटननंतरही अनेक नामवंत वैज्ञानिक युरोपात झाले, त्यातील काहींनी अधिकाराची पदेही भूषविली. परंतु एकूणच विज्ञानाचे स्वरूप मर्यादित होते : छोट्या प्रयोगशाळांत मर्यादित साधन-सामग्री वापरत अल्पसंख्य व्यक्तींनी सत्तेच्या व उत्पादनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग राहून व्यक्तीगत पातळीवर घेतलेला ज्ञानाचा शोध, या प्रकारचे.
विसाव्या शतकात या परिस्थितीत मोठा बदल घडून आला. एकीकडे भौतिकी, रसायन, जीवशास्त्र या विषयांत अंतर्गत क्रांतिकारक बदल घडून आले. त्याचबरोबर विज्ञानाची व तंत्रज्ञानाची वाढही एकत्रितपणे, परस्पर सहकार्याने होऊ लागली. विज्ञाना-तील संशोधन तंत्रज्ञानापुढे नवी आव्हाने देऊ लागले तर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे विज्ञानाला चालना मिळू लागली. तंत्रज्ञान अधिकाधिक विज्ञानाधिष्ठित होऊ लागले, तर विज्ञानही तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबित होत गेले. परिणामी या शतकात विज्ञानाची प्रवेगी, स्फोटक वाढ होत गेली.
यामुळे सध्या विज्ञानाला समाजव्यवहारात मुख्य प्रवाहातील व कळीचे स्थान प्राप्त झाले आहे. विज्ञान आज ज्ञानसंपादनाचा हौशी छंद राहिला नसून एक व्यवसाय, पेशा बनला आहे. रोजगाराचे व करिअरचे क्षेत्र झाले आहे. यामुळे विज्ञानक्षेत्राच्या रचनेत व जडणघडणीत, तसेच वैज्ञानिकांच्या सामाजिक स्थानात, जबाबदारीत व वर्तणुकीतही मोठे बदल घडून आले आहेत. याचा परिणाम साहजिकच विज्ञानाच्या सामाजिक अंगाकडे प्रकर्षाने लक्ष वेधले जाण्यात झाला.
विज्ञानाचे सामाजिक कार्य – बर्नालवाद
विज्ञानामुळे माणसाला निसर्ग-व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होते. त्याचा उपयोग करून घेऊन निसर्गावर ताबा मिळवणे, निसर्गातील शक्तिस्रोत व बले माणसाला अनुकूल करून घेणे शक्य होईल, अशा प्रकारची एक उपयुक्ततावादी व आशावादी मांडणी बेकनपासून केली जात होती. विज्ञानाची अधिकाधिक वाढ माणसाला अधिकाधिक प्रगतीकडे नेणारी ठरणार, असे हे आदर्शवादी समीकरण होते. यात समाजिक परिस्थितीचा विज्ञानावर परिणाम होऊ शकेल याची फारशी जाणीव नव्हती.
परंतु विज्ञानाची प्रवेगी वाढ होत असतानाच सामाजिक व्यवहारात विज्ञानाचा वापर ज्या प्रकारे होत गेला त्याने अनेकांना अंतर्मुख केले. विज्ञानविषयक गृहीते तपासून बघण्यास प्रवृत्त केले. पुरोगामी, सामाजिक भान असलेल्या वैज्ञानिकांचा एक गट यात आघाडीवर होता. जॉन डेस्मंड बर्नाल याचे मुख्य प्रवर्तक होते. लॅन्सेलॉट हॉगबेन, जे.बी.एस्. हाल्डेन, जोसेफ नीडॅम, हायमन लेवी, ज्यूलियन हक्सली, क्राऊथर वगैरे केंब्रिजमधील ब्रिटिश तर जोलियो-क्यूरी, लांगेविन (Langevin) सारख्या फ्रेंच वैज्ञानिकांचा यात समावेश होता.
यातून बर्नाल यांचा The Social Function of Science हा महत्त्वाचा ग्रंथ तयार झाला. पहिल्या महायुद्धात युरोपात प्रचंड हानी झालेली होती. त्यानंतर दशक-भरात महामंदीचे अरिष्ट येऊन युरोपीय व अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली, बेकारीमुळे प्रगत भांडवलशाही राष्ट्रांतील जनतेला मोठ्या हालअपेष्टांचा सामना करावा लागला. यातच फॅसिझमचा जोरही वाढत गेला. यामुळे शतकाच्या सुरुवातीस वाटत असलेल्या चढत्या भाजणीतील आर्थिक प्रगतीचा आशावाद कोसळला. पहिल्या महायुद्धात रक्त सांडण्यात विज्ञानाचा चांगलाच हातभार लागला होता. भरीस वसाहतवाद जगभर फैलावण्याला व त्याद्वारे युरोप-अमेरिके बाहेरील जनतेचे शोषण करण्याच्या कामीही विज्ञानाचे योगदान स्पष्ट झाले होते. भांडवलशाही राष्ट्रांतील या घडामोडींची तुलना सोविएत रशियाशी केली जात होती. तेथे क्रांतीनंतरच्या नवसमाजनिर्मिति-प्रक्रियेत प्रगतीचे महत्त्वाचे हत्यार म्हणून विज्ञान तंत्रज्ञानावर भर दिला गेला होता. तुलनात्मक दृष्ट्या अल्पकाळात सोविएत युनियनने केलेली कौतुकास्पद प्रगती एकीकडे तर भांडवलशाही-तील मंदी, फॅसिझम, दुसऱ्या महायुद्धाचे जमणारे ढग ही अरिष्टे दुसऱ्या बाजूला, या पार्श्वभूमीवर बर्नाल यांनी विज्ञानाकडे व त्याच्या कार्यपद्धतीकडे विश्लेषणात्मक नजर टाकली. त्यांच्या ग्रंथाचे दोन भाग होते. —- पहिला, “What science does’, ‘विज्ञान काय करते’ हा, तर दुसरा, What science could do’, ‘विज्ञान काय करू शकते’. बर्नाल यांचा सिद्धान्त थोडक्यात असा होता :- ‘विज्ञानामुळे माणसाला प्रगतीचे एक उत्तम साधन लाभले आहे. परंतु विज्ञानाची वाढ पूर्णपणे स्वतंत्र, स्वायत्त नसते. ती भोवतालच्या सामाजिक परिस्थितीशी निगडित असते. सुरुवातीस भांडवलशाही प्रगति-शील असताना विज्ञानाची वाढही निकोप रीतीने झाली. परंतु नंतर मात्र भांडवलशाही-तील उत्पादनसंबंध अडथळ्याचे ठरू लागले, भांडवलशाही प्रगतीच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या. याचा विज्ञानावरही परिणाम झाला. विज्ञानवाढीत विकृती निर्माण झाल्या, विज्ञानाची माणसाचे भले करण्याची क्षमता भांडवलशाहीतील खाजगी नफ्याच्या हव्यासा-पोटी चिरडली गेली. विज्ञानाचा दुरुपयोग शोषण व दमन यांसाठी झाला तसेच खुद्द विज्ञानाची वाढही खुंटली. समाजवादी व्यवस्थेत मात्र खाजगी भांडवलाच्या कचाट्यातून सुटल्यामुळे विज्ञानाची सामाजिक भले घडवून आणण्याची क्षमता पूर्ण फुलारून येण्याची शक्यता मोकळी होते. त्यामुळे मानवी समाजाची अखंड विनाअडथळा प्रगती आणि विज्ञानाची मुक्त वाढ यासाठी समाजवादी क्रांती आवश्यक आहे.’
भारतासारख्या वसाहती जोखडाखालील देशांबद्दलही त्यांची हीच भूमिका होती. ‘समाजापुढील प्रश्न सोडविण्यासाठी विज्ञानाची गरज भारतात सर्वाधिक आहे. परंतु पारतंत्र्यातून मुक्त झाल्याखेरीज भारतीयांची विज्ञान क्षमता फुलून येणार नाही. त्यामुळे वैज्ञानिकांपेक्षा स्वातंत्र्यासाठी झगडणारे राजकीय नेतेच सध्या भारतीय विज्ञानाची अधिक सेवा करीत आहेत’, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या या 1939 मधील ग्रंथात केले आहे.
हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि लगोलगच दुसऱ्या महायुद्धात विज्ञानाची कामगिरी प्रकर्षाने जाणवून आली. या काळातील रेडार, ओ.आर.(ऑपरेशन्स रिसर्च) वगैरे वैज्ञानिक घडामोडी महत्त्वाच्या होत्याच, पण त्या सर्वांना झाकोळून टाकले ते अणुबॉम्बनिर्मितीने. प्रारंभीच्या युद्धपूर्व बर्नालवादास या भांडवलशाहीतील विज्ञानाच्या यशामुळे काही अंशी छेद गेला. मात्र एक नवा धागा यातून मिळाला. तो म्हणजे विज्ञानाचा वापर योजनाबद्धपणे आणि मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिकांना सहकार्याने काम करायला लावून केला की प्रचंड कठीण प्रश्नही सोडविता येतात. यामुळे युद्धोत्तर बर्नालवादाने थोडे सौम्य, मवाळ स्वरूप धारण केले, ‘भांडवलशाही व्यवस्थेतही अधिक वैज्ञानिक प्रगती शक्य आहे; मात्र त्यासाठी विज्ञानाचा वापर योजनाबद्ध रीतीने केला पाहिजे.’
आपल्याकडे पंडित नेहरूंनी बर्नालवादाचे हे सौम्य स्वरूप स्वीकारले. सामाजिक परिवर्तनासाठी आणि देशापुढील गरिबी, बेकारी, अनारोग्य वगैरे प्रश्न सोडवून झपाट्याने आधुनिकीकरण घडविण्यासाठी विज्ञानाची कास धरली. 1947 च्या भारतीय विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात बोलताना ते म्हणाले—-‘जागतिक तसेच राष्ट्रीय प्रश्न सोडविण्या-साठी एकमेव योग्य मार्ग म्हणजे विज्ञानाचा मार्ग असा माझा ठाम विश्वास आहे. विज्ञानाचा मार्ग म्हणजे वैज्ञानिक कार्यपद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोन. जगातील आर्थिक रचना आणि सामाजिक-राजकीय घडामोडी यांपासून विज्ञानाला अलिप्त ठेवणे शक्य नाही.’ स्वातंत्र्योत्तर काळात या दिशेने भारतीय विज्ञानक्षेत्रास चालना देण्यास नेहरूंनी आपले राजकीय वजन व वैयक्तिक प्रतिष्ठा कामी लावली. बहुतेक प्रमुख भारतीय वैज्ञानिकही या विज्ञानविषयक भूमिकेशी सर्वसाधारणपणे सहमत होतेच.
युद्धोत्तर संयुक्त राष्ट्रसंघात युनेस्कोची स्थापना झाली. त्याचे पहिले डिरेक्टर-जनरल ज्यूलियन हक्सली होते, तर जोसेफ नीडॅम विज्ञानविभागाचे प्रमुख होते. त्यांनी मूलतः बर्नालवादी भूमिकाच युनेस्कोच्या विज्ञानविषयक ध्येयधोरणात अंतर्भूत केली. हक्सली यांनी वैज्ञानिक मानवतावादाचा (scientific humanism) पुरस्कार केला.
बर्नालवादापलीकडे आता आपल्या लक्षात आले आहे की बर्नाल यांच्या आदर्शवादी भूमिकेला छेद गेला आहे. एकीकडे सोविएत युनियनमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची चांगली वाढ झाली, तरी सामाजिक पातळीवर मात्र त्याचा परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला नाही. समाज परिवर्तनासाठी केवळ विज्ञानाचा घटक पुरेसा व पर्याप्त ठरला नाही. आपल्याकडेही वेगळ्या प्रकारे असेच घडून आले. खूप वाटचाल झालेली आहे, प्रगती म्हणावी अशीही परिस्थिती आहे. परंतु वाढ हव्या त्या दिशेने व वेगाने झालेली नाही, आणि मूळ ध्येय जवळ आलेले नाही. प्रगत भांडवली देशांतही विज्ञानाची वाढ खुंटली नाही. उलट बहुतांशी प्रवेगी वाढ येथेच घडून आली. तीत दोष आहेत. ती वाढही बऱ्याच बाबतीत विकृत आहे. तरीही आज जगाचा चेहरा-मोहरा बदलणारे विज्ञान-तंत्रज्ञान येथूनच आलेले दिसते.
आता मागे वळून पाहताना 20 व्या शतकातील विज्ञानाची ठळक वैशिष्ट्ये जाणवतात ती अशी :—- 1) मोठ्या प्रमाणावर संस्थीकरण, 2) ‘बड्या’ विज्ञानाचा उदय आणि 3) विज्ञानाचे व्यावसायिकीकरण. हे तीनही घटक एकमेकांत गुंतलेले, एकमेकांशी निगडित आहेत. तरीही एकेक घटक वेगळा बघणे इष्ट ठरावे : 1) संस्थीकरण:
पूर्वी विद्यापीठांच्या छोटेखानी वातावरणातील शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित विज्ञान आता मोठ्या प्रमाणावर वाढले. स्वतंत्र विषयांसाठी स्वतंत्र संशोधन संस्था उभारल्या जाण्याचा हा काळ आहे. (ब्रिटन व भारतातील सीएसआयआर प्रयोगशाळा. जर्मनीतील मॅक्स प्लँक संस्था वगैरे). बहुतेक देशांत अणुशक्ती, अवकाश संशोधन, तसेच संरक्षण व लष्करी क्षेत्रांत सार्वजनिक व सरकारी पातळीवर संशोधनसंस्था कार्यान्वित आहेत.
2) ‘बड्या’ विज्ञानाचा उदय :
अणुबॉम्बच्या अमेरिकेतील मॅनहॅटन प्रकल्पाने बड्या विज्ञानाचे युग जन्माला घातले. मोठ्या प्रमाणावरचे, प्रचंड खर्चाचे, शेकडो संशोधक कामाला जुंपणारे तीन-तीन पाळ्यांत काम करणारे प्रकल्प सुरू झाले. अणुशक्ती, आणि अवकाश प्रकल्प, high energy physics मधले महाशक्तिशाली प्रवेगक वगैरे. केवळ प्रमाण मोठे झाले असे नव्हे तर संशोधन–उपकरणे पण अधिकाधिक गुंतागुंतीची, अधिक हाय-टेक व प्रचंड खर्चाची होत आहेत. 3) विज्ञानाचे व्यावसायिकीकरण:
सामाजिक व्यवहारातील अनेकविध क्षेत्रांत आता विज्ञानाचा कमीअधिक प्रमाणात वापर होत असून विविध व्यवसायांत वैज्ञानिकांची गरज पडू लागली आहे. त्यामुळे खाजगी उद्योगधंदे, मोठे कारखाने यात वैज्ञानिकांची पदे निर्माण झाली. प्रगत देशात तर कित्येक खाजगी प्रयोगशाला मोठ्या प्रमाणावर संशोधनाचे काम करत आहेत. (उदाहरणार्थ, अमेरिकेतील बेल टेलिफोन्स लॅब). 1996 मध्ये अमेरिकेतील आर अॅण्ड डी खर्चापैकी 61 टक्के खर्च उद्योगधंदे करत होते. जपानमध्ये हे प्रमाण 67 टक्के तर युरोपीय संघटनेत 53 टक्के होते. आपल्या देशात उद्योगधंदे मागासलेले वा परकी बहूद्देशीय कॉर्पोरेशन्सवर अवलंबित असल्याने हे प्रमाण कमी आहे.
या सर्वांचे काही परिणाम उघड जाणवणारे आहेत. विज्ञान खर्चिक झाल्यामुळे संशोधनाची उपकरणे, साधनसामग्री व अन्य सुविधा यांसाठी मोठी भांडवल-गुंतवणूक अपरिहार्य झाली. त्यामुळे प्रायोजक म्हणून वैज्ञानिकांना सरकार, लष्कर, खाजगी उद्योग वा तत्सम संघटनांवर अवलंबून राहावे लागते. खाजगी क्षेत्रात नफ्यासाठी तर सरकारी वा लष्करी क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणासाठी गुप्तता येते. त्यामुळे वैज्ञानिक संशोधन मुक्त न राहता ज्ञानाची मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका उद्भवतो. मोठ्या संख्येने व मोठ्या गटात काम करताना वैयक्तिक जबाबदारी वाटली जाते. त्यामुळे प्राणघातक अस्त्रांची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांच्या गटात एकूण शेवटच्या परिणामास आपण जबाबदार आहोत असे काही प्रत्येकाला वाटत नाही.
संख्यात्मक वाढीमुळे गुणात्मक पातळीवर तसेच संशोधनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही फरक पडतो. बहुसंख्य वैज्ञानिकांचे काम सैद्धान्तिक वा मूलभूत संशोधना-ऐवजी उपयोजित संशोधनाचे असते. हे साहजिकच असले तरी त्यामुळे विज्ञानाच्या सैद्धान्तिक वा तात्त्विक दृष्टिकोनाच्या अंगापेक्षा तांत्रिक अंगच महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत प्रयोगशाळेतील आपले काम कौशल्याने पार पाडून इतर बाबतीत अवैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे चालून जाऊ शकते. विशेषतः विज्ञान शिक्षणाच्या आखणीत समग्र दृष्टिकोनाऐवजी निव्वळ तंत्रकौशल्य मिळविण्यावर भर असेल तर अशी शक्यता वाढते. पर्यावरणविषयक प्रश्नही याच्याशी निगडित आहेत. निव्वळ नफ्यासाठी जाणूनबुजून होणारी हानी बाजूला ठेवली, तरी सम्यक् दृष्टिकोनाभावी होणारी हानीही कमी नाही—उदा. सोविएत युनियन, चीन.
फ्रान्सिस क्रिक यांनी हल्लीच्या स्पर्धात्मक वातावरणातील वैज्ञानिकांच्या बाबत काहीशा गमतीने म्हटले आहे की ‘They have to work so hard, they hardly get time for serious thinking’, ही स्थिती काही प्रमाणात सर्वत्रच आहे.
वैज्ञानिक संशोधनाचा पाया वा गुरुत्वमध्ये शैक्षणिक जगातून उचलला जाऊन औद्योगिक क्षेत्राकडे सरकला आहे. आणि प्रगत राष्ट्रांत वैज्ञानिक संशोधन सार्वजनिक क्रयवस्तू (public good) राहिली नसून बाजारातील क्रयवस्तू (market good) झालेली आहे. जागतिकीकरण-प्रक्रियेत हे सर्वत्रच घडू शकेल.
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना
विसाव्या शतकात विज्ञानाचे महत्त्व आणि ताकद वाढल्यामुळे वैज्ञानिकांची सामाजिक जबाबदारी पण वाढली आहे. एकविसाव्या शतकात विज्ञानाचे स्वरूप कसे असेल याचे भाकीत करणे कठीण आहे, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे. ती म्हणजे विज्ञानाचे समाजधारणेतील व समाजपरिवर्तनातील महत्त्व वाढतच जाणार आहे. त्यामुळे वैज्ञानिकांची भूमिकाही अधिकाधिक महत्त्वाची व निर्णायक होणार आहे. म्हणून विसाव्या शतकातील अनुभवांच्या प्रकाशात एकविसाव्या शतकातील वैज्ञानिकांच्या सामाजिक जबाबदारीचा विचार करणे महत्त्वाचे ठरावे.
याबाबतची महत्त्वाची चर्चा व मांडणी जून 1999 मध्ये बुडापेस्ट येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या विज्ञानावरील जागतिक परिषदेत करण्यात आली. तिचा आढावा घेणे इष्ट ठरावे.
ही परिषद युनेस्को व आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आली. या विज्ञानावरील परिषदेचे शीर्षक होते —- ‘एकविसाव्या शतकासाठी विज्ञान : एक नवी बांधिलकी.’ विज्ञान व समाज यातील परस्परसंबंधांचा अनेकविध अंगांनी विचार करून या परिषदेने दोन दस्तावेज मंजूर केले. एक, ‘विज्ञानाचा जाहीर-नामा’ तर दोन, ‘कृतीची चौकट’. या परिषदेत उजळले गेलेले दोन-तीन मुद्दे येथे खास नमूद करावेसे वाटतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानास नैतिकता व सामाजिक जबाबदारीची जोड दिली पाहिजे यावर परिषदेत खूप जोर दिला गेला. ‘नैतिक व सामाजिक जबाबदारी’ हा विषय सर्व क्षेत्रातील विज्ञानशिक्षणाचा व वैज्ञानिकांच्या प्रशिक्षणाचा अविभाज्य घटक असावा; तसेच उच्च दर्जाची वैज्ञानिक सचोटी व गुणवत्ता जपणे, जनतेशी संवाद साधणे व तरुण पिढीस शिकवणे या गोष्टी वैज्ञानिकांनी आवश्यक समजून आवर्जून केल्या पाहिजेत असे मांडले गेले. तसेच विज्ञानाच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठविण्याचे स्वातंत्र्य वैज्ञानिकांना दिले पाहिजे असेही मांडले गेले. हा शेवटचा मुद्दा मांडला डॉ. जोसेफ रोटब्लाट (1995 चे शांतता नोबेल पारितोषिक विजेते, तर 1999 चे जमनालाल बजाज पारितोषिक–परदेशात गांधीवादाचा प्रसार करण्याबद्दल–विजेते) यांनी. नैतिकवादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोटब्लाट यांनी अधिवेशनात एक खळबळ माजवणारा प्रस्ताव पुढे केला. ज्याप्रमाणे वैद्यकीय पदवीधराला आपल्या पेशाला सुरुवात करताना ‘हिप्पोक्रेटिक शपथ’ घ्यावी लागते त्याच धर्तीवर तरुण वैज्ञानिकांना शपथ द्यावी अशी त्यांनी मागणी केली. ‘माणसांना किंवा पर्यावरणाला हानी पोहोचविण्याच्या कोणत्याही उद्देशासाठी मी माझ्या शिक्षणाचा वापर करणार नाही.’ हे वाक्य त्या शपथेत त्यांना पाहिजे होते. असे काही करणे वास्तववादी होणार नाही, आणि वैद्यकीय पेशात घडले आहे त्याप्रमाणे ही शपथ निव्वळ प्रतीकात्मकच ठरेल असे बहुतेकांचे मत पडल्याने प्रतिनिधींनी रोटब्लाट यांची सूचना बाजूला ठेवली. परंतु अशा भावनांकडे पूर्णतः दुर्लक्ष करणेही शक्य नव्हते. त्यामुळे परिषदेच्या सर्वसंमत ठरावात तरुण वैज्ञानिकांना आवाहन केले गेले की ‘त्यांनी विज्ञानात अध्याहृत असलेल्या मूलभूत नैतिक तत्त्वांचे व जबाबदाऱ्यांचे पालन करावे.’
जागतिक कीर्तीचे भारतीय वैज्ञानिक डॉ. एम्.एस्. स्वामिनाथन यांनीही परिषदेपुढे सांगितले की विज्ञान व समाज यांच्यात सामंजस्याचे नाते निर्माण झाले पाहिजे. ‘विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड शक्ती आहे. मानवतावादाची मात्रा देऊन ही शक्ती कशी सौम्य करायची हे आपल्याला कळले तरच तिचा उपयोग मानवजातीच्या फायद्यासाठी, भल्यासाठी करता येईल.’
एकूण या सगळ्यांचा रोख आहे तो वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनात व मनोवृत्तीत बदल घडवून आणण्यावर. निव्वळ व्यवसाय, पेशा म्हणून विज्ञानाच्या तांत्रिक अंगावरच भर न देता एक समग्र, सर्वांगीण, holistic दृष्टिकोन वैज्ञानिकांनी अंगीकारला पाहिजे असे यातून स्पष्टपणे ध्वनित होते.
येथे थांबून थोडा विचार करायला पाहिजे. कारण आजच्या जगात इतर व्यावसायिकांपेक्षा वैज्ञानिकांवर अधिक जबाबदारी टाकावी की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. विज्ञानाचे जे ‘सामान्य’ (normal, routine, maintainance सदृश) स्वरूप आहे तेथे वैज्ञानिकांवर असा अतिरिक्त नैतिक बोजा टाकणे अयोग्य ठरू शकेल. विज्ञानाचे जे दुसरे क्रांतिकारक स्वरूप आहे —- निसर्गाचे स्वरूपच बदलून टाकण्याचे वा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्क्रांतीची दिशाच बदलून टाकण्याचे (उदा. अणुशक्ती वा जनुकीय अभियांत्रिकी) —- तेथे मात्र संबंधित वैज्ञानिकांवरची नैतिक जबाबदारी फार महत्त्वाची ठरू शकते. परंतु वैज्ञानिकांच्या समूहात अशाप्रकारे वगर्वारी करणे ही गोष्ट काही योग्य नव्हे. शिवाय वैज्ञानिक ही काहीतरी इतर माणसांपेक्षा वेगळी (आणि साहजिकच उच्च दर्जाची) जात आहे असे एक मिथक यातून निर्माण होण्याची भिती आहे, वा अशाप्रकारचे मिथक अस्तित्वात असल्यास त्याला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
या तिढ्यावर कशाप्रकारे मात करायची हा खरा प्रश्न आहे. आणि याची सर्वसाधारण दिशा बुडापेस्टच्या विज्ञानावरील जागतिक परषदेतील चर्चा व ठराव यांतून बरीच स्पष्टपणे जाणवून येते.
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानावर सध्या धार्मिक व अन्य प्रकारच्या मूलतत्त्ववाद्यां-कडून अतिशय टोकाची टीका होऊ लागली आहे. आतापर्यंतच्या विज्ञानव्यवहारातील त्रुटी व गैरवापर यांचा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानालाच विरोध करण्यासाठी कळत वा नकळत, जाणीपूर्वक वा अजाणतेपणे वापर केला जात आहे.
आधुनिक विज्ञानाला पाश्चात्त्य, युरोपीय, परकी वगैरे लेबले लावून काही गट हे विज्ञानच नाकारतात. पुन्हा निसर्गाकडे वळण्याचे वा आपापल्या प्रदेशात आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान येण्यापूर्वीच्या काळाकडे वळण्याचे आवाहन करतात. पण अशा प्रकारे काळाची पावले मागे वळवणे शक्यच नाही, आणि तसे प्रयत्न आपल्याला अधिकच वाईट परिस्थितीत नेऊन सोडू शकतात. दुसरा प्रकार आहे काही अतिसापेक्षतावादी भूमिका घेणाऱ्यांचा. (काही आधुनिकोत्तरवादी, post-modernist, यात मोडतात.) आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानावर ‘पाश्चात्त्य’ असा शिक्का मारून त्यविरोधात आधीच्या कालखंडातील पौर्वात्य, भारतीय, चीनी, आफ्रीकी, इस्लामी आणि प्राचीन, मध्ययुगीन वगैरे वेगवेगळी ‘विज्ञान-तंत्रज्ञाने’ उभी करतात आणि ही सर्वच एकाच पातळीवरची व दर्जाची असून प्रत्येकाने आपापल्या ‘संस्कृती’प्रमाणे वा ‘वंशा’प्रमाणे वा ‘धर्मा’प्रमाणे जे सुयोग्य व अनुरूप असेल ते वापरावे अशी मांडणी करतात. ही भूमिका नुसतीच चुकीची वा स्वदेशी अभिनिवेशाची नसून प्रत्यक्षात आपल्यासारख्या मागास व गरीब देशांच्या दृष्टीने धोकादायक व हानीकारकही आहे.
आधुनिक विज्ञान हा मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा एक टप्पा आहे, आणि त्या अर्थी हे विज्ञान विशिष्ट देश वा प्रदेश वा भूभाग यांच्या पलीकडे जाणारे आहे. कागदाचा शोध चीनमध्ये लागला आणि शून्याची संकल्पना आपल्याकडे आकाराला आली. पण त्यामुळे कागद चीनबाहेर व शून्य भारताबाहेर निरुपयोगी ठरले वा अन्य लोकांना त्यांचा वापर करता आला नाही असे घडलेले नाही. उलट जगातील इतरांनीच मूळ शोधकांपेक्षा त्यांचा वापर अधिक परिणामकारकपणे केला असे म्हणावे लागेल. त्याच प्रमाणे आधुनिक विज्ञान जरी युरोपात उदयाला आले असले तरी तो सर्व मानव जातीचाच ठेवा आहे. आधुनिक विज्ञानाला तत्पूर्वीच्या विभिन्न संस्कृतींतील ज्ञान व तंत्र यातील अनेक गोष्टींचे योगदान लाभलेले आहेच. त्यामुळे अधिक प्रगत आधुनिक विज्ञान अस्तित्वात आल्यावर अन्य प्रदेशांतील अन्य संस्कृतींनी ते आत्मसात करणे अपरिहार्यच आहे, आणि आवश्यकही आहे. विज्ञान संशोधन व वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करण्याची संधी सर्वांना म्हणजे सर्व देशांना, तसेच देशांतर्गत सर्व समाजगटांना उपलब्ध व्हावी असे बुडापेस्ट परिषदेत मांडले गेले. परिवर्तनवादी मंडळींनी व चळवळींनी याचा पाठपुरावा करायला पाहिजे. कारण गरिबी आणि सुबत्ता यांतील भेद सध्याच्या काळात विज्ञान संशोधन व विज्ञानाचा उपयोग करणे वा न करणे यांच्याशी जोडला गेला आहे.
अर्थात हे घडवून आणतानाच आतापर्यंतचा दुरुपयोग, शोषण आणि हानी टाळून वर उल्लेखलेले नैतिक व मानवतावादी घटक प्रभावशाली राहतील हे बघावे लागेल. यासाठी विज्ञान संशोधन, विज्ञान प्रसार आणि विज्ञानाचा वापर या एकूण प्रक्रियेचे स्वरूप अधिकाधिक व्यापक, उदात्त, जनहितकारक आणि लोकशाही पद्धतीचे करणे आवश्यक आहे. यासाठी निव्वळ वैज्ञानिकांचाच नव्हे तर सर्व जनतेचा सहभाग मिळवता येईल अशी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तसेच शिक्षणक्षेत्रात सर्व थरातील विज्ञानशिक्षणास प्राधान्य देणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व्यापक प्रमाणावर प्रसार करणे जरूर आहे. त्यामुळे केवळ वैज्ञानिकांच्याच नव्हे तर एकूणच सर्वसाधारण माणसाच्या मनोवृत्तीत बदल अपेक्षित आहे. अशा प्रकारचा वैज्ञानिक मानवतावाद हा फार आदर्शवादी प्रकार आहे खरे, परंतु त्याला पर्याय दिसत नाही.
21 सी, शुभेच्छा अपार्टमेंट, विवेकानंद रोड,
ठाणे (प.) — 400 602
[1999 मधील तुळपुळे स्मृतिव्याख्यानाचे टिपण; बायजा जानेवारी-फेब्रुवारी 2000 च्या अंकात प्रसिद्ध झालेले.]