स्त्रीवैज्ञानिक आणि त्यांच्या संशोधनाचे सामाजिक आयाम

स्त्रीवैज्ञानिकांचा विचार करताना मी पाच आधुनिक स्त्री वैज्ञानिकांचा परिचय येथे करून देणार आहे. या पाच जणींनी तत्कालीन स्वीकृत सिद्धान्तांना छेद देणारे संशोधन केले. त्याचबरोबर त्यांच्या संशोधनातून प्रचलित, स्वीकृत सामाजिक व्यवहारांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये ज्या मोठ्या उणिवा त्यांना आढळल्या त्यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली. परिणामी या वैज्ञानिक संशोधनाचे सामाजिक मोल समाजाला मान्य करावे लागले. प्रचलित व्यवस्थांमध्ये सकारात्मक बदल करावयाला त्यांच्या मौलिक संशोधनाचा हातभार लागला. या पाच जणींच्या संशोधनाला असलेली सामाजिक जाणिवेची झालर त्यांच्या वैज्ञानिक मोठेपणाला शोभा देणारी आहे.
स्त्री-वैज्ञानिक आणि त्यांच्या संशोधनाचे विषय
ज्या पाच स्त्रियांचा विचार येथे केला आहे त्यांच्या संशोधनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एका विषयात प्रावीण्य मिळवलेल्या या संशोधक फक्त त्याच एका विषयाचा खोलवर अभ्यास करून थांबल्या नाहीत. स्वतःचे संशोधन करताना वेगवेगळ्या विज्ञानशाखांमध्ये निर्माण होणाऱ्या ज्ञानाला त्यांनी आपल्या संशोधनात एकत्र आणले. यामुळे एकाच वेळी त्यांचे नाते अनेक विषयांशी निर्माण झाले. अनेक प्रकारच्या संशोधकांशी त्यांनी देवाणघेवाण केली. ही देवाणघेवाण विषय, देश, काळ आणि भाषा यांच्या सीमा छेदून गेली. त्यांना सार्वत्रिक स्वरूप मिळाले. खरे तर कोणत्याही मोठ्या वैज्ञानिक संशोधकात आढळणारे हे खास गुण आहेत. या पाच जणी म्हणूनच जागतिक पातळीवरच्या बिनीच्या संशोधकांमध्ये गणल्या गेलेल्या आहेत.
आधुनिक विज्ञानाला सुरुवातीला धर्माशी आणि लोकांच्या प्रचलित धार्मिक समजुतींशी, संकल्पनांशी संघर्ष करावा लागला. आधुनिक विज्ञान जसजसे प्रस्थापित झाले तसतशी त्या विषयांची वा संशोधकांची, संस्थेची सुद्धा पीठे झालेली दिसली. प्रचलित राज्य-अर्थ-व्यवस्थेचा पैसा, पाठिंबा आणि प्रसिद्धी यातून काही ठिकाणी साचलेपणा, बंधने आलेली दिसली. पण या लेखातील विदुषी अशा पठडीत अडकल्या नाहीत. ज्ञान-विज्ञानाचा वसा घेतलेल्या त्या सच्च्या संशोधक आहेत याचा प्रत्यय त्यांच्या कामातून आलेला आहे. आज जागतिक विज्ञानक्षेत्रात खऱ्या संशोधनाला मान्यता देण्याचा उदारपणा धर्म व्यवस्थेपेक्षा निश्चितच अधिक आहे. त्यामुळे या स्त्री संशोधकांना आधुनिक वैज्ञानिक आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. यांपैकी फ्लॉरेन्स नाईटिंगेल या एकोणिसाव्या शतकातील आहेत. बाकीच्या विसाव्या शतकाचे प्रतिनिधित्व करतात.

आधुनिक आरोग्य व्यवस्थेची सुधारक: फ्लॉरेन्स नाइटिंगेल (1820 – 1910)
वैज्ञानिक दृष्टीने विविध सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची वृत्ती युरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाआधी रुजवयाला सुरुवात झाली होती. घराबाहेर पडून स्त्रियांनी सामाजिक काम करणे ज्या काळात युरोपमध्येही तितकेसे प्रचलित नव्हते, त्या काळाच्या पार्श्वभूमीवर फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्यांचे काम अजरामर झाले आहे. त्यांनी आरोग्य-क्षेत्रात आणि विशेषतः परिचारिकांमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवेत सुधारणा करण्यासाठी जी विशेष कामगिरी केली त्यामुळे जगभरचे लोक त्यांना जाणतात. लौकिक अर्थाने फ्लॉरेन्स नाइटिंगेल या खरे तर वैज्ञानिक संशोधक नाहीत. स्वतः संशोधक नसूनही त्यांनी काटेकोर वैज्ञानिक पद्धतीने आरोग्यक्षेत्रातील भयानक स्थितीचे वास्तव समाजापुढे आणले. केवळ वर्णन करून ही वस्तुस्थिती मांडली नाही तर अतिशय परिश्रमपूर्वक योग्य ती निरीक्षणे करून त्यांनी महत्त्वाची प्रचंड आकडेवारी गोळा केली. माहितीचे विश्लेषण केले आणि आरोग्य सेवेतील अनागोंदी कारभार त्यामधून समाजासमोर आणला. यासाठी त्यांनी संख्याशास्त्राचा उपयोग सामाजिक प्रश्नाची तीव्रता मोजण्यासाठी आणि प्रभावी मांडणी करण्यासाठी केला. त्यांचे “नोटस् ऑन नर्सिंग’ हे 1860 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक अतिशय गाजले.
1840-45 साली जेव्हा त्यांनी इंग्लंडमध्ये या क्षेत्रात काम करावयाला सुरुवात केली तेव्हा केवळ स्त्री असणे या एकमेव कारणामुळे गरजू गरीब स्त्रिया या व्यवसायामध्ये परिचारिका बनून येत. अशी सेवा देण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण तेव्हा दिले जात नसे. त्याची गरजही कोणाला वाटत नव्हती. बायकांना उपजतच सेवा करण्याची क्षमता असते, ही तेव्हाची सर्वसाधारण सामाजिक समजूत होती. याचबरोबर आरोग्यसेवा देणारे दवाखाने, इस्पितळे, यांत अत्यंत बेशिस्त, अस्वच्छता, अनारोग्य यांचे साम्राज्य असे. या सर्व परिस्थितीची दाहकता आणि परिचारिकांचे आरोग्यासंबंधीचे, स्वच्छतेसंबंधीचे अज्ञान फ्लॉरेन्स यांच्या आकडेवारीमधून प्रथमच समाजापुढे आले. त्यावर मात करण्यासाठी सुचविलेल्या पद्धतींमुळे उपायांच्या अंमलबजावणीतून होणाऱ्या बदलांचे परिणाम आणि प्रमाणही तपासता आले. सरकारी अधिकाऱ्यांचा आणि नोकरशहांचा मनमानी कारभार आणि त्यांची वृत्तीही त्यातून स्पष्टपणे समजली. गैरव्यवस्थेचा दोष नक्की कोठे, कोणाचा आणि किती प्रमाणात आहे, त्याचे परिणाम कसे होत आहेत, हे त्यातून अधोरेखित झाले. आरोग्यव्यवस्थापनात सुधारणा करण्याची प्रक्रिया पुढे त्यातूनच सुरू झाली. परिचारिकांचे प्रशिक्षणशास्त्र हेदेखील त्यांच्या अभ्यासातून विकसित झाले, क्रीमियन युद्धात प्रत्यक्ष लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांपेक्षाही युद्धरेषेपासून दूर असलेल्या तळावरील दवाखान्यातील अनागोंदी कारभाराने मरणाऱ्या जखमी सैनिकांची संख्या किती तरी अधिक होती, हे त्यांनी संशोधनातून सप्रमाण दाखवून दिले. हलगर्जीपणा, अस्वच्छता, अपुरी औषधे, अपुरी साधनसामुग्री, आरोग्यसेवकांच्या प्रशिक्षणातील कमतरता या सर्व गोष्टी फ्लॉरेन्स यांनी बारकाईने नोंदल्या आणि प्रशासनासमोर मांडल्या. आरोग्य व्यवस्थेमध्ये आज संख्याशास्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याची सुरवात करण्याचे श्रेय फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना जाते. संख्याशास्त्रात सामान्यपणे वापरला जाणारा “पाय चार्ट” (pie chart) हा फ्लारेन्स यांनी विकसित केला आहे हे फार थोड्यांना माहीत असते. आजकाल तर व्यवस्थापन-शास्त्रात त्याचप्रमाणे इतर अनेक क्षेत्रांत त्याचा वापर अनिवार्य ठरला आहे.
गोऱ्या माणसांच्या श्रेष्ठत्वाला आव्हान: मार्गारेट मीड (1901 – 1978)
मानवाच्या विकासात आनुवंशिकता आणि संस्कार (nature and nurture) यांपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे त्यावरून एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्य जगात वाद झाला होता. चार्ल्स डार्विन यांनी सजीवांची उत्क्रांती विशद करणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धान्त 1859 साली मांडला. त्यांचे मानवाची उत्क्रांती (Descent of Man) हे पुस्तक 1871 मध्ये प्रसिद्ध झाले. तेव्हापासून डार्विन यांच्या सिद्धान्ताचा “बळी तो कान पिळी’ यासारखा चुकीचा अर्थ काही लोकांनी, विशेषतः आनुवंशिकता श्रेष्ठ मानणाऱ्या काहींनी, प्रसृत केला. निसर्गानेच गोऱ्या माणसांना जगावर राज्य करण्यासाठी निर्मिले आहे असे आग्रहाचे प्रतिपादन हे विद्वान करीत असत. त्यातच पाश्चात्त्य देशांत विज्ञान-तंत्रज्ञान क्रांती झाल्याने काही सामाजिक डार्विनवादी लोकांना बळ मिळाले होते. साम्राज्यशाहीचा विस्तार करण्यात यशस्वी ठरल्यामुळे गोरा वंश श्रेष्ठ असल्याचा समज तेथे प्रचलित होता. 1920 साली हा आनुवंशिकतावाद पराकोटीला पोहोचला. सामाजिक, सांस्कृतिक संस्कार महत्त्वाचे मानणारे वैज्ञानिकांचे गट या नैसर्गिक अनुवंशवर्चस्ववादाशी जोरदार वैचारिक मुकाबला करीत होते. याच काळात जीवशास्त्राची आणि मानववंशशास्त्राची फारकत झाली. फ्रान्सिस गाल्टन (1822-1911) हे वांशिक श्रेष्ठत्व मानणाऱ्यांचे नेते होते, तर संस्कारांचे महत्त्व मानणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये फ्रांत्झ बोस हे आघाडीवरील मानववंश-शास्त्रज्ञ होते.
विसाव्या शतकात, सुरुवातीला पहिल्या महायुद्धाच्या काळात, विज्ञानाचे विघातक स्वरूप जगापुढे आले. गोऱ्या लोकांच्या वंशश्रेष्ठत्वाचा दाह जगाने अनुभवला. या अनुभवांना इतिहासात तोड नव्हती. या घटनांनी बोस यांच्यासारखे मानववंशशास्त्रज्ञ अस्वस्थ झाले होते. अनुवंशवर्चस्ववादाचा मुकाबला आपल्या शास्त्रीय संशोधनातून ते करीत होते. त्यांच्या विचारांना भरभक्कम पुरावा उपलब्ध करून देण्याचे काम अमेरिकेतील मार्गारेट मीड आणि रूथ बेनेडिक्ट या बोस ह्यांच्या दोन विद्यार्थिनींनी आपल्या शास्त्रीय संशोधनातून केले. वंश, आनुवंशिकता आणि संस्कृती यांचा संबंध तपासण्याचे आणि संशोधनाचे निष्कर्ष जगापुढे ठेवण्याचे काम मार्गारेट मीड यांनी त्यांच्या “कमिंग ऑफ एज इन सामोआ’ या पुस्तकातून केले. या पुस्तकाने पा चात्त्य देशातील बुद्धिवंत वर्गात मोठी खळबळ उडाली. मार्गारेट मीड या मानवशास्त्राच्या अभ्यासक होत्या. सामोआ बेटात राहून, अतिशय परिश्रम घेऊन तेथील स्थानिक लोकांची संस्कृती, माणसांची सामाजिक वर्तणूक यांचा अभ्यास त्यांनी त्या समाजात राहून केला. मानवी संस्कृतीचा आणि सामाजिक वर्तणुकीचा संबंध भौगोलिक वैशिष्ट्यांशी आहे हे आपल्या संशोधनातून त्यांनी दाखवून दिले. गोऱ्या लोकांची पा चात्त्य जीवनपद्धती वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून सर्व जगभर रुजविण्याचे प्रयत्न कसे चुकीचे आणि घातक आहेत, हेही त्यांच्या संशोधनातून पुढे आले. माणसांच्या, त्यांच्या सांस्कृतिक वैविध्याच्या बहुविध क्षमता नष्ट करण्याचे पा चात्त्य देशांचे धोरण घातक ठरेल हा इशाराही त्यांनी पा चात्त्य समाजांना दिला.
1920 सालच्या दशकात पा चात्त्य देशांतील उदारमतवादी, मानवतावादी वातावरणात बोस यांच्या या दोन विद्यार्थिनींच्या संशोधनाची आणि त्यांच्या पुस्तकांची दखल जोमदारपणे घेतली गेली. रशियामधील क्रांतिकारी वातावरणाचाही हा विचार पसरविण्यास हातभार लागला. त्या काळात मार्गारेट मीड यांच्या पुस्तकाच्या अक्षरशः लाखो प्रती खपल्या. एका अर्थी विज्ञानाच्या साहाय्याने सांस्कृतिक, सामाजिक समजुतींकडे निरखून बघण्याच्या आणि पारखून घेण्याच्या चळवळीची ही सुरुवातच म्हणावी लागेल.
पुढील काही वर्षांत मार्गारेट मीड यांच्या संशोधन-पद्धतीमधील काही त्रुटी वैज्ञानिकांनी पुढे आणल्या. संशोधन-पद्धतींमधील त्रुटी या त्या काळातील यांत्रिक विचारपद्धतीमधून निर्माण झाल्या होत्या असेही लक्षात आले. पण त्यांमुळे मानववंश-शास्त्राच्या संशोधनात वैज्ञानिक दृष्टी आणि कठोर वैज्ञानिक संशोधनपद्धती विकसित होण्याला चालना मिळाली. मानवाची उत्क्रांती, मानववंशशास्त्र, जेनेटिक्स, आणि जीवशास्त्र यांचे गुंतागुंतीचे संबंध लक्षात यावयाला लागले. असे जरी झाले तरी आनुवंशिकता आणि संस्कार या वादाच्या माध्यमातून तसेच मार्गारेट मीड यांच्या संशोधनामधून सांस्कृतिक घटकांना मिळालेल्या वैचारिक आधारामुळे एका व्यापक पातळीवर पर्यावरणाला महत्त्व देण्याचे बीज याच काळात रोवले गेले, असे म्हणावे लागेल. आनुवंशिकता आणि संस्कार या दोन्ही घटकांचा परिणाम मानवी समाजावर होतो हेच मार्गारेट मीड यांच्या संशोधनामुळे अधोरेखित झाले.
आधुनिक पर्यावरणाच्या प्रश्नाकडे लक्षवेध : रेचेल कार्सन (1907-1963) अशीच खळबळ जीवशास्त्रज्ञ रेचेल कार्सन यांच्या “सायलंट स्प्रिंग” या पुस्तकाने 1960 च्या दशकात उडवून दिली. 1950 साली रेचेल कार्सन यांनी लिहिलेले “द सी अराउंड अस्” हे पुस्तक अतिशय गाजले होते. पृथ्वीच्या तीन चतुर्थांश भागास व्यापून असणारा समुद्र आणि त्यातील लाखो जीवजातींसंबंधी आपणा मानवांना अतिशय तुटपुंजी माहिती आणि ज्ञान आहे. आपली जमिनीवरील मानवी संस्कृती ही अपरिहार्यपणे या समुद्रजीवनाशी जोडली गेलेली आहे. किंबहुना उत्क्रांतिक्रमात जमिनीवरील सबंध जीवसृष्टी ही समुद्री जीवांच्या विकासानंतर निर्माण झालेली आहे. या समुद्रस्थित जीव-सृष्टीचे अथांग, खोल, काळोख्या अंधारातील, पाण्यातील जीवन, त्यातील प्रचंड गुंतागुंतीचे नातेसंबंध, अवलंबित्व, त्यामधील घडामोडी यांचे अत्यंत प्रभावी वर्णन करणारे हे पुस्तकही गेल्या शतकातले एक महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. रेचेल कार्सन यांची समुद्रस्थित जीवांच्या गुंतागुंतीचे रहस्य शोधणारी दृष्टी त्यानंतर अमेरिकेच्या भूमीवरील जीवसृष्टीकडे वळली. अनेक वर्षे अमेरिकन सरकारच्या मत्स्य आणि प्राणि-सेवा संस्थेमध्ये कार्यरत असताना त्यांच्या संशोधनातून प्रचंड माहिती आणि ज्ञान त्यांनी जमा केले होते. प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्या अभ्यासातून त्यांच्यावर होणाऱ्या रसायनांच्या घातक परिणामांची तीव्र जाणीव त्यांना होत गेली. या दुष्परिणामांच्या निरीक्षणांमुळे खरे तर रेचेल कार्सन यांना खूप राग येत असे. पण आपला राग आवरून अतिशय काटेकोरपणे त्यानी याबद्दलची सर्व वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत आणली.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतील रासायनिक उद्योगांनी आपला मोहोरा माल खपविण्यासाठी नागरी क्षेत्राकडे वळविला होता. नफ्यासाठी खाजगी मक्तेदार कंपन्या सरकारी पातळीवर या सर्व रसायनांचा प्रसार करीत असत. सरकारी आशीर्वादाने सर्व नागरी भूप्रदेशावर, घरादारांवर, लोकांवर, अन्न-पदार्थांवर, होणाऱ्या परिणामांची तमा न करता रसायनांचा वापर केला जात असे. हजारो प्रकारची रसायने, सूक्ष्म जंतू आणि कीटक नष्ट करण्यासाठी म्हणून सर्व भूपृष्ठावर फवारण्याची एक लाटच त्या काळात अमेरिकेत आली होती. एखाद्या किडीचा प्रादुर्भाव एखाद्या पिकावर दिसताच हजारो एकर शेतीच्या क्षेत्रावर विमानातून घातक रसायनांची फवारणी केली जात असे. इतकेच नव्हे तर शहरात आरोग्य आणि स्वच्छता राहावी म्हणून मोठ्या प्रमाणात अनेक कीटकनाशके फवारली जात असत. अशा बेदरकारपणे फवारलेल्या रसायनांमुळे असंख्य पशू, पक्षी, कीटक आणि जमिनीतील अतिशय उपयुक्त असणारे सूक्ष्मजीवसुद्धा नष्ट होत होते. मोठ्या प्रमाणावर फवारलेली रसायने जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर नद्या, नाले, तळी, समुद्र यांच्या पाण्यात मिसळून जात असत. त्या पाण्यातील असंख्य जलचर, मासे तर नष्ट होत होतेच; पण असे मासे खाऊन जगणारे पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने नष्ट झालेले आढळत होते. ठिकठिकाणाहून या सर्व प्रकाराच्या बातम्या वर्तमान पत्रांत येत असत.
त्यातही डी.डी.टी या रसायनाची फवारणी तर फारच प्रचलित होती. याची घातकता तंबाखूपेक्षा अधिक आहे हे रेचेल कार्सन यांनी सप्रमाण दाखवून दिले. ह्या सर्व प्रकाराने अस्वस्थ झाल्यामुळे त्यांनी एकाहाती प्रचंड संशोधन केले, पुरावे गोळा केले, रासायनिक फवारणीचे अनंत दुष्परिणाम तपासले, नोंदले, मोजले. अनेक फळबागांवर शेतांवर केलेल्या फवारणीमुळे लोकांच्या आणि विशेषतः शेतमजुरांच्या मुलांवर, गर्भवती स्त्रियांवर परिणाम होताना दिसत होते ते अभ्यासले. कॅन्सरसारख्या रोगाचे प्रमाणही त्यामुळे वाढताना त्याना आढळले. स्वतः रेचेल कार्सन याच रोगाची शिकार झाल्या होत्या. तरीसुद्धा नेटाने, परिश्रमपूर्वक गोळा केलेले सर्व पुरावे सायलंट स्प्रिंग या पुस्तकाद्वारे त्यांनी जगापुढे आणले. त्यांना सरकारी नोकरशहा आणि मक्तेदार धनदांडग्या कंपन्यांच्या रोषाचे धनी व्हावे लागले. पण या कशानेही विचलित न होता हे प्रचंड संशोधन त्यांनी जगापुढे मांडले. त्याची दखल घेणे अध्यक्ष केनेडींनाही भाग पडले. डी.डी.टी. वर अमेरिकेच्या सरकारने बंदी घातली. घातक रासायनिक द्रव्ये फवारण्यासारख्या प्रथा संपविण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाल सुरू झाली. रेचेल कार्सन यांनी 1963 साली जगाचा निरोप घेतला. अमेरिकेने पर्यावरणरक्षणासाठी 1969 साली कायदा केला तेव्हा मात्र त्यांच्या अथक परिश्रमांचे खरे सार्थक झाले.
सर्व सजीव सृष्टी ही असंख्य पातळ्यांवर गुंतागुंतीच्या रचनेने गुंफली गेली आहे आणि मानवाचे त्यावरील आक्रमण हे इतर जीवजातींच्याप्रमाणेच स्वजातीच्या नाशाला कारणीभूत ठरणारे आहे याचा इशाराच रेचेल कार्सन यांच्या सामाजिक महत्त्वाच्या वैज्ञानिक कामाने दिला. मानवी समाजाला त्याच्या घातक कृतींची जाणीव त्यांनीच सर्वप्रथम करून दिली त्यामुळे पर्यावरणशास्त्राचे आणि पर्यावरण-चळवळीचे मातृत्व खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे जाते.
यांत्रिक नागरी नियोजनाला आव्हान: जेन जेकब्स (1920- )
निसर्गातील अनेक जीवजातींमध्ये जे गुंतागुंतीचे नातेसंबंध दिसतात तसेच गुंतागुंतीचे नातेसंबंध मानवी समाजातही आढळतात. समाजातील विविध घटकांना, विविध प्रदेशातील लोकांना, समूहांना एकाच आर्थिक व्यवस्थेमध्ये नकळतपणे एकत्र आणण्याचे काम मोठी शहरे करीत असतात. नानाविध उद्योजकांच्या उद्योगांना, व्यापार-उदीमाला आणि देशोदेशी पसरलेल्या विविध संस्कृतीच्या लोकांना शहरे एकाच अवकाशात आणतात आणि शहरांमध्ये एक वेगळे, दाट नागरी सांस्कृतिक, सामाजिक रसायन तयार होते. आर्थिक समृद्धी हे या शहरांचे खास वैशिष्ट्य असते. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित झालेल्या अर्थव्यवहारांमुळे शहरीकरणाचे प्रमाण आणि वेग प्रचंड वाढला. नियोजनाला काहीही अवसर न देता शहरे अस्ताव्यस्तपणे वाढली. त्यातूनच आधुनिक नागरीनियोजन-शास्त्राचा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उदय झाला.
एकोणिसाव्या शतकातील प्रचलित यांत्रिक विश्लेषणपद्धतीचा उपयोग करून वैज्ञानिक क्षेत्राने खूप झेप घेतली होती. यश संपादन केले होते. त्यामुळे या पद्धतीला उपयोजित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी मान्यता मिळाली. शहरे ही यंत्रे आहेत आणि त्यांची रचना यांत्रिक पद्धतीने केली तर अस्ताव्यस्त वाढणाऱ्या शहरी समाजाला, नगरातील बेशिस्तीला आवर घालता येईल, असे सिद्धान्त अनेक नगररचना-शास्त्रज्ञांनी मांडले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून असे नागरी धोरण वाढत्या आक्रमकतेने युरोपात आणि अमेरिकेत राबवले जाऊ लागले होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत मोटारवाहतुकीसाठी महाकाय महामार्ग बांधण्याची आणि रस्त्यांच्या गरजेनुसार शहरांची पुनर्रचना करण्याची एक प्रचंड मोहीमच राबविण्यात आली होती. कागदांवरचे नागरीनियोजन आराखडे प्रशासनाने कठोरपणे राबविले. त्या काळी अमेरिकेत खाजगी मोटारउद्योगातील मक्तेदार कंपन्या सर्व नागरिकांना खाजगी गाडीचे स्वप्न विकत होत्या. वेगवान खाजगी मोटारीच्या प्रवासाचा हव्यास नागरिकांमध्ये झपाट्याने वाढीला लागला. गुळगुळीत रस्ते आणि त्यावरून सुरळीत धावणाऱ्या असंख्य गाड्या, दूरवर पसरलेली नागरी घरांची वस्ती, यांचे स्वप्न पुढील दोन दशकांत अमेरिकेने साकार तर केले; पण त्यापायी हजारो गरीब लोकांच्या, काम-गारांच्या वस्त्या, एकट्या स्त्रियांच्या तसेच सामाजिक दृष्ट्या एकसंध असलेल्या गटांच्या अनेक नागरी विभागांवर रोडरोलर फिरविले गेले. त्यांतही काही वांशिक गटांना इतरांपेक्षा अधिक त्रास भोगावे लागले. एकमेकांना आधार देणारे सामाजिक लोकगट बळजबरीने विखुरले गेले. अनेकांचे सामाजिक आधारच हरवून गेले. अमेरिकेच्या सर्व भूभागावर नकाशात उभ्या आडव्या रस्त्यांची आखणी करून सरळ रुंद रस्तेबांधणीची मोहीम बेदरकारपणे राबविली गेली.
यासोबतच दाटीवाटीने वसलेल्या शहरांतील गर्दी हटविण्याची, स्वतंत्र खाजगी घरांची गरज बिल्डर आणि नगर विकासक मोठ्या जाहिरातींच्या माध्यमांतून प्रतिपादत होते. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी हे सर्व आवश्यक आहे अशीही समजूत करून दिली जात होती. वरकरणी पाहता काही नागरी प्रश्न काही काळ सुटल्यासारखे भासले पण वाहतुकीसारखे नवे जटिल प्रश्न त्यांतून निर्माण झाले. या नियोजनपद्धतीवर जेन जेकब्स हिने शरसंधान केले ते 1960 च्या दशकात. मानवी समाजातील गुंतागुंतीचे प्रश्न हाताळण्यासाठी यांत्रिक नगरनियोजनपद्धतीच्या असलेल्या मर्यादा जेन जेकब्स ह्यांनी सप्रमाण दाखवून दिल्या. नागरी सामाजिक अभिसरण-प्रक्रियेची मोजणी करून त्याचे संबंध तपासता येत नाहीत. महानगरातील सामाजिक संबंधाचे भान पद्धतशीर निरीक्षणांतून, वर्णनात्मक अभ्यासातून तसेच इतिहासाच्या प्रवाही अभ्यासातून होऊ शकते. येथे केवळ मोजणी करून, आकडेवारी जमवून केलेली विश्लेषणपद्धत पुरेशी ठरत नाही हे सर्व प्रथम जेन जेकब्स या पुरातत्त्वशास्त्रज्ञ असलेल्या विदुषीने आपल्या “डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज” या पुस्तकातून सप्रमाण दाखवून दिले. न्यूयॉर्क शहरातून असंख्य गरीब लोकांच्या घरावरून वरवंटा फिरविणारा महामार्ग या एका बाईच्या अथक परिश्रमामुळे रद्द केला गेला. तेथील प्रचंड मोठे 400 एकर क्षेत्रफळाचे मध्यवर्ती उद्यान तिच्यामुळे वाचले. तत्कालीन नगरनियोजनकारांच्या यांत्रिक नियोजनपद्धतीचे, सामाजिक अज्ञानाचे आणि बेदरकार नोकरशाहीचे वाभाडे काढणारे हे पुस्तक आज नगरनियोजन शास्त्रात फार महत्त्वाचे मानले जाते.
मानवी संबंध कसे निर्माण होतात, कसे विकसित होतात, तसेच शहरे कशी आणि कशामुळे विकसित होतात या मानवी प्रक्रियेचा सखोल अभ्यास नगररचना-कारांनी करायला हवा हे जेन जेकब्स यांच्या संशोधनाचे मुख्य सूत्र राहिले आहे. केवळ दगड विटा, उंच इमारती, महाप्रचंड कारखाने, महाकाय रस्ते आणि नागरी भौतिक पाया-भूत सुविधा म्हणजे शहरे, ही समजूत हिरिरीने खोडून काढण्याचे महत्त्वाचे काम या पुस्तकाने केले.
जेन जेकब्स या पुरातत्त्वशास्त्रज्ञ, प्राचीन नागरी विकास आणि नगरांच्या रचना हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय. त्यांची या विषयावरची अनेक पुस्तके गाजली आहेत. शहरे का वाढतात? शहरांच्या अर्थव्यवस्था खेड्यांपेक्षा का विकसित असतात? शहरे का नष्ट होतात? मानवी समाजाच्या, संस्कृतीच्या प्राचीन काळापासूनच्या विकासात शहरांचे किती महत्त्वाचे योगदान आहे यांसारख्या प्रश्नांना त्यांनी ऐरणीवर आणले. आणि हे सर्व करताना नैसर्गिक संपत्तीवाढ, उत्क्रांति-प्रक्रिया आणि मानवी अर्थव्यवस्था यातील साम्य एका नव्या पुस्तकातून त्यांनी मांडले आहे. त्यांचे “नेचर ऑफ इकॉनॉमीज’ हे पुस्तक 2000 साली प्रकाशित झाले. त्यामधील नैसर्गिक विकास प्रक्रियेला असलेला वैज्ञानिक तात्त्विक पाया पुरविला आहे तो लिन मार्गुलीससारख्या आधुनिक जीवशास्त्रज्ञांनी.
उत्क्रांतीच्या सिद्धान्ताला नवे क्रांतिकारी वळण?: लिन मार्गुलीस (1935 – )
सजीवांतील पेशींचा अभ्यास करणारी पेशीशास्त्र ही एक खास विज्ञानशाखा विकसित झाली आहे. पेशीच्या केंद्रामध्ये असलेल्या गुणसूत्रांचा अभ्यास हा अनुवंशशास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला जातो. विसाव्या शतकात अनेक शास्त्रज्ञांनी त्यात मोलाचे संशोधन करून महत्त्वाची भर घातली. अशा वेळी लिन मार्गुलिस ह्यांचे लक्ष मात्र या प्रचलित केंद्रिका संशोधनाच्या ऐवजी पेशीमधील केंद्रिकेच्या सभोवताली असलेल्या अवयविकांकडे (organelles) गेले. यात मायटोकाँड्रीया आणि इतर दोन प्रकारच्या सूक्ष्म बुडबुड्यांवर त्यांनी आपले संशोधन केंद्रित केले. हे बुडबुडे म्हणजे स्वतंत्र डीएने भरलेल्या पातळ आवरणाच्या सूक्ष्म पिशव्या आहेत. ह्या सूक्ष्म पिशव्या अलग करून प्रयोगशाळेत योग्य वातावरणात ठेवल्या असता त्यांची वाढ होते आणि दुभाजनाच्या क्रियेने पेशींच्याप्रमाणेच त्यांची संख्या वाढते हे त्यांच्या लक्षात आले. केंद्रिका नसलेले हे सजीव म्हणजे स्वतंत्र असे बॅक्टेरिया आहेत हे त्यांनी सिद्ध केले. मानवी शरीरातील पेशींमधील मायटोकॉड्रीयांना पेशीचे ऊर्जानिर्मितिकेंद्र (power house) मानले जाते. त्यांना असा प्रश्न पडला की हे स्वतंत्र बॅक्टेरिया पेशींच्या आत कसे शिरले असतील. आणि त्यांचे सजीव सृष्टीच्या विकासात काय महत्त्व आहे?
केंद्रिका नसलेल्या पेशींच्या आधी काही रसायनांनी भरलेल्या सूक्ष्म पिशव्यांच्या स्वरूपातील जीव पृथ्वीवर अवतरले. त्यांच्यातही खूप विविधता निर्माण झाली. एकाच प्रकारच्या द्रवरूप वातावरणात अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांची वाढ होतहोत त्यांची संख्या प्रचंड वाढली. कालांतराने या बॅक्टेरियाच्या पातळ त्वचेचा भेद करीत एक जीव दुसऱ्या बुडबुड्यात शिरला. तेथे हे दोन अथवा अधिक सजीव पातळ भिंतीच्या पलीकडील वातावरणातून पोषकद्रव्ये शोषून घेत एकत्रपणे वाढतच राहिले. या जीवांचेही दुभाजन होतहोत ते संख्येनेही वाढले. ही एकमेकांच्या आवरणात घुसण्याची प्रक्रिया या सूक्ष्म जीवांच्या एकाच वातावरणात एकत्रित राहण्यातून उद्भवली. एकमेकांच्या साहाय्याने साध्या जीवांपासून अतिशय गुंतागुंत असलेल्या सजीवांची पेशीनिर्मितिप्रक्रिया अव्याहत-पणे चालू राहिली आणि त्याच पद्धतीने असंख्य प्रकार असलेले वनस्पती आणि प्राणिजीवन सृष्टीमध्ये वाढत गेले. अशा त-हेने विविध सूक्ष्मजंतूंच्या सह-अस्तित्वातून पेशींची निर्मिती झाली असावी असा सिद्धान्त लिन मार्गुलीस ह्यांनी 1969 साली मांडला. Symbiogenesis या नावाने तो ओळखला जातो. आज या सिद्धान्ताला मान्यता मिळाली आहे.
ब्रिटिश संशोधन लव्हलॉक यांच्या 1970 च्या दशकात मांडलेल्या गाइया सिद्धान्ताला साहाय्यभूत होणारे संशोधनही मार्गुलीस यांनी केले. गाइया सिद्धान्त थोडक्यात मांडावयाचा तर तो ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेने विशद करता येईल. गाइया म्हणजे वसुंधरा. एक प्राचीन ग्रीक देवता. गाइया सिद्धान्त म्हणजे सबंध सजीव सृष्टीच्या नाते-संबंधाचा, परस्परावलंबन तत्त्वाचा, आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त. लिन मार्गुलीस यांच्या वचनांचा आधार घेऊन सांगायचे तर गाइया म्हणजे अवकाशातून पाहिले तर दिसणारा, पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या सहकार्याचा आणि सहजीवनाचा सिद्धान्त असे म्हणता येईल. पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा मूलभूत पद्धतीने घेतलेला वेध. पृथ्वीवरील सर्व सजीव एकमेकांशी जोडलेले आहेत कारण त्या सर्वांना स्पर्श करणारे पृथ्वीचे वातावरण आणि त्यांना जीवन देणारे पाणी आणि सूर्याची ऊर्जा हे स्रोत समान आहेत. या पृथ्वीवर सर्व सजीवांनी एकत्रितपणे ही समृद्ध सजीव सृष्टी, तसेच या पृथ्वीवरील हवामान आणि सर्व प्रकारच्या सजीवांना उपयुक्त पर्यावरणाची निर्मिती केली आहे.
विविधतेने नटलेल्या पृथ्वीची निर्मिती कोट्यवधी वर्षे अव्याहतपणे चालू असलेल्या उत्क्रांतिक्रमात झाली आहे. प्रथम स्वतंत्र प्रकारचे बॅक्टेरिया, नंतर त्यांच्या मीलनातून उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या रचना असलेल्या पेशी (protoctists), त्यांच्यातून जोडणी आणि विभाजन होत वाढलेल्या बुरशी (fungi), वनस्पती (plant), आणि प्राणी (animal) या पाच टप्प्यांमधून उत्क्रांतीची ही प्रक्रिया विकसित होत गेली, असा सिद्धान्त त्यांनी मांडला. सहजीवन आणि सहकार्य या दोन गोष्टींमुळे या पृथ्वीवरील मानवासहित सर्व सजीवसृष्टीचा विकास आणि वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या सजीवांच्या सहकार्यातून आणि गुंतागुंतीच्या अवलंबन असलेल्या नातेसंबंधांमधून या पृथ्वीवरची सृष्टी साकार झाली आहे. हा सिद्धान्त लिन मार्गुलीस यांनी “सिम्बियॉटिक प्लॅनेट’ या पुस्तकाद्वारे 1998 साली मांडला. भूगर्भशास्त्र आणि विशेषतः त्यातील आधुनिक जीवाश्मांचे शास्त्र, जेनेटिक्स, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करीत, त्यातील संशोधकांशी आणि त्यांच्या कामाशी आपले संशोधन जोडून घेत स्वतःचे संशोधन, सिद्धान्त त्यांनी रचले. या सर्व खडतर मेहनतीनंतर आता त्यांना आणि त्यांच्या कामाला विज्ञानक्षेत्रात मान्यता मिळाली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे सामाजिक शास्त्रांमध्येही नव्याने विचार सुरू झाला आहे.
स्त्री वैज्ञानिक: थोडक्यात परामर्श
फ्लॉरेन्स नाईटिंगेल, मार्गारेट मीड, रेचेल कार्सन आणि जेन जेकब्स या चार जणींनी आपल्या वैज्ञानिकतेला संवेदनशीलता आणि सामाजिक शहाणपणाची जोड दिली. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीला आधुनिक समाजातील गैर गोष्टी सर्वांना दिसत असतात तितक्याच सहजपणे दिसल्या. पण त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे त्यांकडे दुर्लक्ष करणे त्यांना शक्य झाले नसावे. आपले म्हणणे समाजापुढे आणण्यासाठी त्यांना त्यांची वैज्ञानिक दृष्टी आणि शिस्त उपयोगी आली. त्यासाठी त्यांनी विज्ञानाशी किंवा स्वतःच्या संवेदनांशी तडजोड न करता उलट या दोन्हीचा सर्जनशीलतेने आणि कुशलतेने वापर केला. जे सत्य आढळले ते स्पष्टपणे समाजापुढे आणण्यासाठी त्यांनी प्रचलित सामाजिक-राजकीय मतांची वा व्यवस्थेची पर्वा केली नाही. त्यांची ही एकात्मिक सामाजिक, वैज्ञानिक दृष्टी राजकारणाला आणि प्रस्थापितांनाही नमवायला कारणीभूत ठरली. त्यांच्या संशोधनाची दखल घेणे प्रस्थापित व्यवस्थेलाही भाग पडले. त्यांना जगन्मान्यता मिळाली. त्या व्यक्ति-स्वातंत्र्याच्या आणि विशेषतः स्त्री-स्वातंत्र्याच्या भोक्त्या असूनही आत्मकेंद्री मात्र नव्हत्या हे विशेषत्वाने नमूद करावयाला हवे.
लिन माणुलीस ह्यांचे संशोधन विज्ञानक्षेत्रापलीकडे अजून तरी फारसे प्रसिद्ध नाही. 2000 साली त्यांचा अमेरिकेतील वीस सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांमध्ये समावेश केला गेला आणि राष्ट्रपति क्लिंटन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. जगातील आघाडीच्या शंभर श्रेष्ठ आधुनिक वैज्ञानिकांच्या यादीत लिन मार्गुलिस ह्यांचा समावेश केला जातो.
एकोणिसाव्या शतकात डार्विनच्या उत्क्रांति सिद्धान्तातील survival of the fittest या निरीक्षणाचा ‘बळी तो कान पिळी’ असा चुकीचा पण सोयिस्कर अर्थ साम्राज्य-वादी विस्तारवादाच्या काळात पाश्चात्त्य प्रस्थापितांनी लावला होता. जीवघेणी स्पर्धा आणि वर्चस्ववाद या तत्त्वांच्या सहाय्याने साम्राज्य-विस्ताराच्या काळात जगातील देश वसाहतींच्या अर्थव्यवस्थेने जोडले गेले. डार्विन यांच्या संशोधनाचा सोयिस्कर अर्थ काढून त्याचा उपयोग साम्राज्यवादी शक्तींनी जगावर वर्चस्व मिळविण्यासाठी केला. आज जीव-शास्त्रीय आणि सूक्ष्मजीवांच्या संशोधनातून उत्क्रांति-प्रक्रियेतील सहकार्य आणि सहजीवन या तत्त्वांचे स्थान प्रकर्षाने, महत्त्वाचे म्हणून पुढे आले आहे. येणाऱ्या शतकात सहकार्याच्या आणि सहजीवनाच्या या तत्त्वज्ञानाला सार्वत्रिक मान्यता मिळाली तर त्याचे सकारात्मक परिणाम राजकीय, सामजिक क्षेत्रावर होऊ शकतात. पृथ्वीवर युद्ध आणि रक्तपात याऐवजी मानवी समाजाला स्वतःमध्ये बदल करावयाला वेगळी ऊर्जा यातून मिळेल हा आशावाद येथे चर्चिलेल्या पाच संशोधक स्त्रियांनी जिवापाड जपला. मानवजातीला तो नक्कीच लाखमोलाचा आहे.

संदर्भ
Florence Nightingale : Twenty Best Books. The Readers Digest Association, London 1956
Margaret Mead: A Terrible Beauty. The People and Ideas that Shaped the Modern Mind, a History, Peter Watson, Phoenix Press, 2001 Rachel Carson : The Sea Around Us. Rachel Carson, From Twenty Best Books, The Readers Digest Association, London 1956 Silent Spring, Rachel Carson, First Mariners Book, Edition 2001 Jane Jacobs : Lise and Death of Great American Cities. Jane Jacobs, Random House New York 1961 Economy of Cities. Jane Jacobs, Vintage Books, 1971 The nature of Economies. Jane Jacobs, Vintage Books Edition, 2001 Lynn Margulis :
Symbiotic Planet. Lynn Margulis, Basic Books, 1998

8, संकेत अपार्टमेंटस, उदय नगर, पांचपाखाडी, ठाणे — 400 602

काही डार्विनवाद्यांनी निसर्गाच्या रक्तरंजित आणि संघर्षावर आधारित असण्या-वर विशेष भर दिला. पण माझ्या प्रयोगशाळेतील नवे संशोधन जीवनाच्या जंजाळा-तील अनेक सुसंवाद दाखवते. संघर्ष हा एकच निसर्गनियम मानण्याच्या चुकीमुळे अगदी विज्ञानक्षेत्रातही उपयोजनाच्या संधी संरक्षक ऐवजी संहारकतेत शोधण्याची घाई झाली. संयमाअभावी आज संस्कृती विनाशाच्या काठावर उभी झाली. पण संघर्षाला निसर्गव्यवहारातला एकच सक्रिय घटक मानणे चुकीचे आहे—- उत्क्रांतीच्या प्रचंड प्रक्रियेत परस्परांना मदत करणे संघर्षापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.
जगदीशचंद्र बसू, अलाहाबाद विद्यापीठाच्या 1928 च्या दीक्षांत समारोहाच्या भाषणातून.
‘भविष्यातील मार्ग आखताना बऱ्याच वेळा इतिहासातून नीट समजून घेतलेले धडे उपयोगी पडतात. सध्या अनेक महत्त्वाच्या समस्यांवरचा रामबाण उपाय म्हणून जीवतंत्रज्ञानाचा झेंडा फडकवला जात आहे. एखाद्या विषयाला सांगोपांग टीकेविना पाठिंबा देण्यातील धोकेही उघडच आहेत. खूप अपेक्षा निर्माण करून ठेवल्याने जीव-तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या वैज्ञानिकांवर खास जबाबदारी आलेली आहे.’
—- पी. बलराम आणि एस. रामशेषन्, संपादकद्वय, ‘भारतातील जीवतंत्रज्ञान’ विशेषांक, ‘करंट सायन्स’,
Vol.60, No.9-10, 25-5-1991

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.