जाहिरा शेख गप्प राहिली असती तर? तर सुखाने चाललेल्या ‘रामराज्या’ला असा कलंक लागला नसता. कोर्टाचे काम वाढले नसते. सेक्युलर पक्षांना विरोधाचा मुद्दा मिळाला नसता. अपप्रचारी प्रसारमाध्यमांना न्यूज मिळाली नसती. ‘शांतता सौहार्दाचे वातावरण’ असेच टिकून राहिले असते. पण जाहिरा शेख बोलली. भारतीय लोकशाहीतला हा तसा दुर्मिळ प्रसंग आहे की कुणी सामाजिक कार्यकर्ता किंवा विरोधी पक्षनेता नाही तर एक सामान्य नागरिक असूनही ती उघडपणे सत्तेविरुद्ध बोलली. निकालात निघाले म्हणून गुजरात सरकार आनंदोत्सव साजरा करीत असतानाच बेस्ट बेकरी प्रकरणाला जाहिराच्या बोलण्याने नवे वळण मिळाले.
६ डिसेंबर १९९२ अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली. हजारो अविवेकी कारसेवकांनी ती पाडली. या प्रकरणात केंद्रातील तीन मंत्र्यांवर आरोप आहेत. या तिघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना ‘बाबरी मशिदीचे पतन हा हिंदू जनमताचा उद्रेक होता.’ आहे. हे अंशतःच खरे आहे. वस्तस्थिती मात्र त्यांच्यावरील आरोप गडद करणारीच आहे. मी स्वतः ६ डिसेंबरच्या त्या कारसेवेत सहभागी होतो. बाबरी मशीद पाडताना तर मी बघितलेच पण मागाहून ती पाडणाऱ्यांमध्येही सहभागी झालो. त्यानंतर देशभरात उसळलेल्या दंगली व वातावरण यामुळे पुढे मात्र हिंदुत्ववादी विचारसरणीपासून मी दुरावलो तो कायमचाच, अयोध्या प्रकरणापासून ते स्टेन्सची हत्या व गुजरात दंगलीपर्यंतच्या सगळ्या घटना मला अस्वस्थ करणाऱ्याच आहेत.
अयोध्येच्या मुद्द्यावरून पुन्हा सरकार व एकूणच देशाला वेठीला धरण्याचे संघपरिवाराचे प्रयत्न नव्याने चालू आहेत. या पार्श्वभूमीवर बाबरी मशीद प्रकरणातील एका वस्तुस्थितीची नोंद उद्याच्या निकालाआधी करणे गरजेचे वाटते. जाहिराइतकीच एक नागरिक म्हणून वस्तुस्थितीला वाचा फोडणे, ही मला माझी नैतिक जबाबदारी वाटते.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच भजन, कीर्तन, आदी धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला होता. लाखोंच्या संख्येने कारसेवकांच्या झुंडी जमा होत होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रा स्व संघ, भाजप आदी संघटनांच्या नेत्यांनी व्यासपीठावरून कारसेवकांना संबोधित करायला सुरवात केली होती. भडक-चिथावणीखोर भाषणांना ऊत आला होता. आडवाणी, जोशी यांनी नेहमीप्रमाणेच ज्वलंत भाषण केले. विनय कटियार, साध्वी ऋतंभरा व उमा भारती यांनी तर ‘एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो. . .’ अशा चिथावणीखोर घोषणा द्यायला सुरवात केली. कारसेवकांमध्ये उद्रेकाचे वातावरण निर्माण व्हावे, असाच त्या भाषणांचा माहौल होता. दुपारी १२ च्या सुमारास काही कारसेवकांनी बाबरी मशिदीच्या घुमटावर चढून भगवा झेंडा फडकवला. कारसेवकांमध्ये अतिरेकी आनंदाची एकच लाट उसळली. आणि काही कळायच्या आतच मशिदीवर घाव घातले जाऊ लागले. वातावरणात प्रचंड चीत्कार. ‘जय श्रीराम . . .’ ‘एक धक्का और दो’ . . . सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. व्यासपीठावरून आडवाणी यांनी ‘शांत रहा . . .’ असे एकदोन वेळा सांगून पाहिले. पण या शांततेच्या आवाहनात चुकूनही मशिदीवर चढलेल्या कारसेवकांना खाली उतरण्याची सूचना नव्हती. जे घडते आहे ते निषिद्ध आहे असा भाव नव्हता. काही क्षणांतच आडवाणी, जोशी वगैरे मंडळी व्यासपीठावरून निघून गेली. कटियार, ऋतंभरा, उमा भारती यांनी मात्र या कृतींना चिथावणी देणाऱ्या घोषणाच पुढेही चालू ठेवल्या.
झुंडीचे मानसशास्त्र वेगळेच असते. कधी कधी झुंड नेत्यांच्याही नियंत्रणाबाहेर जाते. जाऊ शकते. परंतु अयोध्येत जे घडले ते आडवाणी सांगतात तसे निव्वळ उत्स्फूर्त नव्हते. नेत्यांनी चिथावणीखोर भाषणांनी उद्रेकाचे असे वातावरण निर्माण केले की जे पुढे घडले ती कारसेवकांची उद्रेकक्रिया वाटावी. यात निश्चितपणे उपस्थित नेते दोषी आहेत. त्यात वरील तीन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश होतो.
सरकारच गुन्हे करत असताना न्यायालयाकडूनच न्यायाची अपेक्षा करावी लागते. पण नागरिक म्हणून आपणा सर्वांचीही जबाबदारी मोठीच आहे. धार्मिकता आणि धर्मांधता यात विवेकपूर्ण फरक करणे, बाह्य अतिरेकी शक्तींनी देशाला जेरीस आणले असताना अंतर्गत धर्मांध शक्तींना थारा न देणे, धाडसाची असली तरी त्याबद्दल स्पष्ट भूमिका घेणे, मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समाजांत अजूनही काही विवेकी लोक टिकून आहेत. त्यांची अनुकूलता हीदेखील मोठीच शक्ती आहे—या आधारेच धर्मांध शक्तींशी लढावे लागेल. मग त्या सरकारात असल्या तरी ! कधी कधी एखादी व्यक्तीही हे चित्र बदलू शकते. फक्त जाहिरासारख्या धाडसाची आवश्यकता आहे. नाहीतर, कवी साहिर यांनी म्हटल्यासारखे आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छा जाएगा . . . आणि अशी सत्याला दफन करणारी शांतता निर्माण झाली तर त्याला आम्हीच जबाबदार असू ,
इ १८ सप्टेंबर २००३ च्या लोकसत्तेतील लेखाचा हा संक्षेप लेखकाच्या संमतीने व शर्मिला वीरकरांच्या सूचनेनुसार पुनर्मुद्रित करत आहोत.