कादंबरी हा साहित्यप्रकार किती सर्जनशीलपणे हाताळता येऊ शकतो याचा अद्भुत प्रत्यय अर्नेस्ट कॅलनबाख यांची इकोटोपिया ही कादंबरी वाचताना येतो. मानवी संबंधातील गुंतागुंत, ताणतणाव, सर्जनशील पैलू, विश्वाचे आकलन, मनुष्य आणि विश्व यांच्यातील सहसंबंध हे असे कादंबरीचे विविधांगी विषय असतात हे आपण नेहमीच अनुभवतो. लेखकाची कल्पनारम्यता, चिंतनशीलता, भाषेच्या माध्यमातून एखाद्या कथेच्या अनुषंगाने कादंबरीत व्यक्त होते. याशिवाय ही कादंबरी वाचकाला खूप काही देऊ शकते हे इकोटोपिया वाचताना लक्षात येते. विश्वातील मनुष्यप्राणी व निसर्ग यांच्यातील सहसंबंध कसे आहेत हे प्रभावीपणे सांगणे पुरेसे न मानता, हे सहसंबंध कसे असावेत, हे कसे घडवले पाहिजेत, काय केले म्हणजे ते संबंध अधिक न्याय्य, आनंददायी होतील, याची एक ब्लू प्रिंट देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. या कादंबरीकडे वाचकांचे लक्ष वेधण्याच्या उद्देशानेच हे टिपण लिहीत आहे.
कादंबरीतील आशयाचा परिचय करून देण्यापूर्वी विसाव्या शतकात प्रचलित झालेल्या विकासाच्या प्रारूपाचा थोडक्यात आढावा घेणे आवश्यक वाटते. इकोटोपिया या प्रचलित विकासाच्या प्रारूपाला एका बाजूने प्रश्नांकित करते तर दुसऱ्या बाजूने या प्रारूपाला एक समर्थ पर्यायही सुचविते. विसाव्या शतकात विकास म्हणजे मोठे कारखाने; औद्योगीकरण; मोठी धरणे; निसर्गातील साधनसंपत्तीचा अविरत, अनिर्बंध आणि शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त उपयोग; शहरीकरण, जास्तीत जास्त भौतिक समृद्धी होय, असा आणि एवढाच अर्थ प्रचलित झाला व तो लोकप्रियही झाला. वारंवार होणारी युद्धे, वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना प्रचंड उत्पादनास प्राधान्य देणारी अर्थव्यवस्था, परकीय आक्रमणाच्या भीतीतून सुटका मिळावी ह्यासाठी निर्माण केलेली राज्यव्यवस्था अनेक देशांत करण्याचा प्रयत्न झाला. हे करण्यासाठी, हा विकास साधण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर वाढत गेला. सामर्थ्यसंपन्न शस्त्रस्पर्धा, शस्त्रस्पर्धेत टिकून राहण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर, व असे विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आवश्यक ती शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यातून जसा विकास झाला तसाच निसर्गाचा नाश करण्याची क्षमताही वाढली. आणि असंख्य नव्या प्रश्नांना जगाला सामोरे जावे लागले. शोषण. विषमता, अन्याय, दडपशाही करणारी, पूर्वीपेक्षाही अधिक सामर्थ्यवान अशी आर्थिक, राजकीय सत्ता उदयास आली. यामुळेच या व्यवस्थेचा, या विकासाच्या प्रारूपाचा वा संकल्पनेचा इतिहास, आधारभूत तत्त्वज्ञान, मूल्यप्रणाली, यशापयश यांची झाडाझडती घेण्याचा लक्षणीय प्रयत्न गेल्या शतकात सुरू झाला आहे. जागतिकीकरणाच्या काळात या आधुनिक विकासाचे चांगले वाईट परिणाम अधिकच तीव्रतेने अनुभवास येताहेत. त्या दृष्टीने विसाव्या शतकातील शेवटची दोन दशके अधिकच महत्त्वाची आहेत. इकोटोपिया ही कादंबरी विसाव्या शतकातील विकासाविषयक चर्चा समजून घ्यायला व पर्याय शोधायला फारच उपयुक्त ठरते.
अमेरिकेतून बाहेर पडून इकोटोपिया नावाचा एक स्वतंत्र देश अस्तित्वात येतो. या देशात अमेरिकेतील कोणालाही प्रवेश दिला जात नाही. विल्यम विन्स्टन या टाइम्स पोस्टच्या आंतरराष्ट्रीय संबंधविषयक वार्ताहराला मात्र खूप प्रयत्न केल्यावर ह्या इकोटोपियात प्रवेश करण्याची संधी तेथील राज्यकर्ते देतात. विन्स्टन इकोटोपियातून वेळोवेळी वार्तापत्रे पाठवितो. तो नियमित रोजनिशीही लिहितो. त्या वार्तापत्रातील व रोजनिशीतील नोंदी आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतात. त्यातूनच विन्स्टनच्या जीवनात घडत चाललेले बदल व अन्य घटनाही कळत जातात. विन्स्टनला जे जे दिसते, जे जे कळते, समजते, लक्षात येते व अनुभवायला मिळते ते ते तो निःसंकोचपणे लिहीत जातो. इकोटोपिया या देशातील अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, यांचा वाचकाला परिचय होत जातो. कादंबरीच्या प्रत्येक पानावर एकापेक्षा एक सरस कल्पना, विचार करण्यास प्रवृत्त करणारी वाक्ये, संकल्पना, लेखक मांडत जातो. जेमतेम २२० पानांच्या या छोटेखानी पुस्तकातील प्रत्येक परिच्छेद लेखकाच्या विलक्षण प्रतिभेचा, चिंतनाचा परिचय करून देतो.
आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीस इकोटोपियात बंदी आहे. कारण विमाने ध्वनि-प्रदूषण व वायुप्रदूषण करतात. लेखकाला टॅक्सीतून इकोटोपियात पोचता येते. कोणतीही शस्त्रे सोबत नेण्याची परवानगी दिली जात नाही. रेल्वे गाड्यांतही जास्तीत जास्त हिरवळ असेल असा प्रयत्न केला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण करता यावे यासाठी वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या कचरा-कुंड्या असतात. लोहचुंबकांचा वापर करून रेल्वेची यंत्रणा चालविली जात असल्याने रेल्वेगाडीचा कोणताही आवाज होत नाही. तैलरंगांचा, ‘पेन्ट्सचा’ वापर अत्यल्प केला जातो. सहजगत्या मिळणाऱ्या वस्तूंचाच उपयोग जास्त केला जातो. या देशात कापडाचा पुरेपूर वापर केला जातो. तर सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळला जातो. अशा कापडाची निर्मितीही केली जात नाही. कारण अशा कापडाच्या निर्मितीसाठी वीज व पाणी यांचा खूप वापर करावा लागतो. संपूर्ण देशात जागोजागी हिरवळ, छोटी कारंजी, शिल्पाकृती असतात. बसच्या पायऱ्यांची उंची जमिनीपासून अगदी कमी असते. त्यामुळे कोणालाही चटकन बसमध्ये चढता येते. कोणतेही फलक हे छोट्याच आकाराचे असतील याची काळजी घेतली जाते. तसा नियमच आहे. कपडे हे शक्यतो वापरलेल्या लोकरीचे व घरी बनवलेलेच असतात.
पत्रकार विन्स्टन हा कृषिमंत्र्याला भेटायला जातो. कृषिमंत्री हा मंत्रालयाबद्दल, कामकाजाबद्दल, कृषिविषयक कोणत्याही योजनेबद्दल काहीच बोलत नाही. तो फक्त सांडपाण्याच्या नियोजनाबद्दल व योग्य उपयोगाबद्दलच चर्चा करतो. सर्व कचऱ्याचे खत बनविणे हाच एक प्रकल्प त्याला महत्त्वाचा वाटतो! कचरा कुठेही टाकण्याची परवानगी दिली असती तर त्यामुळे झालेल्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमावी लागली असती व तीवर खूप खर्च झाला असता असे मंत्री सांगतो! त्यापेक्षा खत करणे, प्रदूषण होऊ न देणे अधिक फायद्याचे! वरून चांगले दिसणारे, उत्तम ‘पॅकिंग’, अशी वैशिष्ट्ये असलेले अन्नपदार्थ देण्यापेक्षा चवदार व पौष्टिक अन्नपदार्थ देण्यावर भर दिला जातो. ते पदार्थ कसे तयार केले जातात हे प्रत्येकाला दिसेल अशी व्यवस्था असते. देशातील ९९ टक्के वाया जाणारे पदार्थ पुनर्वापरायोग्य असले पाहिजेत, किंवा ते दड्डडन्डड्ड करता आले पाहिजेत असा नियम आहे. यामुळे पाऊस व वारा यांद्वारे अन्य देशांनी निर्माण केलेले विष आमच्या देशात पडले तर आमची जमीन ते सहन करू शकेल, असे इकोटोपियातील नागरिक म्हणतात. साखरेविना तयार केलेले अन्न असावे असा या देशात आग्रह आहे. कोणतेही तंत्रज्ञान किंवा उपकरण हे कोणालाही दुरुस्त करता येणारे, वापरता येणारे व सोपे असावे असा नियम आहे. कोणतेही नवे यंत्र प्रथम दहा सामान्य नागरिकांच्या परीक्षणासाठी दिले जाईल. त्यांना ते योग्य वाटले तरच ते यंत्र निर्माण केले जाईल व सर्वत्र वापरले जाईल. सर्व प्रकारच्या इमारती या डत्दृडुड्डठ्ठड्डठ्ठडल साहित्यानेच तयार केल्या पाहिजेत व त्यांचे नवनिर्माण सोपे असले पाहिजे. बहुतांश घरांच्या छपरावर वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्या लावल्या जातात. घरे ही प्राधान्याने लाकडाचीच असावीत असा प्रयत्न असतो.
शाळेतील शिक्षणही वेगळ्या प्रकारचे आहे. पर्यावरणास पोषक वस्तु कशा तयार केल्या पाहिजेत. हे शाळेत शिकविले जाते. अभ्यासक्रम, शिकविण्याची पद्धत, शिक्षणाचे तत्त्वज्ञान या बाबतीत शाळांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. सर्व शाळांत जीवशास्त्र वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र ह्या विषयांवर भर दिला जातो. सर्व पुस्तके सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांनी शोध प्रकल्पाच्या माध्यमातून शिकावे असे बघितले जाते. विद्यार्थ्यांना शेतीकाम कसे करायचे, अन्न कसे शिजवायचे, साधे कपडे कसे शिवायचे व तयार करायचे हे शिकविण्यास प्राधान्य दिले जाते. सौर ऊर्जा, वायु ऊर्जा व लाटांच्या द्वारे ऊर्जा मिळविण्यासाठी तंत्रज्ञानात संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. रोजगारासाठी पदवी लागत नाही, आणि पदवी मिळाली तर कोणचाही विशेष मानसन्मान मिळत नाही. वेगळे काही शोधून काढण्यास प्रोत्साहन दिले जाते. छोटे विचारप्रवर्तक निबंध लिहिण्यास महत्त्व दिले जाते, मोठे प्रबंध लिहिण्यास नव्हे! सर्जनशीलता सर्वांत जास्त महत्त्वाची मानली जाते.
कोटोपियात कोणालाही वडिलोपार्जित संपत्ती मिळत नाही. हा देश अस्तित्वात आल्यावर श्रीमंतांची मोठमोठी घरे, राजवाडे शासनाने ताब्यात घेतली, व त्या घरांत शाळा, संग्रहालये निर्माण केली. देशात फक्त दहा हजार वस्तीचीच गावे आहेत. सर्व नागरिकांना सामाजिक कार्य करावेच लागते. प्रदूषित हवा, रासायनिक द्रव्य असलेले अन्न, अतिरेकी जाहिरातबाजी यांसारख्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी व या व अशा समस्या सोडविण्यासाठी आपल्या हाती कारभार घेतला पाहिजे असे वाटल्याने स्थानिक नागरिक सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. आर्थिक व्यवहारांचे क्रांतिकारक वाटेल असे विकेंद्रीकरण इकोटोपियातील नागरिकांनी केले
लाकडाचे बांधकाम करणाऱ्याला आधी जंगलात जंगलसंवर्धनाचे काम करावेच लागते. सर्वजण झाडांना अत्यंत महत्त्व देतात. मृत झाडांचेही सुतारपक्ष्यासारख्या पक्ष्यांसाठी संरक्षण करतात. नृत्य, नाट्य, संगीत, शिल्प, चित्रकला सारखी एक तरी कला प्रत्येक नागरिकाला येते. सर्वच जण कलेचे जाणकार आहेत. या नागरिकांना बौद्धिक चर्चेत विलक्षण आनंद वाटतो. चर्चा ही कला म्हणून त्यांनी विकसित कलेली आहे. प्रत्येक गोष्ट आनंदाने केली पाहिजे असे ते मानतात. कोणच्याही परिस्थितीत आनंदनिर्मिती करण्यास ते भर देतात. ते टीव्हीचा उपयोग करतात पण टीव्हीला त्यांचा उपयोग करू देत नाहीत! विदेशी चॅनेल्स, वाहिन्या बघण्यासाठी विशेष खर्चिक व्यवस्था करावी लागते. सर्व प्रकारच्या जाहिराती दोन कार्यक्रमांच्या मध्ये फक्त थोडा वेळच दाखविल्या जातात. एकाच कार्यक्रमात वारंवार नव्हे! साधारणतः आठवड्यात फक्त २० तास नागरिक काम करतात. काम करण्याच्या ठिकाणी कामापेक्षाही काम करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व देतात. परिश्रमपूर्वक निर्माण केलेल्या वास्तूंचे परिश्रम करणारेच उद्घाटन करतात!
आर्थिक दुरवस्था ही नागरिकांच्या शक्ती, बुद्धी, कौशल्य व साधनसंपत्तीचा योग्य उपयोग केल्यास दूर करता येऊ शकते असे सारे नागरिक मानतात.
इकोटोपियात मोठमोठी इस्पितळे उघडण्यापेक्षा छोटे दवाखाने मोठ्या संख्येत सुरू करण्यावर भर दिला जातो. विशेषज्ञ डॉक्टर्सना जनरल पॅक्टिस करावीच लागते. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांची, प्रश्नांची त्यांना माहिती असलीच पाहिजे यासाठी ही व्यवस्था आहे. डॉक्टर्स हे रोग्याच्या शारीरिक समस्यांकडे लक्ष देतानाच रोग्याच्या मानसिक भावनिक गरजा व समस्यांवरही उपाय करतात. तसे शिक्षण डॉक्टरांना दिले जाते.
छोटी राज्ये ही पर्यावरणाच्या दृष्टीने व सांस्कृतिक विकासासाठी जास्त उपयुक्त ठरतात असे मानल्याने इकोटोपियात छोटी गावे, छोटी राज्ये असलेली व्यवस्था स्वीकारलेली आहे. या देशात पाणी व हवा अत्यंत शुद्ध आहे व ती तशीच राहावी यासाठी राज्यव्यवस्था व नागरिक अखंड प्रयत्न करतात. आनंदी समाधानी जीवन जगतानाच मृत्यूचाही सहजगत्या स्वीकार करण्यास या देशातील नागरिक तयार असतात.
पत्रकार विन्स्टन हे सारे वार्तापत्रातून कळवत जातो. सुरुवातीला त्याला इकोटोपियातील काहीही आवडत नाही. मात्र हळूहळू त्याच्यावर इतका परिणाम होतो की तो अखेर इकोटोपियाचे नागरिकत्व स्वीकारतो, आपली डायरी न्यूयॉर्क पोस्टला पाठवून देतो!! आणि इथे ही कादंबरी संपते!
अर्नेस्ट कॅलनबाख यांच्या कादंबरीतील वरील कल्पना ह्या केवढ्या क्रांति-कारक आहेत हे सांगायला नको. उपरोक्त कल्पना आजच्या विकासप्रक्रियेतील उणीवा तर दाखवतातच पण उपायही सुचवितात. एक एक कल्पना ही वाचकांना अधिक अभ्यास करायला, वाचन करायला, विचार करायला प्रवृत्त करते. या कादंबरीचे वाचन हा वाचकांना झपाटून टाकणारा अनुभव असतो. हा अनुभव सर्वांनी घ्यावा हे सुचविण्यासाठीच तर हे टिपण लिहिले आहे!
कॅलनबाख यांची ही कादंबरी जर्मनीतील ‘हिरव्या’ पक्षाने बऱ्याच प्रमाणात आपल्या जाहीरनाम्याचा आधार मानली. हा पक्ष देशातील सुमारे दहा टक्के मते मिळवतो.
निर्मल अपार्टमेन्ट्स, हितवाद प्रेसमागे, दुसरी गल्ली, धन्तोली, नागपूर