“ ‘मित्र’च्या निमित्ताने’ या सुनीती देव यांच्या लेखासंबंधी (आ.सु. ऑक्टोबर, २००३) माझी प्रतिक्रिया : सुनीतीबाईंशी बऱ्याच बाबतीत माझे मतैक्य आहे. त्या म्हणतात तसे दादासाहेबांचा दलितांविषयीचा ग्रह न समजण्यासारखा आहे. बऱ्यापैकी बुद्धिवादी वाटणारा माणूस स्वतःस येणाऱ्या एका अनुभवामुळे सबंध जमातीविषयी एवढा आकस धरू शकेल असे वाटत नाही. त्याचे अधिक खोल जाणारे कारण दिले असते तर त्या पात्राला पोषक ठरले असते. तसेच आपल्या आग्रहीपणाने ते मुलांवर त्यांना वृद्धा-श्रमात पाठविण्याचा निर्णय घेणे भाग पाडत आहेत, हे त्यांना कळण्यासारखे आहे. पण या बाबतीत निदान असे म्हणता येईल की कळूनही त्यांचे खचणे व तो निर्णय न पटवून घेणे समजण्यासारखे आहे. स्वतःवर बेतते तेव्हा माणूस आपला बुद्धिवाद विसरतो. त्यामुळे हा भाग तेवढासा खटकत नाही. नर्स रूपवतेबाईंचा सोशिकपणा सुनीतीबाईंना वास्तव वाटला नाही, पण तो त्यांच्या व्यक्तित्वाला उंची देणारा आहे आणि त्यांच्या स्वभावाशी विसंगत नाही. अगदी सुरुवातीस दादासाहेबांचे आपल्या जातीविषयीचे विखार ऐकल्यावरही त्या हे काम स्वीकारायला तयार झाल्या होत्याच. उलट अमेरिकेला दादासाहेबांची मुलगी न्यायला तयार होणार नाही यावर त्या इतक्या हळव्या झाल्या हेच थोडेसे आश्चर्यकारक वाटले.
पण माझा सुनीतीबाईंशी तीव्र मतभेद वेगळ्या कारणासाठी आहे. “मैत्रीचे सुंदर नाते दादासाहेबांनी शारीरिक पातळीवर आणून ठेवले’ याबद्दल “त्या नात्याचे मांगल्य, निर्मलपणा नष्ट केला” असा आरोप त्या दादासाहेबांवर करतात. हे मात्र अजब वाटते. याचा अर्थ ज्यांच्यामध्ये शरीरसंबंध आहे त्यांच्यात निर्मल, मंगल, विशुद्ध अशी मैत्री असू शकत नाही, असा घ्यावा का, यावर मी विचार केला. पण असा निष्कर्ष काढण्यास सुनीतीबाईंनी पर्याय ठेवलेला नाही. माझ्या मते अशी विशुद्ध मैत्री पतिपत्नीत असू शकते आणि कुठल्याही स्त्रीपुरुषांमध्ये असू शकते, ज्यांच्यात शारीरिक नाते आहे. मी तर एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की शारीरिक नाते जडण्यामुळे मैत्री अधिक दृढ होण्यास अडसर न येता मदतच होते.
आणि मुख्य मुद्दा असा की दादासाहेबांनी विवाहाचा पर्याय शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुचविला नसून ते बरे झाल्यावरही रूपवतेबाईंना त्यांच्या घरी राजरोसपणे राहता यावे यासाठी सुचविला असे मला वाटते. एक स्त्री आणि एक पुरुष लग्न न करता एकत्र राहू शकत नाहीत म्हणून त्यांनी हा विचार केला, असे नाटकात अप्रत्यक्षपणे तरी निश्चितच सुचविले आहे. तेव्हा दोन्ही कारणांनी मला दादासाहेबांच्या पात्रावर या बाबतीत कसला अन्याय झाला, असे वाटत नाही.
डॉ. लागूंच्या कामाबद्दल लिहावे तेवढे थोडे आहे. तरी लिहिल्यावाचून राहवत नाही. मला त्यांचे काम त्यांनी सिनेमात काम करायला सुरुवात करण्यापूर्वी विजया मेहता यांच्याबरोबर केलेल्या काही नाटकांतल्या (“एक होती राणी”, “मी जिंकलो, मी हरलो”, “मादी”, इ.) उत्कृष्ट अभिनयाची आठवण करून देणारे वाटले. ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशी तर होतीच, पण त्यांनी आपल्या अभिनयाने तिचे सोने केले आहे, असे म्हणावेसे वाटते. ज्योती चांदेकर यांनी मिसेस रूपवते यांच्या भूमिकेसही योग्य असाच न्याय दिला आहे. शेवटी सुनीतीबाईंना वाटले तसे हे नाटक म्हणजे फक्त रूपवतेबाईंचा जीवनप्रवास, असे न वाटता मला दोन भिन्न प्रकृतीच्या पण अनुरूप व तोडीस तोड व्यक्तींच्या काही काळ एकत्र येण्याचा उत्सव वाटला. विशेष आवडला तो रूपवते बाईंचा शेवटचा फोन कॉल, त्या वेळी फोटोसमोर उदबत्ती लावणारे दादासाहेब, आणि दोघांचाही (त्यातल्या त्यात दादासाहेबांचा) भरून आलेला आवाज.
मधुकर देशपांडे, 12, Angelica Court, Matawan, N.J. 07747, U.S.A.
‘वर्तमान’ या श्री. द्वादशीवार यांनी लिहिलेल्या कादंबरीचे श्री. दि. य. देशपांडे यांनी केलेले समीक्षण (आ.सु., अंक १४.६, पान २२५) आवडले. त्यात त्यांनी अप्टन सिंक्लेअर या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या ज्या कादंबरीचा उल्लेख केला आहे त्या कादंबरीचे नाव ‘बोस्टन’ असे आहे. या कादंबरीच्या पहिल्या प्रकरणाचे शीर्षक मनोवेधक आहे. ‘रन अवे ग्रँडमदर’ असे या पहिल्या प्रकरणाचे शीर्षक. हे शीर्षक वाचूनच माझ्या मनात या कादंबरीविषयी कुतूहल निर्माण झाले, ह्या कादंबरीमुळे माझी या लेखकाशी ओळख झाली. मग मी ह्या लेखकाच्या सर्व कादंबऱ्या वाचून काढल्या. पण मला तुमच्या वाचकांना जे सांगायचे आहे ते थोडेसे वेगळेच आहे.
मी अमेरिकेतील मेरिलँड युनिव्हर्सिटीच्या गणित विभागात १९५३ साली रुजू झालो. माझा तेथील प्राध्यापकांशी हळूहळू परिचय वाढत गेला. सांगायची मजेदार गोष्ट अशी की तेथील प्राध्यापकांना अप्टन सिंक्लेअर या लेखकाविषयी काहीसुद्धा माहिती नव्हती. ज्या अमेरिकन लेखकाने मला अतिशय प्रभावित केले होते त्या लेखकाची खुद्द अमेरिकेतील प्राध्यापकांना काहीसुद्धा माहिती नसावी याचा मला अचंबा वाटला. बर्नार्ड शॉ या प्रसिद्ध लेखकासंबंधीदेखील त्यांना काहीसुद्धा माहिती नव्हती. डॉक्टर्स डायलेमा सारख्या प्रसिद्ध नाटकाविषयी देखील ते सर्वस्वी अनभिज्ञ होते. हे दोन लेखक प्रस्थापित भांडवलशाहीविरोधात लिहीत असल्यामुळे तर असे घडले नसेल?
तुमच्या वाचकांना ही माहिती मनोरंजक वाटेल असे वाटल्यावरून या पत्राचे प्रयोजन.
भा. स. फडणीस, ९२, रामनगर, नागपूर
मी आजचा सुधारक मधील लिखाण अतिशय आवडीने (आपल्या शक्तीनुरूप) अभ्यासत असतो. प्रकाशित लिखाणापैकी सर्वच आवडते/पटते असे नव्हे. तरी विचाराला एक आगळी/नावीन्यपूर्ण दिशा देण्याला मात्र ते लिखाण साह्यभूत ठरते, हे आवर्जून सांगावेसे वाटते.
मा. श्री. दि. य. देशपांडे सरांचे लिखाण मात्र क्वचितच पूर्णतः पटते. त्यांचे लिखाण माझ्या अल्पमतीप्रमाणे बहुधा एकांगी वाटते. परंतु ऑगस्ट ०३ अंकातील ‘विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?’ या लघुलेखातील मा. श्री. दि. य. दे. सरांचे विचार सर्वस्वी पटले.
लखनसिंह कटरे, बोरकन्हार, ता. आमगाव, जि. गोंदिया — ४४१ ९०२