‘सर्व प्राणी समान आहेत’ हा पीटर सिंगर यांचा दि. य. देशपांडे यांनी अनुवादित केलेला लेख वाचला. (आ.सु. जून 2003) आपणाला पटणाऱ्या विचारांचाच अनुवाद अनुवादक करीत असतो, असे मी गृहीत धरतो. लेख वाचून पहिला प्रश्न मनात उद्भवला तो म्हणजे, ‘मुळात मानवजात मानवाशी तरी माणुसकीने वागण्या- इतपत प्रगत झालेली आहे का?’ तसे असते तर संहारक शस्त्रास्त्रांची निर्मिती त्याने थांबवली असती. माणसाने माणसांना मारण्यासाठी जी युद्धे होतात तीही होणार नाहीत याची काळजी त्याने घेतली असती. धर्माच्या नावावर होणाऱ्या दंगलींनाही पायबंद घातलेला आढळला असता. परंतु हा युक्तिवाद बाजूला ठेवू या, कारण एखादा नैतिक विचार सबल कारणांसह दिलेला असेल तर ‘इतर जण अनैतिक वागतात म्हणून मीही अनैतिक वागेन किंवा त्याचे समर्थन करीन’ हे म्हणणे योग्य ठरणार नाही.
सर्व प्राण्यांना यातना होतात, दुःख होते. त्यामुळे सर्व प्राणी समान आहेत असे मानावे, असे पीटर सिंगर म्हणतात. त्यामुळे मानवाने खाण्यासाठी किंवा प्रयोगासाठी त्यांचा वापर करू नये असे ते सुचवतात. लेख वाचल्यानंतर ज्यांची लेखातून उत्तरे मिळत नाहीत असे खालील प्रश्न उद्भवतात.
1. सर्व प्राणी म्हणजे फक्त वनस्पती सोडून अळ्या, कीटक ते मासे, पक्षी सस्तन प्राण्यापर्यंत प्राण्यांच्या असंख्य जाती गृहीत धराव्यात का?
2.मानवाच्या व प्राण्यांच्याही हितासाठी प्रयोगशाळेत वैद्यकीय चाचण्यांसाठी केले जाणारे प्राण्यांवरील प्रयोग बंद करावेत का?
3. उत्क्रांति-तत्त्वानुसार मानवाचा जो आहार आहे (मिश्राहार–सर्वभक्षी omnivorus) त्यात बदल करावा का?
पीटर सिंगर यांनी पहिल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण त्यांच्या Equality for Animals (पुस्तक : Practical Ethics केम्ब्रिज प्रकाशन) ह्या लेखात दिले आहे ते असे : पाठीचा कणा असलेल्या सर्व प्राण्यांना मज्जासंस्था असते. विशेषतः सस्तन प्राणी आणि पक्षी यांची मज्जासंस्था तत्त्वतः सारखीच असते. ह्या मज्जासंस्थेमुळे प्राण्यांना यातना जाणवतात. वनस्पतींना अशी मज्जासंस्था नसते. त्यामुळे वनस्पतींना दु:ख किंवा यातना जाणवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘स्व’ची जाणीव (self consciousness) असणारे मानवाव्यतिरिक्त अन्य प्राणी आहेत. ही गोष्ट डॉल्फिन व चिंपाझीबद्दल सिंगर खात्रीने सांगतात. थोड्या कमी ठामपणे ते डुकरांबद्दल बोलतात, आणि कृमि (worms), भैकेर (tadpoles) किंवा नवजात मानव अर्भके यांना ‘स्व’ची जाणीव बिलकुल नसते याबद्दल ते ठाम आहेत. म्हणून सिंगर असा निष्कर्ष काढतात की कृमि किंवा पूर्णतः मनोविकारग्रस्त मानवास मारले गेले तरी हरकत नाही. परंतु जे प्राणी त्यांच्या जगण्यामध्ये जाणीवपूर्वक आनंद उपभोगतात, त्यांना मारणे समर्थनीय ठरत नाही.
समजा एखाद्या 60 वर्षांच्या मनुष्यास अपघात होऊन तो न परतणाऱ्या कोमामध्ये गेला. समजा कोमामध्ये 5 वर्षे जिवंत राहून नंतर तो मरण पावला. यामध्ये खरे तर तो मनुष्य 65 व्या वर्षी मरण पावला, परंतु 60 वर्षांचेच जीवन तो जगला. कोमामध्ये गेल्यानंतर माणसाचे आयुष्य संपले. काही मनुष्यांना-अर्भकांना जिवंत असूनही जीवनच नसते. एका विशिष्ट रोगाने ग्रस्त मानवाया (Tay Sachs) असलेल्या अर्भकाची वाढ सहा महिन्याच्या पुढे होत नाही. समजा अशा अर्भकाला न्युमोनिया झाला तर त्यास उपचार न करता तसेच मरू देणे शहाणपणाचे ठरेल. कारण केवळ हाडामांसाचा गोळा किंवा जीवशास्त्रीयदृष्ट्या (in a biological sense) जगवण्यात काही अर्थ नाही. चरित्रात्मक जगणे (living in a biographical sense) आणि जीवशास्त्रीयदृष्ट्या जगणे ह्यात फरक केला पाहिजे असे जेम्स राचेल्स या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने मत मांडले आहे. मानव व इतर प्राण्यांना केवळ ते जिवंत आहेत म्हणून जगण्याचा हक्क असावा, हे समर्थनीय ठरणार नाही असे राचेल्स म्हणतात. ‘चरित्रात्मक जीवन’ याचे अधिक स्पष्टीकरण देताना राचेल्स म्हणतात की सस्तन प्राणी आपल्याला जास्त जवळचे आहेत आणि त्यांना चरित्रात्मक जीवन आहे असे म्हणता येईल. त्यांना भावना असतात, ते एकमेकांची काळजी घेतात, ते एकमेकांच्या सहवासात राहतात. विशेषतः माकड, कुत्रा यासारख्या सस्तन प्राण्यांना भविष्यात व भूतकाळात पाहण्याची वृत्ती असते. अर्थात अगदी सस्तन प्राण्याखालोखाल इतर प्राण्यांचा विचार करत गेलो तर आपणास जीवन म्हणून काही आढळत नाही. किडे, कीटक, झिंगे, कोळंबी, मासे यांसारखे समुद्रातील प्राणी, अशा प्राण्यांमध्ये जीवनासाठी आवश्यक अशा मानसिक क्षमतांचा (mental capacities) अभाव आढळतो. योग्य कारणासाठी असे प्राणी मारले तरी हरकत नाही असे राचेल्स सुचवतात. आपल्यापैकी सर्वांना ह्या उतरत्या श्रेणीची थोडीफार कल्पना असते. आपण असा विचार करतो की माणसाला मारणे हे माकडाला मारण्यापेक्षा जास्त चुकीचे आहे. माशीला किंवा डासाला मारण्यात आपणाला गैर काही वाटत नाही. परंतु माशी व माकड यांमध्ये माकडाला मारणे नैतिकदृष्ट्या थोडे गंभीरपणे घेतले जाते. परंतु जेव्हा आपण वनस्पतीकडे येतो तेव्हा त्यात अनैतिक असे काही वाटत नाही.
पीटर सिंगर यांच्या तत्त्वानुसार (प्राण्यांना यातना होतात) पाठीचा कणा असलेल्या व मज्जासंस्था असलेल्या यादीत बहुतांश प्राण्यांचा समावेश होईल. जेम्स राचेल्स यांच्या तत्त्वानुसार प्राण्यांची यादी सस्तन प्राण्यांएवढीच मर्यादित राहिल. प्राण्यांना यातना होण्याबद्दलचे समर्थन सबळ कारणांनी दिले तर क्षम्य मानले जावे असे वाटते? उदाहरणार्थ युरोपमध्ये शेतीची मशागत व पिकाची कापणी करताना अनवधानाने असंख्य उंदीर मारले जातात. हे प्राणी धान्याची प्रचंड नासाडी करत असतात. उंदरापासून प्लेग, लेप्टोस्पायरोसीस यासारखे रोग मानवास होतात. त्यामुळे केवळ उंदरांना यातना होतात म्हणून त्यांना मारू नये याचे समर्थन करणे अवघड जाते. पीटर सिंगर यांचा प्राण्यांवरील प्रयोगांनाही विरोध दिसतो.
जीवशास्त्रीय ज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी, नवीन औषधांच्या निर्मितीसाठी (मानव आणि अन्य प्राण्यांच्या हितासाठीही) आणि शस्त्रक्रियेने आजार बरे करण्यासाठी प्राण्यांवरील प्रयोगाची आवश्यकता असते. शरीरशास्त्र (Anatomy) व शरीरक्रिया विज्ञान (Physiology) ह्या शास्त्रांचा पायाच मुळी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांवर उभारला गेला आहे. रोगप्रतिकारक शक्ती, लसीकरण, रक्ताभिसरण ह्या गोष्टींची स्थापना प्राण्यांवर प्रयोग करूनच प्रथमतः विल्यम हार्वे, लुई पाश्चर व एडवर्ड जेन्नर ह्या शास्त्रज्ञांनी केली. प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या प्रयोगात उंदीर, घुशी ह्यांचे प्रमाण 90 टक्के एवढे आहे. पक्षी, कुत्रा, मांजर, माकड, ससा हेही प्राणी प्रयोगासाठी वापरले जातात. परंतु त्यांचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे केवळ प्राण्यांना यातना होतात म्हणून मानवाच्या हिताची प्रगती थांबवणे योग्य नाही. अर्थात गमतीसाठी किंवा सौंदर्यप्रसाधनांसाठी प्राण्यांना यातना दिल्या जात असतील तर ते मात्र समर्थनीय ठरणार नाही.
फूड अॅण्ड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनच्या (FAO) जागतिक अहवालात (The State of Food Insecurity in the World 2002) 1998 ते 2000 ह्या काळात 84 कोटी लोकांना पुरेसे अन्न (पोषण, nourishment) मिळू शकलेले नाही, असे नमूद करण्यात आलेले आहे. सूक्ष्म पोषण-द्रव्यांच्या अभावाने (deficiency in micronutrients) दोन अब्ज लोक प्रभावी आहेत. ‘सर्व प्राणी समान आहेत’ हे तत्त्व अंगीकारले व मांसभक्षण (सर्व प्रकारचे-समुद्रातील प्राण्यासहित) न करावयाचे ठरवल्यास अहवालात सांगितलेल्या आकड्यांमध्ये कितीतरी पटीने वाढ होईल. पीटर सिंगरने सांगितलेल्या तत्त्वापेक्षा जेम्स राचेल्सने सांगितलेले तत्त्व यामुळे जास्त सयुक्तिक वाटते.
आजच्या सुधारकच्या लेखात खालील एक विधान आहे ते मला चुकीचे वाटते.
‘गाई, बैल, वासरे यांच्या मांसातून एक पौंड प्रोटीन मिळविण्याकरिता गुरांना २१ पौंड प्रोटीन खाऊ घालावे लागते. या रूपाने माणसांना अप्राप्य होणारे प्रोटीन जगातील एकूण प्रोटीनच्या ९० टक्के इतके भरते.’ प्रश्न असा निर्माण होतो की १ पौंड प्रोटीन मिळविण्यासाठी गुरांना २१ पौंड प्रोटीन खाऊ घालावे लागते म्हणजे काय? गुरांना तर चारा (वनस्पती) लागतो आणि वनस्पतींमध्ये प्रोटीन जवळपास नसतेच. युरोप-अमेरिकेमध्ये गुरांना धान्य जरी देत असले असे मानले तरी धान्यात प्रोटीनचे प्रमाण कमी असते. (१०० ग्रॅममागे ८ ग्रॅम). किती पौंड धान्यापासून किती पौंड मांस उपलब्ध होते याची आकडेवारी इंग्रजी विश्वकोषात उपलब्ध आहे ती खालीलप्रमाणे.
यावरून धान्यातील प्रोटीनमधून मांसामध्ये किती प्रोटीन उपलब्ध होईल हे सहज काढता येते. प्रोटीनचे आकडे धान्यात सरासरी १०० ग्रॅमला ८ ग्रॅम तर मांसामध्ये १०० ग्रॅमला २० ग्रॅम प्रोटीन गृहीत धरून काढले आहेत.
अ) २.५ पौंड धान्य (प्रोटीन ११० ग्रॅम) – १ पौंड कोंबडीचे मांस (प्रोटीन ९० ग्रॅम) ब) ५ पौंड धान्य (प्रोटीन २२० ग्रॅम) – १ पौंड डुकराचे मांस (प्रोटीन ९० ग्रॅम) अ) १० पौंड धान्य (प्रोटीन ४४० ग्रॅम) – १ पौंड गाईचे मांस (प्रोटीन ९० ग्रॅम)
वरील आकडेवारीवरून असे दिसते की गुरांना जरी धान्य दिले (खरे तर चाराच द्यावयास हवा) तरी ४४० ग्रॅम प्रोटीनपासून ९० ग्रॅम प्रोटीन मांसामध्ये उपलब्ध होते. कोंबडीमध्ये तर हे प्रमाण ११० ग्रॅमला ९० ग्रॅम एवढे आहे.
२२ मार्च १९९७ च्या New Scientist मध्ये ‘Who is suffering now?’ । ह्या नावाचा एक लेख आला आहे. लेखकाचे म्हणणे असे की, आपणाला जरी तसे वाटत असले तरी प्राण्यांना यातना होत नाहीत. नैसर्गिक निवडीनुसार प्राणी अशा रीतीने उत्क्रांत झालेले आहेत की ते एकमेकांचे भक्षण जरी करत असले तरी त्यांना यातना होत नाहीत कारण उत्क्रांतीनुसारच त्यांचे वागणे असे. त्याला ते evolutionary design criteria (उत्क्रांतीय संरचनेचे निकष) असे म्हणतात. जसे कोल्हा कुणाचे भक्ष्य होऊ शकत नाही परंतु ससा कोल्ह्याचे भक्ष्य होऊ शकतो. आणि सशाला कोल्ह्याचे भक्ष्य होताना यातना होत नाहीत. कारण उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार त्यांची रचना केली गेलेली आहे. अर्थात ही गोष्ट आपणाला समजायला किंवा मान्य करायला जड जात आहे हे खरे परंतु वैज्ञानिक जगतात यावर वादविवाद होत आहेत.
२३/७, शिंदेनगर, बावधन, पुणे — ४११ ०२१
या लेखाचे संक्षिप्त भाषांतर पुढील अंकात येईल. — सं.ट