पोषणाच्या बाबतीत गरोदर व अंगावर दूध पाजणाऱ्या स्त्रिया आणि शाळेत जाण्याच्या वयाच्या आतील मुले हे समाजातील सर्वांत हळवे गट आहेत. आदिवासी भागात या गटांच्या पोषण-पातळीची आणि अन्न-सुरक्षेची एक पाहणी केली गेली. गडचिरोली जिल्ह्यातील वनाच्छादित गावे (‘वन-गट’) आणि जंगल तोडून शेतीकडे वळलेली गावे (‘शेती गट’) यांचा हा तौलनिक अभ्यास होता.
पाहणीसाठीचे नमुने आकाराने लहान होते, कारण पाहणीच्या मर्यादित वेळात रानावनात फिरणाऱ्या आदिवासींना मोठ्या संख्येने एकत्र करता आले नाही. ही एका छोट्याशा काळात केलेली छेद-परीक्षा (Cross-Sectional Study) होती; दीर्घकाळ पाठपुरावा करणारी दीर्घ-परीक्षा (Longitudinal Study) नव्हती. या मर्यादा लक्षात घेऊनच निष्कर्षांचा विचार करायला हवा.
दोन्ही प्रकारच्या गावांमध्ये घरे कच्ची असतात व त्यांच्यात हवा खेळती ठेवण्याच्या सोई दुर्लक्षित असतात. सार्वजनिक विहिरीचे पाणी वापरले जाते. शौचासाठी शेतां-जंगलांमध्ये जाण्याचाच प्रघात आहे.
वन-गटातील गावांमध्ये हिवाळ्यात मोहाची फुले, डिंक, बोरे, आवळे, अशी वनोपज गोळा करून उपजीविका चालते. उन्हाळ्यात तेंदूपत्त्यांवर भर असतो. पावसाळ्यात शेती केली जाते. शेती-गटातील गावांमध्ये हिवाळी (रबी) शेतीही केली जाते. दोन्ही गटांमध्ये वर्षभर मोलमजुरी हे उपजीविकेचे पूरक साधन असते. वन-गटांमध्ये जंगलांवर अवलंबून असणे अर्थातच जास्त दिसते, पण येथेही सुमारे अर्धाच काळ वनांमध्ये उपजीविकेसाठी घालवला जातो, तर अर्धा काळ वनांपासून सुटा घालवला जातो.
पाहणी केलेल्या बहुतेकांची धारणा होती की जंगलतोडीने अन्नपुरवठा, वनौषधी, आरोग्य व उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. पण प्रत्यक्ष पाहणीत शेती-गटातील गावांची आर्थिक-सामाजिक स्थिती आणि अन्नपुरवठा व पोषणाची पातळी वन गटांपेक्षा चांगली असल्याचे दिसले. शेती-गटातील 15 पैकी 12 घरांमध्ये अन्नपुरवठा सुरक्षित होता, तर वन-गटात 15 पैकी 9 च घरे अन्नसुरक्षित होती. वनखात्याच्या अधिकाऱ्यांचेही मत दिसले की जंगलतोडीने आदिवासींच्या विकासाला धोका उत्पन्न होत नाही, पण सोबत संतुलित नव-वनीकरण मात्र हवेच.
वन-गटातील स्त्रियांपेक्षा शेती-गटातील स्त्रियांमध्ये आहाराबद्दल संख्येने जास्त व जास्त योग्य धारणा आढळल्या. यात त्या क्षेत्रातील ‘सर्च’ या सेवाभावी संस्थेच्या कामाचाही परिणाम महत्त्वाचा असल्याचे जाणवले. शेती-गटातील स्त्रियांचे मत होते की भात, डाळ व आंबील हे पदार्थ गरोदरपणात टाळायला हवेत आणि मुलांना पाजण्याच्या काळात कडधान्ये आणि आंबट पदार्थ टाळायला हवे. वन-गटातील बायका गरोदरपणात फक्त आंबील टाळतात व पाजण्याच्या काळात काहीच टाळत नाहीत.
अंगावर मुलांना पाजणे थांबवण्याच्या तंत्रांबद्दलही फरक आढळले. शेती-गटातील बहुतेक बायका पूरक अन्न म्हणून गूळपाणी वापरतात तर वन-गटात चीक वापरला जातो. दोन्हीकडे अंगावर पिणे सहा ते बारा महिन्यांनंतर थांबवले जाते. पाजणे थांबवताना विशेष काही न करता थेट प्रौढांच्या अन्नाचा वापर केला जातो.
दोन्ही गटांमध्ये काही प्रकारचे अन्न फार अपुरे पडत असल्याचे जाणवले. तृणधान्ये, पालेभाज्या, दूध व फळांचे प्रमाण हे आवश्यक (recommended) सुपोषणाच्या पातळीच्या अर्ध्याहून कमी होते. एकूण कॅलरीज, प्रथिने, कॅलशियम, बीटा कॅरोटीन, लोह हे सर्व घटक आवश्यक प्रमाणाच्या अर्ध्याहून कमी होते. वांगी, टमॅटो आणि काही शेंगाच फक्त योग्य प्रमाणात खाल्ल्या जात होत्या.
गरोदरपणात लोह आणि एकूण कॅलरीज वगळता शेती-गटातील स्त्रिया वन-गटापेक्षा बरे पोषण भोगतात—-पण हा फरक नगण्य आहे. पाजण्याच्या काळात मात्र दोन्ही गटांतील स्त्रिया सारख्याच कुपोषित असल्याचे आढळले.
शरीराची मापे (anthropometry) आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ही कुपोषणच दाखवतात. गरोदरपणात 57% तर पाजण्याचा काळात 89% स्त्रिया आवश्यक पोषण-पातळीच्या कमी पोषित होत्या. इथेही शेती गटात वन-गटापेक्षा पोषण बरे होते. लोहाच्या बाबतीत मात्र वन-गट शेती-गटाच्या तुलनेत पुष्कळच चांगल्या प्रकारे पोषित होता. (रातांधळेपणाचे प्रमाण शेती-गटात 14% होते, तर वन-गटात रातांधळेपण नव्हते.)
अन्नप्रकारांमध्ये स्त्रियांच्या बाबतीतलाच अनुभव बालकांमध्येही लागू पडतो – पण इथेही शेती-गटाचे पोषण वन गटातल्यापेक्षा थोडेसे बरे आढळले. वेगवेगळ्या निकषांप्रमाणे कुपोषणाचे प्रमाण 28% ते 89% आढळते. एकूणच शेती-गटातील अन्न सुरक्षित घरांचे प्रमाण वन-गटातील घरांच्या प्रमाणापेक्षा जास्त होते आणि याचा परिणाम पोषणात स्पष्ट दिसतो. वनांवर अवलंबून राहणे कमी होतानाच शेती-गट अन्न आणि उत्पन्नाची पर्यायी साधने घडवताना दिसतो. याउलट फक्त जंगलांवर जगणे वन-गटाला जड जाताना दिसते.
हे त्रोटक संशोधन वेगवेगळ्या अंगांनी पुढे न्यायला हवे, जसे —-
क) नमुन्यांचा आकार वाढवायला हवा.
ख) वने तोडून शेतीकडे वळताना होणारे बदल वेळोवेळी तपासायला हवे.
ग) निकषांची संख्या वाढवायला हवी व काम करण्याच्या क्षमतेवर होणारे परिणाम तपासायला हवेत.
घ) वेगवेगळ्या विकास-घटकांचा (शाळा, पाणी, वैद्यकीय सेवा, वीज) आरोग्य व राहणीमानावरील परिणाम तपासायला हवा.
[डी. हर्षदा हिने गडचिरोलीतील काही खेड्यांतील काही समाजगटांच्या पोषण-पातळीच्या केलेल्या तपासणीचा हा सारांश आहे. निर्वनीकरणानंतर अन्नसुरक्षा व पोषण सुधारते, हा जरासा (च) अनपेक्षित निष्कर्ष कर्मठ पर्यावरणवाद्यांना पटणार नाही —- पण असा काही सुधार होत नसल्यास संकलक जीवनपद्धतीचे लोक शेतीकडे का वळतील, याचाही विचार व्हावा!]