सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्तरावरची दिग्भ्रांत अवस्था, मध्यमवर्गीयांची अलिप्तता, कामगार-शेतकऱ्यांची दैना, श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यात वाढत जाणारी दरी, युवकांमधली बेकारी, त्यातून येणारे नैराश्य, दिशाहीनता, दारिद्र्य आणि वैचारिक, बौद्धिक दिवाळखोरी माजून समाजात जेव्हा अराजकसदृश्य भयावह पोकळी निर्माण होते तेव्हा फासिस्ट हुकू मशहा निर्माण होण्याच्या साऱ्या शक्यता त्यात दडलेल्या असतात. ह्या साऱ्या अराजकातून समाजाला बाहेर काढण्याच्या, त्याचे हरवलेले गतवैभव परत मिळवून देण्याच्या मिषाने कुणी बझेलियस विंड्रिप नावाचा हुकूमशहा अमेरिकेत अवतरतो. देशकालपरत्वे (त्याचे नामाभिधान कधी हिटलर, मुसोलिनी, स्तालिन, तर कधी खोमेनी वगैरे बदलत जाते!) हुकुमशाही ही सर्वंकष दमनकारी यंत्रणा धर्म, वर्ण, वर्ग, रंग, जात असे निरनिराळे रूप धारण करून समाजाला नुसते वेठीसच धरत नाही तर साऱ्या समाज-जीवनालाच गिळंकृत करू बघते. ह्या भयकारी, अजगरी पाशातून मुक्त होण्यासाठी सर्वसामान्यांची, बुद्धिवंत-विचारवंतांची; हतबल न होता कधी एकट्याने, कधी गटांनी चालविलेली अविश्रांत लढाई; ह्या हुकूमशाहीचे तंत्रमंत्र, तिचा प्रचंड आवाका, सर्व-सामान्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांना भ्रष्ट करण्याचे, क्षीण विरोधही निर्दय-पणे चिरडून टाकण्याचे तंत्र; शेवटी ही सारी यंत्रणा सर्वसामान्यांच्या भल्याचीच कशी आहे हे ठासून सांगणारे अजब तर्कशास्त्र आणि प्रचार-यंत्रणा! सिंक्लेअर ल्यूइस ह्या नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन लेखकाच्या ‘इट कान्ट हॅपन हिअर’ ह्या 1936 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीचा हा गाभा आहे.
लोकशाही संकल्पना आणि तिच्या क्रियान्वयनावर प्रगाढ वि वास असणाऱ्या अमेरिकनांना लोकशाहीची विटंबना, गळचेपी आणि सरतेशेवटी अवतीर्ण होणारी फासिस्ट हुकूमशाही, ही कल्पनाही करवत नाही. आपल्या देशातील लोकशाही अबाध्य आहे त्यामुळे कमीतकमी ‘येथे हे घडणे नाही’ अशा खोट्याच भ्रमात वावरणाऱ्या समाजाला ल्यूइसने आपल्या कादंबरीच्या रूपाने जोरदार धक्का दिला आहे. त्यांच्या स्वप्नाळू, अंधश्रद्ध भाबडेपणाला चांगलेच धारेवर धरले आहे. वेगाने बदलणाऱ्या सामाजिक, राजकीय वास्तवाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याचा इशारा ल्यूइसने केवळ अमेरिकन जनतेलाच नव्हे तर जगातील सर्वत्र लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या समाजांना दिला आहे.
‘डेली इन्फॉर्मर’ चा संपादक डोरेमस जेसप—ह्या कादंबरीचा नायक, हा खरा तत्कालीन अमेरिकन समाजाचा प्रतिनिधी आहे. अमेरिकेच्या भविष्याविषयी त्याला नुसती आस्थाच नाही तर त्यासाठी आपले सर्वस्व त्यागायलाही तो तयार आहे. बझेलियस विंड्रिपच्या हुकूमशाहीविरुद्ध लढताना त्याच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते, त्याला स्वतःला देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली सतरा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा होऊन त्याची ट्रायनॉन छळछावणीत रवानगी होते. एका सुसंस्कृत विचारवंत माणसाच्या नशिबी हुकूमशाही व्यवस्थेत अक्षरशः पशुवत् जिणे येते.
अमेरिकन समाज ह्या पृथ्वीतलावर सर्वश्रेष्ठ असल्याची जाणीव साऱ्यांना करून देणे ही माझी आकांक्षा आहे, असे म्हणणारा विंड्रिप डेमोक्रॅट पक्षाचा अध्यक्षपदा-साठीचा उमेदवार आहे. अमेरिकेतील तत्कालीन सामाजिक वास्तव विस्कळीत झालेले आहे. असंतुष्ट कामगार, दिग्भ्रांत मध्यमवर्ग, डाव्या पक्षांमधला एकसंधतेचा अभाव, धरसोड वृत्तीचे उदारमतवादी, – ही सारी हाताबाहेर गेलेली परिस्थिती; ही हुकूमशाही प्रवृत्तीचा विंड्रिप बरोबर हेरतो. डोरेमससारख्या द्रष्ट्या विचारवंत संपादकाला विंड्रिपची ही हुकूमशाही प्रवृत्ती दिसत असते. तो आपल्या लेखणीने त्याचा प्रतिकारही करू बघतो, आपलं सारसर्वस्व पणाला लावण्याची तयारीही करतो पण विंड्रिपची अध्यक्षपदाकडे चाललेली घोडदौड मात्र कुणाच्यानेही थांबणारी नसते. लोकशाहीच्या उणिवांवर फासिस्ट हुकूमशाही हा काही उपाय राहू शकत नाही, ह्यावर डोरेमस कितीही ठाम असला तरी सद्यःस्थितीत आपल्याला कुणी हिटलर, मुसोलिनीच हवा; तोच आपल्या देशाला गर्तेतून बाहेर काढून उन्नतीच्या यशशिखरावर नेऊ शकेल असा विचार करणारा भाबडा समाजही बहुसंख्येने आहे. विंड्रिप भंपक, दिखाऊ आणि अतिशय पाताळयंत्री राजकारणी आहे. लोकशाही, संसद ह्यावर त्याचा वि वास नाही. संसदेत कुठल्या विषयावर तोंड उघडायला महिनोन् गणती लावणाऱ्या संसदसदस्यांच्या हाती आपली राजकीय शक्ती देण्यापेक्षा, नोकरशाहीलाच आपल्या ताटाखालचे मांजर बनवून त्यांच्या हाती सत्ता द्यायची, वेळ पडलीच तर संविधानात बदल करायचा असे त्याचे स्पष्ट मत आहे. विड्रिपच्या निवडणूक जाहीरनाम्यातही वित्त-संस्था, बँका, विमा कंपन्या यांवर सरकारी नियंत्रण ठेवणे, लोकांना ‘धार्मिक स्वातंत्र्य’ देणे, नीग्रोंना मतदानापासून वंचित ठेवणे, त्यांना कुठलेही सार्वजनिक पद न देणे, त्यांच्या वकिली, वैद्यकीय व्यवसायावर बंदी आणणे, काम करणाऱ्या स्त्रियांना पुन्हा त्यांच्या पवित्र अशा चूलमूल ह्या क्षेत्रात पाठवणे; साम्यवाद, समाजवादाची भलावण करणाऱ्यांवर किंवा रशियाशी संगनमत असल्याचा संशय असणाऱ्यांवर देशद्रोहाचे खटले भरणे, असे स्पष्ट करण्यात येते. लोकांनाही विंड्रिपचे ‘रिंगमास्टर क्रांतिकारी’ रूप भावते आणि तो अध्यक्षपद हासिल करतो.
विंड्रिप आपली खाजगी सेना सर्वप्रथम उभी करतो. ‘कॉर्पोज’ असे गोंडस नावही तिला बहाल करण्यात येते. गुंडागर्दीला राजाश्रय मिळतो. सरकारविरुद्ध कट केल्याच्या आरोपाखाली कुणाही निरपराध्याचा खून पाडणे, देशद्रोहाखाली अडकवणे वगैरे सर्रास चालू होते. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात उठणारे विरोध-निषेधाचे आवाज हिंसाचार, घातपात आणि दहशतीने दडपले जाऊ लागतात. अशी ही हुकूमशाहीची पावले विंड्रिपच्या रूपाने सर्वत्र येताना दिसूनही डोरेमस सुरुवातीला त्याकडे फारशा गांभीर्याने बघत नाही. ‘हे येथे घडणे नाही,’ अमेरिकेत हुकूमशाही वगैरे येणे अशक्यप्राय आहे, ह्या आपल्या विचारावर तो ठाम असतो. त्याच्या ह्या भाबडेपणाची किंमत त्याला स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या सर्वस्वाचा होम करून मोजून द्यावी लागते.
संपादक डोरेमसचा काटा काढण्याचा कट रचला जातो. विंड्रिपच्या विरुद्ध लिहिलेल्या संपादकीयामुळे डोरेमसला सतरा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा होते आणि छळछावणीत त्याची रवानगी केली जाते. राष्ट्रद्रोह, शत्रुराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविणे, लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करणे असे आरोप त्याच्यावर लावले जातात. डोरेमस ह्या साऱ्याने हबकूनच जातो. विंड्रिपच्या हुकूमशाही कारकिर्दीत देशपातळीवर कसे मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतात ह्याचे अतिशय तपशीलवार, रोचक व रोमांचक वर्णन कादंबरीत येते. साऱ्या विद्यापीठात एकच अभ्यासक्रम राबवला जातो. अभ्यासक्रमातून तथाकथित भंपक परंपरा आणि विषय वगळण्यात येतात. लॅटिन, ग्रीक, हिब्रू, संस्कृत ह्या भाषा, पुरातत्त्वशास्त्र, इ.स. 1500 पूर्वीचा इतिहास, भाषाशास्त्र, साहित्य, ह्यांचा अभ्यास बंद करण्यात येतो. ललित साहित्याऐवजी आणि भावुक कवितेऐवजी वर्तमानपत्रातले उतारे अभ्यासक्रमात येतात.
चर्च आणि राज्यसंस्था कॉर्पोजसमोर शरणागत होतात. शेतकरी, कामगारांनी केलेल्या संपात त्यांना गोळ्या घालून ठार केले जाते. संशयित कम्युनिस्टांची सरळ छळछावणीत रवानगी केले जाते एका अर्थाने सारा देश पोलिसराज्यच बनून जातो. कुणाचा कुणावर वि वास उरत नाही. सर्वत्र भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण होते. कामाव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू धजत नाही. कुणाची चाहूल, दारावर पडलेली थाप, टेलिफोनची वाजणारी घंटी, लोकांच्या हृदयाचे ठोके चुकवायला लागते. साऱ्या थोर लेखकांच्या पुस्तकांनीच सर्वसामान्यांची मने कलुषित होतात आणि ते स्वतंत्रपणे विचार करायला लागून राज्यसत्तेविरुद्ध बंड ताशादी याने करायला तयार होतात, अशा विचाराने थोरो, व्हिटमन, मार्क ट्वेन, इमर्सन, डिकन्स, वेल्स, मार्क्स, शॉ, टॉलस्टॉय ह्यांची पुस्तके बाळगणेही गुन्हा ठरायला लागतो. डोरेमसच्या घराची झडती घेताना तर एका आसुरी आनंदाने त्याचा सारा अमूल्य ग्रंथसंग्रहच त्याच्या डोळ्यादेखत कॉर्पोज जाळून टाकतात. अशी ही दमनकारी यंत्रणा तरुण पिढीलाही भ्रष्ट बनवायला लागते. डोरेमसचा मुलगाही त्याच्या आडमुठेपणाबद्दल कॉर्पोजची बाजू घेऊन त्याला दोषी ठरवतो.
ह्या हुकूमशाहीविरुद्ध लढायला भूमिगत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण होते. अशा साऱ्यांना ‘फासिस्ट शक्तींचे हस्तक’ ठरवून एकतर जेलमध्ये धाडले जाते किंवा ठार मारले जाते. अगदी असेच जर्मनी, रशिया, इटली, हंगेरी, पोलंड, स्पेन, क्यूबातही सामान्य जनजीवन दहशतीखाली पिचत होते. फासिस्टांनी कम्युनिस्टांना, कम्युनिस्टांनी सोशल डेमोक्रॅट्सना, सोशल डेमोक्रॅट्सनी आणखी इतरांना आपले शत्रू समजून त्यांचा काटा काढण्याच्या वातावरणात कोण कुणाची बाजू घेऊन ह्या धुम चक्रीत शहीद होणे पत्करेल! प्रत्येक राज्यकर्ता आणि धार्मिक संघटना शांतीचे गोडवे तर मोठ्या आवाजात गात होते पण हेही सांगायला विसरत नव्हते की शांती प्रस्थापित करायची असेल तर युद्धसज्ज होण्याशिवाय गत्यंतर नाही!
डोरेमसला अटक होते. त्याला लाथाबुक्यांनी बुकलून काढले जाते. कम्युनिस्ट असण्याचा ठपका ठेवून राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली त्याला ट्रॉयनॉन कान्संट्रेशन कॅम्पमध्ये सतरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होते. तिथल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याला सफाई आणि भंगी कामेही करावी लागतात. जनावरांसारखी वागणूक दिली जाते. सर्वसामान्य माणूस केवळ मोडून जावा अशी ही सारी व्यवस्था आहे—-पण ह्या विपरीत अमेरिकेत कुठेही छळछावणी नाही असे सांगितले जाते. खरे तर शिक्षा भोगणारे दुर्दैवाने वाट चुकलेले, स्वयंघोषित उदारमतवाद्यांच्या नादी लागलेले दुर्दैवी जीव आहेत. त्यांना नवीन बदललेल्या सामाजिक, आर्थिक वास्तवाची ओळख करून देणाऱ्या त्या प्रशाळाच होत. अशी सारी ‘गोबेल्सप्रणीत’ चोख प्र
ट्रायँनॉन कॅम्पमध्ये कार्ल पास्कल हा कम्युनिस्ट कार्यकर्ताही डोरेमसबरोबर देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा भोगतो. कार्लबद्दल डोरेमसला आत्मीयभाव असतो. त्याच्या वैचारिक बैठकीबद्दल आदरही असतो. पण साम्यवाद जेव्हा त्याच्यासाठी धार्मिक अंधश्रद्धेचे रूप धारण करतो तेव्हा डोरेमस अस्वस्थ होतो. मॉस्को कार्लसाठी ‘पवित्र शहर’ बनते. जेरुसलेम, मक्का, रोम, बनारस ह्यांच्या नुसत्या उल्लेखानेही त्या त्या धार्मिक सनातन्यांनी ज्या भक्तिभाव आणि समर्पणाने गदगदून यावे तशीच काहीशी अवस्था कार्लची झालेली असते. डोरेमसचे बुद्धिवादी मन ह्याने व्यथित होते. डोरेमसची शूर पायलट मुलगी मेरी ग्रीनहिल आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देते. हुकूमशाहीच्या विरुद्ध लढताना का असेना, पण कुणा व्यक्तीचा खून पाडणे डोरेमसला मंजूर नाही.
विंड्रिपचा अंतस्थ सहकारी, त्याच्या साऱ्या काळ्या कारस्थानांचा सूत्रधार ली सारासान विंड्रिपची सत्ता धुडकावून स्वतः हुकूमशहा बनतो. लोकांचे लक्ष ह्या सत्ताबदला-वरून हटावे आणि आपल्या विरोधात कुठलेही कटकारस्थान शिजू नये म्हणून तो देशातील साऱ्या जागरूक (!) नागरिकांना, त्यांच्यातील देशभक्तीला स्मरून परकीय शक्तींच्या संभाव्य आक्रमणाच्या विरोधात एकसंध उभे राहण्याचे आवाहन करतो. मेक्सिकन सरहद्दीवर चालू असलेल्या चकमकींचा खोटाच बागुलबोवा उभा करून मेक्सिकोविरुद्ध युद्धाची घोषणा करतो. हुकूमशहा तेवढा बदलतो, व्यवस्था आहे तशीच राहते. उलट ती आपले आसन बळकट करण्यासाठी आणखी निरनिराळ्या पाशवी दमनतंत्राचा अवलंब करते. महिन्याभरातच सारासानचा खून पाडून डेवी हाईक नवा अध्यक्ष बनतो. अशी ही दमनकारी यंत्रणेची अंतहीन भयावह साखळीच निर्माण होते. सर्वसामान्यांच्या हालअपेष्टा क्रमाने वाढत जातात, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वातंत्र्योमींचे अधिकच खून पाडले जातात.
डोरेमसची ह्या राजकीय उलथापालथीत सुटका होते आणि तो कॅनडात आश्रय घेतो. इकडे अमेरिकेत आणखी एक उठाव होऊन नव्या निःपक्षपाती निवडणुका जाहीर होईपर्यंत टोब्रीज अध्यक्षपदाची सूत्रे हस्तगत करतो. कॉर्पोजची पाळेमुळे अधिकच खोलवर पसरत जातात, वरचा डोलाराच तेवढा आपले स्वरूप बदलत राहतो. ऑरवेलच्या ‘नाइनटिनएटीफोर’ सारखी व्यंग्यात्मक शैली किंवा कोस्लरच्या ‘डार्कनेस अॅट नून’ सारखे अंगावर काटा उभा करणारे रोमांचकारी वास्तव ह्या कादंबरीत नाही. पण ते कादंबरीचे वैगुण्य ठरत नाही. मुळात अशी तुलनाही अप्रस्तुतच ठरते. ल्यूइसच्या ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे हुकूमशाही अवतीर्ण होतानाची सामाजिक स्थिती, तिचा जामानिमा, तिचे तंत्रमंत्र, वैचारिक पोकळीत तिचे पोसले जाणे, इत्यादी बाबींचा लेखाजोखा अतिशय रंजक कथासूत्रात गुंफला आहे. ल्यूइसच्या कादंबरीचे हे सूत्र सार्वत्रिक, सार्वकालिक आहे. तद्वतच आपल्या सद्यःस्थितीवर चपखल बसणारे आहे. लोकशाही मूल्यांवर निष्ठा असणाऱ्यांनी आपले स्वातंत्र्य गृहीत धरू नये, दबा धरून असलेल्या फासिस्ट शक्ती केव्हा आणि कुठल्या उन्मादी रूपात अवतीर्ण होऊन लोक-शाहीचा घास घेतील ह्याची शा वती देता येत नाही. ‘हे येथेच काय कुठेही घडू शकेल’ एवढा इशारा जरी आपण समजून सजग झालो, तरी पुरेसा ठरेल. ल्यूइसच्या ‘इट कान्ट हॅपन हिअर’ ह्या कादंबरीचे तेच खरे इंगित आहे.
97, इंद्रधनु सदनिका,अंबाझरी लेआऊट, नागपूर — 440 010