‘वर्तमान’ ही श्री. सुरेश द्वादशीवारांची अद्यावधि शेवटची कादंबरी. तिच्या वेष्टनावर तिचे वर्णन ‘राजकीय कादंबरी’ असे केले आहे. तिच्यात इ.स. 2002 या कालखंडावर आणि त्यातल्या मातब्बरांवर प्रकाशझोत टाकला आहे. केंद्र-सरकार, राज्यसरकारे. पक्ष. संघटना. प्रसारमाध्यमे आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तम आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तमान राजकारणाचा पट उलगडणारी’ हे तिचे वर्णन बरोबर आहे. पण त्या वर्णनांत न आलेले अनेक सामान्यपणे दुर्मिळ गुणही तिच्यात आहेत. प्रथम सांगायचा गुण म्हणजे तिची विलक्षण मनोवेधकता. चारशेचार पृष्ठांची ही कादंबरी इतकी चित्ताकर्षक आहे की वाचक एकदा वाचायला लागला की झपाटल्यासारखा ती वाचतच राहतो, आणि त्याला सवड असेल तर एक-दोन बैठकीत ही संपवितो. पहिल्या पृष्ठापासून शेवटच्या पृष्ठापर्यंत कुठेही कंटाळवाणा भाग येत नाही.
कादंबरीत वेगवेगळ्या प्रकरणांत एकेका राज्यातील आणि केंद्रातील गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील घडामोडींचा इतिहास सांगितला आहे. काश्मीर ते केरळ, आणि गुजरात ते बंगाल या सर्व राज्यांतील पक्षोपपक्षांचे राजकारण अत्यंत मार्मिकपणे सांगून त्यांचे केंद्रातील राजकारणाशी असलेले संबंध उलगडून दाखविले आहेत. केंद्र आणि राज्ये यांतील व्यक्तींना काल्पनिक नावे दिली असली तरी प्रमुख पात्रे कोण आहेत हे ओळखणे सोपे असते. व्यक्तींचे चित्रण मार्मिक झाले आहे. त्यातही पंतप्रधान आणि काँग्रेसाध्यक्ष यांची व्यक्तिचित्रे विशेष प्रभावी उतरली आहेत.
खऱ्या व्यक्तवर बेतलेल्या पात्रांखेरीज काही पूर्ण काल्पनिक व्यक्तिरेखाही कादंबरीत आहेत. त्यांपैकी विशेष डोळ्यांत भरणारी व्यक्तिरेखा म्हणजे प्रभासकुमार या पत्रकार-संपादकांची. त्याचे चित्रण कारक प्रभावी आणि ठसठशीत उतरले आहे. केरळच्या राजकारणातील दोन प्रमुख पात्रे म्हणजे बी. आर्. आणि के. आर्. हीही लक्षणीय आहेत.
देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांतील प्रदेशांचे लेखकाला चांगले ज्ञान आहे, आणि त्या त्या प्रदेशांची वर्णने—-भूगोल आणि इतिहास—-प्रत्ययकारी झाली आहेत. स्थानिक चालीरीती, घटना प्रत्येक देशाच्या चित्रणात बेमालूम येतात. पक्षोपपक्षांच्या मतप्रणाल्या अत्यंत भिन्न आणि परस्परविरुद्ध असल्या तरी त्यांचे निरूपण तटस्थपणे करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. उदार आणि परमतसहिष्णु अशा दृष्टिकोणातून त्या विचारसरणींकडे पाहिल्यामुळे कोणत्याही पक्षावर अन्याय झाला नाही असे म्हणता येते. सारांश, कादंबरी अतिशय सुंदर उतरली असून तिच्यात नाव ठेवायला जागा सहसा सापडत नाही. नाही म्हणायला एक तांत्रिक दोष दाखवावा असे वाटते. ‘वर्तमान’ ही कादंबरी आहे असे वेष्टनावर छापलेले असल्यामुळे ते लेखकास मान्य आहे असे समजायला हरकत नसावी. पण तसे असेल तर एक तांत्रिक प्र न विचारावासा वाटतो. ‘वर्तमान’,
‘कादंबरी’ आहे असे म्हणणे कठीण आहे. कारण तिच्यात अथपासून इतिपर्यंत एक कथानक नाही. वेगवेगळ्या राज्यांतील राजकीय घडामोडींत कथेचे एकसूत्र नाही. प्रत्येक प्रकरण एकेका राज्यातील आणि केंद्रातील राजकारणाचे स्वतंत्र चित्रण आहे. त्यामुळे पुस्तकाचे स्वरूप एखाद्या आल्बमसारखे झाले आहे. त्यामुळे पुस्तकाची वाचनीयता आणि यश डागाळली गेली आहेत असे मात्र नाही. एक कथानक नसूनही सगळी प्रकरणे एकमेकांशी बांधलेली आहेत. कथानकाचे एक सूत्र नसले तरी देशाचा वर्तमानकालीन इतिहास हे विषयाचे सूत्र पुस्तकाला आहे.
‘वर्तमान’ ही रचना म्हणजे एक वर्तमान ऐतिहासिक कादंबरी. या वर्णनावरून मला तशा स्वरूपाच्या अनेक कादंबऱ्यांची आठवण झाली. प्रा. ग. प्र. प्रधानांची ‘साठा उत्तराची कहाणी’ ह्या कादंबरीचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. परंतु प्रधानांच्या पुस्तकाचे स्वरूप खरोखरच कादंबरीचे आहे. तिला कथानकाचे सूत्र आहे. अप्टन सिंक्लेअर या विख्यात अमेरिकन लेखकाची Sacco आणि Vanzethi केस वरील अतिशय प्रभावी आणि नितांतसुंदर कादंबरी. तिचे वर्णन A Contemporary Historical Novel असे सार्थपणे केले आहे. या कादंबऱ्यांत सत्य आणि काल्पनिक यांची गुंफण बेमालूम झालेली असून त्यांना कथानकाचे एक सूत्रही आहे. त्या दृष्टीने ‘वर्तमान’चे वैशिष्ट्य लक्षणीय आहे. एक कथानक नसतानाही तिची वाचनीयता
आणि सौंदर्य यत्किंचितही कमी झाली नाहीत.
मी चुकत नसेन तर ‘वर्तमान’ ही त्या प्रकारची मराठीतील एकमेव कादंबरी असावी. ती लिहिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
कर्मयोग, प्लॉट नं. 4, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — 440 012