परस्परावलंबनाविषयी आणखी काही (२)

७. (क) मोहनी: आम्ही आम्हाला पैसा जास्त मिळाल्याने श्रीमंत होत नाही, तर आमच्या परिश्रमांच्या मोबदल्यात आपल्याला किती उपभोग मिळाला ते पाहून पूर्वीइतक्याच श्रमांत जास्त उपभोग मिळत असेल तरच आम्ही संघशः आणि त्यामुळे सरासरीने व्यक्तिशः श्रीमान् झालो आहोत हे समजू शकते.
(ख) पंडित: ह्याला अर्थ नाही. एक उपाशी तर दुसरा तुडुंब! सरासरीने दोघेही अर्धपोटी!
(ग) मोहनी: वरील वाक्यात, म्हणजे ७क मध्ये, पूर्वीइतक्याच श्रमात प्रत्येकाला जास्त उपभोग हा शब्द घालायला हवा आणि सरासरीने हा शब्द काढायला हवा म्हणजे माझ्या म्हणण्यातील अर्थ स्पष्ट होईल. उदा. प्रत्येकाची पैशातील मिळकत तितकीच राहून धान्य स्वस्त झाले, अथवा गावोगाव जाणारी बसगाडी सुरू झाली व तिचा प्रवास प्रत्येकाच्या आटोक्यातला राहिला, तर त्या समाजाचा उपभोग वाढेल अथवा धान्याच्या किंमती स्थिर राहिल्या व पैशातील मिळकत वाढली तरीही उपभोग वाढेल.

८. (क) मोहनी: पूर्ण स्वावलंबन शक्य नाही आणि जे स्वावलंबन पुरस्कारतात त्यांनाही ते अभिप्रेत नाही. पूर्ण परस्परावलंबन मात्र शक्य आहे. एका राष्ट्राच्या अन्तर्गत व्यवहारात तर ते नक्कीच शक्य आहे. स्वावलंबन हा शब्द वापरल्यामुळे स्वावलंबन आणि परस्परावलंबन ह्यातील सीमारेषा समजत नाही. पूर्ण परस्परावलंबनाचा पुरस्कार आणि स्वीकार केल्यास गैरसमजाला वाव राहत नाही.
(ख) पंडित: पूर्ण परस्परावलंबन स्पष्ट करा.
(ग) मोहनी: पूर्ण परस्परावलंबन स्पष्ट करण्याच्या अगोदर पूर्ण स्वाव-लंबन म्हणजे काय हे स्पष्ट करणे योग्य होईल. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी कामांची रचना अशी करणे की ज्यामुळे आपण कुणाचेही लाचार राहणार नाही. ही लाचारी आपणाकडे येऊ नये यासाठी सगळी कामे स्वतः करणे हे केवळ शेतकऱ्यालाच शक्य आहे आणि प्रत्येकाने शेती करावी अशी त्याकडून अपेक्षा आहे. कमीत कमी वस्तू बाजारातून आणाव्यात, आपल्याला लागणारे धान्य स्वतः निर्माण करावे; वस्त्रासाठी लागणारा कापूस स्वतः पिकवावा आणि मातीची, गवताने शाकारलेली—-स्वतःला बांधता येतील अशी, घरे बांधावीत. असे केल्याने पूर्ण स्वावलंबन साधले असे होईल. पण हे स्वावलंबनदेखील अशक्यप्राय आहे, कारण घरात जाते लागते, उखळ-मुसळ लागते, पाटा-वरवंटा लागतो, गाडगी-मडकी लागतात आणि ह्याबाबतीतील स्वावलंबनाला मर्यादा पडतातच कारण प्रत्येकाला स्वतःला ह्या वस्तू घडविणे शक्य होत नाही. त्यामुळे कुंभार, लोहार, सुतार, चांभार व विणकर ह्यांची मदत घ्यावी लागतेच. सुताराकडून शेतीची औते, विणकामासाठी माग, आणि तेल पिळण्यासाठी घाणी ह्या वस्तू करवून घ्याव्या लागतात. बैलगाडीची चाके व जू बनविण्यासाठी कुशल सुताराची गरज असते. चाकावर धाव चढविण्यासाठी लोहार लागतो. दळण स्वतः केले तरी जाते घडविण्यासाठी पाथरवट लागतो व जात्याच्या अणीसाठी लोहाराची गरज असते. खुंट्यासाठी सुतार लागतो. सूत कातण्यासाठी चरखा लागतो व चरख्याच्या चात्यांसाठी सुतार-लोहाराची गरज पडते. मोट शिवायला व बैलांचे पट्टे इ. सामानासाठी चांभार लागतो. गावकऱ्यांची एकमेकांशी चांगली ओळख असल्यामुळे आणि सगळ्याच कारूनारूंना एकमेकांची गरज असल्यामुळे ते एकमेकांना सांभाळून घेतात व कुणावरच लाचारी येऊ देत नाहीत, म्हणून ह्या प्रकारच्या परस्परावलंबनाला स्वावलंबनच मानले जाते. ह्या पलीकडची कोणतीही वस्तू बाजारातून आणावी लागली व त्यासाठी पैसा मोजावा लागला तर स्वावलंबनाला बाधा येते. ह्या व्यवहाराला परावलंबन समजले जाते.
परस्परावलंबनामध्ये स्वावलंबन नाही व परावलंबनही नाही. तेथे गावात निर्माण झालेली वस्तू आणि गावाबाहेर निर्माण झालेली वस्तू असा फरक करण्यात येत नाही. त्यामुळे पूर्ण देशातल्या किंवा जगात कुठेही बनलेल्या वस्तू वापरण्यावर निबंध नाही. औद्योगिक क्रान्तीनंतर उत्पादनाच्या प्रक्रियेतच फरक पडला असे नाही तर उत्पादित वस्तूंची विविधताही प्रचंड प्रमाणात वाढली. निर्माण केलेल्या वस्तू आणि निर्मिती करणाऱ्या वस्तू म्हणजे निर्मितीची साधने बनविण्यासाठी एका घरातील लोकांचे श्रम किंवा गावकऱ्यांचे श्रम पुरेनासे झाले. पूर्वीच्या लोहारी किंवा सुतारीमध्ये दोनतीन लोकांच्या पेक्षा अधिक लोकांचे श्रम किंवा कल्पकता लागत नसे. पण रेल्वेची एंजिने किंवा रूळ बनविण्यासाठी किंवा तत्सम वस्तू निर्माण करण्यासाठी निरनिराळे व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपली विविध कौशल्ये व कल्पकता घेऊन एकत्र यावे लागते व ते नवनिर्मितीसाठी एकत्र आले असल्यामुळे एकमेकांची अडवणूक न करता एकमेकांच्या पूर्ण सहकार्याने काम तडीस नेतात. हा परस्परावलंबनाचा एक नमुना झाला. अशी परस्परावलंबनाची अनेक क्षेत्रे आहेत, उदा. वीजनिर्मिती. ही उर्जेचीच निर्मिती आहे! खाणीतून माल काढणे, दर्यावर्दीपणा करणे, जमिनीवरून सायकल-मोटार चालविणे, समुद्रात जहाज चालविणे व आकाशात विमान उडविणे, घड्याळ बनविणे इ.इ. इतकेच नव्हे तर निरनिराळी मानव्यशास्त्रे शिकण्यासाठी व संशोधनासाठीसुद्धा प्रचंड प्रमाणात परस्परावलंबन लागते! स्वावलंबन उराशी धरून यांपैकी काहीच साध्य होऊ शकत नाही. आपल्या मागासलेपणाचे हेच कारण आहे असे तेवढ्यासाठीच मला वाटते. स्वावलंबनाचा ध्यास घेऊन आपण आपलेच पाय मागे खेचत आहोत व जगातील इतरांना आमचे शोषण करण्यासाठी मुक्तद्वार निर्माण करून ठेवीत आहोत! हे सर्व आमच्या लक्षात येईल तो सृदिन!
स्वावलंबन आणि परस्परावलंबन ही उत्तर व दक्षिण ध्रुवाप्रमाणे माणसाच्या मनो-वृत्तीची दोन टोके आहेत त्यामुळे काही प्रमाणात स्वावलंबन व काही प्रमाणात परस्परा-वलंबन असे कधीही होऊ शकत नाही. म्हणजे थोडे स्वावलंबनाने करू व बाकीचे परस्परावलंबनाने करू असे यात म्हणता येत नाही, कारण त्या दोन वृत्तीच भिन्न आहेत आणि त्यांची सांगड घालण्याच्या खटपटीत कुणी पडू नये असे मला वाटते. आम्हाला परस्परांविषयीचा वि वास व परस्परांविषयीची कृतज्ञता हा भाग शिकवावा व शिकावा लागेल. तेव्हाच परस्परावलंबनाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकले असे होईल.

९. (क) मोहनी : खादीविचारामध्ये महत्त्वाची त्रुटी अशी की त्यामुळे विषमता दूर होऊ शकत नाही. विषमता दूर करण्यासाठी ज्याच्या ठिकाणी आज ऐपत नाही अशांच्या ठिकाणी ती निर्माण करावी लागते, किंवा ज्यांच्या ठिकाणी आज ऐपत आहे अशांची ती कमी करावी लागते. खादीने दुसरा पर्याय सुचविला आहे असे मला वाटते. परंतु व्यवहारात हा पर्याय चालत नाही. अभावाकडून विभवाकडे जाण्याची आस आम्हाला तो पर्याय स्वीकारू देत नाही. त्यामुळे आमच्या आचरणातला दंभ मात्र वाढतो.
(ख) पंडित: आज ज्यांच्याजवळ ऐपत आहे त्यांचा उपभोग थोपविता येणार नाही का?
(ग) मोहनी: उपभोग थोपविल्याने आजच्या परिस्थितीत उत्पादनच बंद पडेल. झपाट्याने मंदी येईल आणि ती आवरता येणार नाही. उत्पादन चालू ठेवून प्रत्येका-पर्यंत ते पोचविण्यासाठी आपल्याला दुसऱ्या काही पद्धतींचा अवलंब करावा लागेल. जोवर आम्ही आमची गणिते पैशातल्या नफ्या-तोट्यात मांडू, तोवर केलेल्या कामातून नफा मिळविण्याची आणि तोदेखील पैशाच्या स्वरूपात—आम्हाला अपेक्षा असते. उत्पादन वाढवून पुष्कळदा पैशाच्या स्वरूपात नुकसान येते. त्यामुळे उत्पादक आपले उत्पादन वाढविण्यास नाखूष असतात. उदा. एका शेतकऱ्याने एका गावाला पपई लावली. शेत लहानसे होते व उत्पन्न चांगले आल्यामुळे त्याला नफाही चांगला मिळाला. दुसऱ्या वर्षी मात्र पहिल्यावर्षीपेक्षा थोडे जास्त उत्पादन घेऊनसुद्धा त्याला नुकसान आले, कारण त्याचे पाहून शेजारच्या चार शेतकऱ्यांनी पपईचेच उत्पादन काढले. त्याबरोबर माल म्हणजे पुरवठा वाढला व ग्राहकांनी किंमत पाडून माल घेतला. तिसऱ्या वर्षी पपईचे उत्पादन घटविण्यात आले कारण दुसऱ्या वर्षी पपई-बागाईतदारांचा खर्च निघून आला नव्हता व शेती तोट्यात गेली होती. ज्याला पूर्वी पपई खायला किंमतीमुळे परवडत नव्हती त्यांपैकी काहींना दुसऱ्या वर्षी पपई खायला मिळाली. हे खरे. परंत तिसऱ्या वर्षी पन्हा गरिबाला पपई मिळाली नाही. पपईची किंमत स्थिर राहिली तरच उत्पादनात वाढ होऊ शकते आणि उत्पादन पुरेसे असले तरच ते सर्वांपर्यंत पोचू शकते. म्हणजे प्रत्येक ग्राहकाचे उत्पन्न देखील पुष्कळ प्रमाणात समान असावे लागते. स्थिरभाव व ते परवडतील असे सर्व ग्राहकांचे उत्पन्न ह्या दोन गोष्टी जणू काय समान वाटपाच्या पूर्व अटीच आहेत.
(अपूर्ण)

मोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.