वर्ष 14, अंक 4, हा जुलैचा अंक वाचला. त्यांतील दोन विषयांवर काही मते मांडत आहे.
1. गांधीजी व सावरकर यांच्या एकूण वैचारिकांची तुलना करणे योग्य होईल. अस्मृश्यता निवारण सोडल्यास हे दोघे मान्यवर पुढारी दोन विरुद्ध टोकाना उभे होते. गांधीजींचे अर्थकारण, राजकारण व समाजकारण सुसंगत होती. शेतीप्रधान व खेडीप्रधान अशी उत्पादनाची रचना, सूतकताई व हाथविणाई असा खादी-उद्योगाचा पुरस्कार, नांगरासाठी सशक्त बैल, दुधासाठी सशक्त गायी असा गोरक्षण कार्यक्रम, वैयक्तिक आचरणांत ब्रह्मचर्य व अहिंसा यावर अतिरेकी भर, ही गांधींच्या वैचारिकेची मुख्य सूत्रे होती. सावरकर हे गिरण्यांचे कापड, आधुनिक(तम) तांत्रिकी, अतिरिक्त गोधनाची हिंसा, इत्यादीचा पुरस्कार करीत.
मासिक संग्रह: सप्टेंबर, २००३
तंत्रज्ञान आणि विचारांची पद्धत
भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातले अनेक तज्ञ आजच प्रयोगांचे निष्कर्ष काढायला आणि समजून घ्यायला इलेक्ट्रॉनिक तर्कशास्त्राची मदत घेत आहेत. समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री संगणकांशिवाय कामे करू शकत नाही आहेत. मानव्यशास्त्री, विचारवंत आणि सर्जनशील लेखकांना आज तरी या यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. पण हे लवकरच बदलेल, कारण संगणकाने मजकुराचे संपादन करणे कागद-लेखणी वा टंकलेखकाने तसे करण्यापेक्षा खूपच सोपे जाते. प्रकाशन उद्योगाला इलेक्ट्रॉनिक अक्षरजुळणीचे फायदे आधीच कळलेले आहेत. पुढे साहित्यिक आणि वैज्ञानिक ग्रंथालयेही इलेक्टॉनिक रूपात संगणकावर उपलब्ध होतीलच. साहित्य, तत्त्वज्ञान किंवा इतिहासाचा अभ्यास अंकबद्ध करून संगणक हुकूमनाम्यांमध्ये साठवता येईल का, हा प्र नच नाही आहे—-मुळात संवाद साधायला शास्त्रीपंडितांना संगणक हेच महत्त्वाचे साधन उरणार आहे.
‘देहभान’: एका आदिम सत्याचा पुनरुच्चार
अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित देहभान नाटक पाहिले. नीना कुलकर्णी आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकमींनी त्यात भूमिका केलेल्या आहेत. इतर सहकलाकारांनी त्यांना दिलेली साथही उल्लेखनीय आहे. नाटक दोन पातळ्यांवर घडतंय. एका महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त होणाऱ्या स्नेह-संमेलनात उत्कृष्ट नाटक सादर केले जावे ह्या हेतूने ‘देहभान’ या कादंबरीवर आधारित नाटक सादर करण्याचा धाडसी निर्णय दिग्दर्शिका प्राचार्यांच्या संमतीने घेते. नाटकातच नाटक घडतं आहे. बहुतेक प्रमुख पात्रे दुहेरी भूमिका करताहेत. प्राचार्या दमयंती आणि विकास केंद्रातील मावशी ह्या भूमिका नीना कुळकर्णी ह्यांनी समर्थ अभिनयाने साकार केल्या आहेत.
स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग १)
विषयप्रवेश
काळात भारताचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. या विकासात विज्ञानाचा मोठा हातभार होता. आपण केलेला हा विकास पुरेसा झाला की नाही, आपल्या क्षमतेएवढा झाला की नाही, ज्या क्षेत्रात हवा त्या क्षेत्रात झाला की नाही, समाजातील निम्नस्तरांना फायदेशीर झाला की नाही, या प्र नांना होकारार्थी उत्तरे मिळतीलच असे नाही. पण विकास झालाच नाही असे कोणी म्हणू शकणार नाही. आपल्याला हवी तशी व हवी तेवढी प्रगती का झाली नाही या प्र नाचा शोध आपल्याला राज्यकर्ते व त्यांची धोरणे, समाज व सामाजिक परिस्थिती त्याचप्रमाणे व्यक्तिशः आपण स्वतः यांच्यापर्यंत नेऊन पोचवतो.
वर्तमान
‘वर्तमान’ ही श्री. सुरेश द्वादशीवारांची अद्यावधि शेवटची कादंबरी. तिच्या वेष्टनावर तिचे वर्णन ‘राजकीय कादंबरी’ असे केले आहे. तिच्यात इ.स. 2002 या कालखंडावर आणि त्यातल्या मातब्बरांवर प्रकाशझोत टाकला आहे. केंद्र-सरकार, राज्यसरकारे. पक्ष. संघटना. प्रसारमाध्यमे आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तम आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तमान राजकारणाचा पट उलगडणारी’ हे तिचे वर्णन बरोबर आहे. पण त्या वर्णनांत न आलेले अनेक सामान्यपणे दुर्मिळ गुणही तिच्यात आहेत. प्रथम सांगायचा गुण म्हणजे तिची विलक्षण मनोवेधकता. चारशेचार पृष्ठांची ही कादंबरी इतकी चित्ताकर्षक आहे की वाचक एकदा वाचायला लागला की झपाटल्यासारखा ती वाचतच राहतो, आणि त्याला सवड असेल तर एक-दोन बैठकीत ही संपवितो.
परस्परावलंबनाविषयी आणखी काही (२)
७. (क) मोहनी: आम्ही आम्हाला पैसा जास्त मिळाल्याने श्रीमंत होत नाही, तर आमच्या परिश्रमांच्या मोबदल्यात आपल्याला किती उपभोग मिळाला ते पाहून पूर्वीइतक्याच श्रमांत जास्त उपभोग मिळत असेल तरच आम्ही संघशः आणि त्यामुळे सरासरीने व्यक्तिशः श्रीमान् झालो आहोत हे समजू शकते.
(ख) पंडित: ह्याला अर्थ नाही. एक उपाशी तर दुसरा तुडुंब! सरासरीने दोघेही अर्धपोटी!
(ग) मोहनी: वरील वाक्यात, म्हणजे ७क मध्ये, पूर्वीइतक्याच श्रमात प्रत्येकाला जास्त उपभोग हा शब्द घालायला हवा आणि सरासरीने हा शब्द काढायला हवा म्हणजे माझ्या म्हणण्यातील अर्थ स्पष्ट होईल.
रस्ते आणि मोटारी: एक न संपणारी शर्यत
1908 साली अमेरिकेत फोर्ड मोटारीच्या कारखान्यातून पहिली मोटार बाहेर पडली आणि माणसाच्या भ्रमंतीला क्रांतिकारी वेग प्राप्त झाला. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत या मोटारींचा म्हणावा तितका प्रसार शहरांमध्ये झाला नव्हता. शेतकरी मात्र या वाहनांवर खूष होते. त्यांचा ताजा शेतीमाल शहरांत आणावयाला हे वाहन फार उपयोगी ठरले होते. शिवाय त्या काळात युरोप-अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये रुळांवरून ट्राम, मेट्रो, आणि उंच पुलांवरून धावणारी छोटी रेल्वे यांसारखी सार्वजनिक आणि स्वस्त वाहतूक-साधने उपलब्ध झाली होती. यामुळे मोटारी या प्रामुख्याने खेड्यांमध्ये प्रचलित झाल्या होत्या हे आज खरे वाटणार नाही.
राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-२)
राष्ट्रनिष्ठेत/समाजनिष्ठेत वाढ करण्यासाठी करावयाच्या गोष्टी
१. समाजाकडून व्यक्तीला/कुटुंबाला मिळणारे फायदे आणि सोयी सशर्त (कंडिशनल) असाव्या. कायदे व नियम मोडणाऱ्या व्यक्तींना हे फायदे व सोयी मिळणे लगेच, त्वरित बंद झाले पाहिजे, म्हणजे समाजाची नापसंती त्या व्यक्तीस व कुटुंबास लगेच जाणवली पाहिजे. अर्थात औपचारिक न्याययंत्रणा खूप सुधारली पाहिजे. यामध्ये अनावश्यक कायदे, अंमलात न आणण्यासारखे कायदे रद्द केले पाहिजेत व नवे असे कायदे करू नयेत. (उदा. भाडे-नियंत्रण कायदा, नागरी कमाल जमीन धारणा कायदा, दारूबंदी व गुटखाबंदी कायदा, व्यक्तीची नीती सुधारण्याचा प्रयत्न करणारे कायदे, गर्भलिंग चिकित्सा बंदी कायदा, गोहत्या प्रतिबंधक कायदा) शासन, पोलीस-प्रॉसिक्युटर्स व न्यायमूर्ती या सर्वच न्यायसंस्थेच्या अवयवांत सुधारणा आवश्यक आहे.
मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-४)
मदत आणि पुनर्वसन
२८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून दंगलग्रस्त मुस्लिमांचे नेते मदत-छावण्या उभारून बेघर झालेल्यांना भाडोत्री वाहनांमधून तेथे नेऊ लागले. नुसत्या अहमदाबादेत ५ मार्चपर्यंत ९८ हजार माणसे (जिल्हाधिकाऱ्यांचा आकडा ६६ हजार आहे) अशा छावण्यांमध्ये वसली होती. अहमदाबाद वगळता ही संख्या ७६००० (अधिकृत आकडा २५०००) आहे. एकूण अधिकृत निर्वासित ९१००० तर ‘स्वतंत्र’ माप १,७४,००० आहे. या सर्वांच्या राहण्या-जगण्यात सरकारी मदतीचा मागमूसही नव्हता.
उलट—-“अहमदाबाद, वडोदरा, मेहसाणा, हिम्मतनगर, आणंद, साबरकांठा, बनासकांठा, भडोच आणि अंकलेश्वर जिल्ह्यांत जिल्हाधिकारी व पोलीस ठाण्यांतील काही कर्मचाऱ्यांनी दूध, धान्य, अशा मदतसामग्रीच्या छावण्यांना होणाऱ्या पुरवठ्यात अडथळे उत्पन्न केले.
अर्हतार्जनाची आकांक्षा (विल टु डिझर्व)
अंक 14:4 मध्ये प्रा. दि. य. देशपांडे यांनी तव्य (ऑट) आणि कर्तव्य (ड्यूटी) संकल्पनांचे स्पष्टीकरण व ‘नीतीची अनुभववादी उपपत्ती’ मांडली आहे. या लेखाचा मथितार्थ (1) मुळात शिक्षेच्या भयाने (वा पारितोषिकाच्या आशेने) विधिदत्त कर्तव्यांचे पालन होते. (2) पालनाच्या सवयीने प्रत्यक्ष शिक्षा/पारितोषिक उपस्थित नसतानाही पालनाच्या कल्पनेचे अनुकरण होते. (3) हे करताना माणसे स्वतःला किंवा इतरांना विध्यर्थक/आज्ञार्थक भाषेत तव्य कर्तव्य ही विधिपालनापासून साधित (डिराइव्हड) पदे वापरून आवाहन करतात. (4) कर्तव्यांचा आशय ‘बहुमताने’ लोकांना काय वाटते यावर ठरतो. (5) सदसद्विवेक यांसारख्या गोष्टी अतिगामी (ट्रान्सेण्डेंटल) म्हणून आपल्याला वयं आहेत.