आठ पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी निवर्तल्या. गेली 8-10 वर्षे त्या आमच्याचकडे होत्या. आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची एकुलती एक मुलगी-माझी पत्नी–वारल्यानंतरही मी त्यांना प्रेमाने सांभाळले, हवे नको पाहिले, दवापाणी काटेकोरपण बघितले. यात जगावेगळे मी काही करीत आहे अशी माझी भावना नव्हतीच. पण त्या निवर्तल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त झाल्या त्या मात्र धक्कादायक वाटतात.
“काय, म्हातारीचा बोजा उतरला? सुटलात तिच्या …ला.’ ही त्यातली एक प्रतिक्रिया. “काही बोलू नका हो तुम्ही, वस्तुस्थिती हीच होती.” हे वर. हे बोलणारे माझे मित्र एरवी मनाने मायाळू आहेत. पण आत्ममग्न आणि आचरट बोलण्यात पटाईत. पहिल्यांदा माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पत्नीने थोडासा आग्रह केल्यावर “अहो वहिनी, उगीच आग्रह करू नका. नाहीतरी उद्या या सर्व अन्नाचे शेणच व्हायचे आहे.” असे तारे तोडले. हे ऐकून पत्नी गोरीमोरी झालीच पण मलाही कानकोंड्यासारखे झाले होते. इतरही अनेकजणांनी मी “जोखडातून मुक्त’ झालो असेच सुचविले. जणु काही मी पुन्हा एकदा बंधमुक्त झालो. काय वाट्टेल ते करायला बंधमुक्त हवे अशी अपेक्षा फक्त कलंदर फिरस्त्यानेच करावी. संसारी माणसाने नव्हे.
वार्धक्य आणि व्याधी काही माणूस खुशीने बोलावून घेत नाही. सर्वांनाच ते निसर्गनियमानुसार येत असते. जरा आणि व्याधी सुसह्य कशा होतील एवढेच आपण पाहायचे असते. सांभाळणारांचे, इष्टमित्रांचे, त्या खुद्द व्यक्तीचे जुने रागलोभ, समज गैरसमज, मनातील अढ्या असतात. वास्तविक कुणीही आपले गेलेले आयुष्य म्हटले तरी परत जगू शकणार नसते. मग त्याला त्याची आठवण करून देण्यात काय पुरुषार्थ आहे? आपण काय न्यायनिवाडा करायला बसलेलो असतो? कोणी तो अधिकार आपल्याला दिला? मदर थेरेसांनी पहिला जखमांनी बुजबुजलेला, उंदरांनी कुरतडलेला मानवी देह आपल्या मांडीवर घेतला तेव्हा बघ्यांना, विरोध करणारांना, एकच प्र न विचारला. “या दुर्भाग्याच्या वाट्याला यातनामय, दुःखी जीवन आले. आता त्याला सुखाचे मरण तरी येऊ दे की नको?”
मुळात Mother आणि Mother-in-law असा फरक का करायचा? वास्तविक रक्ताची नाती हे अपघातच असतात. शेवटी माणूस हे माणूसच असते ना? त्याला माणुसकीची वागणूक मिळण्याचा हक्क नाही? पण रूढींचा पगडा समाजमानसावर इतका जबरदस्त असतो की प्रत्यक्ष सासूबाईंनाही ते उपकाराचे ओझेच वाटत राहिले. नाती कशी स्वच्छ, निर्मळ असावीत. रागलोभ, मतभेद रोखठोक त्यावेळपुरते असावेत. दबलेली, तोंडदेखली नाती काय कामाची? जे असहाय्य असतात, प्रतिकार करू शकत नाहीत अशा जराजर्जर वृद्धांवर आणि लहान मुलांवर हुकूमत गाजविण्यात कसला आला आहे पुरुषार्थ ? त्यांचे हट्ट, चमत्कारिक वागणूक हा जीवनाचाच एक भाग म्हणून सहन करायचे असतात, स्वीकारायचे असतात. वाढत्या वयाबरोबर भूक मंदावते, जिभेची चव जाते, श्रवण कमी होते, विस्मरण येते, मेंदूतही जैवरासायनिक बदल होत असतात. त्यामुळे वागणूक बदलते. मुद्दामहून कोणी काही त्रास देत नसतो. त्याला स्वतःलाही तो होत असतोच. सर्व काही त्या व्यक्तीच्या हट्टीपणाच्या, अहंकाराच्या गाठी बांधणे सोयिस्कर असले तरी बरोबर असेलच असे नाही. आणि त्यांचे म्हातारपण पाहत, एकटेपण पाहत पाहत मीही खूप काही शिकत होतोच ना? एका अर्थाने माझीही ती पूर्वतयारीच म्हणायची—माझ्या येणाऱ्या वार्धक्याची, कदाचित व्याधिग्रस्ततेचीपण. जीवनाला एक ओघ असतो सातत्याचा. पणजी, आजीआजोबा, नातवंडे पंतवंडे, असे सर्व सतत अनुभवत जगायला हवे. पा चात्त्य जगातील वयोगटानुसार समाजाचे स्तरीकरण, विभागणी मला पटत नाही. माझ्या मुलीची एक मैत्रीण 5-6 वर्षांच्या परदेशातील वास्तव्यानंतर परत आल्यावर काही काळ (जवळ जवळ वर्षभर) चक्रावून गेली होती. त्या पाचसहा वर्षांच्या काळात आपल्या समवयस्कांपलिकडे म्हणे इतरांशी मिळून मिसळून राहण्याची सवयच गेली होती तिची. इथे वडिलांचे सल्ले आणि चिल्लेपिल्ले, भाचेपुतणे अंगाखांद्यावर हुंदडताना पाहून ती गांगरूनच गेली.
म्हातारपणातले सर्वांत मोठे दु:ख आपल्याशिवाय जग छान मजेत चालले आहे, त्याचे काहीही अडत नाही, या जाणिवेत असावे असे वाटते. मग उगीचच जग बिघडत चालल्याची हाकाटी सुरू होते.
माझ्या माहितीच्या एक बाई आहेत. लग्नानंतर लगेच त्यांच्यावर सासूच्या अंथरुणातील दुखण्याची पुढील 15 वर्षे जबाबदारी पडली. त्यांचे सासरेही नव्वदीच्यावर जगले. बाई आजही प्रेमळ, हसतमुख आहेत. स्वभावात कडवटपणा नाही आला. माझ्या घरीच माझ्या धाकट्या वहिनीने माझ्या आईवडिलांचे 10-15 वर्षे सर्व केले. वडील तर बरेचसे लकवा भरल्यासारखे होते, मनानेही हरवल्यासारखे असायचे. त्यांचा त्रास असा नव्हता, पण खुप परावलंबित्व होते. ऐन पस्तिशीत माझ्या वहिनीला ही सर्व सेवा करावी लागली. आपले कौन्सिलिंगचे करियर, स्त्रीमुक्ती-संघटनेतले काम सोडून देऊन तिला हे करावे लागले. माझ्या बहिणीने तिच्या तीन सासवांची आणि एका मामेदीराची शेवटपर्यंत सेवा केली. या तिघीही स्त्रिया असल्यामुळे समाजधारणेत “त्यांचे ते कामच होते, त्यात विशेष काय?’ अशी भावना दिसते. पण आजच्या या सुविद्य, सुशिक्षित स्त्रियांना त्यांचेही करियर असू शकते हा विचारच नाही.
पुरुष Bread Earmer असतो म्हणजे काही त्याचे खास काही करियर, अभ्यासविषय असतो असे नाही. त्या त्या काळात अस्तित्वात असलेल्या उत्पादन/सेवा आर्थिक व्यवस्थेत तो नोकरीला लागतो आणि तेथील उतरंडीत यथावकाश वर वर चढत जातो इतकेच. जिथे जास्त आवक, संधी असेल तिकडे जाण्याचा तो प्रयत्न करतो. एकदा जम बसला की तिथूनच निवृत्त होतो. स्त्रीही पन्नाशीला मुले हातावेगळी झाली की घराच्या रामरगाड्यातून बरीचशी सुटी होते. स्वयंपाकपाणी इ. राहतेच. पण तरीही चमत्कारिक रिकामपण येतेच.
समस्या इथूनच सुरू होते. आयुर्मान वाढल्यामुळे, मुलांच्या समस्यांतून उसंत मिळालेल्यांपुढे सत्तरी गाठलेल्यांच्या सांभाळाची नवी जबाबदारी येते. बदलत्या परिस्थितीत पहिली पिढी, मधली पिढी, आणि उद्याची पिढी यांची त्रिस्थळी यात्रा तरी असते नाही तर राहती जागा फार अपुरी पडायला लागते. आपापसांतच राहण्याची, मी, माझे नातेवाईक, गाववाले, जातवाले अशी काहीशी जमातवादी प्रवृत्ती आजपर्यंत होती—त्यामुळे तीन्ही पिढ्या सर्वांनाच ओळखत असत. पण आज हे खूप बदलले आहे. तीन्ही पिढ्यांचे मित्र-मैत्रिणी वेगळेवेगळे असतात. मग आवडीनिवडी, खाणे पिणे, मौजमजा यांचे प्रकार भिन्न होतात. जागा अपुरी पडायला लागते. गर्दीही आपल्या देशात कुटुंबापासून ते शहरापर्यंत, शाळा कॉलेजांपासून ते कुंभमेळ्यापर्यंत असते. सार्वजनिक नळ, मुताऱ्या, संडास सर्वत्र एकच समस्या आहे. यातून मार्ग काढायचा तर “मी”ला मुरड घालायलाच हवी. दुसऱ्यांच्या अडचणी, मन जाणून घ्यायला हवे. स्वभाव आनंदी, अल्पसंतुष्ट हवा. आयुष्यातील कितीतरी आनंद हे मानसिकच असतात. सुखसोयी निराळ्या. त्या वाढवाव्यात तितक्या वाढत जातात. पण सुखसोयी आणि आनंद/संतोष यांची गल्लत करू नये. आयुष्य आज इतक्या झपाट्याने बदलत आहे की 5-10 वर्षांच्या अंतरातच पिढीचे अंतर (generation gap) वाटायला लागते. अशा वेळी कोणीच आपल्या पिढीचा बडेजाव मिरवू नये. प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान जपायला हवा. प्रत्येक व्यक्तीला आपले आयुष्य आपल्या पद्धतीप्रमाणे घडवायचे स्वातंत्र्य हवे. पण स्वातंत्र्यासोबत जबाबदारी, उत्तरदायित्वही येतेच. दुसऱ्याला किंमत मोजायला लावून “मी”, “माझे स्वातंत्र्य’ असू शकत नाही. पण ही झाली कायद्याची भाषा. जर्मनीत पालक मुलांचे बाबतीत निष्काळजी असतील, अन्याय अरेरावी करीत असतील, तर सरकार कायद्याचा बडगा उगारते. मुले वृद्ध आईवडिलांना विचारीत नसतील तर त्यांच्या उत्पनातून रकम कापून आईवडिलांस देते. यांत कोणाची शान उरली? प्रेम, आपुलकी, समजुतदारपणा, त्याग, समर्पित भावना या सुसंस्कारात मोडतात, कायद्यात नाही. आणि म्हणूनच एखाद्या असहाय्य, दुःखी, शरीराने थकलेल्या माणसाचा सांभाळ बोजा वाटण्याइतका जेव्हा समाज निबर, संवेदनाशून्य बनतो तेव्हा वाईट वाटते. कोणतेच कौटुंबिक, वैयक्तिक प्र न यातून सुटणार नाहीत.
6, सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई — 400 057