इराकी मोहिमेचे वैशिष्ट्य दोन प्रतिमांच्या रूपांत नजरेसमोर येते. बगदादच्या फिरदौस चौकातील सद्दाम हुसेनचा पुतळा उखडून टाकणे ही पहिली प्रतिमा. एका जुलमी राजवटीचा होत असलेला अंत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगात प्रस्थापित होत असलेली एक नवी व्यवस्था (World Order) ह्यांचे प्रतीक म्हणजे जणू ही प्रतिमा. दुसरी प्रतिमा आहे इराकी वस्तुसंग्रहालयाची आणि अमेरिकन तैनाती फौजांच्या नजरेसमोर गुंड तिथे करीत असलेल्या लुटीची. “अमेरिकाप्रणीत शांती’ (Pax Americana) ह्याच्या यश-अपयशावर ह्या दोन प्रतिमा फार अचूक टिप्पणी करतात : जबाबदारीशिवाय सत्ता! बुशचे पाठिराखे ह्या ‘बुश तत्त्वज्ञानाचे’ वर्णन साम्राज्यवादाचे पुनरागमन म्हणून करत नाहीत. त्यांच्या मते हा एका नवा नैतिक आदेश आहे आणि जगाच्या कुठल्याही भागावर स्वतःची इच्छा लादण्याच्या अमेरिकन वृत्तीचे हा आदेश समर्थन करतो.
हा खास अमेरिकन आंतरराष्ट्रीयवाद (American Internationalism) नैतिकदृष्ट्या योग्य आहे का हा विचार जरी बाजूला ठेवला तरी तो व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? हा प्र न उरतोच. साम्राज्ये नैतिक पायावर कधीच उभारली जात नाहीत. त्यांच्या वाढीला आधार देणारी नैतिक चौकट नंतर निर्माण केली जाते. पण स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्याआधी बुशच्या अमेरिकेने ‘ब्रिटिश राज’चे अनुभव विचारात घ्यायला हरकत नाही. ब्रिटिश साम्राज्याची उभारणी करणारे इतर कुठल्याही शोषणकर्त्यांसारखेच दांभिक होते. एका हातात बायबल आणि एका हातात पैशांची पिशवी घेऊनच ते आले. साम्राज्यातील गुलाम जनतेकडून ‘देवासाठी’ आणि ‘राजासाठी’ खंडणी वसूल करणे सहज शक्य होते कारण राजा आणि देवही इंग्रज असल्याबद्दल त्यांच्या मनांत मुळीच संदेह नव्हता. पण हे करण्यासाठी का होईना ते साम्राज्यवादी प्रत्यक्ष जाऊन काफिरांमध्ये राहिले आणि ख्रि चन धर्मात जरी जमले नाही तरी ‘व्यापार’ ह्या जास्त ‘आद्य’ धर्मामध्ये त्यांनी नेटिव्हांना आंतर्भूत करून घेतले. ह्या सगळ्या प्रक्रियेत ब्रिटिशांनी साम्राज्य तर घडवलेच पण ते स्वतःही घडत गेले. सत्ताधीश आणि दास दोघेही एकमेकांचे ‘जिवलग शत्रू’ बनले.
ज्या मेकॉलेने साम्राज्याचा गाडा चालवण्यासाठी आंग्लशिक्षित ‘ब्राऊन साहेब’ तयार केले, त्याच मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीने भारतातील बुद्धिवंतांना भाषिक आणि बौद्धिक साधने मिळवून दिली. ह्या साधनांच्या मदतीने त्यांनी साम्राज्याच्या अनियंत्रित सत्तेला आ mन दिले. ह्यूमने जेव्हा काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्याने फक्त भार-तीयांच्या राजकीय जाणिवांना वळण देण्याचेच काम केले नाही तर इंग्लंडमधील अन्याय-पीडित जनता आणि इथली शोषित जनता ह्यांच्यामध्ये एक सहानुभूतीचा बंध निर्माण केला. गांधीजींच्या 1930 सालच्या इंग्लंडभेटीमध्ये मॅचेस्टरच्या गिरणीकामगारांनी भारावून जाऊन त्यांचे जे अभूतपूर्व स्वागत केले ते आजकाल फक्त खेळाडूंचे अथवा सिनेकलावंतांचेच केले जाते. त्यांच्याच गिरणीत बनलेल्या कापडाची त्या महात्म्याने केलेली नाकेबंदी त्यांच्या बेकारीचे कारण ठरू शकते ह्याची पूर्ण जाणीव असूनही ते स्वागत त्यांनी केले. चर्चिलच्या ह्या ‘अर्धनग्न फकिराबद्दल’ त्यांना वाटणारे आंतरिक प्रेम हे शोषण करणारा आपल्या दोघांच्या शत्रू एकच आहे ह्या जाणिवेवर आधारित होते.
राजकीय जाणिवा जागृत होत असलेला मध्यमवर्ग, ब्रिटिश सैन्याची वाहतूक करण्यासाठी उभारलेले रेल्वेचे जाळे ज्याने राष्ट्रवादाची बीजेसुद्धा दूरवर पसरवली आणि अगदी क्रिकेटचा खेळसुद्धा, साम्राज्यवादाच्या उदरातच वाढणाऱ्या ह्या राष्ट्रीय जाणीवेच्या गर्भाला पोषक ठरले. अगदी मिठाच्या सत्याग्रहासाठी काढलेल्या दांडीयात्रेतूनही गांधीजींनी एका विशिष्ट कायद्याला आmन केले—-आपण सर्व कायद्यांच्या पलिकडे आहोत असे त्यांनी कधीच म्हटले नाही. स्वतःला अटक करवून घेऊन विरोध करण्याचा आपला हक्क त्यांनी अधोरेखित केला—-कायद्याची चौकट मोडली नाही. त्या चौकटीमुळेच हा विरोध शक्य झाला होता.
नेटिव्हांना सुधारून शहाणे करण्याचे हे ब्रिटिशांचे तथाकथित मिशन असे दुधारी ठरले! ताजमहाल तोडून त्यातल्या संगमरवराचा उपयोग सार्वजनिक बांधकाम विभागासाठी केला पाहिजे असे म्हणणाऱ्या बेंटिंकबरोबरच भारताच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे अनेक ब्रिटिश अभ्यासकही निर्माण झाले. ह्या विद्वानांच्या संशोधनातून लिहिली गेलेली भारताची गाथा आपण अजून उलगडतो आहोत. जे. एस्. मिल आणि व्हिन्सेंट स्मिथ ह्यांच्या मार्गदर्शक तत्त्वज्ञानाचा आधार नसता तर विशिष्ट आणि वैश्विक ह्यातील संबंध स्पष्ट करणारी इतिहासाची प्रणाली निर्माण होऊ शकली असती का? अमेरिकन नव-साम्राज्यवादाचा पुरस्कार करणारे पुस्तकी तत्त्वज्ञ ह्या बौद्धिक संकराच्या अगदी विरुद्ध विचारसरणीचे आहेत. सर्व प्रकारचे सांस्कृतिक संसर्ग, जंतुनाशके टाकून शुद्ध करण्यावर त्यांचा भर आहे. जगाच्या नव्या नकाशात अमेरिका हे नैतिकतेचे प्रमुख दक्षिणोत्तर रेखावृत्त (Prime-Meridian) आहे. ह्या नवीन रूढीप्रियतेचा गुरू अॅलन ब्लूम आहे आणि त्याचे The Closing of The American Mind हे पुस्तक त्याच्या मते ‘नैतिक सापेक्षतावाद’ ह्या विषयावरचे मूलभूत लिखाण आहे.
ब्लूमच्या मते ‘कुठलाही विधिनिषेध नसलेल्या हलक्या लोकांच्या’ (Lesser breeds without the law) संसर्गात आल्यामुळे अमेरिका आपले बौद्धिक वर्चस्व गमावून बसली आहे. त्याच्यामते हे बौद्धिक श्रेष्ठत्व परत मिळविण्यासाठी अमेरिकेला गोऱ्या अँग्लो-सॅक्सन प्रॉटेस्टंट नैतिकतेवर आधारलेली मूल्यव्यवस्था पुन्हा अंगीकारायला हवी. इतर सर्व गोष्टी म्हणजे नीतिभ्रष्टता आहे, ज्याचे समूळ उच्चाटन करावे असा हा रोग आहे. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या सर्व पंथांमध्ये दिसणारा आत्मगौरवाचा हा अहंमन्य आविष्कार हे अमेरिकेच्या नवसाम्राज्यवादाचे लक्षण आहे. टॉमहॉक अस्त्र जसे दुरून फेकतात तसा हा साम्राज्यवादही ‘रिमोट कंट्रोल’नेच हाताळतात.
खुर्चीत बसून युद्ध खेळणाऱ्या योद्ध्याच्या गनशिप राजनीतीने आता ब्रिटानियाच्या गनबोट राजनीतीला मागे टाकले आहे. (पूर्वी वसाहतींमधील बंडाचा बिमोड करायला ब्रिटिश सरकार तोफा असलेल्या बोटी किनाऱ्यापाशी आणून त्यांचा वापर करत असे. आता त्याहीपेक्षा दुरून चिलखती हेलिकॉप्टरच्या मदतीने अमेरिका युद्ध खेळते आहे.) बटन दाबून लष्करी डावपेच खेळणाऱ्यांना गंगादिन (किप्लिंगने ज्याचे वर्णन “माझ्यापेक्षा थोर माणूस’ असे केले) आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’मधील ओमर शरीफ ह्यांच्यातला फरक काय कळणार? कदाचित् हॉलिवुडसुद्धा ‘सद्दामनंतर’ अशा प्रवेशांचे चित्रण करण्यात गुंतले असेल. रॅम्बोच्या रक्तळलेल्या डोळ्यातून दिसणारा इतिहास हा एकच दृष्टिकोन आणि .45 कॅलिबरच्या बंदुकीतून सणसणत सुटलेली गोळी एवढी एकच कृती.
ब्रिटिशांच्या इथल्या राजवटीचे न बुजणारे व्रण शिल्लक असले तरी त्या राजवटीमुळेच मोठ्या प्रमाणावर विस्कळीत आणि अज्ञानी असलेली भारतीय जनता एकत्रित झाली, प्रबुद्ध झाली. शेक्सपियरच्या टेम्पेस्ट ह्या नाटकातील पशुतुल्य कॅलिबनचे अतिशय तरल आणि प्रसन्न अशा ‘एरियल’ मध्ये रूपांतर होण्याची निदान वाटचाल तरी सुरू झाली. म्हणूनच जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा त्यांनी मागे सोडलेल्या ह्या देशाचे एका विशाल लोकशाहीत परिवर्तन झाले. लोकशाहीतील एक आ चर्य म्हणून जगाने त्याच्याकडे पाहिले. अमेरिकाप्रणीत शांती प्रस्थापित करणारा अमेरिकन धर्मयोद्धा मात्र Dr. Strangelove or why I Love the Bomb ह्या सिनेमातील डॉ. स्ट्रेंजलव्हप्रमाणे आहे. जिवंत व्यक्तींपेक्षा मुडद्यांबद्दल जास्त प्रेम वाटणारा हा माणूस अनिर्बंध सत्तेवर विश्वास असणारा आहे. म्हणूनच त्याला “मेलेला शत्रू हा जिवंत शत्रूपेक्षा जास्त चांगला” असे स्वाभाविकपणे वाटते. पण मुळात हा शत्रू का निर्माण झाला ह्याबद्दल आत्मपरीक्षण कुठेच नाही. म्हणूनच जेव्हा केव्हा अमेरिका इराक सोडेल तेव्हा त्या इराकभेटीचे सार म्हणून बगदादमधील लुटलेले वस्तुसंग्रहालय डोळ्यासमोर उभे राहील. ते वस्तुसंग्रहालय ही जणू ‘अमेरिका इथे येऊन गेली’ हे सांगणारी नोंदवहीतील नोंद आहे. इथून पुढे कुठे? दमास्कस?
(18 एप्रिल, 2003 रोजी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये जग सुरैयांचा Bush-button Imperialism हा लेख प्रसिद्ध झाला—-त्याचा हा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत.)