ज्या ऐतिहासिक प्रक्रियेने भारताला तरल, नाजुक, नखरेल दर्शने, धर्मशास्त्र, वास्तुकला आणि संगीत दिले; त्याच प्रक्रियेने उपाशी, मरगळलेली खेडी, संधीसाधू आणि हावरट ‘सुसंस्कृत’ (नागर) वर्ग, नाराज कामगार, ढासळती मूल्ये, अंधश्रद्धा यांनाही जन्म दिला. एक अंग दुसऱ्या अंगाचा परिणाम आहे. एक अंग दुसऱ्याची अभिव्यक्ती आहे.
अगदी अनघड, प्राथमिक हत्यारांमुळे अतिरिक्त उत्पादन तुटपुंजे राहिले, आणि तेही (तंत्रज्ञानाला) समरूप अशा जुन्यापुराण्या समाजव्यवस्थेने हिरावून घेतले. बहुसंख्यकांच्या दारिद्र्यावर आपला ऐषारामी सुसंस्कृतपणा रचलेला आहे, हे विसरून उच्च वर्गाला आपला उच्चपणा अंगभूत श्रेष्ठतेतून आला, असे वाटू लागले. इतिहास म्हणजे स्वैर, विस्कळीत घटनांची माळ नव्हे. आपल्या दैनंदिन गरजा भागवायला माणसे जे करतात, त्यातून इतिहास घडतो. मूठभरांनी इतरांच्या श्रमांवर जगत आपल्या गरजा भागवण्यातून इतिहास ‘सुंदर’ होत नाही. त्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करताना आपल्या बांधवांशी केलेल्या सहकार्याची गरज असते. इतर पुढारलेल्या समजल्या जाणाऱ्या देशांच्या उपलब्धी त्यांच्या फाटक्या कपड्यांच्या दानशूरांनी (ragged–trousered philanthropists) पुरवल्या आहेत. भारतातल्या दात्यांना पायताणे- कपडेच मिळाले नाहीत.
थोर आचार्य, लकाकते राजे-राजवाडे, कवच-शस्त्रधारी सेनापती, लक्ष्मीपुत्र शेठजी आणि लोकनायक हे इतिहास घडवत नाहीत, तर सामान्य, अज्ञानी, मागासलेले लोक इतिहास घडवतात—-ही मांडणी औपचारिक दुराग्रहाची वाटेल, पण ती खरी आहे. समाजातल्या वर्गाच्या हितसंबंधांमधल्या फरकाचे विश्लेषण, एखादा नवा वर्ग कोणत्या गुणांमुळे उदयाला येतो, तो कधी आणि कुठे समाजाला नवे काही न देता आपल्याच हितसंबंधांना जपत प्रतिगामी बनतो, या साऱ्याचा अभ्यास हेच इतिहासाचे योग्य क्षेत्र आहे.
काही वाचक माणूस केवळ पोटासाठीच जगत नाही, असे सांगतील. आपल्या अमर आत्माच्या उन्नयनातूनच माणसांचे समाज आणि इतिहास घडतात, यावर आग्रह धरतील. यात पंचाईत अशी की माणूस भाकरीशिवाय जगू शकतच नाही. आणि शरीर जगवल्याशिवाय आत्मा—-जर परवडत असला तर—-तगवता येत नाही. एकमेकांशी काहीतरी संबंध असल्याशिवाय माणसांच्या समूहाचा समाज बनतच नाही. आणि हा संबंध मुळात रक्ता-नात्याचा नसतो, तर त्याहून खूप विस्तृत अशा वस्तूंच्या उत्पादनाचा आणि देवघेवीचा असतो.
प्रत्येक समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कशाकशाची गरज वाटते, त्या गरजा कोण पूर्ण करते, त्यासाठी कोणती अवजारे वापरते, कोणाच्या श्रमांवर कोण जगते, त्यासाठीचे हक्क दैवी असतात की कायद्याने नेमून दिलेले (पंथ आणि कायदे ही समाजाच्या व्यवहाराची उपांगे आहेत), अवजारे आणि जमिनीची मालकी कोणाकडे असते, अतिरिक्त उत्पादनाची विल्हेवाट कोण आणि कशी लावतात, वस्तू कोणत्या स्वरूपात वितरित होतात, वगैरे वगैरे.
समाज उत्पादनाच्या धाग्यांनी बांधला जातो. (हा) इहवाद मानवी मूल्ये तर नष्ट करत नाहीच, उलट त्या मूल्यांमागची भूमिका आणि आजच्या समाजाची स्थिती यांच्यातील संबंध स्पष्ट करतो. जशी मूल्ये वस्तूंच्या देवाणघेवाणीतूनच उद्भवली तशी संकल्पनांची देवाणघेवाण करणारी भाषाही वस्तुव्यवहारातूनच उपजली—-आणि भाषे-शिवाय चिद्वादी आत्म्याची कल्पनाही करू शकत नाहीत. तत्त्वांचा, दर्शनांचा विचार करणारा माणूस यंत्राधारित जगाला प्रयत्नानेही दोन हजार वर्षांपूर्वी बैलगाडीच्या देशात घडलेल्या विचारधारांच्या मुशीमध्ये ओतून घडवू शकत नाही.
आज भारतावर अधिसत्ता आहे ती नागर मध्यमवर्गाची. इतिहासाच्या ओघाने या वर्गाला काही खास गुणधर्म बहाल केले आहेत. हा वर्ग तांत्रिक बाबतींत मागासलेला आहे. त्याची उत्पादन-पद्धत आणि मानसिकता क्षुद्र भांडवलदाराची आहे. दळणवळण आणि संदेशवहनाची साधने नगण्य आहेत. इथले सरकार मात्र एका विशेष मोक्याच्या जागेवर स्थिरावले आहे. भांडवली संसाधनांचा सर्वांत मोठा संच सरकारकडे आहे. मनात आले तिथे सरकार एकाधिकार प्रस्थापित करू शकते. ही अनिर्बंध भासणारी सत्ता लोकांच्या खऱ्या गरजा पुरवायला वापरणे, तिची जाहीर समाजवादी धोरणांशी सांगड घालणे, लहानमोठ्या भांडवलदारांच्या हावरटपणाला बंधने घालणे, अशी अनेकपदरी जबाबदारी पार पाडण्यासाठी वापरावी लागणार आहे.
[ॲन इंट्रोडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी’ (पॉप्युलर, 1956) या दामोदर धर्मानंद कोसंबींच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील हा उतारा. आज दळणवळण–संदेशवहन सुधारते आहे आणि प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यांत समाजवाद उरला असेल तरी नावापुरताच आहे. पण इतर विश्लेषण मात्र आजही (कुठेकुठे प्रथमावृत्ती लिहिताना पेक्षा जास्त) नेमकेपणाने लागू पडणारे आहे.]