[1974 मध्ये प्रकाशित झालेल्या प्राध्यापक पीटर सिंगर यांच्या ‘All Animals are Equal’ या लेखाचा स्वैर अनुवाद व संक्षेप. सिंगर हे ऑस्ट्रेलिया-तील मेलबोर्न येथे मोनॅश युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.]
अलीकडच्या काळात पीडित वर्गांनी विषमतेविरुद्ध जोराचे लढे दिले आहेत. त्यांचे एक अभिजात (classic) उदाहरण म्हणून अमेरिकी संस्थानांतील कृष्णवर्णीयांनी केलेल्या चळवळींचे देता येईल. काळ्या लोकांना दुय्यम नागरिक ठरविणाऱ्या पूर्वग्रह आणि पशुतुल्यव्यवहार या प्रवृत्तींचा उच्छेद झाला पाहिजे अशी या चळवळीची मागणी होती. तिच्या पाठोपाठ आपण अनेक अन्यही लढे पाहिले आहेत.
मोचक चळवळींची मागणी आपल्या नैतिक क्षितिजाच्या विस्तारांची आणि समानतेच्या मूलभूत तत्त्वाच्या पुनर्विवरणाची असते. स्वाभाविक आणि अपरिहार्य मानले गेलेले आचार वस्तुतः असमर्थनीय पूर्वग्रहाचे परिणाम आहेत असे दिसू लागते. आपल्या वृत्ति (attitudes) आणि आचार निर्दोष आहेत असे छातीठोकपणे कोण म्हणू शकेल? आपण इतरांना छळणाऱ्या लोकांपैकी आहोत असे मानले जाणे आपल्याला अप्रिय असेल, तर आपल्या अतिशय मूलभूत प्रवृत्तींचाही पुनर्विचार करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या वृत्तींचा आणि त्यांच्यातून उद्भवणाऱ्या आचारांचा विचार आपल्याला सर्वांत अधिक पीडित लोकांच्या दृष्टिकोनातून करावा लागेल. तो जर आपण करू शकलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या वृत्ति आणि आचार यांचा एक ठराविक नमुना (pattern) असून त्याचा परिणाम एका वर्गाला (म्हणजे आपल्या), दुसऱ्या वर्गावर अन्याय करून, लाभदायक होतो. असे झाले तर एका नवीन मोचनचळवळीची आवश्यकता आहे असे आपल्याला जाणवेल. माझा उद्देश एका फार मोठ्या वर्गाविषयीच्या आपल्या वृत्ती आणि आचार यांत बदल करण्याची गरज आहे हे सांगण्याचा आहे—- म्हणजे मनुष्यजातीहून अन्य जातींच्या सदस्यांविषयी, ज्यांना आपण प्राणी म्हणतो, त्यांच्या वर्गाविषयी. अन्य शब्दांत, आपण समानतेच्या तत्त्वाचा विस्तार करून ते जसे आपण आता मनुष्यजातीच्या सर्व व्यक्तींना लागू करतो, तसेच ते मनुष्येतर प्राणिजातीतील व्यक्तींनाही लागू करावे अशी माझी आग्रहाची मागणी आहे.
ही मागणी असमंजस (absurd) आहे असे आपल्याला वाटेल. जेव्हा 1792 साली मेरी वॉलसोनक्राफ्टने1 स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन हा ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा तिची मागणी अशीच असमंजस, अनुचित, आणि अर्थहीन मानली गेली. एवढेच नव्हे तर टॉमस टेलर या केंब्रिज विद्यापीठातील एका तत्त्वज्ञाने पशुंच्या हक्कांचे समर्थन या नावाच्या ग्रंथात तिचे विडंबनही केले. टेलरच्या युक्तिवादांचा सारांश असा की जर वॉलस्टोनक्राफ्टचे युक्तिवाद बरोबर असतील तर कुत्री, मांजरे आणि घोडे यांनाही ते लागू पडले पाहिजेत; पण पशुंना हक्क आहेत ही कल्पना उघडच विपर्यस्त असल्यामुळे ते युक्तिवाद स्त्रियांच्या बाबतीतही हास्यास्पद असले पाहिजेत.
टेलरच्या युक्तिवादाचा आधार स्त्री आणि पुरुष यांच्यात असणारे भेद हा होता. तोच युक्तिवाद काळे आणि गोरे यांच्याशी केल्या जाणाऱ्या विषम व्यवहाराच्या समर्थनार्थ केला गेला. सर्व मानव समान आहेत असे म्हणणारे रंगाचा भेद नाकारीत नव्हते. ते म्हणत होते की रंगाचा भेद हे विषम वागवणुकीचे समर्थन असू शकत नाही. सर्व माणसे वस्तुतः समान नाहीत ही सर्वथा उघड गोष्ट होती. माणसामाणसात शारीरिक बळ, बौद्धिक सामर्थ्य, रंग, चेहऱ्याची ठेवण, इत्यादि बाबतींत सुस्पष्ट भेद असतात. सर्व माणसे समान आहेत असे म्हणणारे लोक हे भेद नाकारीत नव्हते. सर्व माणसे समान आहेत असे आग्रहाने प्रतिपादणारे सुधारक समानता ही वस्तुस्थिती आहे असे म्हणत नव्हते. ते तिचा पुरस्कार नैतिक आदेश किंवा उपदेश (prescription) म्हणून करीत होते. ते म्हणत होते की एखादी व्यक्ति स्त्री आहे किंवा कृष्णवर्णीय आहे ही गोष्ट समानतेला पात्र असण्याच्या दृष्टीने अप्रस्तुत, गैरलागू आहे. वंशवादी (racist), (म्हणजे काळ्यांपेक्षा गोरे श्रेष्ठ आहेत असे म्हणणारे लोक) स्वतःचा वंश श्रेष्ठ आहे; असे मानीत असले तरी ते खरे नाही; कारण काही काळे अनेक गोऱ्यांपेक्षा अधिक बलवान्, बुद्धिमान, सज्जन, गुणी असतात हे निर्विवाद आहे. तसेच लिंगवादी (sexist), म्हणजे पुरुषांना श्रेष्ठ मानणारे लोक, एका असत्याचा पुरस्कार करीत होते हेही प्रत्यक्ष वस्तुस्थितीने सिद्ध केले आहे. म्हणजे व्यक्तीचा वंश किंवा तिचे लिंग तिच्या वास्तविक सामर्थ्याचे द्योतक होऊ शकत नाही. वंश किंवा लिंग यांच्या आधाराने व्यक्तिव्यक्तीत पक्षपात करणे गैर आहे.
सर्व मानवांच्या समानतेची मागणी हे एका वास्तवाचे (fact) प्रतिपादन नव्हे; समानता हा नैतिक आदर्श आहे. मानवांनी मानवांशी कसे वागावे, त्यांना कोणती वागणूक द्यावी, याविषयीचा उपदेश किंवा आदेश आहे. कोणतेही वास्तव त्याला विरोध करू शकत नाही.
समानतेचा पुरस्कार करणारे सुधारक सर्व माणसांची सामर्थ्य समान आहेत असे म्हणत नव्हते. ते म्हणत होते की आपण सर्वांना समानतेने वागविणे आपले कर्तव्य आहे. सर्वांची सारखीच काळजी किंवा चिंता (equal concern) आपण केली पाहिजे, सर्वांच्या हिताची समान चिंता किंवा काळजी करणे हे नीतीचे प्रधान तत्त्व आहे असे आज अनेक नीतिमीमांसक म्हणत आहेत. पण हे तत्त्व मनुष्येतर प्राण्यांनाही लागू आहे ही गोष्ट मात्र फार थोड्या लोकांना मान्य होते. ज्या अत्यंत थोड्या लोकांना ती मान्य होती त्यांच्यात जेरेमी बेंटम या उपयोगितावादाच्या संस्थापकाची गणना होते. ‘प्रत्येकाची गणना एक म्हणूनच केली पाहिजे, एकाहून अधिक कोणाचीही नव्हे’, (Each to count for one, none for more than one) या तत्त्वाची उपयोगितावादाचे सारभूत तत्त्व म्हणून घोषणा त्याने केली. तो लिहितो, “एक दिवस हे सर्वमान्य होईल की पायांची संख्या, कातडीचा रंग या गोष्टी कोणाही चेतन व्यक्तीला पीडकांच्या हवाली करण्याचे समर्थक कारण होऊ शकत नाही. मग समान वागवणुकीची अलंघ्य रेषा कोठे काढता येईल? ती विवेकवान असणे किंवा संभाषण करू शकणे येथे काढता येणार नाही. कारण एखादा प्रौढ कुत्रा किंवा घोडा नुकत्याच जन्मलेला किंवा काही महिने वयाच्या अर्भकाच्या तुलनेत अधिक विवेकी आणि संभाषण-योग्य निःसंदेह असतो. म्हणून त्यांना तर्क करता येतो काय?’ किंवा ‘त्यांना बोलता येते काय?’ हा प्र न प्रस्तुत नाही. प्रस्तुत आहे ‘त्यांना दुःख होऊ शकते काय?’ हा प्र न.”
या छेदकात बेंटम दुःख अनुभवण्याची योग्यता समान चिंता किंवा काळजी यांना पात्र असण्याचे पर्याप्त समर्थन कारण आहे असे म्हणतो आहे. सुखदुःख अनुभवण्याची योग्यता ही हितकर किंवा अहितकर असा भेद करण्याची अपरिहार्य अट आहे. दगडाला हिताहित नसते, कारण त्याला सुखदुःखानुभव नसतो. परंतु उंदराला हिताहित असते, कारण त्याला सुखदुःखानुभव असतो. जर एखाद्या प्राण्याला सुखदुःखे होत असतील तर ती लक्षात घेण्याचे नाकारणे हे सर्वथा असमर्थनीय आहे. म्हणून चेतनेचे अस्तित्व ही चिंता किंवा काळजी यांस पात्र असण्याची अपरिहार्य (necessary) आणि पर्याप्त (sufficient) अट आहे.
वंशवादी आपल्या वंशाचे हित सांभाळताना समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करतो, आणि तसेच जातिवादी (speciesist) आपल्या जातीला (species) श्रेष्ठ ठरवून अन्यजातींच्या हिताकडे दुर्लक्ष करतात. बहुतेक सर्व माणसे जातिवादी असतात हे पुढील छेदकातील वस्तुस्थितीवरून दिसून येईल.
मनुष्येतर जातींच्या व्यक्तींची आपली गाठ पडते भोजनाच्या वेळी. त्या आपले भक्ष्य असतात. त्यांना आपण साधन म्हणून वापरतो. जीवन आपल्या रुचीच्या समाधानाकरिता आहे जसे आपण समजतो. पण त्याचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही. आपल्या अन्नविषयक गरजा आपण मांसाहाराशिवाय भागवू शकतो. मांसाहारातून आपल्याला अत्यंत आवश्यक असे प्रोटीन आदि पदार्थ मिळतात असे आपण म्हणतो. परंतु ते जीवनात आवश्यक पदार्थ आपल्याला सोयाबीन आणि इतर वनस्पतींपासून प्राप्त होऊ शकतात, असे संशोधन झाले आहे.
पशुंची हत्या करणे एवढाच फक्त आपण जिव्हालौल्याखातर मनुष्येतर प्राण्यांवर करीत असलेला अन्याय नाही. आपण त्यांच्यावर लादत असलेले दुर्धर कष्ट आणि दुःख त्याहून जातिवादाचे अधिक द्योतक आहेत. आपल्याला कमी दरात मांस मिळावे म्हणून वापरल्या जाणाऱ्या मांसोत्पादनाच्या अमानुष रीतींकडे समाज काणाडोळा करतो. जनावरांना अत्यंत अपुऱ्या जागेत कोंडून त्यात त्यांना सबंध आयुष्य व्यतीत करायला तर आपण लावतोच, पण त्यांची रवानगी कत्तलखान्यांत करण्याकरिता योजले जाणारे उपाय अंगावर शहारे आणणारे आहेत. जनावरे म्हणजे केवळ मांसोत्पादनाची चेतनाहीन यंत्रे आहेत अशा त-हेचा आपण त्यांच्याशी व्यवहार करतो. हे सर्व आपण केवळ जिव्हालौल्याकरिता करतो. हे जातिवादाचे स्पष्ट द्योतक आहे. जातिवादाचे पक्षपाती आचार थांबविण्याकरिता आपण सर्वांनी मांसोत्पादनाला निकराने विरोध करणे आपले परम कर्तव्य आहे. ते करणे सोपे नाही हे खरे आहे. परंतु ते अशक्य नाही असे म्हणता येईल. उदा. अमेरिकेतील दक्षिणेतील गोऱ्यांना गुलामांना मुक्त करताना कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांपेक्षा ते अधिक कठीण नाही. जर आपण आपल्या आहारविषयक सवयी बदलल्या नाहीत, तर गुलामांच्या मालकांना गुलामगिरीबद्दल दोष कसा देता येईल?
आपली जातिवादी दृष्टी औषधीय संशोधनातही दिसून येते. माणसांवर त्यांच्या संमतीवाचून करता न येणारे प्रयोग आपले वैज्ञानिक, कुत्री, मांजरे, उंदीर, माकडे इत्यादि प्राण्यांवर खुशाल करतात. कोणती औषधे माणसांना चालू शकतील हे जाणून घेण्याकरिता जगभर निघृण प्रयोग चालू असतात. जेव्हा माणसांना मनुष्येतर प्राणिजातीपेक्षा श्रेष्ठ ठरविण्याचे सर्व युक्तिवाद सदोष आहेत असे दिसून येते तेव्हा जातिवादी कोठल्या तरी मुलखावेगळ्या वैशिष्ट्याचा आधार घेतात. उदा. ते म्हणतात की मनुष्यप्राण्याची एक स्वाभाविक प्रतिष्ठा (dignity) असते, आणि तिच्यामुळे मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी यांच्यातील अनुल्लंघ्य दरीचे दर्शन घडते. तसेच ते असेही म्हणतात की माणसांना विवेकशक्ती असल्यामुळे ती साध्ये (ends) असतात, आणि म्हणून कोणीही मनुष्येतर प्राणी त्यांच्याशी बरोबरी करू शकत नाही. परंतु मनुष्याची तथाकथित प्रतिष्ठा काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. मनुष्य साध्य (end) असल्यामुळे सर्व मनुष्येतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हे म्हणणे निरर्थक आहे. खरी गोष्ट अशी आहे की आपण सर्व इतके जातिवादी आहोत की मानवाची तथाकथित प्रतिष्ठा किंवा त्याचे साध्यत्व ह्या धूसर कल्पना आपण ताबडतोब स्वीकारतो आणि त्यांच्या संशयास्पद साह्याने आपण सर्वश्रेष्ठ आहोत अशी सोयिस्कर समजूत करून घेतो. पण सर्व मनुष्यांना स्वाभाविक प्रतिष्ठा असते असे म्हणताना, सर्व, म्हणजे महिना, दोन महिन्यांची अर्भके, विकलांग (invalids), मनोरुग्ण, एवढेच नव्हे तर हिटलर, स्टॅलिन यांनाही जी असते, आणि जी हत्ती, डुक्कर किंवा चिंपांझी यांना अप्राप्य असते असा कोणता गुण आहे, हा प्र न निरुत्तर करणारा आहे असे आपल्या लक्षात येते. अनेकदा तत्त्वज्ञ जेव्हा प्रतिष्ठा, आदरणीय, किंवा मूल्यवान इत्यादि कल्पनांना आवाहन करतात तेव्हा त्यांच्याकडचे युक्तिवाद संपलेले असतात अशी स्थिती असते.
संक्षिप्त अनुवाद – दि. य. देशपांडे